वातावरण बदलाचे नियंत्रण आवश्यक

स्रोत: विवेक मराठी    दिनांक15-Oct-2019

***रवींद्र पाठक***

 

कोल्हापूर-सांगली आणि नुकताच पुणे येथे झालेल्या महापूरासंदर्भात आधीच्या लेखात पुराची कारणमीमांसा व उपायोजना यांचा आढावा घेतला. परंतु या केलेल्या योजना केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. याचे खरे कारण म्हणजे वातावरण बदल होय. आणि या लेखात आपण वातावरण बदलाचे परिणाम, त्याची कारणे आणि वातावरण बदलावर नियंत्रण कसे आवश्यक आहे यावर प्रकाशझोत टाकूयात.


 

यापूर्वीच्या लेखामध्ये आपण पुण्याला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात पुरामुळे झालेल्या नुकसानाच्या कारणांची चर्चा केली, त्याअगोदर सांगली-कोल्हापूरच्या पुराचीही कारणमीमांसा केली. वातावरण बदलामुळे आपल्यासमोर ही आणि अशी संकटे वारंवार उभी ठाकत आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नेमक्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचाही आढावा घेतला. लेखाच्या शेवटी आपण अशा निष्कर्षाप्रत आलो की, या पध्दतीच्या उपाययोजना या मलमपट्टी या वर्गात मोडत असून या आणि अशा भयंकर आपत्तीपासून सुटका व्हायची असेल, तर वातावरण बदल नियंत्रणासाठी प्रत्येकाने त्याचे योगदान देणे गरजेचे आहे आणि असे योगदान देण्यात जर कसूर झाली, तर त्याचे पर्यावसन नष्टचर्यात होणे अपरिहार्यच आहे. वातावरण बदलाच्या नियंत्रणात आपण व्यक्तिश:, सांघिक स्वरूपात, प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर नेमके कसे योगदान देऊन या संकटातून पृथ्वीची - म्हणजे पर्यायाने आपली सुटका करून घेऊ शकतो, याबद्दल आपण या लेखाच्या माध्यमातून चर्चा करू या.

 

तर आपण या विषयाची चर्चा करताना, प्रथम या दुष्टचक्राने आपल्या आजूबाजूला घडलेल्या परंतु चर्चेत न आलेल्या बदलाचे, वातावरण बदलाचे महाराष्ट्राशी संबंधित संभाव्य परिणाम, वातावरण बदल म्हणजे काय?, त्याची नैसर्गिक आणि कृत्रिम कारणे, त्याच्या न्यूनीकरणासाठीच्या शास्त्रीय उपाययोजना आणि नागरिकांसाठीची या दृष्टीने आचारसंहिता अशा टप्प्यांमध्ये चर्चा करू या.

 

1) वातावरण बदलाचे आपले आजूबाजूला घडलेले परंतु चर्चेत न आलेले बदल - आज जी मंडळी वयाच्या पन्नाशी-साठीत आहेत, त्यांनी त्यांचे बालपण आठवल्यास तेव्हाच्या आणि आजच्या निसर्गाच्या वर्तणुकीत झालेल्या बदलातील फरक स्पष्टपणे जाणवतील. आश्चर्य हे आहे की तुम्हा-आम्हाला, सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या परिणामातून हे जाणवले, परंतु तत्कालीन राजकर्त्यांना आणि प्रशासनाला मात्र त्याकडे पाहावे असे वाटले नाही आणि त्यामुळे हा विषय आज शेवटच्या स्टेजचा रोग होऊन बसला आहे. खालील तालिकेत त्याची थोडक्यात तुलना आणि उजळणी करतो, जेणेकरून माझे म्हणणेही स्पष्ट होईल.

