अरुणाताईंची संशोधन वृत्ती

विवेक मराठी    12-Jan-2019
Total Views |

 

92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून अरुणाताईंचे नाव घोषित झाले, ही आनंदाची बाब. दरवर्षी सा. विवेक साहित्य संमेलन विशेषांक करत असते, पण अरुणाताईंचे असलेले विवेकचे ऋणानुबंध पाहता त्या ऋणानुबंधाला साजेसाच असा विशेषांक झाला आणि संमेलनाचे अरुणाताईंचे अध्यक्षीय भाषण ऐकले आणि त्यांच्या विषयीचा आदरभाव शतपटीने वाढला. कित्येक दिवस परीक्षणाकरिता हाती घेतलेले अरुणाताईंचे पुस्तक 'डॉ. विश्राम रामजी घोले', परंतु धीर काही होत नव्हता. मनाची तयारी होत होती, पण ऐन वेळेला भीतीचे सावटही येत होते. पण का कोण जाणे आज मन पक्कं झालं, आणि लिहायला घेतलं.

अरुणाताईंचा साहित्यातील प्रवास पाहिला तर अजून आपण या प्रवासाची सुरुवातही केली नाही, हे जाणवतं. अरुणाताईंची साहित्यातील सुरुवात कवितेने झाली असली तरी, कथा, कांदबरी, वैचारिक लेखन, स्त्री-जीवनातील विविध अंगांचा विचार, समीक्षात्मक लेखन, संशोधनात्मक लेखन असा साहित्यातीतील मुक्त संचार आहे. 'डॉ. विश्राम रामजी घोले' हे पुस्तक म्हणजे संशोधनात्मक लेखन आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'मधील अरुणाताईंनी 'विस्मृतीचित्रे' या त्यांच्या सदरात 1996 साली गंगूबाई खेडकर यांच्यावर एक लिहिला होता. गंगूबाईंचे वडिल डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचे पती डॉ. रघुनाथ विठ्ठल खेडकर या दोघांविषयीचे कुतूहल त्यांच्या मनात जागे झाले. या दोघांनीही त्यांच्या काळात स्वतःची नाममुद्रा समाजात उमटवली होती. हीच जाणीव अरुणाताईंना संशोधन करण्यास प्रवृत्त करीत राहिली. या पुस्तकात डॉ. विश्राम रामजी घोले यांचे चरित्र त्यांनी तपशीलवार आणि परिश्रमाने मांडले आहे.

डॉ. विश्राम रामजी घोले हे अतिशय द्रष्टे होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील विचारसरणी पाहता त्यांचे विचार हे दूरदृष्टीचे आणि राष्ट्रहितकारक होते. कोकणातल्या एका आडगावी विश्राम रामजींचे बालपण गेले, शिक्षण मुंबईत पूर्ण झाले. परंतु उमेदीच्या काळातील डॉक्टरी व्यवसायातील महत्त्वाची वर्षे त्यांना ब्रिटीशांच्या नोकरीत शुश्रुषा करावी लागली. युध्दोत्तर काळातील त्यांचे जीवन एक निष्णांत शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी आणि समजंस समाजसुधारक असे राहिले.

डॉ. विश्राम रामजी घोले हे व्यवसायाने डॉक्टर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी इंग्रज सत्तेने भारतीयांवर कसा अन्याय-अत्याचार केला हे प्रत्यक्ष पाहिले आणि अनुभवले. परंतु इंग्रज सरकारकडे नोकरी करीत असल्यामुळे प्रत्यक्ष युध्दभूमीवर राहून सैनिकांची शुश्रुषा करणे हे त्यांनी त्यांचे आद्यकर्तव्य मानले. शल्य विशारदेच्या कामात ते अविश्रांत श्रम करीत होते, त्यांना ध्यासाने पछाडले होते. तरीही त्यांच्या मनात माणसांविषयी कणव आणि प्रेम ओतप्रोत भरली होती. जात, देश, धर्म, वंश यापलीकडे जाऊन मानवसेवा करण्याची तळमळ त्यांना होती. म्हणून त्यांच्यातील डॉक्टरी पेशामागे त्यांच्यातील उदार माणूस सतत अग्रस्थानी येत असे.

