दुर्मीळ नायक, दुर्मीळ चरित्रकार

विवेक मराठी    20-Aug-2018   
Total Views |

नाना आपल्या गीताने जसे अमर आहेत, तसे त्यांनी लिहिलेल्या 'डॉ. हेडगेवार' या चरित्रग्रंथानेही ते अजरामर झालेले आहेत. जोपर्यंत हिंदू समाज आहे, तोपर्यंत नानांनी लिहिलेले हे चरित्र अमर राहील. डॉ. हेडगेवार यांच्यासारखा चरित्रनायक हा दुर्मीळातील दुर्मीळ चरित्रनायक आहे आणि अशा नायकाचे चरित्र लिहिणे हे दुर्मीळातील दुर्मीळ काम आहे, हे काम नानांनी केले.

नारायण हरी पालकर उर्फ नाना पालकर यांना पाहण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला लाभले. 1965 साली माझे प्रथम वर्षाचे शिक्षण झाले आणि त्या वर्षी नानांचा एक बौध्दिक वर्गही झाला. 1966ला गोरेगावला नानांच्या उपस्थितीत मंडल स्तरावरच्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीला मी गेलो. या बैठकीत मला भावनाप्रधान नानांचे दर्शन झाले. एका कार्यकर्त्याने अडचणीमुळे रोज शाखेत जाणे जमत नाही, आणि संघकामाला वेळ देता येत नाही, असे निवेदन दिले. नानांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थिती संदर्भात अधिक वेळ देऊन काम करणे कसे आणि का आवश्यक आहे, हे तळमळीने सांगितले.

नानांबरोबर काम करण्याचा ज्यांना अनुभव आला, त्यांनी नानांच्या या मनोवृत्तीचे दर्शन वेळोवेळी घेतले असेल. नानांची अनेक गीते संघात गायली जातात. या गीतांत गेयता आहे आणि काव्यदेखील आहे. अनेक संघगीते गद्य ओळी असतात, काव्याच्या मीटरमध्ये लिहिलेली आणि ती चालीत गायची असतात. नानांच्या गीतांचे तसे नाही. त्यात विचारांचा विस्तार कडव्यामागून कडव्यात होत जातो आणि विचारांबरोबर काव्याला आवश्यक असलेला भव्य कल्पनाविलासही त्यात असतो. स्वप्नरंजन असते. 'दिसू लागला जवळी मंगल, देशाचा वैभव काळ, उत्साहाने, एकत्वाने, मार्गावर करिता चाल' या एका गीताच्या ओळीतून नानांच्या काव्याची ओळख होते.

संघकामाची ही तळमळ संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांच्या जीवनाची तळमळ आहे. नाना आपल्या गीताने जसे अमर आहेत, तसे त्यांनी लिहिलेल्या 'डॉ. हेडगेवार' या चरित्रग्रंथानेही ते अजरामर झालेले आहेत. जोपर्यंत हिंदू समाज आहे, तोपर्यंत नानांनी लिहिलेले हे चरित्र अमर रूपाने राहील. चरित्रग्रंथ हा साहित्यातील एक प्रकार आहे. जगात उत्तम चरित्रग्रंथकार म्हणून जेम्स बॉसव्हेलचे नाव घेतले जाते. त्याने सॅम्युअल जॉन्सन यांचे चरित्र लिहिले आहे. त्याविषयीचे वाक्य फार प्रसिध्द आहे - जॉन्सन्स आर रेअर बट बॉसवेल्स आर रेअरर - म्हणजे जॉनसन्स दुर्मीळ असतात, पण बॉसवेल्स दुर्मीळातील दुर्मीळ असतात. मराठी भाषेत उत्तम चरित्र लिहिणारे जे लेखक झाले, त्यात कृष्णाजी केळुसकर, धनंजय कीर, भवानराव खैरमोडे यांची नावे घेतली जातात. नाना पालकर हेदेखील एक महान चरित्रलेखक होते. मराठी साहित्य समीक्षकांनी या प्रकारे त्यांची दखल घेतली आहे की नाही, याची मला कल्पना नाही. संघाकडे बघण्याचा जो कलुषित दृष्टीकोन आहे, त्यामुळे मराठी सारस्वतातील एक महान लेखक या दृष्टीने नानांची गणना कुणी केली आहे, असे मला वाटत नाही. मराठी सारस्वतांच्या कोतेपणाबद्दल न लिहिलेले बरे.