 

वरील तालिकेवरून वातावरण बदलाचा शिरकाव कसा कसा होत गेला, याची कल्पना यावी. थोडक्यात, अवर्षणापेक्षा अवृष्टी, अतिवृष्टी, उष्ण-शीत लहरी, नापिकी, समुद्रात उंच लाटा उसळणे ही त्याची महाराष्ट्राशी निगडित रूपे होत. हिमकडे वितळणे, वनस्पतींच्या आणि जिवांच्या प्रजाती नष्ट होणे आणि अखिल सृष्टीच्या अस्तित्वावर संक्रांत हे त्याचे पुढील परिणाम आहेत.
 

वातावरण बदल म्हणजे काय - हे समजण्यासाठी आपण पृथ्वीचा हरित गृहसापेक्ष (ग्रीन हाउससापेक्ष) विचार करू या. हरित गृहामध्ये ज्याप्रमाणे इच्छित पिकासाठी अनुकूल अशी क्लोज सिस्टिम किंवा नियंत्रित स्थिती निर्माण करून भरघोस उत्पादन घेतले जाते, अगदी तसेच पृथ्वीभोवतीच्या वातावरणाने आणि त्याच्या शिरस्थ ओझोन थराने हरित गृहासारखी क्लोज सिस्टिम निसर्गदत्तच स्थापित आहे. यामधील ओझोन वायूचा थर म्हणजे हरित गृहाचा हिरवा कपडा असून पर्यावरण/वायुमंडल हे हरित गृहाच्या आतील नियंत्रित वातावरण आहे. या ओझोन थराखालील स्पेसमध्ये असलेल्या विविध वायूंचे प्रमाण, तापमान याच्या निकषांवर आधारित याचा समतोल घडत असतो. ओझोनचा थर म्हणजे हा हिरवा कपडा, सूर्यापासून पृथीवर येणाऱ्या हानिकारक किरणांना (अतिनील किरणांना) अवरोध करण्याची, म्हणजे पर्यावरण रक्षणाची भूमिका अदा करत असतो. ज्या वेळी पर्यावरणाचा समतोल होता, त्यामुळे आपण वरील तालिकेमध्ये अनुभवलेली आपल्या बालपणीची पर्जन्य, हिवाळा आणि उन्हाळयाची स्थिती होती. म्हणजे त्या वेळी पृथ्वीभोवतीच्या वातावरणात ज्या प्रमाणात विविध वायूंचे प्रमाण होते आणि जे पृथ्वीचे सरासरी तापमान होते, त्या समतोलाचा हा परिणाम होता. याचाच दुसरा अर्थ असा आहे की आज अशी समतोल स्थिती निर्माण केली, तर आपण त्या वेळेसारखेच पर्जन्य, थंडी आणि उष्णता किंवा उन्हाळा घडवून आणू शकतो. म्हणजे पृथ्वीच्या पर्यावरणातील विविध वायूंच्या प्रमाणामध्ये आणि सरासरी तापमानामध्ये घडलेले बदल म्हणजे 'वातावरण बदल'.

 

याला जोडून हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की ही तापमानवाढ कशी बदलत गेली, आज तिची नेमकी स्थिती काय आहे आणि धोक्याची पातळी नेमकी किती आहे. याचे उत्तर असे आहे की, 1850 सालापासून पृथ्वीच्या सरासरी तापमानाच्या नोंदी उपलब्ध आहेत. त्यात दोन अंश से. वाढ झाल्यास पृथीवरच्या जीवसृष्टीसमोर अस्तित्वाचे भयंकर प्रश्न उभे राहणार आहेत आणि आता दीड अंश से. इतकी तापमानवाढ झालेली आहे, त्यामुळेच त्याचे अकराळविकराळ स्वरूप आपणास अनुभवास येत आहे. जर हे याच गतीने चालू राहिले, तर पूर्वी 2050 साली 2 अंश से.ची मर्यादा ओलांडली जाईल असे अनुमान होते, आता 2030 सालीच ही स्थिती येईल, असे शास्त्रज्ञाचे सुधारित अनुमान आहे. यावरून स्थिती किती स्फोटक आहे हे स्पष्ट व्हावे.

