अल गजाली

विवेक मराठी    12-Oct-2019   
Total Views |

***रमा गर्गे***

आज जगभरात असलेले बरेच सुन्नी मुस्लीम (sects) प्रेषित मुहम्मद (स) यांच्यानंतर ज्याला मानतात, तो तत्त्ववेत्ता म्हणजे अल गजाली होय. प्रत्येक क्षणात खुदाचे कसे योगदान असते हे त्याने आपल्या लिखाणातून मांडले. 'एक पत्ता भी अल्लाताला की मर्जीबिना हिल नहीं सकता' हे त्याचे वाक्य खूप प्रसिध्द आहे.इस्लामी तत्वज्ञानात अल गजालीचे सर्वोच्च योगदान आहे. जगातील सुन्नी पंथीयांवर या तत्त्ववेत्त्याचा प्रभाव आहे. त्याला इमाम गजाली असे म्हटले जाते. अल गजाली मूज्जदिज म्हणजे इमान ताजे करणारा आणि इस्लामचा जीवनमार्गी
, हुज्जत अल इस्लाम - authority on Islam म्हणूनही ओळखला जातो. पै. मुहंमद(स) यांच्यानंतर ज्याच्या जीवनात इस्लाम शोधला जातो, तो तत्त्ववेत्ता म्हणजे अल गजाली होय.

 

हा इस्लामी कायदेपंडित, विचारवंत, इस्लामी चिंतक आणि सुफी साधक होता. याचे पूर्ण नाव 'अबू हमीद मोहम्मद बिन अल तुसी अल गजाली' असे आहे. इराणमधील खोरासान प्रांत तूस या ठिकाणी त्याचा जन्म झाला. जूर्जान व तूस येथे त्याचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

लहान असताना अल गजालीला शिक्षणाची खूप आवड होती. एक कथा सांगितली जाते की गावातील श्रीमंत माणसाकडे, त्याच्या मुलांना शिकवण्यासाठी एक शिक्षक येत असत. अल गजाली त्या शिक्षकांसोबत गावच्या वेशीपर्यंत रोज चालत जात असे. शिक्षक उंटावर असत आणि अल गजाली पायी पायी चालत असे, त्यांना आपले प्रश्न खालून विचारत असे. अशा पध्दतीने त्याने शिक्षणाची आपली आस पूर्ण केल्याचे सांगितले जाते. अत्यंत बुध्दिमान असा हा अल गजाली 1058 साली जन्मला.

बगदादच्या निजामिया विद्यापीठात तो 1091 सालापासून शिकवू लागला. या विद्यापीठात शिकवत असताना त्याच्या लक्षात आले की ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो, सॉक्रेटिस आणि ऍरिस्टॉटल यांचा आपल्या शिक्षणावर प्रभाव आहे. अल फराबी आणि इब्न सीना या दोघा इस्लामी तत्त्ववेत्त्यांनी इस्लामेत्तर लोकांचे तत्त्वज्ञान स्वीकारले आहे आणि हे तत्त्वज्ञान मूळ इस्लामला भ्रष्ट करीत आहे, या विषयावर अभ्यास व चिंतन करण्यासाठी अल गजाली विद्यापीठातून बाहेर पडला.


त्यानंतर अल गजाली अकरा वर्षे धर्मशास्त्राचे अध्ययन आणि आणि गूढवादाचे चिंतन करण्यामध्ये मग्न झाला. या काळात अल गजाली दमास्कसमध्ये राहिला आणि त्याने जेरुसलेम इत्यादी भागात भ्रमण केले. त्याने सुफी गूढवादी संस्कृती अंगीकारली. दारिद्रयात व कष्टात दिवस काढले. ग्रीक तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि नंतर आपले प्रबंधरूपी ग्रंथ लिहिले!

1106 साली अल् गजाली पुन्हा निजामिया विद्यापीठात परतला. त्या वेळी तो पूर्ण बदलून गेला होता. त्याने 'तहाफुत अल फलसफा' म्हणजेच 'तत्त्वज्ञानाचे खंडन' आणि 'एह्या उलूम अलदीन' म्हणजेच 'इस्लामी धर्मशास्त्राचे पुनरुज्जीवन' हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. त्याने 'फिक्र' म्हणजे कायदे आणि 'कलाम' म्हणजे धर्मशास्त्र यावरही भरपूर चिंतन केले होते.

अरबी संस्कृतीवर त्याकाळी युनानी तत्त्ववेत्त्यांचा प्रभाव होता. तो काढून टाकणे आणि संपूर्णपणे कुराण आधारित इस्लामी संस्कृती पुनरुज्जीवित करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्याचा वैचारिक पूर्वज 'अशारी' यानेदेखील ग्रीक तत्त्वज्ञानाला अशाच प्रकारचा विरोध केला होता.

कार्यकारणभावाचा सिध्दांत सर्वच जगाने मान्य केला होता. मात्र अल गजालीने या सिध्दांताला कुराण विरोधी मानले. त्याने तो सिध्दान्त खोडून काढला व नवा सिध्दान्त मांडला. यालाच 'ऑकेजनॅलिझम' अर्थात 'प्रसंगवाद' असे म्हणतात. यानुसार, प्रत्येक ठिकाणी नेहमीच कार्यकारणभाव आवश्यक नाही - उदा., पाण्याची वाफ बनते तर ती वाफ अग्नीशिवायही होऊ शकते. त्याच्या मते खुदाच्या मर्जीने सारे काही होत असते.

