‘‘झुंडबळी ही भारतीय परंपरा नाही’’- मा. सरसंघचालक

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Oct-2019   

‘‘मॉब लिंचिंगहा काही भारतीय, हिंदू शब्दप्रयोग नाही. आमची तशी परंपराही नाही. पण हा शब्द घेऊन संपूर्ण देशाला हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयास सुरू आहे. अशा घटना जेव्हा होतात, तेव्हा त्या एकतर्फी होत नाहीत. अशा घटनांचे संघाने कधीच समर्थन केले नाही. त्या प्रत्येक घटनांच्या विरोधात संघ उभा ठाकला आहे. संतप्त करणारी भाषा कृती या सगळ्यांपासून आपण दूर राहिले पाहिजे. अशा घटनांवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी देशातील कायदे परिपूर्ण आहेत. त्यांचा प्रामाणिकपणाने आणि कठोरतेने वापर झाला पाहिजे. जर विद्यमान कायदे अधिक कठोर करण्याची गरज असेल तर तसेही केले पाहिजे.’’ असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.


ते नागपूर शाखेच्या विजयादशमी उत्सवात संघाला देशाला मार्गदर्शन करीत होते. या उत्सवाला प्रमुख अतिथी एच.सी.एल.चे शिव नाडरजी होते. या वेळी बोलताना मोहनजी भागवत म्हणाले, ‘‘लिंचिंग हा शब्द ख्रिश्चन धर्मीयांत आहे. हिंदू धर्मात तशा घटना होत नाहीत. समाजातील विविध वर्गात परस्परांत सद्भावना, संवाद आणि सहयोग वाढायला हवा. घटनेच्या कक्षेत राहूनच अभिव्यक्ती व्हायला पाहिजे. हा संवाद झाल्यावर काही बाबातीत काही निर्णय न्यायालयात होतीलच. न्यायालयाचे निर्णय कसेही झाले तरी परस्परातील सद्भाव कमी व्हायला नको. कुणाच्याही भावनांना धक्का पोहोचेल असे वर्तन व्हायला नको कठोर शब्दांचाही वापर व्हायला नको. असा संयम बाळगणे ही समाजातील फक्त एका घटकाची जबाबदारी नाही, तर सर्वांची ती जबाबदारी आहे. त्याच्या पालनाची सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी.’’


आपल्या भाषणाचा प्रारंभ करताना सरसंघचालकजी म्हणाले, ‘‘या वर्षी मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2014ला ज्या निवणुका झाल्या त्या फक्त नकारात्मक बाबींवर झाल्या की जनतेला एका विशिष्ट दिशेने जायचे होते म्हणून झाल्या होत्या? हे बघायला संपूर्ण जगाचे लक्ष 2019च्या निवडणुकीकडे होते. या वेळी जनतेने दाखवून दिले की, त्यांना लोकशाही हवी आहे. लोकशाही ही विदेशातून आलेली नवी अपरिचित बाब नाही, तर या देशाच्या जनमानसात ती रुजली आहे. लोकशाहीत राहणे लोकशाही यशस्वीपणे चालली पाहिजे यासाठी देशातील जनतेने आपला निश्चय केला आहे, ही बाब 19च्या निकालांनी अधोरेखित झाली. जनतेच्या भावना हे सरकार जाणते, हे कलम 370 निष्प्रभ होण्यातून सिद्ध झाले आहे’’ असे ठामपणाने सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘सत्ताधारी पक्षाची तर ही परंपराच होती, पण संसदेच्या दोन्ही सभागृहांत अन्य पक्षांचीही त्याला साथ मिळाली, म्हणून पंतप्रधान, गृहमंत्री, शासन करणारा पक्ष त्या विचाराला साथ देणारे अन्य पक्षही अभिनंदनास पात्र आहेत.’’


चांद्रयान अभियानाचेही त्यांनी आपल्या उद्बोधनातून कौतुक केले. त्या मोहिमेला अपेक्षेप्रमाणे यश आले नसले, तरी आम्ही जे साधले आहे ते अभिमानास्पद आहे. जनतेची परिपक्व कृती, देशाचा जागृत झालेला सन्मान, सरकारमधील दृढ संकल्प आमच्या शास्त्रज्ञांच्या सामर्थ्याची अनुभूती यामुळे हे वर्ष आमच्या कायम स्मरणात राहील. सीमा अधिक मजबूत होणे देशातंर्गत उद्भवणारा हिंसाचार कमी होणे यांचाही त्यांनी उल्लेख केला.


