थर्माकोलच्या मखराला पर्यावरणस्नेही पर्याय

विवेक मराठी    07-Sep-2018
Total Views |

महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने थर्माकोलवर बंदी घातली आहे. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सज्ज असलेल्या बाजारपेठा खरेच थर्माकोलमुक्त झालेल्या दिसतात. काही विक्रेत्यांनी थर्माकोलला पर्याय म्हणून नावीन्य आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालून आकर्षक अशी अनेक मखरे बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. यानिमित्त काही विक्रेत्यांशी साधलेला हा संवाद.

श्रावण महिना सुरू होताच लगबग सुरू होते ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. खरे तर भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणपती घरी येणार असले, तरी गणरायाच्या जय्यत तयारीची सुरुवात होते ती 'यंदा मखर काय करायचं?' या ओढीच्या प्रश्नाने... या वर्षी हा प्रश्न जरा चिंतेचा वाटू लागला आहे. कारणही तसेच आहे. यंदा महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने थर्माकोलवर बंदी घातली आहे. गणपतीचे आगमन म्हणजे मांगल्याचा आणि पावित्र्याचा अनुभव. गणपती स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत घर असो वा सार्वजनिक मंडळे, साऱ्यांनाच मंदिराचे रूप आलेले असते.

मंदिराचे हे रूप विसर्जनानंतर क्षणात विरून जाते. गणपतीच्या भग् अवस्थेतील मूर्ती, पूजेला आणि नैवेद्याला वापरले जाणारे साहित्य, सजावटीसाठी केलेली मखरे, निर्माल्य म्हणून पाण्यात आणि विसर्जनस्थळी अस्ताव्यस्त पडलेले पाहायला मिळते. या पावित्र्यावर जलप्रदूषणाचे व ध्वनिप्रदूषणाचे सावट असते. काही सुजाण नागरिक व संस्था याला अपवाद आहेत, यात शंका नाही. धर्मदंडाला राजदंडाची जोड मिळाली, तर काही कामे आपसूकच सुकर होऊ लागतात. तसाच हा महाराष्ट्र राज्य सरकारचा थर्माकोल बंदीचा नियम. नागरिकांनी प्रत्यक्षात हा नियम अंगीकारल्याचे चित्र गणरायाच्या पूर्वतयारीसाठी बाजारात फेरफटका मारताना अनुभवायला मिळाले. काही विक्रेत्यांनी थर्माकोलला पर्याय म्हणून नावीन्य आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालून आकर्षक अशी अनेक मखरे बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. यानिमित्त काही विक्रेत्यांशी साधलेला हा संवाद.

पर्यावरणस्नेही मखर

महाराष्ट्र राज्य सरकार प्लास्टिकबंदीबरोबरच थर्माकोलवर बंदी घालणार याची चिन्हे दिसत असतानाच दादरचे अक्षय डेकोरेटर्सचे अरुण दरेकर यांनी आपल्याला थर्माकोलवर पर्याय शोधावा लागणार, याची मनाशी खूणगाठच बांधली.  दादरसारखी भव्य बाजारपेठ आणि विक्रीसमोर आलेला तिढा या दोन गोष्टींमध्ये सुवर्णमध्य काढून दरेकर यांनी पूर्णपणे पर्यावरणस्नेही अशा मखरांची निर्मिती केली आहे. मखरनिर्मितीत त्यांनी प्लायवूडचा बेस, लाकडी फ्रेम-पट्टी, ज्यूट, सुतळ, सुपारी आणि सुपारीच्या खोडाची साल, मातीची भांडी, कागदी लगद्यापासून सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि कठीण डिझाइनसाठी सनबोर्ड अशा साऱ्याच पर्यावरणस्नेही गोष्टी वापरल्या आहेत.

या मखरांची विभागणी दोन भागांत करण्यात आली आहे. मखराची वरील बाजू वजनाने इतकी हलकी आहे की, गणेश विसर्जनानंतर मखराची ही वरील बाजू आपण घरात शो-पीस म्हणूनदेखील वापरू शकतो. साधारण चार ते साडेचार फूट उंचीची मखरे तयार करण्यात आली आहेत. अतिशय सुटसुटीत आणि आकर्षक स्वरूपात ती तयार झाली आहेत. मूर्ती किंवा पूजा करण्यात या मखरांचा जराही अडसर होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. ही मखरे पाच-सहा वर्षेदेखील सहज वापरली जाऊ शकतात. दरेकर यांची मखरनिर्मिती बघण्यासाठी गल्लीत शिरतानाच प्रथम लक्ष गेले ते गल्लीच्या प्रवेशद्वारावरील बॅनरकडे. त्या बॅनरवर 'श्रीगणेशाच्या आगमनाची आतुरता आणि पर्यावरण संवर्धनाची जागरूकता' अशा दोन्ही भावनांच्या सुंदर मिलाफाने घडवलेले आकर्षक इको-फे्रंडली मखर. यातूनच मखरनिर्मितीला पर्यावरणाची जोड दिली आहे, हे कळते.