 

वातावरण बदलाची कारणे - वातावरण बदलाच्या कारणांचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे वर्गीकरण होते. त्याचीही चर्चा आपण थोडक्यात करू.

 

 

नैसर्गिक कारणे - यामध्ये पृथ्वीचा अक्ष 100 वर्षांनी अर्धा अंश या गतीने झुकणे, भूखंडांचे विस्थापन, ज्वालामुखी, जंगलातील वणवे, समुद्रातील उष्ण-शीत प्रवाहांची स्थिती ही कारणे आहेत, ज्यामध्ये मानवजातीस करण्यासारखे फारसे काही नाही. तथापि मानवनिर्मित कारणांच्या योग्य नियंत्रणाने आपण मानवी आणि जीवसृष्टीस अनुकूल स्थिती नक्की करू शकतो, ज्याप्रमाणे ए.सी. लावून आपण आपल्या घरातील स्थिती हवी तशी ठेवू शकतो. येथे लक्षात घ्यावयाची गोष्ट अशी आहे की, घरातील निर्णय आणि अंमलबजावणी ही एकचालकानुवर्ती पध्दतीने म्हणून काटेकोर होते, तर येथे मात्र पृथ्वीवरील 700 कोटी लोकांच्या सामूहिक आणि एकदिशेने प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे.

 

 

मानवनिर्मित कारणे - वातावरणामध्ये मिथेन, कार्बन डाय ऑॅक्साइड, फॉस्फेट्स आणि नायट्रेट्स या वायूंचे प्रमाण (या वायूंना हरित गृह वायू - ग्रीन हाउस गॅसेस असे म्हणतात) वाढल्याने दोन परिणाम होत आहेत. एक - हरित गृह वायू, पृथ्वीवर सूर्यापासून येणारी उष्णता कार्यक्षमतेने शोषून घेतात, वातावरणातील बाष्प/वाफेमुळे या उष्णतेचे सर्वदूर वहन होते आणि पृथ्वीचे सरासरी तापमान वाढण्यास मदत होते. आणि दोन - या वायूंच्या अतिप्रमाणाने ओझोनचा थर पातळ होतो, त्याला भोकही पडते आणि सूर्याची घातक अतिनील किरणे आमच्या पृथ्वीच्या हरित गृहात प्रवेश करून इथली नियंत्रित स्थिती उद्ध्वस्त करतात.

 

म्हणजे आमच्या हरित गृहामध्ये कोणी भट्टी पेटवून तापमान वाढले आणि त्याचा हिरवा कपडा फाटल्यावर मधल्या पिकांचे जे होते, तेच पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचे होत आहे. त्याचप्रमाणे सुस्थितीतील एखाद्या गुलाबाच्या हरित गृहात स्वच्छंदपणे बागडणाऱ्या फूलपाखरांची या पडदा फाटण्याने आणि भट्टी पेटवण्याने जी स्थिती होईल, तीच पृथ्वीवरील प्राण्यांची, वनस्पतींची आणि अर्थात मानवाचीही होत आहे, पुढे होणे अपरिहार्य आहे.

 

पडदा शिवून घेतल्यास आणि भट्टी बंद केल्यास जसे गुलाब टवटवीत होतील, पुन्हा फूलपाखरे बागडतील तसे होणेही निश्चित आहे. त्यासाठी नेमके काय करावे लागेल याचा विचार आता करू. तत्पूर्वी या वायूंच्या उत्पत्तीची कारणे जाणून घेऊ.

