'करुणा'स्त

विवेक मराठी    08-Aug-2018
Total Views |

  करुणानिधी यांनी 5 वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आणि जवळजवळ अर्धशतक द्रमुक पक्षाच्या अध्यक्षस्थानी राहिले. एक संवेदनशील लेखक, कलाकार ते लोकप्रिय राजकीय नेता हा करुणानिधी यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा असाच राहिला. एकाच वेळी 'तलाईवा' (नेता) आणि 'कलैनार' (कलेचे वरदान लाभलेला) अशी दोन पूर्णपणे वेगळया क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट बिरुदे मिरवणारा असा हा एकमेव नेता होता.

प्रादेशिक अस्मितेच्या बाबतीत दक्षिणेकडील राज्ये देशातील अन्य प्रांतांच्या तुलनेत नेहमीच प्रभावी राहिली. केवळ सामाजिक जीवनातच नव्हे, तर तेथील राजकारणावरही त्याचे प्रतिबिंब दिसून येते. एम. करुणानिधी आणि त्यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) हा पक्ष यांचा तामिळनाडूच्या राजकीय क्षितिजावरील उदय हा याच प्रादेशिक अस्मितेच्या भावनेतून झाला आणि त्यामुळेच येथील राजकारणावर आणि जनसमुदायावर दीर्घकाळ त्यांचा प्रभाव राहिला. आज राज्यात अण्णाद्रमुकचे सरकार असतानाही 94 वर्षीय करुणानिधी यांच्या निधनानंतर ज्या प्रकारे येथील जनता शोकसागरात बुडाली, त्यातूनही त्याची प्रचिती येते. करुणानिधी यांनी 5 वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आणि जवळजवळ अर्धशतक द्रमुक पक्षाच्या अध्यक्षस्थानी राहिले. एक संवेदनशील लेखक, कलाकार ते लोकप्रिय राजकीय नेता हा करुणानिधी यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा असाच राहिला. एकाच वेळी 'तलाईवा' (नेता) आणि 'कलैनार' (कलेचे वरदान लाभलेला) अशी दोन पूर्णपणे वेगळया क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट बिरुदे मिरवणारा असा हा एकमेव नेता होता.

3 जून 1924 रोजी नागपट्टीनम जिल्ह्यातील थिरुक्कुवलई गावात मुथुवेल करुणानिधी यांचा जन्म झाला. शाळेत असल्यापासून त्यांचा ओढा साहित्याकडे होता. त्या काळात त्यांनी नाटय, कविता, ललित आदी साहित्य लिहिले. आक्रमक, बंडखोर वृत्ती ही तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असल्याचे दाखविणारे अनेक प्रसंग सांगितले जातात. अगदी कोवळया वयात जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीस्वामी यांच्या वक्तृवाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि 14व्या वर्षी त्यांच्या युवा चळवळीत करुणानिधी सहभागी झाले. सामाजिक क्षेत्रातील ही त्यांची पहिली एन्ट्री ठरली. सुरुवातीला थोडे डावीकडे झुकलेले करुणानिधी हळूहळू द्राविडी अस्मितेच्या मुद्दयावर स्थिरावले. पेरियार ई.व्ही. स्वामी यांच्या विचारांचाही करुणानिधींवर प्रभाव होता. तामिळनाडू तामिळ मन्वर मद्रम ही द्राविडी चळवळीची विद्यार्थी संघटना त्यांनी स्थापन केली. त्याचबरोबर द्राविडी अस्मितेसाठी काम करणाऱ्या अन्य विद्यार्थी संघटना आणि अन्य सामाजिक संघटना यांच्याशीही सातत्याने ते जोडलेले राहिले. त्यांनी त्या काळात सुरू केलेले 'मुरासोली' हे वृत्तपत्र नंतर द्रमुक पक्षाचे मुखपत्र बनले.