दरेकर यांनी मखरविक्रीसाठी सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर केला. यानिमित्त दरेकर म्हणाले, ''सोशल मीडियाद्वारे आम्ही आमच्या मखरांचा प्रसार केला आहे आणि त्याचा आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया इतका प्रभावी आहे की त्याचा योग्य वापर केला, तर प्रगतीसाठी त्याचा नक्की फायदा होऊ शकतो, याचा आम्ही अनुभव घेत आहोत. या वर्षी आम्ही 60 मखरे तयार केली आहेत, त्यापैकी 40ची आतापर्यंत विक्री झाली आहेत. अजूनही ऑर्डर्स येत आहेत. मखरांची किंमत 8000 ते 14000 रुपये इतकी आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, नगर, विरार, वसई इत्यादी ठिकाणी तर आमची मखरे विक्री झालीच, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे दुबईवरूनदेखील आम्हाला ऑर्डर आली आहे.'' 

पहिल्यांदाच केलेला हा इकोफ्रेंडली मखरांचा प्रयोग यशस्वी झाला, हे पाहून पुढील वर्षी कशा प्रकारे हा व्यवसाय वाढविणार आहात? असे विचारले असता दरेकर म्हणाले, ''नक्कीच आनंद वाटतो, पहिल्यांदा केलेल्या प्रयोगाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहता पुढील वर्षी छोटया मखरांची आणि अधिक संख्येने मखरांची निर्मिती करणार आहोत. या वर्षी तयार केलेल्या मखरांचे दर आणि मखरांची साइज याचा पुढील वर्षी विचार करून मखरनिर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच मखरविक्रीसाठी स्वतंत्र दुकानाची सोय करणार आहोत.''

फुलांचे मखर

फूल मार्केटमध्येदेखील विविध प्रकारच्या फुलांच्या आराशीने सजलेल्या मखरांनी बाजारपेठ फुलून गेलेली दिसली. यंदा गणेशोत्सवकाळात थर्माकोलचे मखर खरेदी करण्यापेक्षा स्थानिक फूलविक्रेत्यांनी तयार केलेल्या ताज्या फुलांच्या व कृत्रिम फुलांच्या पर्यावरणपूरक मखराला गणेशभक्तांची मागणी आहे. जरबेरा, ऑर्किड, लिली, गुलाब इत्यादी फुलांचा वापर करून सुंदर कमानी बाजारात उपलब्ध आहेत. सिंहासन, देऊळ, छत्री, पाळणा, पालखी, मोदक आदी दहा-बारा प्रकारच्या, ताज्या फुलांच्या विविध कमानी गणेशभक्तांच्या आवडीनिवडीप्रमाणे बाजारात सज्ज आहेत. लाकडी पट्टयांच्या आधाराने ताज्या व कृत्रिम (कापडी) फुलांचा वापर करून तयार केलेली ही मखरे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत असून त्यांची किंमत अंदाजे 1000 ते 5000 रुपयांपर्यंत आहे.

कागदी मखर

कागदाने तयार केलेली फोल्डिंग मखरेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. राममंदिर, गणेश महाल, सुवर्ण मखर, प्राचीन कोकण मंदिर, सिंहासन अशी वेगवेगळया स्वरूपातील मखरे बाजारात मिळत आहेत. वजनाने हलकी आणि फोल्ड केल्यावर कमी जागेत बसणाऱ्या व पुढल्या वर्षीही जास्त कष्ट न करता वापरात येणाऱ्या या मखरांना बाजारात चांगलीच मागणी आहे.

कापडी मखर

गणेशोत्सवकाळात बाजारात विविध प्रकारच्या कापडांच्या झालरी, पडदे, गणपती मखरावर बांधण्यात येणारे छत हे तर पाहायला मिळत होतेच. यंदाच्या थर्माकोल बंदीनंतर कापडी मखरही सर्वत्र पाहायला मिळत आहेत. रंगीबेरंगी कापड, झालर, मणी, मोती, शोभिवंत टिकल्या आणि मखरांना एकसंध करणारे प्लास्टिकचे पाइप (लहान मुलांच्या खेळांच्या तंबूप्रमाणे) यापासून तयार केलेली मखरे पाहायला मिळतात. ही मखरे 1500 ते 5000 रुपयांपर्यंत बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. थर्माकोलला पर्याय म्हणून ग्राहक हे कापडी मखर घेणेही पसंत करीत आहेत.

चटई मखर

आवड म्हणून डोंबिवलीच्या विजय पंधरे यांनी सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या चटई मखर व्यवसायाला यंदा चांगली मागणी आहे. सुरुवातीला पुठ्ठयांपासून मखरनिर्मिती केली जात असे, परंतु त्याचे फोल्डिंग व्यवस्थित येत नसल्यामुळे पर्याय म्हणून त्यांनी चटईच्या मखरांची निर्मिती सुरू केली. विजय पंधरे यांच्या व्यवसायाला त्यांच्या पत्नी माधवी पंधरे यांची तेवढयाच तोडीने साथ मिळाली आणि व्यवसायाला भरभराट आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या थर्माकोल बंदीच्या निर्णयानंतर या वर्षी पंधरे यांच्या व्यवसायाला चांगलीच मागणी आली आहे आणि डोंबिवलीकर महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. पंधरे यांनी या व्यवसायासाठी डोंबिवलीतील आजदे या गावात छोटेखानी कारखाना उभा केला आहे. त्यातील बहुतांश कामगार महिलाच आहेत.