 

मिथेन - मिथेन वायू हा बायोमास - म्हणजे जंगलातील, शेतातील, उद्यानातील पालापाचोळा, प्राणिजन्य घटक - म्हणजे मेलेली जनावरे, जलचर, पशुवधगृहातील कचरा, पशुधनाचे आणि मानवी मलमूत्र, स्वयंपाकघरातील ओला कचरा, शहरांचे सांडपाणी - विशेषतः मैलायुक्त पाणी, हे आणि असे घटक सडण्याच्या जीवरासायनिक प्रक्रियेतून हा वायू मुक्त होतो आणि वातावरणात मिसळला जातो. प्रत्येक मोठया शहराबाहेर असलेल्या कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगी या त्या घनकचऱ्यामधून विघटित होणाऱ्या मिथेनमुळेच लागत असतात. हा वायू वातावरणासाठी प्रचंड घातक आहे.

 

कार्बन डाय ऑॅक्साइड - प्रचंड प्रमाणात झालेले औद्योगिकीकरण, मानवी आणि प्राण्यांचे श्वासोच्छ्श्वास, ऊर्जानिर्मितीसाठी होणारे इंधनांचे प्रचंड ज्वलन, वाहनांमध्ये जाळले जाणारे इंधन, घराघरात आणि हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी जाळले जाणारे लाकूड, कोळसा किंवा जैविक कचरा, जंगलामध्ये लागणारे वणवे, विविध रासायनिक उद्योगांमधून विघटित होणारा कार्बन डाय ऑॅक्साइड ही या वायूच्या उत्पत्तीचे प्रमुख स्रोत आहेत.

 


फॉस्फेट्स आणि नायट्रेट्स - हे विविध रासायनिक प्रक्रियांतून अतिशय मर्यादित मात्रेत विघटित होतात आणि त्यांचा फारसा परिणामही नाही, त्यामुळे आपण हे सध्या बाजूला ठेवू. रासायनिक खतांच्या वापरानेसुध्दा याचे प्रमाण वाढते.

 

यावर उपाय म्हणजे एकतर या वायूंचे उत्सर्जन नियंत्रित करणे आणि वातावरणातील त्याचा प्रभाव शिल्लक उरणार नाही अशा पध्दतीने त्याला गुंतविणे (sequestration) स्थिरीकरण करणे. प्राणी ऑॅक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑॅक्साइड सोडतात, तर वनस्पती कार्बन डाय ऑॅक्साइड घेऊन ऑॅक्सिजन सोडतात. जोपर्यंत लोकसंख्या मर्यादित होती आणि जंगलक्षेत्र आणि हरित आवरण मुबलक होते, तेव्हा या वायूंच्या प्रमाणाचा समतोल राखला गेला. पुढे लोकसंख्येचा स्फोट, जंगलतोड आणि वर चर्चिलेल्या इतर कारणांनी हरित गृह वायूंचा उद्भव होऊन हा समतोल बिघडला. त्यांच्या परिणामांचे यशस्वी निष्प्रभीकरण करता येईल, इतकेच नाही, तर त्यापासून भरीव उत्पन्न घेता येईल आणि इंधनाच्या बाबतीत राष्ट्र स्वयंपूर्ण होण्यास मदतही होईल. त्याचे विवरण खालीलप्रमाणे -

 

मिथेन हे उत्कृष्ट इंधन आहे. विशेष म्हणजे याच्या ज्वलनाने पर्यावरणाचे नुकसान होत नसते. त्यामुळे मिथेन उत्सर्जन करणाऱ्या घटकांचे सुनियोजन आणि योग्य प्रक्रियेने मिथेनचे पृथक्करण करून आपत्तीचे रूपांतर संपत्तीमध्ये करता येते. त्यामुळे देशाचे इंधन परावलंबित्व घटून त्यासाठी खर्च होणारे परकीय चलन वाचते, त्याऐवजी या रकमांचा देशांतर्गत विनियोग होऊन अर्थव्यवस्थेस बळकटीही मिळते. याच्या सुलभीकरणासाठी नुकतेच 'राष्ट्रीय जीवइंधन धोरण 2018' तयार करण्यात आले आहे. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायटया, कारखाने, हॉस्पिटल्स इत्यादी प्रदूषण करणाऱ्या घटकांनी त्याचा योग्य फायदा घेऊन अशी यंत्रणा स्थापित करणे गरजेचे आहे.

