टक्क्यांची बेरीज - टकरावांची वजाबाकी

विवेक मराठी    16-Jan-2019   
Total Views |

हिंदू मतदार हाच भाजपाचा मतदार आहे. दलित आणि यादव यांना जातभावनेतून वर काढावे लागेल. 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ते करून दाखविले आहे. यशाचा फर्ॉम्युला त्यांच्याकडे आहे. तो प्रामाणिकपणे आणि आक्रमकपणे पुढे न्यावा लागेल. अखिलेश-मायावती यांची युती शंभर टक्के जातीय आहे आणि तिला मुस्लीम धर्मांधतेची जोड आहे, हे उघडपणे दिसणारे सत्य तशाच भाषेत लोकांपुढे मांडले पाहिजे. 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/

  उत्तर प्रदेशात मायावती (बहुजन समाज पार्टी) आणि अखिलेश यादव (समाजवादी पार्टी) यांची येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी युती होऊन निम्म्या निम्म्या जागा त्यांनी वाटून घेतल्या आहेत. आपल्या वाढदिवसाच्या पत्रकार परिषदेत मायावती म्हणाल्या की, ''भूतकाळ विसरून आपण कामाला लागले पाहिजे. आपल्याला भाजपाचा पराभव करायचा आहे.'' या युतीत काँग्रेसला सहभागी करून घेण्यात आलेले नाही. राहुल गांधींनी स्वबळावर 80 जागा लढविण्याचा निर्णय घेतलाआहे.

ही युती झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, भाजपाला याची मोठी किंमत द्यावी लागेल. 2014च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला 22 टक्के आणि बसपाला 19 टक्के मते मिळाली होती. त्याची बेरीज होते 41 टक्के. भाजपाला 42 टक्के मते मिळाली. काही जणांनी असे गृहीत धरले की, दोन्ही पक्षांची मते एकत्र येतील आणि महायुतीला त्याचा फायदा होईल. दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हणतात. उत्तर प्रदेशात मोदी यांचा रथ अडविला जाईल, असे काही जण आता म्हणू लागले आहेत.

प्रत्यक्षात काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. बसपा आणि सपा यांची युती नैसर्गिक युती नाही. या दोघांत प्रचंड हाडवैर आहे. त्याला जातीय रंग आहे. यादव, दलित मित्र नसतात आणि दलितांना यादवांविषयी विश्वास नसतो. ज्याला मत द्यायचे, त्याचे यादवरूप आणि दलितरूप मतदार लक्षात ठेवतात. मुस्लीम उमेदवाराविषयीच्या भावना न लिहिलेल्या बऱ्या. मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यामुळे यादव मते आणि दलित मते एकत्र येतीलच, हे कोणी सांगू शकत नाही. दोन्ही पक्ष मुसलमानांना आपला मतदार मानतात. किती मुसलमानांना ते तिकिटे देतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहील. मुसलमानांचे राजकीय प्राबल्य वाढण्याची शक्यता जर ठळकपणे पुढे आली, तर हिंदू मतांचे ध्रुवीकरण ठरलेले आहे. मुसलमानांना जागा दिल्या नाहीत, तर ते मते कशाला देतील? म्हणून टक्क्यांची बेरीज काहीही होवो, टकरावांची बेरीज-वजाबाकी वेगळी असते.

भाजपा हिंदू मतदारांना कशा प्रकारे आपल्याकडे आकृष्ट करून घेणार आहे, यावर भाजपाचे यशापयश अवलंबून आहे. भाजपाला दलितांची भरभरून मते मिळण्याची शक्यता कमी, आणि मुसलमानांची मते मिळतील हे गृहीत धरणेदेखील चूक आहे. हिंदू मतदार हाच भाजपाचा मतदार आहे. दलित आणि यादव यांना जातभावनेतून वर काढावे लागेल. 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ते करून दाखविले आहे. यशाचा फर्ॉम्युला त्यांच्याकडे आहे. तो प्रामाणिकपणे आणि आक्रमकपणे पुढे न्यावा लागेल. अखिलेश-मायावती यांची युती शंभर टक्के जातीय आहे आणि तिला मुस्लीम धर्मांधतेची जोड आहे, हे उघडपणे दिसणारे सत्य तशाच भाषेत लोकांपुढे मांडले पाहिजे.

- रमेश पतंगे