(ई) ही सिगारेटच

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Oct-2019   

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ई सिगारेटवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रश्न अचानक ऐरणीवर आला. अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. हे ई सिगारेट प्रकरण काय आहे? नेहमीच्या फुंकायच्या विडी-सिगारेटची जागा या नव्या व्यसनाने का घेतली? नेहमीच्या सिगारेटपेक्षा हे सुरक्षित आहे का? नुकसान काय होतं? आणि यावर बंदी आणण्याची नेमकी कारणं काय? अशा अनेक प्रश्नांचं मोहोळ बऱ्याच लोकांच्या मनात उठलं असं दिसतंय. त्यामुळं या सगळयाचा परामर्श घेणं आवश्यक ठरतं.

 

आता मुळात ही ई सिगारेट आहे तरी कशी? आपल्याला माहीत असलेली सिगारेट म्हणजे एका कागदाच्या गुंडाळीत ठासून भरलेला तंबाखू असतो. धूम्रपान करणारी व्यक्ती ही सुरळी पेटवून तोंडात ठेवते. श्वास आत घेताना पेटवलेल्या सिगारेटचा धूर फुप्फुसात जातो. त्याने येणारी 'किक' त्या व्यक्तीला हा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायला उद्युक्त करते. त्याचं व्यसन होतं. पण या सगळयात अनेक गोष्टी होतात. तंबाखू व त्याच्यावरचा कागद जळल्याने धूर होतो. आपल्याला व इतरांना त्याचा त्रास होतो. मुळात माणसांना सवय होते ती निकोटिनची. व्यसन लागतं ते मेंदू निकोटिनवर अवलंबून राहायला लागतो तेव्हा. पण धूर आणि तंबाखू जळल्याने निर्माण झालेली विषारी द्रव्यं कॅन्सरला कारणीभूत ठरतात. तोंडाला भयंकर वास येतो. सिगारेटची लांबी मर्यादित असते. म्हणजे ती कधीतरी विझणार. मग नवी सिगारेट पेटवल्याशिवाय पर्याय नाही. शिवाय गेल्या काही दशकांमध्ये कॅन्सर आणि तंबाखू यांचं घट्ट नातं लक्षात आल्यापासून त्यावर अनेक ठिकाणी बंदी आली. तल्लफ आल्यावरदेखील धूम्रपान करण्याची इच्छा दाबून ठेवण्याला प्रत्यवाय राहिला नाही. धूम्रपान करणाऱ्यांना हे सगळं कठीण जायचं. यावर तोडगा म्हणून ई सिगारेट निघाली.

 

ई सिगारेटमध्ये प्रत्यक्ष काही जाळलं जात नाही. त्यात एक छोटीशी चेंबरवजा बाटली असते. या बाटलीत द्रवरूप निकोटिन असतं. त्याला जोडलेल्या बॅटरीतून ई सिगारेटला ऊर्जा मिळते. ऊर्जेमुळे बाटलीतल्या द्रवरूप निकोटिनचं बाष्पीभवन होऊन वाफ तयार होते. व्यक्ती जेव्हा कश मारते, तेव्हा ही वाफ त्याच्या फुप्फुसात जाते. एकाच वेळी दोन कामं होतात. एकीकडे सिगारेट ओढल्याची अनुभूती मिळते, निकोटिन मिळतं, पण धूर होत नाही. यातल्या काही इ सिगरेटी झुरका मारल्यावर चालू होतात, तर काहींच्या बाबतीत सिगारेटला जोडलेलं बटन दाबावं लागतं. यात निकोटिनच्या द्रवाची वाफ किंवा होत असल्याने ई सिगारेट ओढण्याच्या प्रकाराला बोलीभाषेत 'व्हेप' वा 'व्हेपिंग' म्हणायला सुरुवात झाली. निकोटिनच्या चेंबरमध्ये निकोटिनव्यतिरिक्त पॉलीइथिलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन वगैरे असतं.

 

ही सिगारेट जेव्हा बाजारात मिळायला लागली, तेव्हा त्यामागे पक्का विचार होता. ज्यांना सिगारेटच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची आहे त्यांना ई सिगारेटचा फायदा होईल. ते व्यसनापासून सहज दूर जाऊ शकतील. पण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर हा होरा चुकीचा असल्याचं दिसतंय.

 

उलट सिगारेट प्यायला सुरुवात करताना ई सिगारेटने श्रीगणेशा करायचा कल वाढला. ही उपकरणं स्वस्त असतात. सहज परवडतात. कारण नेहमीची सिगारेट एकदा पेटवली की फेकून द्यावी लागते. यात तसं नाही. निकोटिनची बाटली बराच काळ चालते. तोंडाला वास येत नाही.. म्हणून पालकांना संशय येत नाही. या कारणाने लहान शाळकरी मुलं या व्यसनाकडे वळण्याचं प्रमाण वाढलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशात होणारी ई सिगारेटची आयात वाढली. तीन वर्षांत 38,126 डॉलर्सवरून 83,484 डॉलर्स इतकी झाली. एकदा ई सिगारेटची सवय झाल्यावर मग ही मुलं प्रत्यक्ष सिगारेटकडे वळण्याची भीती वाढली. ब्रिटनमध्ये 2012 साली ई सिगारेट वापरणाऱ्यांची संख्या 7 लाख होती, ती पुढच्या तीन वर्षांत 26 लाखांपर्यंत वाढली. यावरून अल्पावधीत ती किती लोकप्रिय झालीय याची प्रचिती येते.