 


कार्बन डाय ऑॅक्साइडचे उत्सर्जन करणाऱ्या स्रोतांची चर्चा आपण केलीच आहे, ते घटविण्यासाठी सौर, पवन-, जलविद्युत या आणि अशा अपारंपरिक आणि नवीनीकरणीय पर्यायी इंधनांचा उपयोग वाढविणे, इंधन कार्यक्षम यंत्र वापरणे, जल वाहतुकीकडे वळणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त उपयोग करणे हे उपाय आहेत. याशिवाय उत्सर्जित कार्बन वनस्पतीमध्ये शोषला जात असतो, त्यामुळे वृक्षराजींची जोपासना हा यावरील उत्तम उपाय आहे. त्यात प्रभावी वनस्पतींची निवड महत्त्वाची आहे. बांबू ही वनस्पती या दृष्टीने अतिशय कार्यक्षम असल्याने जास्तीत जास्त बांबू लागवड करण्याने कार्बनचे कार्यक्षमरीत्या निष्प्रभीकरण होऊ शकते.

 

 

वैयक्तिक पातळीवर करावयाच्या गोष्टी - प्लास्टिकचा वापर 100% टाळावा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर, रासायनिक खतांचा वापर थांबवून जैविक शेती, संपूर्ण शाकाहार किंवा जमतच नसेल तर नियंत्रित मांसाहार, थोडया अंतरासाठी सायकल वापरणे किंवा पायी जाणे, शक्य तितका कचरा घरात जिरविणे - म्हणजे परसबागेसाठी खत, जैविक इंधन तयार करणे, कचरा विलगीकरण करून देणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, वृक्षसंगोपन करणे, वृक्षतोड न करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणामधून रेडिएशन होत असते त्यामुळे अत्यावश्यक तितकाच या साधनांचा उपयोग करणे, पडीक जमिनीवर हरित आवरण तयार करणे, ग्रीन बिल्डिंग संकल्पनेने बांधकामे करणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वछता राखणे, पाण्याचा कमीत कमी उपसा आणि वापर, स्थानिक वस्तूंचा वापर (यामुळे वाहतुकीसाठी इंधनाच्या ज्वलनाने होणारे दुष्परिणाम टळतात), अन्नाची नासाडी बंद करणे (यामधून मिथेन उत्सर्जित होतो) अशी आचारसंहिता प्रत्येकाने पाळल्यास वातावरण बदलाचे नियंत्रण अवघड नाही.

आनंदाची आणि समाधानाची गोष्ट अशी आहे की आताची सरकारे वातावरण बदल नियंत्रणाच्या विषयात कमालीची संवेदनशील असून त्या दृष्टीने भरीव कामगिरीही करत आहेत. सौर ऊर्जेची प्रचंड निर्मिती, स्वछ भारत अभियान, इलेक्ट्रिक वाहने, सी.एफ.एल. बल्ब्जचा नियोजनबध्द उपयोग, जैविक इंधन पॉलिसी आणि जैविक व शहरी कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन, जैविक इंधनवर धावणाऱ्या बसेस, जल वाहतुकीकडे विशेष लक्ष, प्रकल्प पर्यावरण संवेदनशील करण्याकडे विशेष लक्ष, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण अशा कितीतरी उदाहरणांतून याचा आपणास नेहमी अनुभव येत असतो. त्यापलीकडे नुकत्याच अमेरिकेत झालेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत पंतप्रधानांनी सर्व सदस्य देशांना वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न तोकडे तातडीने असून भरीव प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ठासून सांगितले आणि सदस्य राष्ट्रांनी त्याला प्रतिसादही दिला.

 


या बाबतीत आपणही आपले योगदान देऊन राष्ट्रीय कर्तव्य निभावू या.

 

.