आम्ही कोण? 

विवेक मराठी    11-Aug-2018   
Total Views |


पाकिस्तानात 97% मुसलमान आहेत. त्यांचा धर्म एक आहे. प्रेषित मोहम्मदांवर आणि अल्लावर त्यांची श्रध्दा आहे. एवढया आधारावर पाकिस्तान नावाचे राज्य निर्माण झालेले नाही आणि त्या राज्याचे राष्ट्र होणार नाही. कारण भारतात जशी बहुविधता आहे, तशी पाकिस्तानातदेखील आहे. पंजाबी, सिंधी, बलुची, पखतुनी हे चार मोठे भाषिक गट आहेत. भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांना मोहाजिर म्हणतात. हे भाषिक गट त्यांना आपले मानत नाहीत. पाकिस्तानातील त्यांचे स्थान 'उपरे' असे आहे. पंजाब, सिंध, बलुचिस्तान यांची भाषिक संस्कृती वेगळी आहे. प्रादेशिक सण-उत्सव वेगळे आहेत. याला जोडून पाकिस्तानात 2% हिंदू आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत आणि अत्यल्प पारशी आहेत, हे सर्व अल्पसंख्य आहेत. या सर्वांची मिळून राष्ट्रीय ओळख कोणती?

इम्रान खान यांची तेहरीक-ए-इन्साफ ही पार्टी सर्वाधिक जागा मिळवून निवडून आली. इम्रान खान यांच्या खांद्यावर पाकिस्तानचे नेतृत्व करण्याची जबाबदारी येणार, हे निश्चित झाल्यानंतर भारतात चर्चा सुरू झाली - भारत-पाक संबंध कसे राहणार? काहींनी मत मांडले की ते सुधारणार, तर दुसऱ्यांनी मत मांडले, बिघडणार. इम्रान भारतद्वेष्टा आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारणार नाहीत, असे काही जणांचे मत आहे. ही मते ऐकली आणि वाचल्यानंतर लिहिणाऱ्यांच्या अज्ञानावर आपण हसावे की रडावे असा प्रश्न मला पडतो. पाकिस्तानच काय, कोणत्याही देशाचे परराष्ट्रीय धोरण केव्हाही व्यक्तिसापेक्ष नसते. एखादी व्यक्ती आल्याने या धोरणात कधी आमूलाग्र बदल होत नाहीत किंवा परंपरेने चालू असलेले धोरण सोडून दिले जात नाही. म्हणून पाकिस्तानचा प्रमुख इम्रान होवो की गुमरान होवो, पाकिस्तानच्या कटकटी थांबणार नाहीत.

याचे ऐतिहासिक कारण आहे - 'आम्हाला हिंदूंच्या वर्चस्वाखाली राहायचे नाही' या तत्त्वावर पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातून हिंदूंचा द्वेष हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे पहिले कलम ठरले. आपण भारताचे तुकडे केले आणि इंग्रजांची मदत घेऊन पाकिस्तान तयार केले, हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना माहीत आहे. पाकिस्तानविषयी भारतात कोणाच्याच मनात विश्वास नाही. भारतातील राजकीय पक्ष मते मिळविण्यासाठी मुस्लीम अनुनय करतात, काँग्रेस त्यात आघाडीवर असते. परंतु काँग्रेसच्या मनातच पाकिस्तानविषयी विश्वास नाही. काँग्रेसच्याच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले. पाकिस्तान आणि भारत या दोघांत एकमेकांविषयी अजिबात विश्वास नाही. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी कायम लक्षात ठेवावी लागते. दोन देशांचे राष्ट्रप्रमुख जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा ते गळाभेट घेतात, एकमेकांना खाना देतात, परस्पर चर्चेने प्रश्न सोडविण्याचे पत्रक काढतात, ही सगळी राजकीय नाटकबाजी असते. आपली ओळख कोणती? हे पाकिस्तान जोपर्यंत निश्चित करत नाही, तोपर्यंत ती नाटकबाजी चालू राहणार.

पाकिस्तान निर्मिती कशासाठी?

