थोडा है, थोडे की जरूरत है...

स्रोत: विवेक मराठी    दिनांक26-Oct-2019
|
**देविदास देशपांडे***

पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पट्ट्यात पसरलेला हा भाग म्हणजे एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला, काँग्रेस-राष्ट्रवादीचे राखीव कुरण! राजकारणाच्या या आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्यातील सामना चांगलाच रंगला. त्यात कुस्ती आणि पहिलवान यांसारख्या शब्दांची दोन्ही बाजूंनी सरबत्ती झाली. तीत फडणवीसांनी आपली मागच्या वेळची गदा कायम राखली.


महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि राजकारण्यांसहित सर्व मंडळी फराळाचा आस्वाद घेण्यास किंवा फटाके फोडण्यास मोकळी झाली. गंमत म्हणजे या वेळचे निकाल असे लागले की कोणत्याही रंगाच्या झेंड्याखाली असलेले लोक खुशाल फटाके फोडू शकतील. काही जण सुरसुर्या उडवतील, काही जण लवंगी फटाके, तर काही जण सुतळी बाँब फोडतील, हाच काय तो फरक!

जवळपास तीन-चार दशकांनंतर, आपली कारकिर्द पूर्ण करून सत्तेत पुनरागमन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिलेच ठरले. त्या अर्थाने त्यांनी नवा इतिहास रचला, यात शंका नाही. मात्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला जे अपेक्षित होते ते यश मिळाले नाही, हेही खरे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरते पाहायचे झाले, तर भाजपाच्या खात्यात जमेच्या बाजूला शिल्लक कमीच दिसते. मागील वेळेच्या तुलनेत नुकसान फार झाले नाही, हे त्यातल्या त्यात समाधान. मात्र या भागात तब्बल तीन विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला, हा विषय आत्मचिंतनाला खाद्य पुरवणारा ठरेल.

सहकार चळवळीचा केंद्रबिंदू आणि साखर कारखानदारीसाठी नावाजलेल्या पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेचे 66 मतदारसंघ येतात. मागील पाच वर्षांत भाजपाने जाणीवपूर्वक प्रयत्न करून येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडली होती. निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक बडे नेतेही भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असल्याची चर्चा होती. तीत आपले अस्तित्व कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवले.

 

 

 
. महाराष्ट्रातील संपूर्ण निवडणूक शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशा स्वरूपात लढली गेली, हे नाकारण्यात अर्थ नाही. पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पट्ट्यात पसरलेला हा भाग म्हणजे एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला, काँग्रेस-राष्ट्रवादीचे राखीव कुरण! राजकारणाच्या या आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्यातील सामना चांगलाच रंगला. त्यात कुस्ती आणि पहिलवान यांसारख्या शब्दांची दोन्ही बाजूंनी सरबत्ती झाली. तीत फडणवीसांनी आपली मागच्या वेळची गदा कायम राखली, तरी पवारांनी जमिनीला पाठ टेकली नाही, हे कबूल करावेच लागेल.


त्यांच्या
तुलनेत या भागावर एकेकाळी हुकमत असलेल्या काँग्रेसने तर रणांगणातून पळच काढला होता. या भागातून राज्याला चार-चार मुख्यमंत्री देणार्या काँग्रेसने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढायलाही नकार दिला. पृथ्वीराज चव्हाण यांना चालून आलेली संधी त्यांनी नाकारली. त्या तुलनेत पवारांनी चिवटपणे आपला किल्ला लढवला. भर पावसात भाषण करण्याची त्यांची स्टंटबाजी असेलही, मात्र त्यातून त्यांना हवा तो परिणाम साधण्यात ते यशस्वी ठरले. पवार यांनी विरोधकांच्या फळीचे एकहाती नेतृत्व केले.

त्यामुळेच पुणे जिल्ह्याचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली. या भागात यंदाच्या निवडणुकीत अनेक लक्षवेधी लढती पाहायला मिळाल्या. त्यात सर्वात ठळक लढत होती सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक. यात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. हा भाजपाच्या दृष्टीने जबरी धक्का म्हणावा लागेल.


कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी असाच धक्का दिला. फडणवीस सरकारमधील मंत्री राम शिंदे यांचा त्यांनी पराभव केला. पवारांच्या एका नातवाला लोकसभेच्या वेळेस थट्टेला (आणि पराभवाला) सामोरे जावे लागले. तेव्हाच्या पार्थ पवारच्या तुलनेत रोहित हे अधिक परिपक्व आणि राजकीयदृष्ट्या सजग दिसतात. त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम केलेले असल्यामुळे त्यांच्यात समंजसपणाही दिसतो. विजयानंतर राम शिंदे यांना भेटायला जाण्यातून ते दिसून आले. पवार घराण्यातील दिग्गज अजित पवारांनी बारामतीचा गड कायम ठेवला. तेथे आपल्या सर्व विरोधकांची अनामत रक्कम जप्त करून त्यांनी आपला वरचश्मा कायम ठेवला.

