विळखा मोबाइलचा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक21-Sep-2018   

घडता-घडविता

सध्याची पिढी टेक्नोसॅव्ही असल्याचं कौतुक आपल्याला वाटतं. मात्र किशोरवयीन मुलं ज्या प्रकारे मोबाइलच्या आहारी जात आहेत, त्यामुळे पालक चिंताग्रस्त झालेले दिसतात. मोबाइलच्या अतिवापराचा मुलांच्या मनावर आणि शरीरावरही गंभीर परिणाम होताना दिसतो. अशा वेळी पालकांनी टोकाची भूमिका न घेता, संयमाने परिस्थिती कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन करणारा लेख.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 मागच्या आठवडयात शेजारी राहणाऱ्या काकू मला भेटायला आल्या. त्यांच्या मुलाबद्दल त्यांना बोलायचं होतं. त्या बोलायला लागल्या, ''अगं, मी खूप हैराण झाले आहे या मोबाइलपायी. अथर्वच्या हातात सतत मोबाइल असतो. एका क्षणासाठीही मोबाइलला लांब ठेवत नाही. रात्री झोपताना, उठल्यावर, जेवताना, अभ्यास करताना सतत मोबाइल हातात लागतो. बरं, विचारलं की काय सुरू आहे? तर उत्तर येतं की ''मी काहीतरी महत्त्वाचं करतोय.'' आता याचं इतकं महत्त्वाचं काय असतं ते नाही कळत. परवा तो आंघोळीला गेला होता, तेव्हा मी गुपचुप त्याचा मोबाइल चेक केला आणि या मुलांची भाषा वाचून मी हैराण झाले. एकमेकांना शिव्या देत बोलणं, नावं ठेवणं, आणि चर्चा कसली? तर पब्जी का काहीतरी गेम आहे म्हणे, त्याची. काय करायचं गं आता याचं? कशी सोडवायची याची मोबाइलची सवय? आमचंच चुकलं की काय की, आम्ही मोबाइल फोन घेऊन दिला...'' साठेकाकू अगदी पोटतिडकीने बोलत होत्या.

'मोबाइल' सध्या प्रत्येक घराला लागलेलं ग्रहणच म्हणता येईल. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरलं जाणारं साधन हे सध्या सगळयांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठयांपर्यंत सगळेच या मोबाइलच्या अधीन झालेले आपल्याला  दिसतात. लहान मुलं जेवताना व्हिडिओज/गोष्टी बघण्यासाठी, कुमारवयीन/किशोरवयीन मुलं वेगवेगळे गेम्स खेळण्यासाठी, वेगवेगळया सोशल नेटवर्किंग साइट्सवर फोटोज अपलोड करण्यासाठी, चॅटिंग करण्यासाठी सररास मोबाइल वापरताना आपल्याला दिसतात.

फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्स ऍप, यू टयूब या सोशल नेटवर्किंग साइट्स, तसंच पब्जी, कॅश ऑॅफ क्लॅन यासारखे गेम्स सध्या कुमारवयीन मुलं वापरताना आपल्याला दिसतात. आपले फोटोज, व्हिडिओज अपलोड करणं, स्टेटस अपडेट करणं, त्याला किती व्ह्यूज, लाइक्स मिळतायत, कॉमेंट्स मिळतायत हे सतत चेक करत राहणं,  सतत गेम्स खेळत राहणं, त्यावर चर्चा करणं, त्यावरून एकमेकांमध्ये स्पर्धा करणं या गोष्टी मुलं सतत करताना दिसतात.

मुळातच या मुलांना अगदी लहानपणापासून या सगळया गोष्टींचं एक्स्पोजर मिळाल्यामुळे ते या सगळयाच्या अधीन कधी होऊन जातात, ते आपल्याला कळतदेखील नाही.

मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे या वयातील मुलांच्या मेंदूची अपूर्ण वाढ, विचारांची अस्पष्टता, भावनांवर नियंत्रण नसणं, निर्णय कौशल्य अविकसित असणं आणि कुठेतरी या वयात प्रत्येक नवीन गोष्ट करून बघण्याची आतुरता ही सर्व कारणं मोबाइलच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि मग या सगळयामुळे मुलांची वागणूक, त्यांचं रुटीन बदलत चाललंय, हे पालकांच्या हळूहळू लक्षात यायला लागतं.