पाकिस्तानची निर्मिती इस्लामच्या आधारावर झाली. 1947 साली पाकिस्तान नावाचे राज्य अस्तित्वात आले. या राज्याचे राष्ट्र-राज्य अजूनपर्यंत काही झालेले नाही. ते आणखी शंभर वर्षे गेली तरी होणार नाही. मुळात राज्याची निर्मिती ऐतिहासिक प्रक्रियेतून घडावी लागते. प्राणिजीवनात प्राण्याचा जन्म व्हायचा असेल, तर एक तर त्याला आईच्या उदरात काही काळ राहावे लागते किंवा अंडयात काही काळ राहावे लागते. लगेचच कोणाचा जन्म होत नाही. राज्याचेही असेच आहे. त्याच्या जन्मासाठी शंभराहून अधिक वर्षे जावी लागतात आणि राज्याचे राष्ट्र होण्यासाठी तीन-चारशे वर्षे तरी जावी लागतात. प्राणिजन्मासाठी काही दिवस, काही महिने पुरतात. राज्याचे तसे नसते.

पाकिस्तानचा जन्म 1947 साली अचानक झाला. 1940 साली मुस्लीम लीगने पाकिस्तानचा ठराव केला. या ठरावात पाकिस्तान असा शब्दप्रयोग नाही. पाकिस्तान झाल्यानंतर जिना म्हणाले, ''माझ्या हयातीत मी पाकिस्तान पाहू शकेन असे मला वाटत नव्हते.'' असे अचानक जेव्हा राज्य निर्माण होते, तेव्हा त्याच्यापुढे अनंत समस्या उभ्या राहतात. पाकिस्तान हे त्याचे उत्तम उदाहरण. इस्लामच्या नावाने पाकिस्तान निर्माण झाले. अल्लाकडे सार्वभौमत्व देऊन पाकिस्तानची राज्यघटना तयार झाली. मग प्रश्न सुरू झाले की, इस्लाम आणि अल्ला कुणाचा खरा? सुन्नी म्हणू लागले आमचेच म्हणणे खरे, शिया म्हणू लागले आमचेच म्हणणे खरे. सुन्नीमध्ये दोन विचारधारा आहेत. 1. बरेलवी, 2. देवबंदी. ही दोन्ही ठिकाणे भारतात आहेत. बरेलवीवाल्यांचा सुन्नी संप्रदाय वेगळा आणि देवबंदीवाल्यांचा वेगळा. शियांची ओरड असते की, पाकिस्तानचे सुन्नीफिकेशन चालू आहे. सुन्नींच्या हिंसक संघटना शियांवर हल्ले करतात आणि त्यांना ठार करतात. शियांना गैरमुस्लीम समजले पाहिजे, अशी सुन्नींची मागणी आहे आणि त्यांना दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा दिला पाहिजे. शिया आणि सुन्नी दोघांच्या मते अहमदी मुसलमानच नव्हेत. अहमदिया पंथाच्या लोकांना पाकिस्तानची राज्यघटना मुसलमान मानीत नाहीत.

 

सुन्नींमधला अधिक कडव्या गटाला सलाफी म्हणतात. त्यांना अहले हादिस असे म्हणतात. ते सुफी संताच्या दर्ग्यांवर हल्ले करतात आणि तेथे मन्नत मागायला आलेल्या मुसलमानांना ठार करतात. अहले हादिसची विचारधारा सौदी अरेबियातील सलाफी पंथाकडून आलेली आहे. या सलाफी इस्लामने सौदी अरेबियाचे फार पूर्वीच सलाफीकरण करून टाकलेले आहे. सौदी अरेबियात कोणत्याही गैर मुसलमानाला आपल्या धर्माचे पालन करता येत नाही. त्यांच्याकडून येणाऱ्या अफाट पैशामुळे पाकिस्तानचे 'सौदीझेशन' झाल्याचे पाकिस्तानच्याच लोकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय ओळख