आपल्या भाषणाच्या प्रारंभीच 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या स्व. दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दीचा उल्लेख करत सरसंघचालक आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘देशात सध्या मंदीचे वातावरण आहे. या आर्थिक मंदीची चिंता करायला हवी, पण चर्चा होऊ नये. जगात सुरू असलेला आर्थिक स्पर्धेचा परिणाम भारतासह सर्वच देशांना सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मागील दीड महिन्यापासून सरकारने काही पावले उचलली आहेत. या मंदीवर मात करण्यासाठी विदेशी गुंतवणुकीस अनुमती देणे, उद्योगांचे खाजगीकरण करणे ही पावले आहेत. पण त्याचबरोबर शासनाच्या लोककल्याणकारक योजना कार्यक्रम खालील पातळीवर लागू करण्यासाठी अधिक तत्परता, क्षमता आवश्यक आहे. अनावश्यक कठोरताही टाळली तर खूप गोष्टी सुरक्षित होतील.

परिस्थितीच्या दडपणात जर आपले स्वदेशीचे भान सुटले तर नुकसान होईल. दैनंदिन जीवनात देशभक्तीची अभिव्यक्ती यातूनच स्व. दत्तोपंत ठेंगडीस्वदेशीमानत होते. स्व. विनोबा भावेंनीही याचाच अर्थ स्वावलंबन अहिंसा असा केला आहे, हे सांगून डॉ. भागवत म्हणाले, ‘स्वचा विचार करण्यात स्वतंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या दशकानंतरीही आम्ही कमी पडतो आहोत. याचे कारणगुलाम करणारी शिक्षणपद्धतीहीच आहे. आम्हाला भारतीय दृष्टीकोनातून शिक्षणाची रचना करावी लागणार आहे. स्वभाषा, स्वभूषा, स्वसंस्कृती यांचा सम्यक परिचय करून देणारी भारतीय शिक्षणपद्धती विकसित करावी लागेल..

समाजाचे प्रबोधन समाजत अनुकूल वातावरण निर्माण करण्यात माध्यमे महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात’’ असे आवर्जून सांगून सरसंघचालकजी पुढे म्हणाले, ‘‘त्यासाठी व्यापारी दृष्टीने मसालेदार सनसनाटी विषयांच्या मोहाबाहेर आम्हला यावे लागेल. तसे झाले तर ही वातावरणनिर्मिती अधिक गतीने होऊ शकेल.’’’

भारत हिंदू राष्ट्र आहे हे ठामपणे सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘संघाच्या मते हिंदू हा शब्द फक्त स्वत:ला हिंदू म्हणणार्यांपर्यंत सीमित नाही. जे भारतीय आहेत, ज्यांचे पूर्वज भारतीय आहेत जे सर्व विविधतांचा स्वीकार करीत, सन्मान करीत एकजुटीने देशाला वैभवाच्या मानवतेच्या, शांती प्रास्थापित करण्याचा कामाला सक्रिय असातत, ते सर्व भारतीय हिंदू आहेत. त्यांचा निवास, पूजापद्धती, त्यांची भाषा, त्यांची खानपानाची सवय, रीतीरिवाज कसलेही असले तरी त्याने फरक पडत नाही

राष्ट्राची उन्नती, समाजातील सगळ्या अडचणी जाणत त्यावर मात करणे ही कामे ठेक्याने देता येत नाहीत. वेळोवेळी नेतृत्व करण्याचे काम अवश्य कोणी ना कोणी करेल, पण जोपर्यंत जागृत जनता अशा प्रयत्नात सहभागी होत नाही, तोपर्यंत संपूर्ण शाश्वत सफलता मिळणार नाही. समाजात वातावरण निर्माण करणार्या कार्यकर्त्यांना निर्माण करण्याचे काम संघ करीत आहे. या कार्यकर्त्यांनी देशभरात जे कार्य उभे केले आहे, त्यातून हे सिद्ध होतं की आम्ही, आमचे कुटुंब, आमचा देश संपूर्ण विश्व सुखी होण्याचा हाच मार्ग आहे. चला तर, त्यात सहभागी होऊ या!’’ असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले.

सुरुवातीला शिव नाडर यांचे भाषण झाले. महानगर संघचालक राजेशजी लोया यांनी प्रास्ताविक, परिचय आभारप्रदर्शन केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री जनरल (नि.) व्ही.के. सिंग संपूर्ण गणवेशात उपस्थित होते.