कमी तिथे आम्ही

स्रोत: विवेक मराठी    दिनांक14-Oct-2019   

घर आनंदी ठेवायचं असेल तर परस्परांना समजून घेऊन आनंदी राहता येते. त्यासाठी महत्त्वाची भूमिका घरातील ज्येष्ठांनी बजावयाची असते. कारण आपलं जगून झालेलं असतं नि उरलेलं आनंदाने जगायचं असतं. 'जिथे कमी तिथे आम्ही आहोत' हा विश्वास देणं चागलं ठरतं. नाहीतर मग लुडबुड होते. कुणीच मागे हटलं नाही तर मग नुसती शरीरं घरात एकत्र राहतात. घर दुभंगलेली असतात.


कधीकधी आपल्यालाच ठाम निर्णय घ्यावे लागतात नि सगळयांना जरा अवकाश द्यावा लागतो. घरातली आपल्यासारखी वय झालेली माणसं! आपल्याला कुठे नेताही येत नाही नि टाकून वा ठेवूनही जाता येत नाही. बाहेर तर पडायचं असतं. आपल्याला ते झेपणारं नसतं. जावंसं तर वाटत असतं. म्हणूनच म्हणावं लागतं मग की, जा तुम्ही बाहेर पडा, मी राहीन चांगला घरात.

त्या दिवशी काय झालं की घरातल्या सगळयांनाच लग्नाला जायचं होतं. घरात 70-75 वयाचे आजोबा. जिने चढणं-उतरणं, तिथली गर्दी, आवाज! त्यांनाही जमणार नव्हतं. नेलं तर कुणीतरी त्यांच्याबरोबर थांबावं लागणार! जेवणं म्हणेज बुफे. गर्दी. गेल्या वर्षा-दीड वर्षात आजोबांना काही झेपेनासं झालं. सगळयांनी मिळून बाहेर पडायची ही पहिलीच वेळ. कोण सांगणार? कोणीच काही बोलेना. आजोबांनी मुलाला-सुनेला हाक मारली. म्हणाले, ''काय ठरवलंय तुम्ही! लग्नाला जायचं कसं करायचं? तयारी करावी लागेल.'' मुलगा-सून बोलणार कसे? ''सगळी व्यवस्था करून जातोय असं म्हणण्याइतकंही नातं औपचारिक नव्हतं. आजोबा व घर यांचं चांगलं जुळलं होतं. व्यावहारिक नातं किंवा फक्त औपचारिक नव्हतं, तर भावनिक गुंतवणूकही होतीच. ''मलापण यावंसं वाटतंय'' असं म्हणून आजोबा बोलायचे थांबले. ''सगळे भेटतील. कधी भेटेन नंतर.. कुणास ठाऊक..'' असंही बसता बसता म्हणाले. मुलगा म्हणाला, ''ठीक आहे.'' आजोबा म्हणाले, ''जाऊ नकोस. थांब. मला जरी यावंसं वाटलं तरी मी येणार नाही. गेल्या कार्यातच मी ठरवलंय आता सार्वजनिक समारंभांना जायचं नाही. सगळयांना त्रास होतो. मलाही दगदग सहन होत नाही. तुम्ही आनंदाने जा. काळजी करू नका. माझ्यामुळे किती दिवस अडकून पडणार! तुमचे दिवस आहेत. नाहीतर माझ्यात अडकून पडाल नि तुमचं वय होईल...'' मुलाने नि सुनेने एकमेकांकडे पाहिलं. ''कोणी तरी हवं ना! काही लागलं तर! सोबतीला?'' ''तसं काही लागणार नाही. रात्रीचं कुणी आलं तर बरं, दिवसभर कुणीतरी असतं...'' ''तशी आम्ही तयारी केलीय. तुमच्यावर अवलंबून ठेवलं होतं सगळं.'' ''मला समजत होतं. अरे! आम्हीपण या वयातून गेलोय. मला वाटेल माझ्यामुळे तुम्हाला कोंडून रहावं लागलं. हे बघा! समजा, झालंच तर काय होणार?... ते काय कुणाच्या हातात आहे! तुम्ही निवांत जा...''

कसं वाटतंय हे वाचताना! कल्पित नाही. खरं आहे हे! खूप काही घेता येईल यातून. कुणीही बाहेर निघालं की वाटतं आपणही बाहेर पडावं, फिरावं, खावं, प्यावं. घरातली माणसं कामाला बाहेर पडतात. गाडी असते. जागाही असते गाडीत. हट्टही सुरू होतो. घरातले नाही कसं म्हणणार? बरोबर गेलं तर नेणाऱ्याला अडचण होते. बाहेरचं खाणं नाही सहन होतं, फिरणं जमत नाही, नेऊन अडचण, खोळंबा. मात्र जेव्हा अशी काही समजूतदार उदाहरणं मी पाहते, ऐकते, तेव्हा जागी होते. माझे मोह सोडायला हवेत. हा समजूतदारपणा माझ्या ठिकाणी असायला हवा. कारण घराची स्वस्थता टिकवणं माझ्यावर आहे.

