संस्कृतीवर विज्ञानाचे शिक्कामोर्तब

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Oct-2019   

आर्य हे मुळचे भारतीयचे होते असे पुरावे पुरातत्वशास्त्रातील अग्रगण्य संस्था असणाऱ्या पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व ज्येष्ठ इतिहास व पुरातत्त्व संशोधक प्रा. डॉ. वसंत शिंदे यांच्या हाती सापडले आहेत. त्यांच्या संशोधनातून नवी माहिती समोर येत आहे. यासंबंधी डॉ. शिंदे यांची विशेष मुलाखत.


सर्वप्रथम आपलं अभिनंदन! कितीतरी दशकं भारतात जो प्राचीन इतिहास सांगण्यात आला, त्यावर आधारित राजकीय-सामाजिक ठोकताळे मांडण्यात आले, त्या सर्वांना धक्का देणारं संशोधन आपण आणि आपल्या टीमने केलं आहे. साधारण दहाएक वर्षं आपण या संशोधनासाठी दिली आहेत. या दहा वर्षांनंतर आपलं संशोधन 'राखीगढी'च्या निमित्ताने आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलं आहे. या भरीव कामगिरीबद्दल काय भावना आहेत?

प्राचीन भारतीय इतिहास हा एकूण भारतीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि याबद्दल आपण आजवर चुकीचं शिकतो आहोत, चुकीचं वाचतो आहोत. हा इतिहास दुरुस्त करणं आवश्यक आहे. 'इतिहास बदलणं' असा शब्दप्रयोग मी करणार नाही. त्याचसाठी आमचे प्रयत्न होता की खरा इतिहास उजेडात आणण्यासाठी अशा प्रकारचे काही प्रयत्न करावेत. याच उद्देशाने आम्ही गेली दहा वर्षं या विषयावर काम केलं आणि वास्तव लोकांपुढे आणलं. आता लोकांनाही या विषयाचं महत्त्व समजलं आहे. हडप्पन लोक कोण आहेत हे जोपर्यंत समजलं नाही, तोपर्यंत आपल्याला प्राचीन इतिहास काहीच समजलेला नाही. हडप्पा हे आपलं मूळ आहे. त्यामुळे आम्ही या विषयात उडी घेतली. या प्रकल्पात विविध 16 देशांतील नामवंत संस्थांतील संशोधक सहभागी झाले. दहा वर्षं विविध कसोटयांवर तपासून, तावून सुलाखून जोपर्यंत केलेलं आमचं संशोधन असून यामुळे यावर शंका घेण्यास अजिबात जागा नाही.

आपल्या या प्रकल्पात सहभागी झालेल्या संस्था, संशोधक यांच्याबद्दल थोडं अधिक विस्ताराने..

या संशोधनात अमेरिकेतील सहा संस्था सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूलचा प्रमुख पुढाकार होता. हार्वर्डमधील संशोधकांनी केवळ हडप्पन लोकांच्या डीएनएच अभ्यास करण्यासाठी म्हणून स्वतंत्र लॅब निर्माण केली आहे आणि ज्यात काही भारतीय, जर्मन संशोधक व अमेरिकेतील अन्य काही संस्थांतील संशोधक या विषयावर काम करत आहेत. याशिवाय आमच्या या प्रकल्पात जर्मनीतील मॅक्स प्लांक (Planck) इन्स्टिटयूट फॉर द हिस्ट्री ऑफ सायन्स या ख्यातनाम संस्थेचे संशोधक सहभागी झाले. भारतीय संस्थांमध्ये आमच्या डेक्कन कॉलेजची टीम होती, तसेच Archaeological Survey of Indiaचे काही संशोधक होते, तसेच आणखी अनेक संस्थांतील तज्ज्ञ संशोधक व विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

हे संशोधन सुरू करण्यामागे नेमकी प्रेरणा आणि उद्देश काय होता आणि पुढे ही सर्व प्रक्रिया कशी घडत गेली?