पाकिस्तानात 97% मुसलमान आहेत. त्यांचा धर्म एक आहे. प्रेषित मोहम्मदांवर आणि अल्लावर त्यांची श्रध्दा आहे. एवढया आधारावर पाकिस्तान नावाचे राज्य निर्माण झालेले नाही आणि त्या राज्याचे राष्ट्र होणार नाही. कारण भारतात जशी बहुविधता आहे, तशी पाकिस्तानातदेखील आहे. पंजाबी, सिंधी, बलुची, पखतुनी हे चार मोठे भाषिक गट आहेत. भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांना मोहाजिर म्हणतात. हे भाषिक गट त्यांना आपले मानत नाहीत. पाकिस्तानातील त्यांचे स्थान 'उपरे' असे आहे. पंजाब, सिंध, बलुचिस्तान यांची भाषिक संस्कृती वेगळी आहे. प्रादेशिक सण-उत्सव वेगळे आहेत. याला जोडून पाकिस्तानात 2% हिंदू आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत आणि अत्यल्प पारशी आहेत, हे सर्व अल्पसंख्य आहेत. या सर्वांची मिळून राष्ट्रीय ओळख कोणती?

ही ओळख शोधण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे अनेक अभ्यासक करत असतात. ऐताझ अहसान यांचे 'इंडस सागा ऍंड द मेकिंग ऑफ पाकिस्तान' या शीर्षकाचे पुस्तक आहे. लेखक पाकिस्तानातील नामवंत वकील आहेत आणि मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात आम्ही कोण आहोत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही मोहोंजदडो, हडप्पा संस्कृतीचे वारसदार असून यमुना, गंगा या भागातील लोकांपेक्षा आम्ही वेगळे आहोत, आमची ओळख वेगळी आहे, हे त्यांनी भारतातील काही लेखकांचा हवाला देऊन आपल्या पुस्तकात पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सिंधू संस्कृती आणि गंगा संस्कृती एक का वेगळी, हा विषय आपण थोडा बाजूला ठेवू; पण लेखकाला हे सांगायचे आहे की, आम्ही अरब नाही, आम्ही इराणी नाही, आम्ही तुर्क नाही आणि आम्ही मोगलदेखील नाही, आमची मुळे मध्य आशियात किंवा इराणात किंवा अरबस्तानात नसून ती सिंधूत आहेत. लेखकाने सिंधू नदीचे वर्णनही फार सुंदर केलेले आहे.

लेखकाने आपला संबंध महाभारताशी नेऊन जोडलेला आहे. (आश्चर्य आहे ना!) लेखक म्हणतो, ''महाभारतात इतिहासपूर्व काळातील फार मोठया गृहयुध्दाचे वर्णन आहे. त्यातून वादातीतरित्या भारतीय उपखंडाच्या एकत्वाचा आपल्याला परिचय होतो. त्याच वेळी हिमालयाच्या पलीकडे असलेल्या चीन आणि बॅक्टेरिया याचा उल्लेख सापडतो. हे भारताचे सीमावर्ती प्रदेश आहेत. भारतीय उपमहाद्वीपाशी ते नैसर्गिकरित्या जोडले गेलेले आहेत. या अफाट उपखंडाचे ऐक्य आणि अविच्छेदनता अतिशय प्राचीन असून ती ऐतिहासिक पुराणातून व्यक्त झालेली आहे. हा उपखंड युरोपाच्या उपखंडाएवढा मोठा आहे.'' आपल्या म्हणण्याचे प्रतिपादन करताना लेखकाने पं. जवाहरलाल नेहरू यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथात खैबरखिंड ते कन्याकुमारी भारतात सांस्कृतिक एकता किती खोलवरची आहे याचे जे प्रतिपादन केलेले आहे, ते उद्धृत केले आहे. याचा अर्थ असा झाला की, पाकिस्तान हे या विशाल सांस्कृतिक भारताचे एक अंग आहे. त्याची स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख किंवा राष्ट्र निर्माण होणे शक्य नाही, हेच लेखकाने वेगळया भाषेत सांगितलेले आहे.

लेखक ऐताझ पुढे म्हणतात की, आमचे इतिहासकार पाकिस्तानची ओळख निश्चित करताना ती अरब, पर्शियन, किंवा तुर्की इतिहासाशी नेऊन जोडतात. ते सिंधू संस्कृतीशी किंवा सिंधू इतिहासाशी आपले नाते सांगत नाहीत. असे करणे म्हणजे सिंधूला नाकारणे आहे आणि सिंधू संस्कृतीच्या अनेक विषयांना सोडून देण्यासारखे आहे. हे सर्व विषय भारतीयांनादेखील समान असतात.

