बेलगंगा साखर कारखान्याचे संजीवक चित्रसेन पाटील

स्रोत: विवेक मराठी    दिनांक17-Oct-2019

चाळीसगाव तालुक्यातील औद्योगिक सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान नाव म्हणजे चित्रसेन पाटील. सध्या ते बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तालुक्यात शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू करून उद्योग क्रांती घडविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.


चाळीसगावमध्ये सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील भाजपाचा जुना चेहरा म्हणजे बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील. दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून सामान्य कार्यकर्ता म्हणून ते भाजपात सक्रिय आहेत. त्यांना पक्षकार्याचा आणि सहकार क्षेत्रातील तगडा अनुभव आहे. कृषिपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना सत्तेचे बळ हवे आहे. त्या माध्यमातून तालुक्यात उद्योग क्रांती घडून शेतकर्यांसह रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा त्यांचा मानस आहे.

बेलगंगा साखर कारखान्याला नवसंजीवनी दिल्याने चाळीसगावमधील जनमानसात त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. सन 2002पासून बेलगंगा साखर कारखाना बंद होता. त्यानंतर तो 2005-2006मध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी ताब्यात घेतला. नोव्हेंबर 2006मध्ये निवडणूक लागली. प्रस्थापित राजकारणी निवडणुकीपासून दूर राहिले, कारण कारखाना सुरू होणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. कारण कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात होता. चित्रसेन पाटील यांचे पॅनेल निवडून आले आणि ते चेअरमन झाले. निवडून आल्यानंतर कारखाना जिल्हा बँकेच्या मालकीचा असल्याने त्यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासकांकडून पाच वर्षांच्या कराराने प्रतिहंगाम दोन कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर कारखाना चालवायला घेतला. सन 2007-2008मध्ये गळित हंगाम घेतला आणि अडीच लाख मे.टन उसाचे गाळप केले जिल्हा बँकेचे दोन कोटी भाडे दिले. सन 2007-2008चा यशस्वी गळित हंगाम घेतल्यानंतर 2008-2009च्या गळित हंगामाची तयारी सुरू असताना जिल्हा बँकेची निवडणूक लागली. या निवडणुकीत चित्रसेन पाटील यांच्या मातोश्री लीलाताई पाटील यांनी भाजपाच्या पॅनलमधून निवडणूक लढविली. या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलला अपयश आले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत ईश्वरलाल जैन यांच्या पॅनेलला यश मिळाले होते. चाळीसगावमधून प्रदीप देशमुख संचालक म्हणून निवडून आले. याच काळात चाळीसगाव मतदारसंघ 30 वर्षांपासून आरक्षित होता, तो 2009मध्ये खुला झाला. सन 2002मध्ये बंद असलेला साखर कारखाना चित्रसेन पाटील यांनी सुरू केल्याने ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते. राजकीय हेतूने बेलगंगा साखर कारखान्याचा भाडेकरार जिल्हा बँकेच्या माध्यमातून रद्द करण्यात आला. या राजकीय खेळीत राष्ट्रवादीकडून राजीव देशमुख यांना उमेदवारी मिळाली. भाजपाचे उमेदवार वाडीलाल राठोड होते. त्या निवडणुकीत चित्रसेन पाटील यांनी तालुका पिंजून काढला. त्या वेळी राजनाथ सिंह प्रचारासाठी आले होते. चाळीसगावात प्रमुख वक्ते म्हणून राजनाथ सिंह यांनी त्यांचे कौतुक केले होते. त्याआधी चित्रसेन पाटील यांनी विचार मांडताना देशमुख परिवाराने कारखाना कसा बंद पाडला याची माहिती देत याबाबत कणखर भूमिका घेत आक्रमक प्रचार केला होता. 2009-2014दरम्यान चाळीसगावचे आमदार राष्ट्रवादीचे होते. जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, तत्कालीन आमदारांचे काका जिल्हा बँकेचे संचालक होते. राज्यात सत्ता राष्ट्रवादीची होती. केंद्रात यूपीएचे सरकार होते. परंतु 2002पासून बंद असलेला कारखाना सुरू करण्यात स्थानिक आमदार राजीव देशमुखही अपयशी ठरले. हाच कारखान्याचा मुद्दा घेऊन 2014मध्ये उन्मेष पाटील निवडणूक लढवून आमदार झाले.यानंतर 2014मध्ये जिल्हा बँक भाजपाच्या ताब्यात आली. जिल्हा बँकेने 5 डिसेंबर 2016 रोजी कारखाना कर्जवसुलीसाठी विक्रीला काढला. एमएसटी बँकेने कारखाने स्वत: विकले आणि स्वत: घेतले. विकणारेही तेच, घेणारेही तेच. भारत सरकारचा उपक्रम असल्याने ही विक्रीची प्रकिया एमएसटी कंपनीकडे सोपविली. मात्र घेणारेही तेच असल्याने आपला कारखानाही भांंडलवदारांनी घेण्याऐवजी भूूमिपुत्रांनी का घेऊ नये? अशी संकल्पना पाटील यांनी मांडली. त्यांची ही कल्पना तालुक्यात, जिल्ह्यात सर्वांना अशक्य वाटली. परंतु चित्रसेन पाटील यांनी गावोगावी कॉर्नर बैठका घेऊन शहरात डॉक्टरांच्या, व्यापार्यांच्या, समाजातील सर्व घटकांच्या बैठका घेतल्या. त्यांना कारखान्याचा भावनिक, सामाजिक, व्यावहारिक विषय समजावून सांगितला. कारखाना वडिलोपार्जित वास्तू आहे. सामाजिक असा की, कारखान्याच्या माध्यमातून 125 कोटीचे चलन ग्रामीण भागात फिरते. हजारो लोकांना रोजगार मिळतो. व्यावहारिक म्हणजे सहकारी साखर कारखाने तोट्यात तर खासगी कारखाने नफ्यात चालतात, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भूतो भविष्यतीअसा इतिहास घडला. तालुक्यातील भूमिपुत्रांनी त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला. त्यामुळे चित्रसेन पाटील यांच्या चळवळीला तालुक्यातील भूमिपुत्रांनीच 70 कोटी दिले. केवढी ही विश्वासार्हता. 2017-18मध्ये गळित हंगाम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिली घटना आहे. भूमिपुत्रांनीच आपला कारखाना घेतला.