सरस्वती नदीबाबत संशोधन करण्याची माझी इच्छा होती. आमच्याच विद्यापीठात अनेक वर्षांपूर्वी एका संशोधकाने या भागात विस्तृत संशोधन करून सरस्वती खोऱ्यात सिंधू संस्कृतीच्या जवळपास साडेचारशे वसाहती शोधून काढल्या होत्या. हे काम अत्यंत महत्त्वाचं होतं. परंतु त्या वेळी त्यातून समोर आलेली माहिती मात्र अत्यंत त्रोटक होती. या कामाचा पुढे उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यात आणखी संशोधन करणं आवश्यक होतं. त्यामुळे 2006मध्ये मी याबाबत संशोधनाला सुरुवात केली. दुसरी गोष्ट म्हणजे, सरस्वती नदीबाबत बरेच मतप्रवाह आहेत की सरस्वती नदी ही नव्हेच, ती अफगाणिस्तानमध्ये आहे वगैरे. परंतु, आजची घग्गर - हाक्रा नदी, जी पंजाब-हरयाणातून पुढे राजस्थान आणि तिथून पुढे पाकिस्तानात जाते आणि तिथून पुन्हा कच्छमध्ये समुद्राला मिळते. या संपूर्ण नदीचं लुप्त झालेलं पात्र शोधून काढण्यात आलं आहे. इस्रोने यामध्ये मोठं काम केलं आहे, सॅटलाइट छायाचित्रं घेऊन संशोधन केलं आहे. त्यामुळे, ही नदी होती, आपल्या वैदिक ग्रांथांमध्ये वारंवार तिचा उल्लेखही येतो, या नदीचं महत्त्व मला जाणून घ्यायचं होतं. सिंधू संस्कृतीच्या सर्वाधिक वसाहती या सरस्वती नदीच्या खोऱ्यात सापडल्या आहेत. हडप्पन संस्कृतीतील महत्त्वाचा भाग हा सिंधू नदी नसून सरस्वती नदी होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. याशिवाय, हडप्पन संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांचा काही संबंध लावता येतो का, हेही मला पाहायचं होतं. आर्य इथले की बाहेरचे वगैरे जो काही वाद आहे, त्याला काही पुरातत्त्वीय आधार मिळतो का, हे मला जाणून घ्यायचं होतं. तिसरं म्हणजे, मग हडप्पन लोक नेमके कोण, हेही आम्हाला जाणून घ्यायचं होतं. ब्रिटिश इतिहासकारांनी तर असं म्हटलं की हे बाहेरून आलेले लोक आहेत, मेसापोटेमियामधील लोकांनी इथे येऊन सिंधू संस्कृती निर्माण केली. आम्ही साधा विचार केला की हे जर बाहेरून आलेले लोक, तर इथे कोण होतं? कोणी असतील तर त्यांनी काहीच केलं नाही का? त्या लोकसंख्येचं composition कसं होतं? हे सर्व जाणून घेण्यासाठी डीएनए अभ्यासणं आवश्यक होतं. त्यामुळे 2007मध्ये मी हरयाणातील 'फर्माना' या ठिकाणी मोठया प्रमाणात उत्खनन सुरू केलं. आम्हाला त्या काळातील राहणीमानाचे अवशेष हवे होते, ते तिथे मिळाले. त्याच ठिकाणी आम्हाला सर्वांत मोठी दफनभूमीदेखील मिळाली. 2008-09मध्ये डीएनएसाठी त्या दफनभूमीत आम्ही उत्खनन सुरू केलं.

 

