संघवृक्षाचे सुमधुर फळ

विवेक मराठी    17-Aug-2018   
Total Views |

अटलजी होते संघस्वयंसेवक. ग्वाल्हेरमध्ये बालवयातच त्यांचा संघप्रवेश झाला. संघप्रचारक नारायणराव तरटे यांनी त्यांना संघात आणले. अटलजींचे ते 'मामू' झाले आणि त्यांचे मामा-भाच्याचे हे संबंध अखेरपर्यंत कायम राहिले. आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि मानवी विचारधारेचा सुंदर वृक्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या वृक्षाला लागलेले सुमधुर फळ म्हणजे अटलबिहारी - संघसमर्पित, मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वार्पण केलेला एक स्वयंसेवक.

सर्वसमावेशकता, सहमती, सहकार्य, समन्वय हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अटलबिहारी या संस्कृतीचे आत्मदर्शन होते. हा देश प्राचीन आहे, संस्कृती प्राचीन आहे, पण झापडबंद विचारांनी चालणारा आपला देश नाही. तो सर्वांना सन्मान देऊन सर्वांतील चांगल्यांचा स्वीकार करून सत्य एक आहे, पण ते जाणण्याचे मार्ग भिन्न आहेत, या मार्गाने चालणारा देश आहे. अटलजी या मार्गाचे पथिक होते.

 अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनाने एका युगाचा अंत झाला, एक पर्व समाप्त झाले, असे मी काहीही म्हणणार नाही, कारण ही वाक्ये घासून घासून गुळगुळीत झालेली आहेत. एका वाक्यात त्यांची महानता सांगायची झाली, तर भारताच्या धूसर झालेल्या राजकीय-सांस्कृतिक वारशाची त्यांनी पुनःप्रतिष्ठापना केली. आम्ही कोण आहोत, आमचा वारसा कोणता आहे आणि आम्हाला कोठे आणि कसे जायचे आहे, हे अटलजींनी जवळजवळ पन्नास वर्षांच्या आपल्या राजकीय जीवनकाळात स्पष्ट केले.

अटलजी होते संघस्वयंसेवक. ग्वाल्हेरमध्ये बालवयातच त्यांचा संघप्रवेश झाला. संघप्रचारक नारायणराव तरटे यांनी त्यांना संघात आणले. अटलजींचे ते 'मामू' झाले आणि त्यांचे मामा-भाच्याचे हे संबंध अखेरपर्यंत कायम राहिले. आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि मानवी विचारधारेचा सुंदर वृक्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या वृक्षाला लागलेले सुमधुर फळ म्हणजे अटलबिहारी - संघसमर्पित, मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वार्पण केलेला एक स्वयंसेवक.

जनसंघाची स्थापना 1953 साली झाली. श्रीगुरुजींनी संघातील अनेक ज्येष्ठ प्रचारक आणि कार्यकर्ते जनसंघाच्या कामासाठी राजकीय क्षेत्रात पाठविले. अटलजींचा त्यात क्रमांक लागला. राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय विचार रुजवायचा आणि सत्ता हे साध्य न मानता साधन मानून काम करायचे, हे प्रारंभापासूनचे पथ्य ठरले. अटलजींनी शेवटच्या श्वासापर्यंत अव्यभिचारी निष्ठेने या पथ्याचे पालन केले. राजकीय क्षेत्रात स्वयंसेवकाने कसे काम केले पाहिजे, याचा महान आदर्श घालून दिला. आपल्या आदर्शाशी त्यांनी कधी तडजोड केली नाही, विचारात कसली भेसळ केली नाही. अटल ही उपाधी हिमालयाला लावण्यात येते. अटलबिहारी वाजपेयी राजकारणातील हिमालय होते. ऊन, पाऊस, वारा, वादळ, कशाचाही हिमालयावर परिणाम होत नाही, तो आपल्याजागी अटल असतो. पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत विजय-पराजयाचे अनेक प्रसंग आले, झोंबणाऱ्या टीकांचे प्रहार झाले, मान-अपमानांना सामोरे जावे लागले, केवळ एक मताने सरकारही गमवावे लागले, परंतु अटलजी 'अटल' राहिले. सर्व आघात सहन करीत ते आपल्या ध्येयपदावर ताठ उभे राहिले. विजयश्री त्यांनी खेचून आणली. पुढच्या पिढीसाठी निरंतर विजयाचा मार्ग त्यांनी आखून दिला.

अटलजी पंतप्रधान झाले. जीवनाची ती महत्त्वाकांक्षा नव्हती, ध्येयमार्गावरील तो एक आवश्यक पडाव होता. राष्ट्र सर्वप्रथम, इतर सर्व गोष्टी गौण, हा संस्कार ते जगत असल्यामुळे भारताच्या संरक्षण सिध्दतेत कसलीच तडजोड असता कामा नये, म्हणून त्यांनी पोखरणला अणुस्फोट घडवून आणले. जागतिक दडपणाची त्यांनी चिंता केली नाही. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्यानंतर, पाकिस्तानशी निरर्थक वाटाघाटीच्या भानगडीत पडले नाहीत. आपल्या प्रदेशातून पाकिस्तानचे आक्रमण मोडून काढण्यासाठी त्यांनी युध्दाचा मार्ग पसंत केला. सारे जग भारताच्या मागे उभे राहिले, कारण जगाला स्वाभिमानाची आणि सामर्थ्याची भाषा समजत असते. युनोत मातृभाषेत-म्हणजे हिंदीत भाषण करून त्यांनी आपल्या अस्मितेचा जागर केला.