डॉ. हेडगेवार यांच्यासारखा चरित्रनायक हा दुर्मीळातील दुर्मीळ चरित्रनायक आहे आणि अशा नायकाचे चरित्र लिहिणे हे दुर्मीळातील दुर्मीळ काम आहे. हे काम नानांनी केले. या चरित्राचे महत्त्व काय आहे? किंवा त्याचा प्रभाव काय आहे? या प्रभावामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या चरित्रग्रंथाच्या प्रभावामुळे झालेले आहेत. देशाची मुख्य विचारधारा या चरित्रग्रंथाच्या प्रभावामुळे झालेली आहे. जगाच्या इतिहासात एका व्यक्तिजीवनाच्या चरित्राचा असा प्रभाव फारच थोडया महापुरुषांच्या नशिबी आलेला आहे. म्हणून नानांचा डॉ. हेडगेवार हा चरित्रग्रंथ केवळ अद्वितीय नसून अनुपमेय आहे, त्याची तुलना कोणाशी करता येणार नाही.

साहित्यशास्त्रात आदर्श चरित्रग्रंथाच्या अनेक कसोटया निर्धारित केल्या आहेत. या कसोटयांचा आधार घेऊन या ग्रंथाची समीक्षा केली, तर कदाचित हा ग्रंथ या कसोटयांत उत्तीर्ण होणार नाही आणि कसोटया उत्तीर्ण झालेला ग्रंथ समाजजीवनावर प्रभाव पाडण्यास कुचकामी पडण्याचाच संभव अधिक असतो. चरित्रग्रंथाची सर्वोत्तम कसोटी - किंवा एकमेव कसोटी - हीच आहे की, वाचक चरित्रनायकाला आपल्या जीवनात जगण्याचा किती प्रयत्न करतो. लेखक चरित्रनायकाचा जीवनसंदेश वाचकांपर्यंत पोहोचविण्यास त्याच्या हृदयात आणि बुध्दीत त्याचा प्रवेश करण्यास किती प्रमाणात यशस्वी झालेला आहे. नाना पालकरांनी लिहिलेल्या डॉ. हेडगेवार चरित्रग्रंथास ही कसोटी लावल्यास नाना या कामात शंभर टक्केच काय, तर एकशे एक टक्के यशस्वी झालेले आहेत.

श्रीगुरुजी संघाचे द्वितीय सरसंघचालक होते. संघाला भक्कम वैचारिक अधिष्ठान, अखिल भारतीय पाया आणि समाजाच्या विविध अंगात संस्थाजीवनाने प्रवेश हे श्रीगुरुजींचे संघकामातील भव्य योगदान आहे. ते म्हणत असत की, ''जेव्हा केव्हा माझ्यासमोर प्रश्न उभे राहतात, तेव्हा त्याच्या उत्तरासाठी मी डॉ. हेडगेवारांचे चरित्र वाचतो. मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळतात.'' श्रीगुरुजींसारख्या महान योग्याची ही स्थिती आहे. सर्वसामान्य कार्यकर्तादेखील संघकामाची प्रेरणा डॉक्टरांच्या चरित्रातूनच ग्रहण करतो. डॉ. हेडगेवार हाच त्याचा आदर्श असतो.

डॉ. हेडगेवारांचे चरित्र लिहिणे, तेही त्यांच्या मृत्यूनंतर चौदा वर्षांनी, हे फार अवघड काम होते. पहिली सर्वात मोठी अडचण होती, ती म्हणजे चरित्रग्रंथासाठी जी साधने लागतात, त्यांची कमालीची कमतरता. या कमतरतेची दोन कारणे होती. पहिले कारण - चरित्रनायक प्रसिध्दिपराङ्मुख आणि दुसरे कारण 48च्या बंदीत जी जाळपोळ झाली, त्यात महत्त्वाची असंख्य कागदपत्रे जळली. नियतीचीदेखील कदाचित तीच इच्छा असावी, कारण भारतीय परंपरेत ज्या थोर व्यक्ती महान कार्ये करतात, त्यांचे नाव मागे राहत नाही, त्यांचे कार्य फक्त राहते. वेदांचे कर्ते कोण? कुणाला माहीत नसते. व्यासांचे, वाल्मिकींचे जीवनचरित्र त्रोटक रूपाने माहीत असते, परंतु त्यांचे रामायण आणि महाभारत प्रत्येक घरात असते. अशा प्रसिध्दिपराङ्मुख चरित्रनायकाच्या चरित्र साधनांचा शोध नानांनी सर्व देशभर फिरून केला, कागदपत्रे गोळा केली आणि चरित्रनायकाचा संगतवार जीवनक्रम शोधला, त्याची मांडणी केली. या कामासाठी कुणी त्यांना शिष्यवृत्ती दिली नव्हती किंवा एखादा धनिक पैशाची थैली घेऊन त्याच्या मागे उभा नव्हता. पाश्चात्त्य चरित्रकार या बाबतीत फार भाग्यवान असतात. त्यांना साधनांची कमतरता नसते आणि धनाची त्याहूनही नसते. या सर्व अडचणींवर मात करून एकाग्र चित्त होऊन अचाट परिश्रम करून नानांनी चरित्रग्रंथाचे लेखन केले.