इथेनॉल प्रकल्प ऊस उत्पादकांसाठी कामधेनू ठरणार

लोकहिताचे संकल्प श्री गणरायांच्या साक्षीने आशीर्वादाने सिद्धीस जातातच, याची प्रचिती आम्हाला आली. 2017ला श्रीगणेश आगमनाप्रीत्यर्थ ऊस लागवड, ऊस वाहतूक, बॉयलर प्रदीपन आरास केली होती. गणराय स्वत: उसाने भरलेल्या ट्रकचे सारथ्य करीत होते. त्याप्रमाणे 2018ला कारखान्याची चाके फिरली, धूर निघाला आणि बाप्पाच्या कृपेने आम्ही यशस्वी ट्रायल सीझन घेतला.

2018ला कारखान्यात साखर निर्मिती होऊन साखर पोत्यांमध्ये भरली जात आहे, काही पोत्यांची थप्पी गोडाउनला लावली, तर काही माल विक्रीला ट्रकद्वारे बाहेर जात आहे. कारखाना गजबजलेला आहे, अशा कल्पनेची सजावट होती. या दोन्ही संकल्पनांना गणरायानेतथास्तुम्हटले. देखाव्याप्रमाणे घडले. आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा फलद्रुप झाल्या. प्रयत्नांना गजानन पावला.

2019लाआम्ही साखर विक्री करू शकलो.

आता 2019ला श्री गणेश आगमनाला, स्वागताला इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करीत आहोत. इथेनॉल निर्मिती ही काळाची गरज आहे ऊस उत्पादकांसाठी कामधेनू ठरणार आहे.

हे पार्वतीनंदना, तू तर आमचे अंतर्मन हेतू जाणतोस. ही आरास प्रत्यक्षात बेलगंगा क्षेत्री यशस्वी होऊ दे. चाळीसगाव तालुकावासीयांंना आशीर्वाद दे आम्हाला बळ दे ही प्रार्थना.

निर्विघ्नम् कुरु मे देवो, सर्व कार्येषु सर्वदा!

चित्रसेन यशवंतराव पाटील,

चेअरमन, बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव

 
  आजही पुन्हा एकदा ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. सत्तेचे साधन नसताना अशक्य ते शक्य करून दाखविलेले आहे. जर सत्तेचे साधन हाती असेल तर, अनेक उद्योग उभे ते करू शकतात. उद्योग क्षेत्रातील काम करण्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे तालुक्यातील जनमानसात त्यांची वेगळी प्रतिमा आहे

चाळीसगाव तालुका हा दुग्धव्यवसायात एकेकाळी राज्यात अव्वल तालुका होता. मुंबईला दुधाचा सर्वाधिक पुरवठा चाळीसगाव तालुक्यातून होत असे. मात्र गत 20 ते 25 वर्षांपासून तालुक्यातील दुग्धव्यवसाय संपुष्टात आला आहे. त्यासाठी उद्योगाची क्रांती घडविण्याचे स्वप्न बाळगणार्या बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांची भूमिका तालुक्याला वेगळेव्हिजनदेणारी आहे, हे मात्र निश्चित. तालुक्यातील त्यांचे कार्य लक्षात घेता सर्वसामान्य जनतेकडून त्यांना पसंती दिली जात आहे

तालुक्यात शेतीला जोड उद्योगाची पायाभरणी झाल्यास तालुक्यात रोजगार वाढेल, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. तालुक्यातील शेतीला पूरक उद्योग-व्यवसायांना नवसंजीवनी देण्यासाठी चित्रसेन पाटील प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

 जसा आपला देश शेतीप्रधान आहे, तशी तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीशी निगडित आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक स्तर उंचावयाचा असेल, त्यांच्या खिशात दोन पैसे असले तर ते तालुक्याच्या गावी येतात. त्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतीपूरक उद्योग सुरू करण्याचा पाटील यांचा मानस आहे.