समृध्द वारशाचे पाईक

विवेक मराठी    07-Jan-2019   
Total Views |

 

पंतप्रधानांना किंवा मुख्यमंत्र्यांना वेतन देऊन राज्य चालविण्यासाठी आपण दिलेले आहे. ते आपले मालक नाहीत, आपण त्यांचे मालक आहोत. प्रजातंत्राने आपल्याला दिलेला हा मालकी हक्क आहे. हा मालकी हक्क म्हणजे 'राइट टू प्रॉपर्टी'सारखा घटनादत्त अधिकार नाही. त्याचे उल्लंघन झाले असता आपल्याला न्यायालयात जाता येणार नाही. प्रजातंत्र सांगते की हा मौलिक अधिकार आपला आपण जपायचा आहे, आपणच त्याचे रक्षण करायचे आहे.

हजारो वर्षांच्या पारतंत्र्याचा परिणाम म्हणून आपला स्वभाव कणभर जागे होण्याचा आणि मणभर झोपण्याचा आहे. तसे आपण झोपत नाही. आपल्या व्यक्तिगत स्वार्थाच्या बाबतीत आपण चोवीस तास जागे असतो. समाजाच्या स्वार्थाच्या बाबतीत क्षणभर कणभर जागे होतो आणि पुन्हा आपण आपल्या व्यक्तिगत स्वार्थाच्या मागे धावत राहतो. म्हणून आपणच आपले रक्षणकर्ते आहोत, हे कसे आहोत, याची जागृती करत राहावी लागते.

प्रजातंत्रामध्ये आपणच प्रजा असतो, आपणच राज्यकर्ते असतो आणि आपणच आपले रक्षणकर्ते असतो. समाज जर देवदूतांचा बनलेला असेल, तर अशा समाजाला शासनाची काही गरज नसते. सर्व लोक आपआपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडीत राहतात, विधिनियमांचे स्वतःहून पालन करीत राहतात, कुणीही कसलाही अपराध करीत नाही, चोऱ्या-माऱ्या होत नाहीत, खून-कत्तलीचा तर प्रश्नच नाही; जे काही उत्पादन समाज करील त्याच्यातील न्यायोचित वाटा प्रत्येकाला मिळण्याची व्यवस्था केलेली असते, अन्यायाचा मागमूस नसतो. ही झाली आदर्श समाजाची संकल्पना.

जगात अब्जावधी लोक राहतात. ते वेगवेगळया देशांत राहतात. समाज करूनच राहतात. परंतु कोणत्याही देशात अशा प्रकारची आदर्शवत समाजरचना निर्माण झालेली नाही. भविष्यात कधी निर्माण होणार की नाही हे काही सांगता येत नाही. बोधिसत्त्वाच्या माकडाच्या कथेत जे सांगितले, तसाच समाज राहणार आहे. म्हणून समाजाच्या नियमनाची गरजदेखील राहणार आहे. शासन व्यवस्थेशिवाय समाज उभा राहू शकत नाही, टिकू शकत नाही, चालू शकत नाही, प्रगती करू शकत नाही आणि जिवंतदेखील राहू शकत नाही, हे आजचे आपले वास्तव आहे. आदर्शवाद आणि वास्तव यांच्यामध्ये जी मोठी दरी असते, ती पार करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुशासन करण्याच्या दिशेने वाटचाल करणे आहे.

हे सुशासन आकाशातून खाली पडणारे नाही. दुसऱ्या कुठल्या देशाची नक्कल करून ते आपल्याला आपल्या देशात आणता येणार नाही. 'आपला उध्दार आपणच करायचा आहे' हा गीतेचा आदेश आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की, उध्दारास उधारीचे काही काम नाही, हा रोकडा व्यवहार आहे.

समाजाचे नियंत्रण करण्याचे काम शासन व्यवस्था करते. ही शासन व्यवस्था काय असते? एक काळ असा होता की, शासन करणारा राजा म्हणत असे, मी देवाचा अंश आहे आणि देवाच्या आज्ञेने मी तुमच्यावर शासन करतो आहे. हा काळ पूर्णपणे संपला आहे असे नाही. ज्या ज्या देशात मुस्लीम शासन आहे, त्या त्या देशातील मुस्लीम शासनकर्ते आज असेच म्हणतात. ते म्हणतात, ''अल्ला सार्वभौम आहे, कुराण त्याच्या आज्ञेचा ग्रंथ आहे आणि आज्ञांप्रमाणे आम्हाला राज्य करायचे आहे.''