या उत्खननात बरेच प्रयत्न करूनही आम्हाला फारसं काही मिळालं नाही. नंतर लक्षात आलं की कदाचित, उत्खननादरम्यान जी काही काळजी घ्यायला हवी ती आम्ही घेतली नसावी. डीएनए हा नाजूक, संवेदनशील विषय आहे. आम्ही सांगाडयांचं उत्खनन केलं खरं, पण जवळपास दोनेक महिने ते तसेच उघडयावर राहिले. यामागचा हेतू हा की सर्वसामान्य लोकांनी हे उत्खनन पाहावं. परंतु मग यादरम्यान ऊन, पाऊस, वारा यामुळे जो काही होता-नव्हता तो डीएनए नष्ट झाला. आपल्या हवामानात इतका पूर्वीचा डीएनए टिकून मुळात अवघड असतं. त्यानंतर मग राखीगढीत जेव्हा उत्खनन सुरू केलं, तेव्हा आम्हाला अन्य संशोधकांनी उत्खननादरम्यान काळजी घ्यायला सांगितलं. उदा., एकाच वेळी सर्वत्र खोदकाम न करणं, मास्क-हँडग्लोव्ह्ज वापरणं, ऍप्रन वापरणं, उत्खनन झाल्याझाल्या त्याची नोंद करणं, सॅम्पल्स तत्काळ लॅबमध्ये पाठवणं वगैरे. त्याप्रमाणे आम्ही केलं आणि मग संशोधन यशस्वी होऊ लागलं. राखीगढीमध्ये आम्ही जवळपास चाळीस सांगाडे शोधले व त्यांचा अभ्यास केला. त्या वेळी डीएनएद्वारे आम्हाला सबळ पुरावे मिळू शकले. दुसरी गोष्ट म्हणजे, आम्ही संशोधनातील बऱ्याचशा गोष्टी भारतातच केल्या. हैदराबादच्या सीसीएमचे - सेंटर फॉर सेल्युलर ऍंड मॉलेक्युलर बायोलॉजीचे संशोधक आमच्यासह काम करत होते. त्यांच्याबरोबर सुरुवातीला डीएनएचा अभ्यास केला. परंतु, अत्याधुनिक प्रणालीने याचा अभ्यास करायला हवा, हे आम्हाला कालांतराने यात जाणवलं. पुन्हा केवळ भारतीय लोकांनीच संशोधन केलं असतं तर उद्या याच विदेशी संशोधक वा संस्थांनी आमच्यावर शंका घेतली असती. म्हणून आम्ही त्यांनाच या संशोधनात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आणि मग 16 देशांतील संशोधक यामध्ये सहभागी झाले. त्यानंतर आम्ही गोळा केलेली सॅम्पल्स त्यांच्याकडून क्रॉस-चेक करून घेतली. त्यामुळे आमच्या संशोधनात शंका घेण्यास काही वाव उरला नाही. अशा रितीने असंख्य अडीअडचणींवर मात करून आमचा हा प्रकल्प सफल झाला.

आर्य संस्कृती की सिंधू संस्कृती आणि इथली मूळ संस्कृती, किंवा आर्य-अनार्य हा एकूण वाद आणि त्यावरून आजवर प्रचलित असलेली मतमतांतरं इ.च्या पार्श्वभूमीवर आपलं संशोधन नेमकं काय सांगतं? आपले निष्कर्ष सिध्द करणारे नेमके कोणते निश्चित पुरावे आपण सांगू शकाल?

हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जेव्हा आम्ही डीएनएचा अभ्यास केला, आमच्या सॅम्पल्सबरोबरच आम्ही तत्कालीन अन्य भौगोलिक प्रदेशांतील - उदा., इराण वा आजूबाजूच्या भागातील लोकांच्या डीएनएचाही अभ्यास केला. नंतर आधुनिक काळातील डीएनएचाही आम्ही अभ्यास केला. या तुलनात्मक अभ्यासानंतर आमच्या हे लक्षात आलं की, 'स्टेपी लोक (steppe) जे मध्य आशियातून आले, ज्यांना पुढे आर्य म्हटलं गेलं आणि त्यांच्यामुळे आपली संस्कृती निर्माण झाली' असं आजवर म्हटलं जात होतं, त्या लोकांच्या डीएनएचा आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा हे लक्षात आलं की मध्य आशियातील लोकांची ancestry आणि हडप्पन लोकांची ancestry वेगळी आहे. हेच इराणमधील लोकांच्याही बाबतीत झालं. त्यांचीही ancestry वेगळी निघाली. दुसरीकडे, आम्ही जेव्हा अंदमानमधील मूळ hunter gatherers जमातींशी जेव्हा हडप्पन लोकांचा डीएनए जुळवून पाहिला, तेव्हा मात्र तो जुळला. त्यामुळे साधारण 12 हजार वर्षांपूर्वीच ही सेपरेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. hunter gatherersमधून दोन वेगवेगळया शाखा निर्माण झाल्या. एकात इराणी शेतकरी झाले, दुसऱ्या शाखेत दक्षिण आशियाई शेतकरी झाले. तिथपासून मग आतापर्यंत सलगपणा (continuity) आढळतो. हे फार महत्त्वाचं आहे. जर बाहेरून आलेल्या लोकांनी इथे आक्रमण केलं असतं आणि इथल्या मूळ लोकांना हुसकावून लावलं असेल, तर त्यांची ancestry आपल्याला मिळाली असती, त्यात continuity मिळाली नसती. पुरातत्त्वीय संशोधनातही आम्हाला त्याचे पुरावे मिळाले असते, बाहेरचे लोक आपली संस्कृती घेऊन आले, हे कुठेतरी आढळलं असतंच. तसं काहीच आढळलं नाही. त्यामुळे या संशोधनाअंती आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की, आपल्या या प्रदेशात गेल्या 12 हजार वर्षांपासून continuity आहे, पुढे जो काही विकास झाला असेल तो इथल्याच लोकांमधून झालेला आहे. पुरातत्त्वीय संशोधनातून आम्हाला याचे पुरावे मोठया प्रमाणात मिळाले आहेत. आधी सुरुवात झाली, मग पुढे विकास होत गेला, हे स्पष्टपणे आढळून आलं आहे. त्यातूनच पुढे हडप्पा संस्कृती उदयास आली, बाहेरून कोणतंही आक्रमण झालेलं नाही.

इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की, अगदी प्राचीन काळापासून भारतीयांचा अन्य प्रदेशांतील, खंडातील लोकांशी मुख्यतः व्यापाराच्या निमित्ताने संबंध आलेला आहेच. त्यामुळे थोडयाफार प्रमाणात वांशिकदृष्टया मिश्रण हे झालेलं आहेच. परंतु, त्यातून ancestry मात्र बदलली नाही. त्यामुळे आर्य आक्रमणाचा सिध्दान्त चुकीचा आहे, हे आज आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. बाहेरील लोकांनी इथे येऊन प्रगती केली हे सांगणं चुकीचं आहे. जी काही प्रगती झाली ती इथल्याच लोकांनी केलेली आहे. यामुळे आजवर आपल्याला सांगितल्या गेलेल्या इतिहासाला आता एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे, असं मला वाटतं.

एक थोडा वेगळा प्रश्न. तुम्हीही इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक होण्यापूर्वी तुम्हीही कधीतरी विद्यार्थी होता, शाळेत- महाविद्यालयात गेलात, तिथे तुम्ही इतरांनी लिहिलेला / सांगितलेला इतिहास वाचला असेल.. आर्य-अनार्य वाद तुम्हालाही शिकवला गेला असेल. आणि आज तुम्ही सबंध प्राचीन इतिहास नव्याने लिहावा लागेल, इतकं मोठं संशोधन केलं आहे. याबद्दलच्या भावना कशा सांगाल?

 

ही एक अत्यंत समाधानाची भावना आहे की आम्ही यामध्ये काही योगदान देऊ शकलो. आजवर चुकीचा इतिहास दुरुस्त करू शकल्याचं हे समाधान आहे..

आर्य आक्रमण सिध्दान्त आणि त्यावरून विविध ऐतिहासिक, सामाजिक संदर्भाच्या बाबतीत भारतात गेल्या 70-80 वर्षांत बरंच राजकारण झालं आहे, येथील समाजकारणावरही याचं प्रतिबिंब उमटलं आहे. अशा स्थितीत आपलं हे महत्त्वाचं संशोधन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत - विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पाठयपुस्तकातून पोहोचवण्यासाठी काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं?

मुळात यामध्ये आणखी मोठया, व्यापक प्रमाणावर संशोधन होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा प्रकारच्या नव्या संशोधनांबाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या पाठयपुस्तकातून यावी, यासाठी आमचा प्रयत्न राहील. पाठयपुस्तक निर्मिती करणाऱ्या विविध संस्थांकडे आम्ही यासाठी पाठपुरावा करणार आहोत. यासाठी आगामी काळात यूजीसी, मनुष्यबळ विकास मंत्रालय आदींशी आम्ही संपर्क करणार आहोत. हे संशोधन म्हणजे सुरुवात आहे, असं मी मानतो. आता या संशोधनावरून पुढे हडप्पन संस्कृतीविषयीच्या अधिक सखोल संशोधनाला वाव मिळेल. त्या दृष्टीने आमची आगामी काळातील वाटचाल राहील.

मुलाखत : निमेश वहाळकर