तुमचं मूल मोबाइलच्या किंवा इंटरनेटच्या आहारी गेलं आहे, हे ओळखण्यासाठी तुम्ही पुढील लक्षणं तपासून पाहू शकता.

 1. मोबाइल बंद झाल्यावर, रेंज गेल्यावर बेचैन होणं.

 2. गेम खेळताना मोबाइल काढून घेतल्यास किंवा फोन आल्यास चिडचिड होणं.

 3. दोन दोन मिनिटांनी सतत फोन तपासून बघणं.

 4. मोबाइल वाजलाय, मेसेज आलाय असं सतत वाटत राहणं. तो जवळ नसतानाही वाजलाय असा भास होणं.

 5. घरातील संवाद कमी होणं.

 6. अभ्यासातील एकाग्रता कमी होणं.

 7. स्वत:च्याच धुंदीत असणं.

 8. झोपेच्या, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होणं.

 9. मोबाइल आपल्या दृष्टिक्षेपापलीकडे जाऊ न देणं इत्यादी.

मोबाइलच्या, इंटरनेटच्या व्यसनामुळे अनेक भीषण परिणाम झालेले आपल्याला दिसतात. झोपेवर परिणाम होणं, एकाग्रता कमी होणं, विचार, कृती मंदावणं, चिडचिड होणं याबरोबरच काही आजार मुलांच्या मागे लागू शकतात. यामध्ये पुढील काही आजारांचा समावेश आहे -

 1. टेक्स्ट नेक - यामध्ये सतत डोकं खाली करून मोबाइल बघितल्यामुळे मानेचं दुखणं सुरू होतं. तासनतास मोबाइलवर वेळ घालवल्याने हा आजार होऊ शकतो.

 2. डिजिटल आय स्ट्रेन - सलग दोन तास किंवा त्याहून जास्त वेळ मोबाइलवर किंवा इतर कोणत्याही गॅजेटवर बसल्याने डोळे दुखणं, लाल होणं, कोरडे पडणं आणि डोळयावर ताण येणं अशा प्रकारची लक्षणं यामध्ये दिसून येतात.

  फँटम व्हायब्रेशन/रिंगिंग सिंड्रोम -  यामध्ये मोबाइल वाजत नसला किंवा जवळ नसला, तरीही तो वाजलाय किंवा व्हायब्रेट होतोय असा भास होत राहतो.
 1. ऑॅब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर - एखादी गोष्ट सतत करत राहणं - उदा. मोबाइलवर सतत गेम खेळणं, तो सतत चेक करत राहणं. थोडक्यात एखादी गोष्ट सारखी करण्याचं कम्पल्शन आणि ती न झाल्यास झालेली बेचैनी.

 2. नोमोफोबिया - यामध्ये मोबाइलशिवाय राहावं लागलं किंवा काही कारणाने तो वापरता आला नाही तर भीती निर्माण होते. मोबाइलशिवाय आपण राहू शकत नाही अशी भीती वाटत राहते. या आजाराबद्दल, त्याच्या लक्षणांबद्दल अजून अभ्यास सुरू आहे.

आता या सगळयावर उपाय काय करू शकतो,  मुलांना यातून बाहेर कसं काढू शकतो, हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. आणि मग पालक काही वेळा एकदम टोकाची भूमिका घेताना दिसतात - उदा., मोबाइल काढून घेणं, इंटरनेट बंद करणं वगैरे. परंतु अशाने मुलांच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण होऊ  शकतो. तुम्ही हे त्यांच्या भल्यासाठी करत आहात, हे लक्षात न घेता तुम्ही त्यांचे शत्रू आहात ही भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ  शकते. यावर एकच काय तो हा उपाय असं जरी सांगता नाही आलं, तरीही काळाप्रमाणे, परिस्थितीनुसार आपण खाली दिलेले काही उपाय, काही गोष्टी आचरणात आणल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ  शकतो.