प्रजातंत्र सांगते की, जनार्दन जनतेत असतो. त्या जनताजनार्दनाच्या इच्छेने आणि आज्ञेने राज्य करायचे आहे. आकाशातील न दिसणाऱ्या ईश्वराच्या आज्ञेपेक्षा रोज दिसणाऱ्या आणि अनुभवाला येणाऱ्या जनताजनार्दनाच्या इच्छा-आकांक्षा आणि आज्ञा प्रमाण मानून राज्य चालवायचे आहे. प्रजातंत्राने यासाठी आपल्या सर्वांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पहिली जबाबदारी आपल्यात असलेल्या जनताजनार्दनाची ओळख करून घेण्याची आहे. दुसरी ओळख हा जनार्दन दोन हात, दोन पाय, दोन डोळयांचा नसून लाखो हात-पाय आणि डोळयांचा आहे, पण त्याचे शरीर एक आहे. त्याचे मन आणि बुध्दी एक झाली पाहिजे. या जनार्दनाने, म्हणजे समाजाने आपले शासन चालवायचे आहे. आपणच आपले राजे व्हायचे आहे आणि आपणच आपली प्रजा आहोत. आपणच आपले कायदे करणारे आहोत आणि आपणच आपल्या कायद्यांची अंमलबजावणी करणारे आहोत.

आपल्यावर राज्य करण्यासाठी ज्यांना आपण बसवितो, त्यांना कान धरून पुढील गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे. ते सांगण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे, त्याची आपण ओळख करून घेतली पाहिजे. ती गोष्ट अशी आहे - एका राज्याचा राजा राज्य करण्यास वैतागला. वैतागून तो वनात गेला आणि एका ऋषीला भेटला. त्यांना म्हणाला, ''राज्य करण्याचा मला कंटाळा आलेला आहे. एक भानगड मिटवावी तर दुसरी भानगड उभी राहते. तिच्याकडे लक्ष द्यावे तर तिसरी उभी राहते. राज्यांतील कटकटींना काही अंत नसतो. मी काय करावे? मला मनःशांती कशी लाभेल? याचे मार्गदर्शन तुम्ही करावे.''

ऋषी म्हणाले, ''तू संन्यास घे आणि आश्रमात येऊन राहा.'' राजा म्हणाला, ''ते शक्य नाही, कारण त्यामुळे राज्यात गोंधळ निर्माण होईल.'' ऋषी म्हणाले, ''मुलाला राज्य दे आणि स्वस्थ बस.'' राजा म्हणाला, ''मुलगा अजून लहान आहे. त्याला ही जबाबदारी पेलणार नाही.'' ऋषी म्हणाले, ''मंत्रीमंडळाकडे सर्व राज्य दे.'' राजा म्हणाला, ''त्यांच्यात ती क्षमता नाही.'' शेवटी ऋषी म्हणाले, ''हे राज्य तू मला दे, ते मी चालवितो.''

राजाने या गोष्टीला मान्यता दिली आणि राज्य ऋषीला दान करून टाकले. राजा जायला निघाला आणि म्हणाला, ''मी राजकोषातून थोडे धन घेऊन जातो. त्याच्या साहाय्याने थोडा व्यापार करीन.'' ऋषी म्हणाले, ''राजकोषातून तुला धन घेता येणार नाही, कारण ते आता माझे आहे आणि माझी त्याला परवानगी नाही.'' राजा विचारात पडला.

ऋषी त्याला म्हणाले, ''मी तुला नोकरी देण्यास तयार आहे. त्याबद्दल वेतन देईन.'' राजा त्याला तयार झाला. ऋषी म्हणाले, ''आजपासून हे राज्य तुला चालवायचे आहे. तुला त्याचा अनुभव आहे. त्याबद्दल तुला वेतन दिले जाईल.'' राजाने ते मान्य केले आणि तो राज्यकारभार करू लागला.