1957 साली कुल्लथलाई मतदारसंघातून विजयी होऊन ते पहिल्यांदा तामिळनाडू विधानसभेत गेले. मात्र त्याआधी अनेक चळवळींतून, आंदोलनांतून त्यांनी लक्ष वेधून घेतले होते. 1953 साली कल्लुकुडी येथील त्यांचे आंदोलन अधिक महत्त्वाचे ठरले. या शहरात उभारल्या गेलेल्या दालमिया सिमेंट प्लांटच्या नावावरून तेथील रेल्वे स्थानकाला दिलेले 'दालमियापुरम' हे नाव बदलण्याच्या मागणीसाठी करुणानिधींनी आपल्या सहकाऱ्यांसह रेल रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागून पोलीस कारवाईत दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. यात करुणानिधींनाही अटक झाली, पण या आंदोलनामुळेज राजकीय क्षेत्रातील त्यांचे स्थान पक्के झाल्याचे मानले जाते. 1957च्या निवडणुकीत ते अपक्ष लढूनही विजयी झाले आणि तेव्हापासून सलग 13 वेळा ते विधानसभेवर निवडून  गेले.

1949मध्ये अण्णादुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम या नावाने जस्टिस पार्टीची नवी आवृत्ती सुरू केली. पक्षाच्या उदयापासून करुणानिधी त्याच्याशी जोडलेले होते. नंतर पक्षाच्या कार्यकारिणीत खजिनदार, सहसचिव, सचिव, अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. 1967मध्ये काँग्रेसला हरवून द्रमुक पक्ष सत्तेत आला, अण्णादुराई मुख्यमंत्री बनले. 1969मध्ये अण्णादुराईंचे निधन झाल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार हा पेच निर्माण झाला. पक्षातील बहुतांश वरिष्ठांनी करुणानिधींना पाठिंबा दिल्यामुळे ते मुख्यमंत्रीही झाले आणि पक्षाचे अध्यक्षही. तेव्हापासून ते त्यांच्या निधनापर्यंत करुणानिधी द्रमुकचे अध्यक्ष राहिले. पाच वेळा ते मुख्यमंत्री बनले. 1976मध्ये आणीबाणीमुळे आणि 1991मध्ये कलम 256 अन्वये असे दोन वेळा त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले होते. केंद्रात ते कधी गेले नाहीत, तरी केंद्रीय राजकारणात आपला प्रभाव राहावा यासाठी ते नेहमी आक्रमक राहिले.

दक्षिणेत राजकारण आणि चित्रपट क्षेत्र एकमेकांमध्ये कसे गुंतलेले आहेत, हे सर्वज्ञात आहे. सुरुवातीचा खूप मोठा काळ करुणानिधींची या दोन्ही क्षेत्रांतील कारकिर्द हातात हात घालून चालली. पटकथाकार म्हणून 20व्या वयात कारकिर्दीला सुरुवात केलेल्या करुणानिधींनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. 'ठेनपंगडी सिंगम' या पुस्तकासाठी त्यांना तामिळ विद्यापीठाचा 'राजा राजन' पुरस्कारही मिळाला आहे. 1947मध्ये त्यांनी 'राजकुमारी' या पहिल्या चित्रपटासाठी पटकथा लेखन केले. त्यानंतर 1952मध्ये त्यांनी पटकथा लिहिलेला 'पराशक्ती' हा तामिळ चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. तामिळ सुपरस्टार शिवाजी गणेशन याचा हा पहिला चित्रपट होता. दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीचा संदर्भ असलेला हा चित्रपट अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक विषयांवर आधारलेल्या अनेक चित्रपटांचे लेखन करुणानिधींनी केले. तब्बल 41 तामिळ चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांचे पटकथा लेखन सुरूच होते. 2011 साली प्रसिध्द झालेला 'पोन्नार शंकर' हा त्यांनी पटकथा लेखन केलेला शेवटचा चित्रपट ठरला. हा ऐतिहासिक चित्रपट होता. त्यांनी गीतलेखनही केले.