मखरनिर्मितीसाठी येणाऱ्या महिला त्यांच्या वेळेनुसार येऊन आपले काम करत असतात. माधवी पंधरे यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि साथ यांच्यामुळे महिला वेळेचे बंधन न पाळता वेळेत काम पूर्ण करून देतात. दर वर्षी 400 ते 500 एवढया मखरांची विक्री होत असे, परंतु यंदाच्या थर्माकोल बंदीमुळे हा मागणीचा आकडा 2500वर गेला आहे. ही चटई मखरे मुंबई, विरार, वसईसह हैदराबाद येथे पोहोचली आहेत.

एवढया मोठया प्रमाणात मखरनिर्मिती करण्यासाठी मोठया प्रमाणात चटई किंवा कच्चा माल कुठून आणता? हा प्रश्न विचारला असता माधवी पंधरे म्हणाल्या, ''होय, यासाठी आम्हाला भरपूर कच्चा माल आयात करावा लागला. माझ्या पतींनी आंतरजालावरून शोधून मखर बनविण्यासाठी खास आसाम राज्यातून बांबूपासून तयार केलेली चटई मागविली आहे. लाकडी पट्टयाचा आधार घेऊन हवे तसे आकर्षक असे मखर तयार केले जातात. मखराच्या सजावटीसाठी कापड, झालर, मोती, मणी, कुंदन, लटकन यांचा वापर केला जातो. मखरनिर्मितीबरोबरच दिवाळीत कंदिलाचीही निर्मिती केली जाते.''

या वर्षीच्या वाढलेल्या मखरांच्या मागणीमुळे पंधरे कुटुंबीयांचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे. त्यामुळेच भविष्यात व्यवसायवृध्दीसाठी काय प्रयत्न असतील? असे विचारले असता माधवी पंधरे आनंदाने म्हणाल्या, ''या वर्षी वाढलेली मागणी नक्कीचआनंददायक आहे. भविष्यात आमचा यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट ठेवण्याचा मानस आहे.'' चटईची ही मखरे दिसायला सुबक आणि आकर्षक तर आहेतच, तसेच त्यांच्या किमतीही माफक आहेत - 500 ते 5 हजार रुपयांपर्यंत डोंबिवलीत उपलब्ध आहेत.

गणेशोत्सवात सर्वाधिक उधाण येते ते सजावटीला. आपले मखर आणि सजावट इतरांपेक्षा कशी सुंदर दिसेल, याचा विचार प्रत्येक गणेशभक्ताने केलेला दिसतो. याचाच विचार करून बाजारात दर वर्षी नवनवीन गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मागणी काय आहे याचा विचार करूनच बाजारात वस्तूंची खरेदी होत असते. या वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या थर्माकोल बंदीचाही योग्य विचार केलेला दिसतो. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सज्ज असलेल्या बाजारपेठा खरेच थर्माकोलमुक्त झालेल्या दिसतात.

थर्माकोलला पर्याय म्हणून सजावटीसाठी रंगीत पडदे, आकर्षक कृत्रिम कापडी वेगवेगळया रंगांतील फुले, रंगीबेरंगी झिरमिळया, शामियानाची प्रतिकृती असेलेले कापडी मखर, चटई मखर, फुलांच्या कमानी असलेली सुटसुटीत मखरे, वेगवेगळया रंगसंगतीतील विद्युत माळा अनेक गोष्टींची रेलचेल बाजारात दिसत आहे. खरेदीसाठी बाजारात गणेशभक्तांची झुंबड पाहायला मिळत आहे.

सण-उत्सव हे तर हिंदू समाजाचे अविभाज्य अंग आहे. त्यातील सर्वोच्च आनंद देणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. पण मागील काही वर्षांत हा उत्सव साजरा करण्याच्या पध्दतीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचल्याचेच विदारक चित्र दिसत आहे. निसर्गपूजा ही आपली संस्कृती आहे. आधुनिक काळात या संस्कृतीचा सररास ऱ्हास केला जात आहे. निसर्गाशी एकरूप राहणे तर सोडाच, परंपरेच्या नावाने निसर्गाच्या नाश करण्याकडेच कल दिसत आहे. गणपती ही बुध्दिदेवता आहे याचा जरी विचार केला, तरी निसर्गावर उपकारच होतील. हे उपकार निसर्गावर नाही, तर आपल्यावर आणि आपल्या येणाऱ्या पुढील पिढीवर होतील, हे निश्चित. महाराष्ट्र राज्य सरकारने थर्माकोल बंदी करून गणरायाला अद्भुत भेटीचा नजराणा दिला आहे, असे म्हणायला हरकत नाही.