आत्ममग्नतेतून जागे होऊ या

विवेक मराठी    04-Jan-2019   
Total Views |

 

आपला भारत देश लोकशाही मार्गाने चालतो आणि लोकशाहीने आपल्याला मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे आणि हा मौलिक अधिकार किती मौल्यवान आहे, याची जागृती हा या लेखांमागचा उद्देश आहे. 2019 साली आपल्याला आपल्या रक्षणाचा विचार कसा आणि का केला पाहिजे, याबद्दल या लेखांच्या माध्यमातून चिंतन करायचे आहे. तसेच प्रजातंत्र हे समूहसाधनेचे तंत्र आहे. समूहसाधनेचे हे तंत्र कसे आहे, ते कसे चालते, आणि ते नीट चालले तर त्याचे परिणाम काय होतात, याचे चिंतन केले पाहिजे.

गवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात,

'उध्दरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥'

सहाव्या अध्यायातील या पाचव्या श्लोकाचे गीताईतील मराठी रूप असे आहे - 'उध्दरावा स्वयें आत्मा खचू देऊ नये कधी, आत्मा चि आपुला बंधु, आत्मा चि रिपु आपुला.' आपणच आपले मित्र असतो, आपणच आपले शत्रू असतो. आपण जसा विचार करू, तसे आपण घडत जातो. म्हणून आपला उध्दार आपणच करायचा असतो, तेथे अन्य कुणाचे काही काम नाही, असा याचा भावार्थ आहे.

याला एक आध्यात्मिक संदर्भ आहे. आपला देश आध्यात्मिक विचारांची खाण आहे. प्रत्येक माणूस सुखासाठी धडपड करत असतो. आपले अध्यात्म सांगते की, सुख कोणत्याही बाह्य वस्तूत नाही. बाह्य वस्तू नाशिवंत आहेत. अविनाशी सुख पाहण्यासाठी आपण आपल्या आतमध्ये डोकावून पाहिले पाहिजे. हे कसे पाहायचे, याचे शास्त्र आपल्या पूर्वजांनी तयार केले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, संन्यासयोग, भक्तियोग इत्यादी विविध मार्ग शोधण्यात आले. आपल्या सर्वांना त्याचे फार आकर्षण असते.

अध्यात्म हे व्यक्तीला स्वतःची उन्नती करून घेण्याचा मार्ग सांगते. माणूस समाजात राहतो. तो समाज जर ठीक असेल, तर उन्नतीचे सर्व मार्ग अनुसरता येतात. समाजच जर बिघडला, तर व्यक्तिगत उन्नतीचे मार्ग शोधणे अवघड आहे. आपल्याकडे आध्यात्मिक मार्गाचा जेवढया मोठया प्रमाणात विचार झाला आहे, तेवढया मोठया प्रमाणात समाज नीट कसा चालेल, समाजातील माणसे नीट कशी वागतील, परस्परांना धरून कशी राहतील, एकमेकांच्या सुख-दुःखात समरस कशी होतील, याचा विचार आणि व्यवस्था आपल्याकडे चांगल्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. माणसे परमार्थाच्या मागे लागली आणि प्रपंचाकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

रामदास स्वामींना याची फार प्रकर्षाने जाणीव झालेली दिसते. म्हणून ते म्हणतात,

'आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थविवेका। येथें आळस करुं नका। विवेकी हो॥1॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल। तेणें तुम्ही कष्टी व्हाल॥ प्रपंच परमार्थ चालवाल। तरी तुम्ही विवेकी॥2॥ प्रपंच सांडून परमार्थ केला। तरी अन्न मिळेना खायला. मग तया करंटयाला। परमार्थ कैंचा॥3॥

येथे प्रपंचाचा अर्थ अगोदर समाज नीट कसा चालेल हे बघावे आणि मग परमार्थाच्या मागे लागावे, असा करावा लागतो. समाजात राहणारा माणूस कशा प्रकारचा व्यवहार करत असतो, याची एक जातक कथा आहे. बोधिसत्त्वाचा जन्म वानरकुळात झाला होता. एका पारध्याने वनात या माकडाला पकडले. ते खूप गलेलठ्ठ झालेले होते. परंतु तो बोधिसत्त्व असल्यामुळे तो माकडचाळे करीत नव्हता. पारध्याच्या हे लक्षात आल्यानंतर या गुणी माकडाला त्याने राजाला भेट देऊन टाकले.