राज्यातील अन्य भागांप्रमाणेच . महाराष्ट्रातील मतदारांनीही पक्षांतराबाबत मतदान यंत्रातून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. म्हणूनच काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूरमधून सलग दुसरा पराभव झाला. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आले. मात्र जनतेने त्यांना नाकारले. बार्शीतही राष्ट्रवादीच्या दिलीप सोपलांनी शिवसेनेत केलेला प्रवेश मतदारांनी स्वीकारला नाही. त्यामुळे तीस वर्षांनंतर तेथे सोपलांची सद्दी संपली.

महायुतीच्या दृष्टीने सर्वात नामुश्कीचा पराभव हा कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणावा लागेल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हा जिल्हा. त्यामुळे त्याच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. मागील निवडणुकीत शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळवला होता. त्यातील पाच आमदारांना जनतेने घरी परत पाठवले. भाजपालाही जत आणि शिराळ्याचा जागा गमवाव्या लागल्या. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके आणि भाजपाचे सुरेश हाळवणकर हे चार आमदार हॅटट्रिक करण्याच्या बेतात होते. मात्र आता ते होणार नाही.

 

शिवसेनेला नगर जिल्ह्यात आणखी एक धक्का बसला. तेथे भाजपाने 8, तर शिवसेनेने 4 जागा लढवल्या होत्या. मात्र सेनेच्या चारही उमेदवारांचा दारुण पराभव झाला. नगरमध्ये अनिल राठोड, पारनेर-नगर मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी, श्रीरामपूर मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे संगमनेर मतदारसंघात साहेबराव नवले पराभूत झाले. शिवसेनेबरोबरच भाजपालाही चिंतेत टाकणारा हा निकाल आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादीला 6, काँग्रेसला 2 राष्ट्रवादी पुरस्कृत क्रांतिकारी शेतकरी पक्षाला 1 अशा नऊ जागा मिळाल्या. भाजपाच्या पारड्यात अवघ्या तीन जागा पडल्या. तब्बल सात आमदार या निवडणुकीत पराभूत झाले.

पुणे शहराने गेल्या वेळी आठहीच्या आठही जागा भाजपाच्या पदरात टाकून अभूतपूर्व यशाचे माप टाकले होते. पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपाने एकहाती यश मिळवले. यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीने येथे महायुतीला झुंजवले. भाजपाने दोन जागा (हडपसर वडगाव शेरी) गमावल्या, मात्र बाकीच्या जागा राखण्यात यश मिळवले. एकेकाळी शहरावर अधिराज्य गाजवणारी काँग्रेस या वेळी कुठे दिसलीही नाही. उपनगरांमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याने नेते-कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी चांगलेच आव्हान उभे केल्याचे दिसले.

 

वडगाव शेरीत सुनील टिंगरे यांचा विजय राष्ट्रवादीच्या तंबूत उत्साह आणणारा ठरेल. ऐन निवडणुकीत माजी आमदार बापू पठारे आणि नगरसेविका रेखा टिंगरे यांनी काही पदाधिकार्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे जगदीश मुळीक यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर सुनील टिंगरे यांनी केवळ 5,300 मतांनी मुळीक यांचा पराभव केला. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी . भीमराव तापकीर यांना अखेरच्या फेरीपर्यंत झुंजवले. केवळ 2200 मतांनी तापकीर यांनी बाजी मारली. मागील निवडणुकीत तापकीर तब्बल 63 हजार मतांनी विजयी झाले होते, हे येथे उल्लेखनीय.


 

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे यांना रमेश बागवे यांनी चांगलेच झुंजवले. मात्र कसब्यात महापौर मुक्ता टिळक यांनी पर्वती मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी सहज विजय मिळवले.

 

पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील लढत सुरुवातीपासून चर्चेचा विषय बनली. मात्र ज्या सहजतेने चंद्रकांतदादा पाटील यांनी विजय मिळवला, त्यावरून ती चर्चा फुकाची असल्याचेच सिद्ध झाले. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात स्थानिकांची नाराजी आणि विरोधकांनी एकजूट करून मनसेला दिलेला पाठिंबा, ही केवळ बातम्यांची बेगमी ठरली.