एक महिन्यानंतर ऋषी त्याला भेटायला आले आणि त्यांनी विचारले, ''तुझे आता कसे चालले आहे?'' राजा म्हणाला, ''माझे उत्तम चालले आहे. मी आता तणावमुक्त असतो. याचे कारण असे की, हे राज्य माझे नसून तुमचे आहे आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी राज्य चालवितो. त्यामुळे राज्याच्या चांगल्या-वाईटाची जबाबदारी मालक म्हणून माझ्यावर येत नाही, ती तुमच्यावर येते. म्हणून मी चिंतेतून मुक्त असतो.''

गोष्टीतील ऋषी म्हणजे आपण, जनताजनार्दन आहोत. पंतप्रधानांना किंवा मुख्यमंत्र्यांना वेतन देऊन राज्य चालविण्यासाठी आपण दिलेले आहे. ते आपले मालक नाहीत, आपण त्यांचे मालक आहोत. प्रजातंत्राने आपल्याला दिलेला हा मालकी हक्क आहे. हा मालकी हक्क म्हणजे 'राइट टू प्रॉपर्टी'सारखा घटनादत्त अधिकार नाही. त्याचे उल्लंघन झाले असता आपल्याला न्यायालयात जाता येणार नाही. प्रजातंत्र सांगते की हा मौलिक अधिकार आपला आपण जपायचा आहे, आपणच त्याचे रक्षण करायचे आहे. रक्षणकर्ते पोलीस आपणच आहोत आणि न्यायमूर्तीदेखील आपणच आहोत. मालकी हक्क म्हणजे मालमत्तेचे उत्तम रक्षण करावे लागते, तसेच तिचे वर्धनही करावे लागते.

मालमत्तेचे रक्षण कसे करायचे, याची ही कथा आहे. एका श्रीमंत पित्याला तीन मुले होती. तो वृध्द झाला. आपल्या संपत्तीचे रक्षण कसे होईल, याची त्याला चिंता होती. त्याने पत्नीचा सल्ला घेतला. पत्नी त्याला म्हणाली, ''आपण चार महिने बाहेर जाऊ या. मी मुलांची परीक्षा घेते.'' तिने तिन्ही मुलांना जाताना धान्यबीजांची एक-एक पिशवी दिली आणि सांगितले की, मी आल्यानंतर ही पिशवी मला द्या.

मोठया मुलाने ती पिशवी कपाटात बंद करून ठेवली. दुसऱ्या मुलाने बाजारात जेव्हा बीजांचे भाव वाढले, तेव्हा विकून टाकली आणि तिसऱ्या मुलाने सर्व बीज पेरून टाकले.

चार महिन्यानंतर आई-बाबा परत आले. आईने मुलांकडे आपली ठेव मागितली. पहिल्या मुलाने कपाटातून पिशवी काढून दाखविली. त्या बीजांना टोके लागलेली होती. दुसऱ्या मुलाने बाजारातून खरेदी केलेल्या बीजाची पिशवी दिली आणि पहिल्या पिशवीतून जो नफा झाला, तो आईला दिला. तिसरा मुलगा म्हणाला, ''माझ्याकडे आता बीज नाही. तू माझ्याबरोबर शेतात चल, बीजांचे काय झाले ते तुला दाखवितो.'' आई शेतात गेली. मुलाने पिशवीभर बीजाच्या गोणीच्या गोणी होतील एवढी बीजसंपत्ती तयार केली होती.

पत्नी आपल्या पतीला म्हणाली, ''हा तिसरा मुलगा तुमचा वारस आहे. पहिला तुमच्या संपत्तीचे रक्षण करील, परंतु वाढ करणार नाही. दुसरा तिच्यात वाढ करील, पण ती मर्यादित असेल, परंतु तिसरा ती उत्पादक कामात लावून तिची अमर्याद वाढ करील.''

मालकी हक्काची जी संपत्ती आपल्याला मिळाली आहे, तिची तिसऱ्या मुलाप्रमाणे वृध्दी करून तो वारसा आपल्याला आपल्या मुला-बाळांना द्यायचा आहे.

(क्रमश:)

vivekedit@gmail.com