'श्री' कोल्हटकर - एक आनंदाचा झरा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक12-Oct-2019

**श्रीकांत फौजदार***


'श्री' काल्हटकरांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रसन्न असे होते. त्यांचा सहवास म्हणजे 'आनंदाचा झरा' अनुभवणे. हास्य, विनोद व चेष्टा ही त्यांची त्रिगुण मात्रा होती. बोलण्याचीही त्यांची एक शैली होती. संघस्वयंसेवक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गुणसमुच्चय होता. उत्कृष्ट शारीरिक घोषवादक, संवादकौशल्य, संपर्क वृत्ती आणि सर्वस्व समर्पण ही त्यांची संघकार्याची चतुःसूत्री होती. 

दि. 22 ऑगस्ट 2019 रोजी श्रीकृष्ण कोल्हटकर यांचे पुणे मुक्कामी वयाच्या 81व्या वर्षी निधन झाल्याचे 'दै. तरुण भारत'मधील वृत्तावरून समजले. अलीकडे बराच कालवधी ते उपचारार्थ पुण्यातील बंधूकडे होते. कर्करोगाच्या व्याधीतून सुधारणा झाली, मात्र अंतिम हृदयविकाराच्या धक्क्याने प्राणज्योत मालवली. केवळ एक महिन्यापूर्वीच राजाभाऊ आचार्य यांच्या पत्नींच्या निधनाचे वृत्त निवेदन करण्यासाठी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता काहीसा नैराश्याचा आणि व्याधींचा सूर बोलण्यात आलाच. त्यांच्या निधनानंतर 1960 सालापासून जवळजवळ 50 वर्षांचा प्रदीर्घ असा जीवनपट स्मृतिपटलासमोर आला. ज्येष्ठ कार्यकर्ते, अधिकारी किंवा प्रचारक यांच्या कार्याची चर्चा होते, नोंद घेतली जाते. मात्र क्षेत्रीय स्तरावरील दीर्घकाळ कार्यरत राहणाऱ्या स्वयंसेवकांची नोंद क्वचितच होते. अर्थात संघकार्यात आपण अशी वर्गवारी किंवा तुलना करीत नसतो. पण हे शल्य उराशी राहतेच.


श्रीकृष्ण कोल्हटकर हे 'श्री' नावानेच सुपरिचित होते आणि या एकेरी नावानेच संघकार्यात सर्वत्र वावरले. उत्कृष्ट शरीरयष्टी आणि प्रभावी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सर्वसामान्य समाजात संघस्वयंसेवक म्हटले की ते गंभीर प्रकृतीचा, सतत 'बौध्दिका'चा डोस देणारा, काहीसा एकांगी अशी प्रतिमा असते. 'श्री'चे व्यक्तिमत्त्व या सर्वांना छेद देणारे होते. त्यांचा सहवास 'आनंदाचा झरा' असे. हास्य, विनोद व चेष्टा ही त्यांची त्रिगुण मात्रा होती. बोलण्याचीही एक शैली होती. संघाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे त्यांनी आयुष्याकडे गंभीरपणे कधी पाहिले नाही. त्यामुळे त्यांचा सहवास सर्वांनाच हवासा वाटे.


संघस्वयंसेवक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गुणसमुच्चय होता. उत्कृष्ट शारीरिक घोषवादक, संवादकौशल्य, संपर्क वृत्ती आणि सर्वस्व समर्पण ही त्यांची संघकार्याची चतुःसूत्री होती. वार्षिक शिबिरे व संघशिक्षा वर्ग यांच्यामध्ये त्यांचा निवास व वावर हा निखळ आनंद असावा याचे वर्गशिक्षक म्हणून त्यांचे कौशल्य असामान्य होते. या बळावर त्यांनी सामान्य स्वयंसेवक ते शीर्षस्थानी असलेले सरकार्यवाह-संघचालक यांची मने जिंकून घेतली. या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या सेवाभावी गुणांचे जे दर्शन घडविले, ते जीवन सार्थकी होते.


गृहनिर्माण मंडळातील आपल्या सेवानिवृत्तीनंतर 12 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्यांनी संघाच्या 'पितृछाया' कार्यालयाचे 'कार्यालय प्रमुख'म्हणून कार्य केले. हा कालावधी संपूर्णपणे 'प्रचारक' या स्वरूपाचा होता. संघाचे संघचालक, सरकार्यवाह व वरिष्ठ अधिकारी यांचा निवास या ठिकाणी असे. परिवारातील काही मान्यवरांचाही निवास या ठिकाणी असे. या सर्वांची सेवा करण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. त्यांचे हे कार्य संस्मरणीय आहे.


सेवा कार्याचा कळस म्हणून दोन प्रमुख घटनांचा उल्लेख करणे आवश्यक वाटते. प्रथम मा. मोरोपंत पिंगळे यांची अंतिम क्षणी दीड वर्ष केलेली शुश्रुषा आणि द्वितीय म्हणजे मा. बाळासाहेब देवरस यांची सहा महिने केलेली शुश्रुषा. स्वयंसेवकाला यापेक्षा आणखी कोणते भाग्य पाहिजे! वर्षानुवर्षे गुरुपौर्णिमेला समर्पणाची बौध्दिके आणि पद्ये श्रवण करण्यापेक्षा 'नेता ऐसा मिळे आम्हाला' या सश्रध्द भावनेने केलेले सेवा समर्पण परमोच्च. 'श्री' कोल्हटकरांची ही तपसेवा अमोल आनंदठेवा होता. अनेक व्यक्ती, घटना-प्रसंग, संघर्ष आणि संवाद - काय नाही पाहिले त्यांनी त्यांच्या सहवासात! अर्थातच त्या सर्वांची उजळणी व्हावयाची. या सर्व त्यागाचा त्यांनी कोणताही व्यक्तिगत स्वार्थ साधला नाही आणि कुणाला साधू दिला नाही, प्रसंगी कठोरच राहिले. स्मृतींचे एक चिरंतन दालन त्यांच्या आयुष्यात निर्माण झाले होते.