हा माकडचाळे करून आपली करमणूक करील, असे राजाला वाटले, परंतु त्याने यापैकी काही केले नाही. जे समोर ठेवले ते त्याने खाल्ले आणि शांतपणे माणसांचे निरीक्षण करीत राहिला. माकडचाळे न करणाऱ्या माकडाला राजा कंटाळला आणि त्याने पारध्याला सांगितले की, याला वनात नेऊन सोडून दे. पारध्याने तसे केले. तो आपल्या कळपात पुन्हा गेला. इतर वानरांनी त्याला विचारले, ''तू चांगला राजवाडयात होतास, ते सोडून तू वनात का आलास?'' बोधिसत्त्व म्हणाला, ''माणसात राहण्याचा मला कंटाळा आला.'' कंटाळा का आला? या प्रश्नाचे उत्तर बोधिसत्त्वाने असे दिले, ''मी राजधानी वाराणसीत होतो. अनेक लोकांना पाहिले. प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत होता. पैसा मिळविताना तो दुसऱ्याची चिंता करीत नाही. पैसा मिळविण्याच्या नादात तो खरे सुख हरवून बसतो. एखादा चांगला पदार्थ मिळाला की, तो एकटाच खाईल, इतर कुणालाही देणार नाही. एखाद्याकडे विशिष्ट प्रकारचे ज्ञान असेल तर ते दुसऱ्याला देणार नाही. पैसा साठवून ठेवील. घरात अनेक स्त्रिया असतात. त्या सदोदित शरीर सजविण्याच्या कामात मग्न असतात आणि सारखी बडबड करीत राहतात. त्या कधी रुसतात, रडतात, भांडतात. आपण माकडे यापैकी काही करीत नाही. जे अन्न मिळेल, ते आपण सर्व जण मिळून वाटून खातो, ज्ञान दुसऱ्यांना देतो. आपल्या स्त्रिया शरीर सजवीत नाहीत आणि भांडणही करीत नाहीत.''

अडीच हजार वर्षांपूर्वीची ही समाजस्थिती आहे, त्यात फार बदल झाला आहे असे नाही. पूर्वी जे घरात होते, ते आता दूरचित्रवाहिनीच्या पडद्यावर आले. ज्या कौटुंबिक मालिका आपण पाहतो, त्या अनंत भानगडींनी भरलेल्या असतात. त्या आपल्याला गोड वाटतात, कारण आपणही तसेच जगत असतो. आध्यात्मिक साधनेने व्यक्तीची उन्नती होते, पण समाजाच्या उन्नतीसाठी काय करायचे?

विचारी माणसांनी याचा खोलवर विचार करून प्रजातंत्राचा शोध लावला. आपण जर लोकशाही राजवट आणली, प्रजेची राजवट आणली तर समाजाची उन्नती होत जाईल. व्यक्तीच्या उन्नतीसाठी ध्यानधारणा, समाधी, भक्ती हे मार्ग आहेत, तसेच समाजाच्या उन्नतीसाठी प्रजातंत्राच्या मार्गाने आपण गेले पाहिजे, असे आपल्या विचारी मंडळींनी ठरविले. आध्यात्मिक साधना व्यक्तिगत असते आणि प्रजातांत्रिक साधना सामूहिकपणे करायची असते.

व्यक्ती ही शक्तिमान असते हे जसे खरे, तसे समाज हा अफाट शक्तीचे केंद्र असते. जेव्हा समाज केवळ व्यक्तिनिष्ठ होतो आणि समाजनिष्ठेला सोडचिठ्ठी देतो, तेव्हा त्याची शक्ती सूक्ष्म रूपात जाते, ती दिसत नाही. तिची जागृती करावी लागते आणि त्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतात. समूहरूपाने आपणच आपले रक्षणकर्ते असतो, आपणच आपले भाग्यविधाते असतो, आणि आपणच आपले भक्षकदेखील असतो.