संस्कृतीचे विस्मरण

अशाच एका दुसऱ्या पुस्तकाचे नाव आहे 'ए व्हाइट ट्रेल', लेखकाचे नाव आहे हरून खलिद. या पुस्तकात पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांची स्थिती काय आहे, याचा लेखकाने त्या त्या समुदायातील लोकांशी प्रदीर्घ चर्चा करून शोध घेतलेला आहे. सगळया पुस्तकाचा पुन्हा कधीतरी परिचय करून देऊ. या पुस्तकाच्या हिंदू या प्रकरणामध्ये मुलतानमध्ये हिंदू परिवार होळी कशी आणि का साजरी करतात, याची माहिती दिलेली आहे. त्यातून भक्त प्रल्हाद हा मुलतानचा आहे, त्याचे पिता हिरण्यकश्यपू तोदेखील तिथलाच आणि त्याला जिवंत जाळण्यासाठी आपल्या मांडीवर घेऊन बसलेली होलिका हीदेखील मुलतानची. हे प्रकरण वाचले की या गोष्टी समजतात. लेखक म्हणतो, ''होलिकेच्या दहनात तीस महिला सहभागी झालेल्या होत्या. या पौराणिक घटनेशी आपले नाते सांगणाऱ्या तेवढयाच राहिल्या होत्या. हे हिंदू आता धार्मिक अल्पसंख्य झालेले आहेत. स्वतःच्याच घरात ते परके झालेले आहेत. पाकिस्तान निर्माण होण्यापूर्वी मुलतानमध्ये ते पिढयानपिढया राहत होते. खरे सांगायचे तर ते या भूमीचे खरे वारसदार आहेत. वाईट गोष्ट ही की मुस्लीम देशात त्यांचे आता स्वागत नाही.'' ही वाक्ये पाकिस्तानातील एका मुस्लीम लेखकाची आहेत.

अफ्रासियब खटक पाकिस्तानातील 'द नेशन' या एका वर्तमानपत्रात ते एका लेखात म्हणतात, ''आमच्यासमोरचा प्रश्न अतिशय नाजूक आणि संवेदनशील आहे. समाजात असलेल्या सांस्कृतिक, वांशिक आणि राष्ट्रीय बहुविधतेला - ज्या शेकडो वर्षांपासूनच्या आहेत - कशा प्रकारे हाताळायचे याचा आहे. या वेगळेपणाच्या भावना स्वतंत्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर हवेत विरून जाणाऱ्या नाहीत, कारण त्यांची पाळेमुळे इतिहासात आणि समाजात फार खोलवर गेलेली असतात. तार्किक आणि संवेदनशील एकच मार्ग आहे, तो म्हणजे विविधतेत एकता शोधण्याचा. यानेच विविधतेचे अभिनिवेश कमी होत जातील. परंतु असे काही करण्याऐवजी वेगळेपण नाकारून आणि अनेक वेळा त्यांना उत्तेजित करून प्रश्नाचा विचका करून टाकण्यात आलेला आहे. बहुसंख्य असलेल्या मंडळींनी राज्याचा उपयोग करून वांशिक आणि सांस्कृतिक वेगळेपण चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून फुटीरतावादी शक्ती वाढताना दिसतात.''

इम्रानमुळे भारत-पाकिस्तान संबंधाचे काय होईल, हा प्रश्न आपण बाजूला ठेवू या. परंतु इम्रानमध्ये पाकिस्तानची ओळख निर्माण करण्याची शक्ती आहे का? पाकिस्तानी म्हणून आम्ही कोण आहोत? आमचे पूर्वज कोण? आमची संस्कृती कोणती? सिंधूशी आमचे नाते काय? तक्षशीला आमची का? भक्त प्रल्हादाचे आमच्या संस्कृतीत कोणते स्थान आहे? आक्रमक अरब आमचे की परके? आणि आपल्या संस्कृतीशी साम्य असणारे भारतीय आपले कोण? असा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याची शक्ती इम्रानमध्ये आहे का? नसेल, तर पाकिस्तानमध्ये अठरा पंतप्रधान होऊन गेले, त्यात एकोणिसावा नंबर इम्रानचा लागला, एवढेच एक वाक्य त्याच्या नावापुढे लिहिले जाईल.

vivekedit@gmail.com