श्रीकृष्ण कोल्हटकर यांच्या संघकार्याचे मूल्यमापन करताना विशेष आठवते ते त्यांचे घोष शाखेचे कार्य. 'घोषविभाग' हा संघाचा 'अंलकार' समजला जातो. अलंकारासारख्याच घोष शाखा त्यांच्या वैशिष्टयाने चालतात. घोष शाखेच्या स्वयंसेवकाकडेही आदराने बघितले जाते. घोष शाखांचा विस्तार आणि त्यातील वाद्यवादनांचे तरुणांचे आकर्षण हे समीकरण घेऊन विशेष प्रयत्न केले गेले. तरुणंाची चांगली संख्या आकर्षित झाली. मुंबई महानगरात, विशेषतः पूर्व उपनगरात घोष शाखांच्या निर्मितीमध्ये आणि त्यांच्या वृध्दीकरणात श्री कोल्हटकरांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे होते. ते स्वतःउत्कृष्ट 'शंखवादक' होते. विशेष म्हणजे नित्य शाखांची जबाबदारी सांभाळून त्यांनी हे कार्य केले. कारण 'घोष शाखा' नित्य सायं शाखांच्या समाप्तीनंतर भरत असत. अर्थातच उशिराने 'श्री' कोल्हटकरांनी शाखा व घोष शाखा यांच्या माध्यमातून आपल्या कौशल्याने अनेक स्वयंसेवक घडविले आणि कार्यरत ठेवले. आजमितीस अनेक ठिकाणी ते केवळ संघाचीच जबाबदारी पार पाडीत नसून आपल्या उद्योग-व्यवसायात उच्च पदांवर कार्यरत आहेत.


जनसंपर्क आणि जनसेवा हे संघाच्या स्वयंसेवकांचे अंगीभूत गुणच समजले जातात. 'श्री' कोल्हटकर यांच्याकडेही ते रसायन होते. गृहनिर्माण मंडळाताील त्यांच्या सेवेप्रमाणे (कोषागार अधिकारी) त्यांच्या महानगरात बदल्या होत गेल्या. साहजिकच संघकार्यावर त्याचा परिणाम झाला. 'श्री' कोल्हटकरांचे क्षेत्र विस्तारित गेले. विशेषतः चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे, खार या उपनगरात त्यांचा मोठा संपर्क होता. आपल्या बोलक्या स्वभावाने ते नागरिकांची विविध कामे करीत. विशेष उल्लेख करावयाचा झाल्यास त्यांच्या वांद्रे येथील वास्तावात त्यांनी केलेल्या सेवा कार्याचा दाखला देता येईल. तेथील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारिवर्गाच्या परिचयामुळे त्यांनी विशेषतः स्वयंसेवकांची व नागरिकांची गृहनिर्माण मंडळ, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, विद्युत मंडळ या कार्यालयाशी निगडित असलेली विविध कामे सांगता येतील. पंतनगर, बेहराम पाडा, खारनगर, खार दांडा या परिसरातील आर्थिकदृष्टया दुर्बल स्वयंसेवकांना दिलेला आर्थिक मदतीचा हात त्यांच्या आयुष्याच्या उभारणीत महत्त्वाचा ठरला. 'संवाद व सेवा' हा त्याच्या स्थायिभावाच होता. याचा फायदा पर्यायाने संघकार्यात होत असे. नोंद घ्यावी असे कार्य म्हणजे विवेकचे तत्कालीन प्रतिनिधी श्याम देशपांडे यांना ते सातत्यपूर्ण सहकार्य करीत. श्याम देशपांडे 'पद्यगायानाच्या' बैठकीच्या कार्यक्रमांना त्याचा मोबदला देत. अशा काही रंगलेल्या बैठकी आज आठवतात. अलीकडे त्यांनी 'एकता' मासिकाचे वाचक ग्राहक वृध्दिंगत करण्यात हीच सेवा दिली.


विस्तीर्ण बागेत सर्व रोपटयांची निगराणी करता येत नाही, लक्ष देता येत नाही. एखादे कोपऱ्यातील असे रोप स्वतःच फुलते, विकसित होते. सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेते. संघासारख्या महाकाय संघटनेत श्री कोल्हटकरासारखी रोपे स्वतःचे आयुष्य स्वतःच फुलवितात. भाग्यरेषांचे गणित त्यांच्याजवळ नसते. संधी प्राप्त व्हावी हा विचार स्वप्नातही नसतो. ते सामान्य माणसाप्रमाणे सहजपणे कार्यरत राहतात, कर्तव्याचे नाणे वापरतात आणि आपले जीवन कृतार्थपणे समर्पित करतात. 'श्री' कोल्हटकर असे कृतार्थ जीवन जगले.

9833027277