आपण थोडे इतिहासात डोकावून पाहू या. 1192 साली आपली दिल्ली महंमद घोरीच्या ताब्यात गेली. ती आपल्या ताब्यात यायला 1947 साल उजाडले. या कालखंडात कधी अरबांनी, कधी तुर्कांनी, कधी इराणी लोकांनी, कधी मोगलांनी, तर कधी इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. हे राज्य करणारे आपल्यापेक्षा फार बुध्दिमान होते, शूर होते, ज्ञानी होते असे काही नाही. एकच गोष्ट त्यांच्याकडे होती, ती म्हणजे त्यांच्याकडे समाजसंघटनेचे बळ होते. हे बळ आपण टाकून दिले होते.

यामुळे महंमद बीन कासीम सतरा वेळा भारतावर स्वारी करतो, सोमनाथाचे मंदिर फोडतो, त्याला अडविण्यासाठी सर्व भारतीय समाज उभा राहिला असे झाले नाही. एक अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीहून पाच हजाराची फौज घेऊन देवगिरीवर चालून येतो आणि देवगिरीचे साम्राज्य रसातळाला जाते. दक्षिणेत मुस्लीम आक्रमणाचा मार्ग खुला होतो. हा इतिहास खरे म्हणजे वाचवत नाही. वाचताना आपलीच आपल्याला लाज वाटायला लागते. आम्ही सोन्यासारख्या देशाचे कसे वाटोळे केले, याची शरम वाटायला लागते. पण असे वाटून उपयोग काय? ज्या शोकाचा आज काही उपयोग नाही, तो करण्यात शहाणपण नाही.

अशी परिस्थिती पुन्हा उत्पन्न होता कामा नये, याचा विचार करण्यातच शहाणपण आहे. भारतातील अनेक थोर पुरुषांनी आपल्याला असा शहाणपणाचा उपदेश केलेला आहे. अनायहिलेशन ऑफ कास्ट (जाती निर्मूलन) या आपल्या भाषणाचा समारोप करत असताना डॉ. बाबासाहेब सांगून गेले की, ''हिंदूनो तुम्हाला स्वराज्य तर मिळणार आहे, परंतु माझी चिंता अशी आहे की, मिळालेल्या स्वराज्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे का? जाती-पातीत विभागलेले तुम्ही स्वराज्याचे रक्षण कसे करणार? येणारे स्वराज्य पुढे येणाऱ्या पारतंत्र्याची नांदी तर ठरणार नाही ना, याचा तुम्ही विचार करा.''

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यापुढेदेखील संघ सुरू करत असताना एक ज्वलंत प्रश्न होता - आम्ही वारंवार पारतंत्र्यात का जातो? मूठभर परकीय लोक आमच्यावर राज्य का करतात? आमच्यात कोणत्या उणिवा आहेत? त्यांनी त्याचे उत्तर दिले की, आम्ही स्वार्थी झालो आहोत, फक्त स्वतःचा विचार करतो, समाजाचा अजिबात विचार करीत नाही. त्यामुळे सामाजिक शक्ती उभी करून आपल्याला देश उभा करायचा आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून त्यांनी समूहसाधनेचा मार्ग शोधला आणि समाजापुढे ठेवला.

आपल्याला या ठिकाणी डॉ. हेडगेवारांच्या समूहसाधनेवर किंवा डॉ. आंबेडकरांच्या वक्तव्यावर भाष्य करायचे नसून 2019 साली आपल्याला आपल्या रक्षणाचा विचार कसा आणि का केला पाहिजे, याबद्दल चिंतन करायचे आहे. वर म्हटले आहे की, प्रजातंत्र हे समूहसाधनेचे तंत्र आहे. समूहसाधनेचे हे तंत्र कसे आहे, ते कसे चालते, आणि ते नीट चालले तर त्याचे परिणाम काय होतात, याचे चिंतन केले पाहिजे.   

vivekedit@gmail.com