विश्व कुमारवयीन मुलांचं

स्रोत: विवेक मराठी    दिनांक08-Sep-2018   

कुमारवयीन   मुलांमध्ये जसे शारीरिक बदल होत असतात, तसेच मानसिक बदलही होत असतात. हे मानसिक बदलच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरत असतात. शिक्षण घेताना आलेला स्पर्धात्मक ताण, नव्याने  कळत असलेली  बाहेरील जगाची ओळख, कुटुंबातील त्यांचे स्थान, या अशा अनेक गोष्टींचे त्यांच्या मनात झालेले संभ्रमाचे जाळे . शिवाय आजच्या पालकांची बदलती जीवनशैली आणि   मुलांच्या उमलत्या वयात , त्यांना समजून घेण्याची कसरत, अशा साऱ्याच प्रश्नांची म्हणजेच कुमारवयीन मुलांचे भावविश्व उलगडणारे नवे पाक्षिक सदर. 

''अमित, अरे काय हे असं वेडयासारखं वागणं तुझं.... रूमची अवस्था बघ कशी करून ठेवली आहेस ते....''

''सावनी, थोडं तोंड सांभाळून बोल. आईवडिलांशी असं बोलतात का?''...

''राघव, आता प्लीज तो मोबाइल बाजूला ठेव आणि थोडा अभ्यास कर बघू!''...

''आश्लेषा, आता आणखी किती वेळ आरशासमोर उभी राहणार आहेस तू?''...

''अगं, सुमित आजकाल  इतका चिडचिड करतो ना... काहीही ऐकत नाही बघ अजिबात. मनाला येईल तसं वागणं-बोलणं सुरू असतं.''...

''तासन्तास मोबाइलवर काय करत असतात माहीत नाही. मी गेले की लगेच फोन ठेवून देणार.''...

''अगं, वैष्णवी आजकाल अचानक घाबरते.''...

''अगं, आजकाल जयेशला जरा काही बोललं की लगेच राग येतो.''....

....कुमारवयीन मुलांच्या घरातून ऐकायला मिळणारे टिपिकल संवाद.

उध्दटपणे बोलणं, ओरडून बोलणं, ऐकून न ऐकल्यासारखं करणं, गॅजेट्सशी तासन्तास खेळणं, तुलना करणं, खाण्याचे नखरे, बाहेरचं खायला हवं, बोअर होणं, बेशिस्त वागणं, मोकळेपणाने न बोलणं, वाद घालणं, चिडचिड करणं, मित्र-मैत्रिणींचे आई-बाबा चांगले आहेत असे वाटणं, धीर नसणं, निष्काळजीपणा, आरशासमोर वेळ घालवणं, शिक्षणाचं महत्त्व नसणं असं सगळं तुमच्या कुमारवयीन मुलामुलीमध्ये तुम्ही पाहत असाल, तर हे सगळं अगदी नॉर्मल आहे. कॉमन आहे. कुमारवयीन मुलांमध्ये होत असलेले शारीरिक बदल आपल्याला दिसत असतात. त्यांच्या वागणुकीत होणाऱ्या बदलांचा आपल्याला त्रास होत असतो. परंतु त्यांच्या मेंदूमध्ये, विचारांमध्ये, भावनांमध्ये, दृष्टीकोनामध्येसुध्दा काही बदल होत असतात आणि त्यांच्या कृतीतून, वागण्यातून त्याचा नैसर्गिक परिणाम दिसत असतो,  हे आपण बऱ्याचदा लक्षात घ्यायला विसरतो.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण 'तू कसा चुकीचा वागतो आहेस' हे सांगत राहतो. कसं वागलं पाहिजे, काय बरोबर आहे हे सांगण्याऐवजी आपण काय चूक आहे, काय करू नये हेच सांगत राहतो आणि त्यामुळे मुलांना असं वाटत राहतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपले आईबाबा नाहीच म्हणतात. मला सारखेच बोलत राहतात.

आपल्या मेंदूचा पुढचा भाग म्हणजे फ्रंटल लोब. हा भाग रोजच्या दैनंदिन आयुष्यात लागणारी कौशल्यं आणि त्यांची  वाढ नियंत्रित करत असतो.  विचार, भावना यांच्यावर नियंत्रण असणं, त्या व्यक्त करणं, समस्या निराकरण, निर्णयक्षमता याचं विकसन फ्रंटल लोबमध्ये होत असतं. वयाच्या पंचविशीला मेंदूच्या या भागाची वाढ पूर्ण होते. त्यामुळे या कुमारवयीन मुलांचे विचार स्पष्ट नसणं, त्यांच्या  भावनांवर नियंत्रण नसणं, निर्णय घेता न येणं... थोडक्यात - त्यांच्या डोक्यात होत असलेला गोंधळ अगदी स्वाभाविक असतो. कारण त्यांची ही कौशल्यं अजूनही अपरिपक्व असतात.

एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाने वयाच्या या टप्प्याला 'आयडेंटिटी व्हर्सेस रोल डिफ्यूजन' किंवा 'आयडेंटिटी क्रायसिस' असं म्हटलं आहे.  या टप्प्यात मुलं स्वत:चा शोध घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. 'माझ्या आईवडिलांचा मुलगा' ते 'मी स्वत:' अशी ओळख  निर्माण करण्याची त्यांची धडपड सुरू असते आणि त्यासाठीच स्वत:ची प्रतिमा जपणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.

