सुनिश्चित ध्येय

स्रोत: विवेक मराठी    दिनांक15-Oct-2019

**अजित आपटे *** 

छत्रपती शिवाजी महाराजांची ध्येय इतकी सुनिश्चित होती की, आज 350 वर्षांनंतरही ती अनुकरणीय वाटतात. काळ बदलेल, देश बदलतील, राज्यकर्ते बदलतील, पण महाराजांचे ही सुनिश्चित ध्येय कायम मार्गदर्शकच राहतील.दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीत महाराजांबरोबर साधारण
15 ते 2000 घोडदळ व 35,000 पायदळ असावे. पायदळापैकी बरेच लोक शिबंदी म्हणून ठिकठिकाणी स्थानिक झाले असावेत. त्याशिवाय ब्राह्मण कारकुनांची संख्या 2000 इतकी मोठी होती असे मार्टिन (फ्रेंच अधिकारी) सांगतो. प्रत्यक्षात इतकी मोठी संख्या महाराष्ट्रातून तिकडे जाणे शक्य नाही. नोकरीच्या आशेने आलेले इतर स्थानिक ब्राह्मण किंवा इतरांच्या संख्येपक्षा त्यांनी तिकडे जाऊन केले काय हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. पाँडिचेरीच्या भोवती जो पुष्कळ मोठा मुलुख ओसाड पडला होता तो या लोकांनी लागवडीखाली आणला आणि त्यामुळे त्यातून जास्तीचे उत्पन्न मिळू लागले. जे त्याआधीच्या मुस्लीम राज्यकर्त्यांना पूर्वी कधी जमले नव्हते ते या ब्राह्मणांनी करून दाखविले! आता फ्रेंच हे शेरखानाचे (आदिलशाही सरदार) पक्षपाती आणि एतद्देशीय हिंदूंच्या विरुध्दच होते. त्यामुळे या ब्राह्मणांच्या चांगल्या गोष्टींवरही मार्टिनने टिकाच केली. हिंदूंसारखे सज्जन, पण असंघटित लोक आपले गुलाम होण्याच्याच लायकीचे आहेत, असे मुसलमानांप्रमाणे इतर परकीयांनाही वाटत असे. त्यामुळे हिंदू राजांविरुध्द ते मुसलमानांनाच मदत करीत असत. त्याबाबतीत महाराष्ट्रातील सिद्दीचे उदाहरणही याच धर्तीचे आहे. महाराजांचे सर्व परकीय शत्रू वेळप्रसंगी लपून-छपून पण सिद्दीलाच मदत करीत. हजारो मैलांवरून येणाऱ्या या परकीयांना इथल्या राजकीय, धार्मिक परिस्थितीचे किती पटकन आकलन होत असे! आणि आपण? असो


मार्टिनने काही म्हटले तरी महाराजांच्या या नवीन कारभाऱ्यांनी चांगला कारभार केला यात काही शंका नाही. कारण महाराजांच्या हयातीतच नव्हे तर नंतरही
, म्हणजेच संभाजी महाराजांच्या काळातही तिथली प्रजा मराठी राज्याशीच जोडून राहिली.


महाराजांनी दक्षिणेतील नवीन प्रदेश जिंकण्याचा व तेथील व्यवस्था लावण्याचा उपक्रम सुमारे सहा महिने केलेला दिसतो. त्यानंतर विजापूरच्या अंत:स्थ झगडयाची वार्ता लागल्यामुळे व बहादूरखान औरंगजेबाकडून तकीर (दूर) होऊन दिलेरखानाची नेमणूक दक्षिणेत झाल्याचे कळताच महाराजांनी चेन्नईकडचा आपला मुक्काम आवरता घेतला व बरोबर काही सैन्य घेऊन ते पूर्वघाट चढून महाराष्ट्राकडे आले. आपल्या नव्या राज्याच्या सीमेवरचे डोंगरी किल्ले
, जयदेवगड इ. त्यांनी जिंकले आणि त्यांची डागडुजी करून ते युध्दास समर्थ ठेवले. नंतर शहाजीराजांच्या जहागिरीतील होसकोटे, कोलार, बाळापूर, शिरे हा मुलुख आपल्या ताब्यात आणला. 'तो (शिवाजी महाराज) येतो आहे, एवढी नुसती बातमी ऐकूनच मुसलमान किल्ले सोडून जातात.' असे इंग्रजांचे वार्ताहर कळवतात.