चरित्रनायक नानांच्या श्रध्देचा विषय आहे. परंतु त्यामुळे नानांनी नायकाला देवत्व दिलेले नाही. डॉ. हेडगेवार तुमच्या-आमच्यासारखेच हाडामासाचे माणूस होते. त्यांची संघसाधना एका अर्थाने योगसाधनाच होती. त्यांचे जीवन म्हणजे पावित्र्याचे मूर्तिमंत रूप होते. अशा माणसाला काही सिध्दी आपोआप प्राप्त होतात. नानांनी डॉक्टरांच्या या जीवनावर अजिबात भर दिलेला नाही. डॉक्टरांसारखा एक सामान्य माणूस संघासारखे एक अचाट काम करू शकतो, तर माझ्यासारखा सामान्य माणूस या कामातील एक लहानसा भाग म्हणून का करू शकत नाही? असा विचार चरित्र वाचल्यानंतर वाचकाच्या मनात आपोआप निर्माण होतो. डॉक्टरांचे वैशिष्टय सांगत असताना नानांनी अनेक ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारची वाक्यरचना केलेली आहे. डॉक्टर सहकाऱ्यांपेक्षा नेहमीच दोन पावले पुढे असत. बरोबर चालणाऱ्याला वाटत असे की, दोन पावले टाकली की आपण डॉक्टरांबरोबर जाऊ, म्हणजे जे डॉक्टर करू शकतात, ते मीही करू शकतो, असा सहजभाव यातून निर्माण होतो. डॉक्टर अलौकिक होते खरे, परंतु ते लोकांसाठी अलौकिक नव्हते. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टये ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणात नानांनी अनेक उदाहरणांसहित दाखविलेली आहेत.

डॉ. हेडगेवार या चरित्रग्रंथात 1940च्या वर्गातील डॉक्टरांचे शेवटचे भाषण नानांनी दिलेले आहे. या भाषणाची गणना जगातील दहा अप्रतिम भाषणांत करावी लागेल. ते भाषण ऐकणाऱ्यांचे जीवन त्यामुळे पूर्णपणे बदलले आणि नंतर जो कुणी चित्त शुध्द करून, मन एकाग्र करून हे भाषण वाचतो, त्याला संघकार्याची न संपणारी ऊर्जा प्राप्त होते, एवढे अलौकिक सामर्थ्य या भाषणात आहे. म्हटले तर भाषणे म्हणजे शब्द असतात, शब्दाला भाव आणि अर्थ असतो. तो भाव ग्रहण करण्याची आपली जर मनःस्थिती असेल आणि अर्थ समजून घेण्याइतकी बुध्दी असेल, तर असे एखादे भाषण जीवनात मूलगामी परिवर्तन करणारे ठरते. येशू ख्रिस्ताचे सरमन ऑन द माउंट किंवा लिंकनचे गेटिसबर्गचे भाषण या प्रकारात मोडणारे भाषण आहे. नानांच्या चरित्रग्रंथात ते भाषण पूर्वीच्या प्रदीर्घ संदर्भाने येते. त्यामुळे भाषण हृदयाला जाऊन भिडते.

डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रग्रंथाचे अनुवाद भारतातील बहुतेक भाषांतून झालेले आहे. सर्व देशभर आज हजारो शाखा आहेत, लाखो सेवा कार्ये आहेत, आणि सर्व क्षेत्रांना मिळून चार हजाराहून अधिक प्रचारक असतील. डॉ. हेडगेवार हे या सर्व कार्याची प्रेरणा आहेत. त्यांचे जीवनचरित्र हा प्रेरणेचा अक्षय स्रोत आहे. नाना पालकरांनी परिश्रम करून जे चरित्र लिहिले, त्याचा प्रभाव इतका प्रचंड आहे. म्हणून लेखाच्या सुरुवातीला जे म्हटले की, या भारतभूमीत जोपर्यंत हिंदू समाज आहे, तोपर्यंत नाना पालकर लिखित हेडगेवार चरित्र वाचले जाणार आहे. हिंदू समाज अमृतपुत्र असल्यामुळे त्याला मरण नाही. डॉ. हेडगेवार चरित्राला पूर्णविराम नाही.

vivekedit@gmail.com