आपण पालक म्हणून काही वेळा आपली मतं मुलांवर लादण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या गोष्टीबद्दलचं आपलं मत काय आहे आणि ते कसं बरोबर आहे हे आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपण हे लक्षात घ्यायला हवं की या वयात ही मुलं त्यांची स्वत:ची मतं तयार करत असतात. एखाद्या गोष्टीबद्दल , व्यक्तीबद्दल, निर्णयाबद्दल त्यांचं मत काय आहे हे त्यांना व्यक्त करायचं असतं. परंतु त्यांनी स्वत:ची मतं व्यक्त केली, तर आपल्याला मुलं अचानक आगाऊ  झाल्यासारखी वाटतात. कारण आपल्या आणि त्यांच्या मतांमध्ये तफावत असते. आणि मग आपण त्यांना 'अजून तू कसा लहान आहेस,  तुला काही कळत नाही' हे सांगायला लागतो. मात्र हीच मुलं चुकीची वागली की आपण म्हणतो, ''आता तू मोठा/मोठी आहेस, जरा शहाण्यासारखं वाग.'' थोडक्यात, आपल्याला सोईस्करपणे आपले आई-बाबा लहान-मोठं ठरवताहेत, ही भावना मुलांच्या मनात निर्माण होते.

या वयातील मुलांच्या मेंदूची अपूर्ण वाढ आणि शरीरात झपाटयाने होत असलेले बदल हे त्यांच्या या अशा अविचारी, अविवेकी वागणुकीचं कारण आहे. त्याचबरोबर झपाटयाने वाढत असलेलं जग, नवनवीन तंत्रज्ञान, सतत होत असणारी स्पर्धा, त्यांचं व्यग्र वेळापत्रक, अभ्यासाचा ताण, विविध  नवनवीन गोष्टींचं मिळणारं एक्स्पोजर या सर्व गोष्टीही मुलांच्या या अशा वागण्याला कारणीभूत ठरू शकतात.

ही सगळी परस्थिती योग्य वेळी योग्य पध्दतीने हाताळली नाही, तर या समस्या आणखी वाढू शकतात. त्याने मुलांमध्ये पालकांबद्दलची अढी निर्माण होऊ शकते, आपल्याला कोणीही समजून घेत नाही ही भावना निर्माण होऊ शकते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मीच काय तो वाईट आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. भावना व्यक्त करता न आल्याने ते आतल्याआत धुसफुसत राहू शकतात आणि एके दिवशी या भावनांचा स्फोट होऊ शकतो.

आता या सगळया परिस्थितीवर उपाय काय? तर याला एकच बिनतोड उपाय आहे असं नाही म्हणता येणार, कारण प्रत्येक मूल वेगळं असतं. त्याच्या गरजा, त्याच्या आवडीनिवडी, चांगले-वाईट गुण, त्याच्या क्षमता, मर्यादा हे सगळं इतर मुलांपेक्षा वेगळं असतं.

मुलांबरोबर आजकालच्या पालकांनादेखील खूप जेन्युइन समस्या असतात. कामाचा ताण, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, रोजचा प्रवास, आर्थिक ताण आणि हे सगळं सांभाळत असताना हातात उरणारा अगदी थोडासा वेळ. त्यामुळे आजकालचं पालकत्व नक्कीच आव्हानात्मक आहे.

त्यासाठी आपल्याला पालक म्हणून आपण काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या.  सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना आदराने वागवा. त्यांच्या मतांचा, विचारांचा, भावनांचा आदर करा. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. त्यांच्याशी संवाद साधण्याची पध्दत बदलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून 'माझ्या आईवडिलांना माझं म्हणणं कळत आहे आणि ते मला समजून घेत आहेत' अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल आणि मग तेही तुमच्याशी मोकळेपणे बोलण्याचा प्रयत्न करतील. ते कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक आहेत याची मुलांना जाणीव करून द्या. घरातील निर्णय घेताना त्यांची मतं विचारा, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करा.

थोडक्यात, तुमच्या आणि त्यांच्या बालपणीची तुलना करू नका. जग इतकं झपाटयाने बदलतंय की मुलांना समजून घेण्यासाठी पालकांना चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे.  सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना शांतपणे ऐकून घेतलंत, तर तेही तुम्हाला ऐकून घेतील आणि तुम्ही दोघे मिळून परिस्थिती बदलण्यात यशस्वी व्हाल.

आजकाल अशा प्रकारच्या अनेक समस्यांना पालकांना आणि मुलांना सामोरं जावं लागतं. काहींना त्यावर योग्य मार्ग सापडतात, तर काहींना नाही. या लेखमालेअंतर्गत कुमारवयीन मुलांच्या अशा छोटया छोटया समस्यांना अधोरेखित करणं आणि त्यावर सहजसोपे पर्याय देणं असा माझा प्रयत्न राहील.

 [email protected]

 9664352690

( लेखिका व्यवसायाने कौन्सिलर असून त्यांची 'मुदिता' ही स्वतःची संस्था आहे. 'मनात माझ्या'  या विषयावर त्या ब्लॉग लिहितात.)