या अस्मितेभोवती गैरसमज, अपसमज, खोटे समज, विकृत समज यांच्या भिंती उभ्या केल्या होत्या. संघविचार अस्पर्श, अपमानित, अवांच्छनीय ठरविण्यात आला होता. या भिंतींना नाव देण्यात आले 'सेक्युलॅरिझम'. अटलजींनी परिश्रमाचे आणि पराक्रमाचे सुदर्शन चक्र सोडून या भिंतींना भगदाड पाडले. इतके मोठे भगदाड पाडले की आता पुन्हा ती भिंत बांधणे साता जन्मी कुणाला शक्य होणार नाही. मी हिंदू आहे म्हणून सर्वसमावेशक आहे, सर्वग्राही आहे आणि सर्वव्यापक आहे. मी हिंदू आहे म्हणून सर्व भेदांच्या पलीकडचा आहे. हे विश्वची माझे घर आहे, मला वंशभेद नाही, रंगभेद नाही, मी चराचर सृष्टी व्यापक आहे.


अटलजींची या स्वविचारांवर जबरदस्त निष्ठा होती, पण वैचारिक दुराग्रह नव्हता. 'एकला चालो रे'ची हिम्मत होती, पण एकांडी शिलेदारी नव्हती. दुसऱ्याला बरोबर घेण्याची उदारता होती पण त्यात तुष्टीकरण नव्हते. वैचारिक मतभिन्नता ही मनभिन्नतेत परावर्तित होणार नाही, याची त्यांनी जीवनभर काळजी घेतली. यामुळेच पंतप्रधान नरसिंह राव त्यांचे जवळचे मित्र होऊ शकले, जॉर्ज फर्नांडिस त्यांचे सहकारी झाले. नितीशकुमारांना त्यांच्याबरोबर काम करताना अडचण वाटली नाही.

सर्वसमावेशकता, सहमती, सहकार्य, समन्वय हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अटलबिहारी या संस्कृतीचे आत्मदर्शन होते. हा देश प्राचीन आहे, संस्कृती प्राचीन आहे, पण झापडबंद विचारांनी चालणारा आपला देश नाही. तो सर्वांना सन्मान देऊन सर्वांतील चांगल्यांचा स्वीकार करून सत्य एक आहे, पण ते जाणण्याचे मार्ग भिन्न आहेत, या मार्गाने चालणारा देश आहे. अटलजी या मार्गाचे पथिक होते. या ध्येयमार्गावरून न थकता चालणारे, कुणाचाही तिरस्कार न करणारे, 'जो साथ देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला,' अशा साधुवृत्तीने राज्य करणारे संन्यस्त राजनेता होते.

रक्ताचे शब्दशः पाणी करून जो जनसंघ वाढविला, त्याची पणती विझू नये म्हणून आपल्या रुधिराचे तेल केले, तो जनसंघ त्यांनी जनता पार्टीत विलीन करून टाकला. पणती आपल्या हातांनी विझविली. सर्वांच्या बरोबरीने जायचे असेल आणि सर्वांना बरोबर घ्यायचे असेल, तर आपले अस्तित्व व्यापक अस्तित्वात समाविष्ट करावे लागते. अटलजींनी ते करून दाखविले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपल्या विझून जाण्याची काही किंमत नाही, उलट आपले अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तेव्हा त्यांनी 'आम्ही मरणासाठी जन्मलो नसून, आम्ही पुत्र अमृताचे आहोत' असा हुंकार देऊन भारतीय जनता पार्टीची निर्मिती केली. फिनिक्स पक्षी राखेतून उभा राहतो, असे म्हणतात. अटलजींनी जनसंघाचा फिनिक्स पक्षी राखेतून जिवंत केला. हा पक्षी आता भारताच्या अवकाशात नव्हे, तर विश्वाच्या अवकाशात मुक्तसंचार करीत आहे.

अटलजी युगानुयुगे वाहणाऱ्या भारताच्या सांस्कृतिक प्रवाहातील एक सुंदर कमळ होते. कमला कमलदल विहारिणीचे अपत्य होते. वीणावादिनी शारदेचे लघुरूप होते. त्यांची कविता शारदीय चांदण्याची बरसात होती. शालीनता, मर्यादा, आर्जव, मार्दव, अटल ध्येयनिष्ठा, निर्भयतेबरोबर निर्वैरता अशा गुणांची साक्षात मूर्ती म्हणजे अटलजी होते. बहुरत्नप्रसवा असणाऱ्या भारतमातेच ते देखणे बालक होते. ध्येयपथावर साथ देणाऱ्या आपल्या असंख्य आत्मजांच्या भेटीसाठी ते निघून गेले आहेत - म्हणत

'हार नही मानूंगा, रार नही ठानूँगा,

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ।

गीत नया गाता हूँ।'

vivekedit@gmail.com