सुरुवातीला खूप आशादायक चित्र होतं.
2019मध्ये झालेल्या एका चाचणीत या ई सिगारेटपासून प्रचलित धूम्रपानाच्या सवयीपेक्षा कमी अपाय होत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे 'युरेका' म्हणत अनेक जणांनी या प्रकाराकडे आपला मोर्चा वळवला. धूम्रपानाचा आनंद मिळतोय, पण त्याचे धोके कमी आहेत म्हटल्यावर धूम्रपानप्रेमी तिकडे मोठया संख्येनं वळणं साहजिकच होतं. जिथे मागणी जास्त, तिथे खुल्या अर्थव्यवस्थेची नजर पडणारच. अचानक इतकी मोठी संधी दिसल्यावर ई सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढली. हौसे-नवसे-गौसे सगळेच आपापला ब्रँड बनवू लागले. भरपूर पैसे कमावू लागले. वेगवेगळया फ्लेवर्समध्ये ई सिगारेट आणायची स्पर्धा लागली. सुरुवातीला प्रचलित सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांनी याकडे फॅड म्हणून दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्यांनाही फायदा खुणावू लागला. ई सिगारेट सुरक्षित असल्याचा दावा करत त्यांनीदेखील ई सिगारेटची भलामण करायला सुरुवात केली.


प्रत्यक्षात हा दावादेखील फोल निघाला. निकोटिनच्या बाटलीत असलेला द्रव पूर्णतः सुरक्षित नाही
, हे लक्षात यायला लागलं. निकोटिनचा द्रव हा एकटादुकटा नसतो. त्यात नुसतं निकोटिन नसतं. निकेल, जस्त, टिन यासारखे धोकादायक धातू त्यात असतात.डाय असेटिलसारखी फुप्फुसांना इजा पोहोचवणारी रसायनं असतात. आरोग्याला घातक अशी इतर द्रव्यदेखील असतात. आणि निकोटिनदेखील काही निरुपद्रवी गोष्ट नाही. त्याने होणारं नुकसान सर्वश्रुत आहे. शिवाय या द्रवात दडलेली इतर द्रव्य कॅन्सरलासुध्दा निमंत्रण देऊ शकतात. आताशा ई सिगारेट मुळे आणखी काही आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात का, याचा जोरदार अभ्यास चालू आहे.धूम्रपान हे आरोग्याला वाईट हे निर्विवाद आहे. पण ई सिगारेटसुध्दा अयोग्य
, हे जगाला कळायला लागलं आहे. त्यात घातल्या जाणाऱ्या द्रवातदेखील भेसळ होऊ लागली आहे. शिवाय ई सिगारेट आतल्या द्रवाची वाफ बनवते, त्यात एकवाक्यता नाही. वाफ बनवण्याची प्रक्रिया सर्वच उपकरणांमध्ये एकसारखी नाही. एकसारख्या तापमानाला वाफ बनत नाही. त्यामुळे निकोटिन बाटलीतल्या द्रवाची वाफ वेगवेगळया तापमानाला बनवतो. तिथे तयार होणारी विषारी द्रव्यं तापमानानुसार बदलतात. हादेखील मोठा धोका आहे. सगळयाचा अभ्यास होणं खूप अवघड आहे.


इथे एक धोका उद्भवतो. कमी घातक असलेल्या सवयीचं पुढे अधिक अधिक घातक सवयीमध्ये रूपांतर होतं
, हा अनुभव आहे. याला गेटवे थिअरी असं म्हणतात. भविष्याला सवयीची ही पहिली पायरी ठरेल की काय, ही रास्त भीती वाटायला लागली. हाच धागा पकडून ई सिगारेटवर बंदी घालण्याचा विचार अनेक सरकारांच्या मनात यायला लागला. अजूनपर्यंत आरोग्याविषयीचे निर्णय घेण्यात आपण जगाच्या खूपच मागे असायचो. परंतु भारतातल्या लोकाभिमुख सरकारने या बाबतीत खूपच लवकर पावलं उचलली आहेत असं म्हणावं लागेल. आतापर्यंत ब्राझिल, उरुग्वे, सिंगापूर, सेशल्स, युरोपातले हाताच्या बोटावर मोजता येणारे काही देश यांनीच हे केलं आहे. 18 सप्टेंबर 2019ला जेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजींनी ई सिगारेट बंदीची घोषणा केली, तेव्हा या संदर्भात ठोस पाऊल उचलणाऱ्या देशांमधला तो आघाडीचा देश ठरला. अजून अमेरिकेतदेखील हे केलं गेलेलं नाही. आजतागायत एकूण वीसेक देशांनी हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांनी बंदी घातलेली नसली, तरी त्यावर कडक निर्बंध घातले आहेत. चीनसकट अनेक युरोपीय देश बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेत यावर निश्चित मंथन चालू आहे.


या पार्श्वभूमीवर आपल्या केंद्र सरकारने किती झटपट पावलं उचलली आहेत
, ते कळतं. यापूर्वीची सरकारं साधे साधे निर्णय घेताना किती वेळकाढूपणा करतं, हे लक्षात घेतलं की या जगाच्या बरोबर - किंबहुना काहीसं पटकन घेतलेल्या ठाम निर्णयाबद्दल त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं, मोदी है तो मुमकिन है म्हणावंसं वाटतं ते यासाठीच.


डॉ. सतीश नाईक

9892245272