टिकाऊ कार्यपध्दती - गोवळकोंडयास (हैद्राबादची कुतुबशाही) भेट व नंतर कर्नाटकातील मोठा मुलुख जिंकणे या गोष्टी महाराजांच्या प्रशासकीय बुध्दीचा व लष्करी पराक्रमाचा उच्च बिंदू दाखवतात. दक्षिणेतले नवे राज्य स्वराज्यात स्थिरावण्यास काही काळ जाणे आवश्यक होते. त्यामुळे आपले सेनापती काही काळ मागे ठेवूनच महाराज महाराष्ट्रात परत आले. मुलुख लांबचा असल्याने अनुभवी
, पोक्त आणि महत्त्वाचे म्हणजे महाराजांचे दूरदृष्टीचे राजकारण समजणारा अधिकारी पुरुष या प्रदेशात अधिकारावर राहणे आवश्यक होते. महाराजांनी भोसल्यांचा पिढीजात नोकर, त्या प्रदेशात शहाजीराजांबरोबर राहिलेला व तिथे एकंदरीत तीन तपे घालवलेला विद्वान, व्यवहारदक्ष पुरुष, रघुनाथ नारायण हणमंते यांची जिंजीस सर्वाधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांच्या मदतीस तिथे भाऊ संताजी भोसले याने कायम राहावे, असे ठरवून टाकले. त्या दोघांनी हंबीररावांच्या पश्च्यात तिकडची मुलकी व लष्करी व्यवस्था चोख सांभाळली, आणि तिथल्या लोकांच्या मनात मराठी राज्याविषयी आपलेपणा निर्माण केला.


अशाच प्रकारचे दुसरे उदाहरण महाराष्ट्रात कोकणातही महाराजांनी घालून दिले होते. कुडाळ
, सावंतवाडी इ. गोव्याच्या सरहद्दीनजीकच्या कोकणातील प्रदेश जिंकल्यावर महाराजांनी लगेच तिथली व्यवस्था नीट लावली त्या प्रांताचा सुभेदार म्हणून त्यांनी रावजी सोमनाथची निवड केली. हा रावजी सोमनाथ व्यापारात निष्णात होता. त्याने तेथील स्वराज्याच्या व्यापाराला चांगली चालना दिली. महाराजांनी तिथे 2000 सैनिकांची शिबंदीही ठेवून दिली. इथे महाराजांनी लष्करी, मुलकी व व्यापारी अशा तिन्ही व्यवस्थांचा चांगला समन्वय करून दाखवला.


ओसाड जहागिरीचे (पुणे) पुनरुज्जीवन ते स्वराज्यनिर्मीती ते अंतकाळ या
35-36 वर्षाच्या कार्यकाळात महाराजांचे सुनिश्चित ध्येय हे पारतंत्र्य - स्वराज्य - सुराज्य असेच राहिले. हा सर्व काळ अत्यंत धामधुमीचा, लढायांचा आणि विलक्षण तणावाचा आहे. अंतर्गत आणि बाह्य शत्रूंनी ते सदैव घेरलेले होते. मृत्यूची टांगती तलवार तर कायमची! पण महाराजांची विधायक, ध्येयवादी वृत्ती मात्र अविचलच!


हे ध्येय इतके सुनिश्चित होते की
, आज 350 वर्षांनंतरही ते अनुकरणीय वाटते, काळ बदलेल, देश बदलतील, राज्यकर्ते बदलतील, पण महाराजांचे हे सुनिश्चित ध्येय कायम मार्गदर्शकच राहील!