सेवाभाव, परोपकार, भेदातीत बंधुत्वभावना आणि जनकल्याणाची कळकळ या गोष्टींनी विश्राम रामजींचा पिंड घडला होता. त्या पिंडधर्माला अनुसरून वागण्याचा पारदर्शीपणा हेच त्यांच्या व्यक्तित्वाचे प्रमुख वैशिष्ट्य. मानवताधर्म सर्वश्रेष्ठ मानून, जनहितासाठी परस्पर विभिन्न असणाऱ्या माणसांशी जनकल्याणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्यपूर्वकाळात धर्मसुधारणांच्या चळवळीत त्यांनी तळमळीने काम केले. विश्राम रामजींनी सत्यशोधक समाजात महात्मा जोतिबा फुले यांच्या समवेत राहून अत्यंत भरीव काम केले. सत्यशोधक समाजातील अध्यक्षपदावरुन राजीनामा दिल्यानंतरही त्यांचे जोतिबांशी मैत्रीचे ऋणानुबंध जोतीबांच्या अखेरपर्यंत राहिले. धर्मसुधारणा आणि सार्वजनिक कामात त्यांचा संबंध लोकमान्य टिळक, आगरकर, रानडे, सार्वजनिक काका, बापूसाहेब मेहेंदळे, डॉ. गर्दे, आदींशी आला.

बहुजन समाजाच्या मागास जीवनसरणीला दूर ठेवून विश्राम रामजी पुढारलेले जीवन जगत होते. त्या काळाच्या मानाने न पटणारे कार्य विश्रामजी करत होते आणि समाजाचा नव्हे तर नातेवाईंकांचाही त्यांच्या जीवनसरणीला विरोध होता. विश्रामजी स्वतः उच्चशिक्षित असल्यामुळे ते नेहमीच शिक्षणाचा पुरस्कार करीत असत. केवळ पुरस्कारच करीत नसत तर कृतीतही आणत. त्यांनी त्यांची मोठी मुलगी काशीबाई आणि पत्नी यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. परंतु या कृतीची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली. काशीबाईंचे इंग्रजी शिक्षण सुरु आहे, ही बाब त्यांच्या आप्तजनांनाच न पटणारी ठरली आणि त्यांनी तिच्या अन्नात काचा कुटून घातल्या, त्यातच तिचा मृत्यू झाला. हा सगळा क्रूर प्रकार होऊनही विश्रामजी डगमगले नाहीत. त्यांनी त्यांची दुसरी कन्या गंगूबाई हिलादेखील आग्रहाने शिक्षण दिले. एवढेच नव्हे तर तिचे योग्य वयात लग्नही लावून दिले. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये विश्रामजींचा पुढाकार होता, तसेच लग्नासाठीच्या संमतिवयासाठी ते धडपडत होते.

डॉ. विश्राम रामजी घोले हे व्यवसायाने डॉक्टर असले तरी पेशापलीकडे जाऊन विविध विषयांचा विचार व वाचन ते सातत्याने करीत होते. स्वतःची लहानशी शेती होती. ब्रिटीश राजवटीने शेतसाऱ्याची जी रयतवारी पध्दत लागू केली होती तिने शेतकऱ्यांना निराधार केले होते. खेड्याची अर्थव्यवस्था कोलमडली होती. सार्वजनिक सभेने 1857 च्या दुष्काळात शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले. घोटवडेकर, गोळे आणि घोले अशी त्रयी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना केल्या. शेतकऱ्यांना वाहिलेले 'शेतकरी' या मासिकाचे मुख्य आधारस्तंभ विश्राम रामजी होते. भारत हा खेड्याचा देश आहे आणि शेती हा तिचा आधार आहे, हे त्यांनी जाणले होते. विश्रामजींना 'शेतकऱ्यांचे कैवारी' असेही संबोधले जात होते.

डॉ. अरूणा ढेरे यांनी या पुस्तकाच्या रुपाने त्या काळाची पुनर्निर्मितीच केलेली दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व आणि उत्तरार्धात सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने डॉ. विश्रामजी घोले आणि त्यांच्या परिवाराने खूप मौलिक कामगिरी केली आहे. डॉ. घोले, त्यांची कन्या गंगूबाई खेडकर आणि त्यांचे जावई डॉ. रघुनाथ खेडकर या दोघांच्या कार्यकतृत्त्वाचा वेध घेतला आहे. विश्रामजींच्या कार्यकतृत्त्वाचा वेध, त्यांची भेदांपलीकडील मैत्री, रचनात्मक कार्याचे पाठीराखे, सह्द्य मानवतावादी, यादवाचे संघटक समाजसुधारक असे विविध पैलू संशोधनात्मकरीत्या उलगडले आहेत.

 पूनम पवार

९५९४९६१८५९