 

'तरतीब' म्हणजेच एखाद्या गोष्टीचा सिक्वेन्स किंवा दिसणारा निसर्गनियम हा विज्ञानाच्या नियमाने होत नसून खुदाच्या इच्छेने होत असतो. यालाच अल गजाली 'तकदीर' असे म्हणतो. जग हे अनंत नसून सांत आहे, निसर्गाचे नियम हे स्वाभाविक नाहीत, असे इमाम गजालीने प्रतिपादन केले.

यालाच संकल्पनात्मक भाषेत म्हणतात की 'कुदरत के कानून, उसूल इनमे तरतीब दिखती है वह मुमकीन है मगर ऐसाही होता रहे ये वाजीब/लाजमी नही।'

विश्वाचे, काळाचे आणि पदार्थांचे शाश्वत असणे, रुह अर्थात जिवाचे मृत्यूनंतर संपणे हे इस्लामविरोधी आहे, असे अल गजाली स्पष्ट करतो.

इमाम गजाली लिहितो, 'भुकेल्याची अन्नाशिवाय तृप्ती होऊ शकते, ज्याचा गळा कापला आहे तो जगू शकतो आणि ज्याचा गळा कापला नाही तो मृत ठरू शकतो''

इस्लामबाहेरील तत्त्ववेत्त्यांचे विचार स्वीकारायचे असतील, तर ते केवळ मूळ 'अब्राहमच्या' परंपरेतून आलेले विचार स्वीकारले जातील. त्याशिवाय असणारे तत्त्वज्ञान हे अंतर्विरोधी असते, असे अल गजाली स्पष्ट करतो.

अल गजालीने इस्लामी शिक्षण पध्दतीला कुराणाचा आधार मिळवून दिला आणि इस्लाममधील शिक्षणाचा हेतू स्पष्ट केला.

 

इस्लामिक बंधुत्व यावरचे त्याचे मत असे होते की, 'कितीही 'फिरके' म्हणजे गट असले, तरी अल्ला सर्वोपरी मानणारे सगळे एक होत.'

 

अल गजालीने 'एह्या उलूम अलदिन' यामध्ये चार मुख्य गोष्टी सांगितल्या - इबादत म्हणजे पूजा, आदात म्हणजे सामाजिक रूढी, मुहलीकात म्हणजे दुर्गुण किंवा पाप आणि मुंजीयात म्हणजे सद्गुण, या बाबी कुराणानुसार व्हावयास हव्या.

त्याच्या नीतिमत्तेच्या कल्पना पूर्णपणे 'अहल ए हादिस'वर अवलंबून होत्या. मुहंमद स. विशिष्ट वेळी जे आणि जसे वागले, ते कोणत्याही तर्कांशिवाय स्वीकारले पाहिजे,असे त्याचे मत होते.

 

इमाम गजलीच्या मते, 'अक्ल म्हणजेच समज, किंवा बुध्दिमत्ता यांच्या जोरावर आपण कुराणातील वचनांचे अर्थ लावू शकत नाही, कारण 'अक्ल'मुळे दुविधा निर्माण होते. आणि त्यामुळे इबादत, म्हणजे रोजचे धार्मिक जीवन असफल होऊ शकते. जन्नत हे मुख्य 'आखरत' - ध्येय बाजूस पडते.

 

म्हणूनच केवळ कुराण आणि हदीस यांना प्रमाण मानून मुस्लिम व्यक्तीने 'शरिया'च्या आधारे जीवनातील पाच गोष्टींचे नियमन केले पाहिजे, ज्यात धर्म, अकल, संतती, संपत्ती आणि दैनंदिन जीवन यांचा समावेश होतो.


अल गजालीला कुराणातील वचनांवर इस्माइली (शिया) आपले काही मत मांडत असत
, ते पटत नव्हते. त्यावरही त्याने कडक प्रहार केले.

अल गजाली तत्वज्ञ होता खरा, पण त्याने तत्वज्ञान आणि तर्काचा आधार घेऊन गुढवादाला पुष्ट केले. त्याने तत्ववेत्यांवर हल्लाबोल केला. त्यामुळेच नंतरच्या काळात कुराण, शरिया, हदीस यांतील वचनांची चिकित्सा झाली नाही. कालसुसंगत मांडणीचे धाडस कुणी केले नाही.

 

'शरिया'चे नियम पालन जनमानसात ठसवण्यात अल गजाली यशस्वी ठरला.

 

अरबी तत्त्वज्ञानाला युनानी विचारप्रवाहापासून दूर ठेवण्यातही त्याने यश मिळवले. जग कसे तयार होते, प्रत्येक क्षणात खुदाचे कसे योगदान असते हे त्याने आपल्या लिखाणातून मांडले. 'एक पत्ता भी अल्लाताला की मर्जीबिना हिल नहीं सकता' हे त्याचे वाक्य खूप प्रसिध्द आहे. वस्तूला स्वेच्छा नाही हे त्याचे म्हणणे होते.

1111मध्ये अल गजालीने जगाचा निरोप घेतला. त्याने काही काळ सुफी साधक म्हणून घालवला. मात्र त्याने शेवटपर्यंत सुफीतत्वे अंगिकारली होती की नाही, यावर मतभेद आहेत.

 

आज जगभरात असलेले बरेच सुन्नी मुस्लीम (sects) प्रेषित मुहम्मद (स) यांच्यानंतर ज्याला मानतात, तो तत्त्ववेत्ता म्हणजे अल गजाली होय.