 1. योग्य मार्गदर्शन - मुलांची बदललेली वागणूक लक्षात आल्यावर त्यांना त्यांची कशी चूक आहे हे सांगण्यापेक्षा त्यांना जेव्हा मोबाइल घेऊन द्याल, तेव्हाच त्यांना त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करा. मोबाइल कशासाठी घेऊन दिला आहे हे त्यांना कळू द्या. तो कशासाठी वापरायला हवा, किती वेळ वापरायला हवा हे त्यांना समजावून सांगा. मोबाइलच्या अतिवापरामुळे काय दुष्परिणाम होतात, याबद्दल त्यांना आधीच जागरूक करा. मुलांना योग्य पध्दतीने शांतपणे समजावून सांगितलं की ते नक्की समजून घ्यायचा प्रयत्न करतात.


 2. नियमावली - घरातल्या प्रत्येकासाठी काही छोटे छोटे नियम घालून घ्या. उदा., जेवताना, झोपायच्या वेळी सगळयांचे फोन बंद राहतील किंवा घरातल्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवण्यात येतील, एकमेकांशी संवाद साधताना व दिवसभराच्या गोष्टी शेअर करताना फोन बाजूला ठेवण्यात येईल, मोबाइलवर कुठल्याही प्रकारचे गेम्स खेळले जाणार नाहीत इत्यादी.. अशा प्रकारचे काही सोपे नियम आपण सगळे पाळू शकतो. आपल्या आई-बाबांना नियम पाळताना बघून मुलंसुध्दा आपोआप हे नियम हळूहळू पाळायला लागतील. आणि ''आई-बाबा, तुम्हीसुध्दा वापरता की मोबाइल सतत'' अशी उलट उत्तरं पालकांना ऐकावी लागणार नाहीत.

 3. स्वत्वाची ओळख - सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपल्या फोटोला किती लाइक्स मिळतात, कॉमेंट्स मिळतात यावर आपण किती फेमस आहोत किंवा सुंदर आहोत अशा प्रकारच्या स्पर्धा मुला-मुलींमध्ये लागलेल्या दिसतात. कमी लाइक्स, व्ह्यूज मिळाले तर ही मुलं निराश होऊ शकतात, त्यांच्या स्व-प्रतिमेला, आत्मविश्वासाला धक्का लागू शकतो आणि मग कपडे, केस, आपण कसे दिसतोय यावर बराच वेळ घालवला जातो. या वयात मुलं जी स्व-प्रतिमा शोधायचा प्रयत्न करत असतात, ती शोधण्यासाठी, ती योग्य पध्दतीने तयार करण्यासाठी त्यांना मदत करा. कोणी लाइक केलं, किती लाइक्स आले यावर आपलं सौंदर्य, आपली प्रतिमा ठरत नसते याची त्यांना जाणीव करून द्या.


 4. शांत राहून परिस्थिती हाताळा - आपल्या मुलाला मोबाइलचं व्यसन लागलं आहे किंवा त्यांच्याकडून इंटरनेटवर काही चुकीच्या गोष्टी बघितल्या जात आहेत हे जेव्हा पालकांच्या लक्षात येतं, तेव्हा एकदम घाबरून न जाता किंवा पॅनिक न होता शांतपणे त्या परिस्थितीला सामोरे जा. शांतपणे मुलांशी बोला. त्यांना समज द्या. खूप काहीतरी भयंकर झालं आहे असं समजू नका. मुलांच्या नकळत त्यांचा मोबाइल चेक करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधा.


 5. तज्ज्ञांची मदत घ्या - सर्व उपाय करूनही परिस्थिती नियंत्रणात येत नसेल, तर योग्य तज्ज्ञांची मदत घ्या. समुदेशनातून मुलांना आणि पालकांना योग्य दिशेने मदत होऊ शकते.

शेवटी एक लक्षात घ्यायला हवं की, मोबाइल हे एक साधन असून जीवन नाही आणि ही गोष्ट जेव्हा आपण स्वत:ला आणि मुलांना पटवून देऊ शकू, तेव्हाच यातून योग्य मार्ग शोधणं शक्य होईल. बदल हा एका रात्रीत होत नसतो, त्यामुळे त्यासाठी संयमाने प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे.

लेखिका समुपदेशक आहेत.

[email protected].com

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/