जिल्ह्यात
मात्र बहुतांश ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या. जिल्ह्यातील 21 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळवला आणि स्वतःचे वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. त्या खालोखाल भाजपाचे नऊ आणि काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि मनसेचे मात्र पुणे जिल्ह्यातून अस्तित्व संपले आहे. पुरंदरमध्ये सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी येथे विजयश्री मिळवली. भोरमध्ये काँग्रेसचेच संग्राम थोपटे तिसर्यांदा 9,206 मतांनी निवडून आले. जुन्नरमध्ये सेनेचे आमदार शरद सोनावणे यांना पराजयाचा धक्का सहन करावा लागला. तेथे राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांनी यश मिळवले. दौंडमध्ये रंगलेल्या लढतीत भाजपाच्या राहुल कुल यांनी अवघ्या 673 मतांनी विजय मिळवला. भोसरी मतदारसंघात भाजपाचे महेश लांडगे विजयी झाले. चिंचवडमध्ये भाजपाचे लक्ष्मण जगताप विजयी झाले. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे भाजपाचे अशोक पवार यांनी बाबूराव पाचर्णे यांना पराभूत केले. खेड-आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते यांनी विजयी मिळवला. आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी यश मिळवून आपल्या मतदारसंघावरील पकड सिद्ध केली. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदारसंघात राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा पराभव खरा धक्कादायक म्हणावा लागेल. राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी तेथे विजय मिळवला. भेगडे हे सलग दोन वेळा निवडून आले होते. पिंपरी मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांनी गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला.

 

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस मतदारसंघातील निकाल सगळ्यात चमकदार ठरला. येथे भाजपाचे उमेदवार राम सातपुतेंच्या गळ्यात विजयाची माळ पडली. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या राम सातपुतेंनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी ओळख मिळवली होती. त्यांनी 2702 मतांनी विजय मिळवला. बाकी सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे यांचा विजय अपेक्षितच होता. तसेच सोलापूर दक्षिणमधून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचाही विजय अपेक्षितच. जिल्ह्यात 11पैकी भाजपाच्या वाट्याला केवळ पाच जागा आल्या होत्या. त्यातील चार जागा मिळाल्या म्हणजे चांगलेच यश म्हणावे लागेल.


सातारा
जिल्ह्यात उदयनराजेंवर राष्ट्रवादीने मात केली असली, तरी जिल्ह्यात महायुती काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात बरोबरीत सामना सुटला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधून विजय मिळवला. महायुतीने कोरेगाव आणि पाटणच्या जागा राखल्या, तर माण आणि साताराच्या जागा मिळवल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड मानल्या गेलेल्या भागात हे यश कौतुकास्पद नाही तर काय?

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी आपले प्रभावक्षेत्र कायम ठेवल्याचे दिसले. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या पाटील यांच्या जिल्ह्यात आठपैकी पाच जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या. ते स्वतः इस्लामपूरमधून निवडून आले. दिवंगत आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील तासगाव-कवठे महांकाळमधून निवडून आल्या. पलूस-कडेगावमधून विश्वजीत कदम यांनी सहज विजय मिळवला. सांगलीतील धनंजय गाडगीळ आणि मिरजचे डॉ. सुरेश खाडे यांच्या रूपाने भाजपाने दोन जागा राखल्या, तर शिवसेनेला केवळ खानापूर-आटपाडीची एकच जागा पुन्हा राखता आली आहे. येथे भाजपाला दोन जागांचे नुकसान झाले. याचाच अर्थ महायुतीला या जिल्ह्यावर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.

 

. महाराष्ट्रात विधानसभेच्या 66 जागा असून येथे 2014च्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला मागे रेटले होते. सर्व पक्ष त्या वेळी स्वतंत्र लढले होते आणि या 66 जागांपैकी भाजपाला 22 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला 12 जागांवर यश मिळाले होते. राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष अशी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. त्याआधी 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजपाला 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या, तर 7 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि मनसे यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर पाहिले, तर यंदा भाजपाला 19 आणि शिवसेनेला 5 अशा 24 जागा मिळाल्या आहेत. याचाच अर्थ गेल्या वेळेपेक्षा फारसे नुकसान झालेले नाही आणि 10 वर्षांपूर्वीपेक्षा तर जास्तच जागा आहेत. त्यामुळे या निकालाने निराश होण्यासारखी अजिबात परिस्थिती नाही. ‘थोडा है, थोडे की जरूरत हैअशी ही स्थिती आहे. जे मिळाले ते यशच आहे, परंतु ते यश आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी भाजपा नेत्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. या निकालाचा अर्थ हाच आहे.