 

घरातली तरुणाई बाहेर पडते, फिरते, मजा करते, खाते-पिते, दर वेळी चढउतार करणं मला शक्य नसतं. पर्यायाने मला गाडीत नेतील तिथे बसून राहावं लागतं. बाहेर पडून मला कंटाळा येतो. ना माझ्या आवडीचं गाणं आजूबाजूला ऐकू येत, ना आवडीच्या पदार्थांचं हॉटेल असतं. माझाही वीकेंड सुरू असतो. मला पाहायचं तर असतं मुलं मजा कशी करतात ते नि टीकाही करायची असते. 'काय हे वागणं, पैसे उधळणं! काय ते कपडे! बोलणं...' अशी माझी वाक्यं सुरू होतात. मला वाटतं जे चाललंय ते पटत नसलं तरी टीका करायच्याऐवजी गप्प बसावं ना! मी बोलले तरी मुलं मुलांना वागायचं तसं वागणारच!

आता चवी बदलल्यात. आवडी वेगळया झाल्यात. जगण्याच्या कल्पना बदलल्यात. बरेच वेळा ते सगळं मला मान्य आहे या आविर्भावात आपण तरुणाईत मिसळलो, तरी लक्षात ठेवू - आपली अडचणच होते त्यांना! जसं माझ्या तरुणाईत मला वेगळं काही करायचं होतं, तसं माझ्या पुढील समोरील तरुणाईलाही वाटणारच. त्यापेक्षा 'तुम्ही तुमचं जगणं जपा. आम्ही आमचं जपू' असा रोल चांगला ठरतो. कुणाचीच कुणाला अडचण होत नाही. त्यांची/तरुणाईची सुटका करणं आपल्यावर अवलंबून आहे. कुणीतरी दोन पावलं मागं जावं लागतं, ते आपणच जायचं असतं, कारण आपलं जगून झालेलं असतं नि उरलेलं आनंदाने जगायचं असतं. 'जिथे कमी तिथे आम्ही आहोत' हा विश्वास देणं चागलं ठरतं. नाहीतर मग लुडबुड होते. कुणीच मागे हटलं नाही तर मग नुसती शरीरं घरात एकत्र राहतात. घर दुभंगलेली असतात. प्रश्न निर्माण होतात. उत्तरं सापडत नाहीत.

खरंच असं सकारात्मक विचार करणारं वृध्दत्व समाजात आहे. आज त्या वयात जेव्हा मी शिरते, तेव्हा मला त्याची मदत होते. माणसं प्रत्यक्ष जगणं खूप काही शिकवतं. इतके दिवस मी समाजात वावरत होते, कामानिमित्त अनेकांच्यात मिसळत होते. बाहेर पडणं होत होतं. वेळ कसा जायचा कळत नव्हतं. आता नेमकं उलट झालंय. कामं आहेत, पण करवत नाही. कामाच्या पध्दती, स्वरूपही बदलू लागलंय. वृध्दत्वाचं रिकामेपण कमी करणारे काही पर्याय आज समाजात दिसतात. वेगवेगळे क्लब, कट्टे असतात. स्त्री-पुरुष एकत्र येऊन बोलतात. नाना-नानी पार्क असतात. आपल्यासारखे अनेक जण आहेत हे पाहून मनाला दिलासा मिळतो. मात्र या वयातही व्यक्त व्हायला संधी मिळायला हवी, व्यासपीठ हवं. जसे अधिकार संपतात तसे निर्णयातूनही बाहेर पडतो. तरी आपल्या शिस्तीच्या कुंपणाच्या आत सगळयांनी राहावं, तसंच राहावं हा हट्ट त्रासदायक ठरतो. आपला अनुभवही फार काही पुढच्यांना उपयोगी पडणारा नसतो. आवतीभोवतीची स्थिती बदललीय.

 

बरेच वेळा घरातल्या घरातही इतिहास माहीत नसतो. आधीच्या पिढीचं कर्तृत्व माहीत नसतं. कारण कुणी बोलतच नाही. अगदी घरातलं उदाहरण द्यायचा मोह होतोय. माझे आजेसासरे कीर्तनकार. राष्ट्रीय कीर्तनकार, त्यातल्या बऱ्याच पदव्या मिळवलेले, एवढंच माहीत होतं. ते किती थोर होते हे मात्र कळलं नाही. माझ्या चुलतसासऱ्यांनी त्यांच्या कितीतरी वर्षांच्या मोडीतल्या डायऱ्या जपून ठेवल्या होत्या. लोकमान्य टिळक, डॉ. मुंजे, न.चिं. केळकर यांची पत्रही त्यात होती. अनेक फोटो होते. सनदा होत्या. एक दिवस त्यांनी त्यांच्या चरित्रातल्या काही घटना सांगितल्या. विलक्षण, सगळया डायऱ्या उतरवून काढायचं काम झालं. त्या वाचताना मी इतकी भारावून गेले की हे कुठेतरी माझ्या पिढीला तरी कळायला हवं असं वाटलं नि त्यांचं एक छोटेखानी चरित्र लिहिलं. कदाचित आप्पा सगळं बोलले नसते, तर त्यांच्याबरोबर इतिहासही काळाच्या पोटात गुडुप झाला असता.

 

मी विचारायची ते वाट पाहात नाही थांबले. त्यांनी पहिलं पाऊल उचललं. तेव्हा आपणच आपल्या इतिहासाबद्दल पुढच्यांसमोर मांडणी करायला हवी.