एम.जी. रामचंद्रन हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती होते, असे म्हणावे लागेल. मित्र आणि शत्रू म्हणूनही हे महत्त्व होते. चित्रपट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत या दोघांनी परस्परांना सोबत केली. 'राजकुमारी' चित्रपटात रामचंद्रन यांची प्रमुख भूमिका होती. 1953मध्ये तेही द्रमुकमध्ये आले आणि त्यांनी पक्षात महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच अण्णादुराई यांच्या निधनानंतर करुणानिधींना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांनीही पाठिंबा दिला होता. 1972मध्ये काही अंतर्गत वादातून रामचंद्रन यांनी द्रमुककडे पाठ फिरवून अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून या दोन मित्रांमध्ये आणि या दोन पक्षांमध्ये जे शत्रुत्व आले, ते कायमच राहिले. 1977मध्ये अण्णाद्रमुकने द्रमुकचा पराभव केला. त्यानंतर तामिळनाडूची जनता द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या पारडयात आलटून पालटून (अपवादात्मक परिस्थिती वगळता) दान टाकत राहिली. या दोन्ही पक्षातील कुरघोडीचे राजकारण कायम चालूच राहिले. १९८९ मध्ये जयललिता यांच्याकडे अण्णाद्रमुकची सूत्रे आल्यानंतर हे राजकीय वैर विकोपाला गेलं. अनेकदा त्यात खालची पातळीही गाठली गेली. १९९६ मध्ये करुणानिधी यांनी जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या मालमत्तेवर छापे घालायला लावले. त्यामुळे जयललिता यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. तुरुंगात त्यांचा खूप छळ झाल्याचेही बोलले जाते. २००१ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर जयललिता यांनी त्याचा सूड उगवत करुणानिधी यांना नेसत्या वस्त्रानिशी तुरुंगात डांबले. पण या कुटील राजकीय वैराचा तामिळी जनतेवर फारसा फरक पडला नाही. तिने राजकीय पटलावर द्राविडी अस्मितेलाच नेहमी महत्त्व दिले. त्यामुळे या दोघांना आलटून पालटून मुख्यमंत्री पद उपभोगण्याची संधी जनतेने दिली. मात्र २०१६ मध्ये जयललिता यांच्या आणि आता करुणानिधी यांच्या निधनानंतर दोन्ही पक्षांत प्रभावी नेतृत्वाची वानवाच दिसत आहे.

करुणानिधी यांना 4 मुले आणि 2 मुली आहेत. द्रमुक पक्षावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप होत राहिला आणि त्यात तथ्यही होते. त्यामुळे करुणानिधींचे राजकीय वारसदारही त्यांच्या कुटुंबातीलच राहतील. सध्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले करुणानिधींचे पुत्र एम.के. स्टॅलिन पक्षाचे नवे अध्यक्ष होतील. त्याचबरोबर ज्येष्ठ पुत्र एम.के. अळगिरी हेदेखील राजकारणात आहेत.

भाजपानेही करुणानिधी यांच्या रूपाने एक हितचिंतक गमावला आहे. निवडणुका तोंडावर असताना हा धक्का मोठा आहे. कारण द्रमुकच्या भावी अध्यक्षाशी जुळवून घेण हे भाजपासमोरचे मोठे आव्हान असेल. 

पक्षाचे नवे नेतृत्व द्राविडी अस्मितेला कितपत महत्त्व देईल याबाबत जनतेत संभ्रम असावा. त्यामुळेच करुणानिधी यांच्या जाण्याने ती कमालीची भावुक झाली. काही दिवसांपूर्वीत्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. या वृत्तामागोमाग करुणानिधी यांच्या तब्येतीच्या चिंतेने त्यांच्या 21 अनुयायांनी आत्महत्या केल्याचे वृत्त वाचले, तेव्हा देशातील अन्य कोणत्याही भागातील जनतेला ते विचित्र, अतार्किक वाटणे साहजिकच आहे. मात्र राजकीय नेते आणि चित्रपट अभिनेते यांच्या बाबतीत तामिळी जनता किती भावुक आहे, याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. (जयललिता यांच्या निधनामुळेही अनेकांना हृदयविकाराचा धक्का बसला होता.) एक द्राविडी नेतृत्व आणि एक कलाकार म्हणूनही करुणानिधी यांच्यावर येथील जनतेने खूप प्रेम केले. मरीना बीच येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याबाबत वाद होऊन तो न्यायालयापर्यंत गेला, ही बाब खूप दुर्दैवी होती. राजकीय वैमन्यासाचा तो कळसच म्हणावा लागेल. अखेर न्यायालयाने त्यासाठी परवानगी दिल्यानंतर मरीना बीचवर करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी जी गर्दी उसळली, ती पोलिसांनाही आवरता आली नाही. करुणानिधी यांच्या जाण्याने द्राविडी अस्मितेच्या नेतृत्वाचा हा अखेरचा हुंकार निमाल्याची भावना या वेळी तामिळी जनतेच्या मनात दाटून आली असावी. 

सपना कदम-आचरेकर