मुंबई, कोकण पुन्हा युतीमागे एकनिष्ठ

स्रोत: विवेक मराठी    दिनांक26-Oct-2019
|
 **आबा माळकर***
 
मुंबई आणि ठाणे ही शहरे नेहमीच भाजपा-सेनेचे बालेकिल्ले राहिलेली आहेत. या वेळच्या निवडणुकीतही त्यापेक्षा काही वेगळे घडलेले नाही. मुंबईसह कोकण म्हणतात तो मोठा भाग विधानसभा निवडणुकीतही भाजपा-शिवसेनेबरोबर राहिला आहे. या भागात भाजपाने आणि शिवसेनेने केलेले काम त्यांच्या उपयोगी पडले आणि लोकांनी या वेळीही त्यांना मते दिली. एकंदरीत विचार करता मुंबईने आणि कोकणाने भाजपाला पुन्हा सत्ता दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
 

मन ही एक विचित्र गोष्ट असते. या मनात तुम्ही कितीही मांडे खाल्ले, तरी ते लोकांना दिसत नाहीत आणि शरीरालाही लागत नाही. त्यामुळे मनातील मांडे हे केवळ समाधान देतात. त्याव्यतिरिक्त त्यांचे कोणतेही काम नसते. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि आतापर्यंत अनेक जण मनातील मांडे खात बसले आहेत. बहुतांश जणांना त्यात भाजपाचा पराभव आणि कथित सेक्युलर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय दिसतोय. पण त्यामुळे खरेच परिस्थिती बदलली आहे का? खरेच भाजपा पराभूत झाली आहे का आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विजयाच्या घोड्यावर विराजमान होऊन धावत सुटली आहे का? मुळात असे प्रश्न विचारले तर लहान मुलगाही वेड्यात काढेल. पण ज्यांना वेड्यांच्या, कल्पनांच्या दुनियेतच वावरायचे आहे, त्यांच्यासाठी विजयात नैतिक पराभव आणि पराभवात नैतिक विजय दिसणार, यात काहीही आश्चर्य नाही.
 
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात खर्‍या अर्थाने भाजपा-शिवसेनेला साथ दिली. ही साथ म्हणजे काय, तर त्याचे विश्लेषण केले तर ते लक्षात येईल. आता मुंबईपासून सुरुवात केली, तर मुंबईत एकूण जागा 36, त्यापैकी भाजपाला 16 जागा मिळाल्या. शिवसेनेला 14, काँग्रेसला फक्त 4, तर राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. म्हणजे 36पैकी तब्बल 30 जागा भाजपा-सेना युतीने जिंकल्या. यात युतीचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो, कारण ही निवडणूक मुळातच शिवसेना-भाजपाने युती करून लढली होती. त्यामुळे त्यांचा एकत्रित विजय महत्त्वाचा आहे. आता मुंबईजवळचा ठाणे हा मतदारसंघ घ्या. ठाणे जिल्ह्यात भाजपाने 8, शिवसेनेने 5, राष्ट्रवादीने 2, मनसेने 1 आणि इतर पक्षांनी 2 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे ठाण्याचा विचार केला, तर ठाण्यात युतीने 18पैकी 13 जागा जिंकल्या. रायगडमध्ये युतीने 7 पैकी 5 जागा जिंकल्या. पालघरमध्ये 6पैकी 1 जागा जिंकली. रत्नागिरीत, सिंधुदुर्गात 8पैकी 7 जागा युतीला मिळाल्या. मतदारांनी दिलेला कौल इतका स्पष्ट असताना त्यात कोणी काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय शोधत असेल, तर त्याला खरेच काय म्हणणार?
मुंबई आणि ठाणे ही शहरे नेहमीच भाजपा-सेनेचे बालेकिल्ले राहिलेली आहेत. या वेळच्या निवडणुकीतही त्यापेक्षा काही वेगळे घडलेले नाही. शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली असली, तरी मुंबईत मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची एक जागा वाढली आहे. मात्र शिवसेनेची एकही जागा वाढलेली नाही, तर काँग्रेसची एक जागा कमी झाली आहे. ही एक जागा कमी झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा वाढल्याने आघाडीच्या आमदारांचा आकडाही मुंबईत कायम राहिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवताना शिवसेनेचे 14, तर भाजपाचे 15 आमदार निवडून आले होते. परंतु या निवडणुकीत शिवसेनेने 19 जागा तर उर्वरित 17 जागांवर भाजपाने निवडणूक लढवली होती. त्या तुलनेत शिवसेनेने 19 जागांपैकी 14 जागा जिंकल्या, तर भाजपाने 17 जागांपैकी 16 जागा जिंकल्या. शिवसेना-भाजपाची युती होऊनही प्रस्थापित शिवसेनेला एकही जागा वाढवता आलेली नाही. युतीच्या बळावर भाजपाची एक जागा वाढली. वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कापून पक्षाने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सावंत यांनी बंडखोरी करत आव्हान उभे केल्यामुळे अटीतटीच्या लढतीत महाडेश्वर यांचा पराभव झाला. मातोश्रीच्या अंगणात काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान यांनी महापौरांसह तृप्ती सावंत यांचा पराभव करत शिवसेनेला घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे वांद्य्रात दहा वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा हा गड मिळवता आलेला आहे. तर चांदिवलीमध्ये काँग्रेसला नसीम खान यांच्या पराभवाने जोरदार झटका बसला आहे. नसीम खान यांचा निसटता पराभव झाला आहे. अवघ्या 409 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे हक्काची जागा गमवावी लागली. भायखळ्यासह चांदिवलीच्या दोन जागांवर शिवसेना निवडून आली असली, तरी अणुशक्ती नगर व वांद्रे पूर्व येथील जागा शिवसेनेने गमावल्यामुळे मागील निवडणुकीएवढेच आमदार मुंबईत राखण्यात त्यांना यश आले आहे.

वर्सोव्यात बंडखोर राजुल पटेल यांचे कडवे आव्हान असतानाही भाजपाच्या भारती लव्हेकर यांनी विजय मिळवला आहे. चौदाव्या फेरीपर्यंत लव्हेकर या दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होत्या. त्यामुळे अपक्ष राजुल पटेल आणि काँग्रेसचे बलदेव खोसा यांच्यामध्ये लढत होती. परंतु शेवटच्या काही टप्प्यांमध्ये लव्हेकर यांनी बाजी मारल्याने बलदेव खोसा आणि पटेल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बंडखोरी होऊनही लव्हेकर यांच्यासह भाजपाचे राम कदम यांनी विजय मिळवला. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ कायम राखण्यात सपाचे अबू आझमी यशस्वी ठरले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार्‍या विठ्ठल लोकरे यांचा अबू आझमी यांच्यासमोर निभाव लागला नाही. सपाच्या परंपरागत मतदारांनी अबू आझमी यांच्यावरच विश्वास दाखवला.
वरळीत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी सुरेश माने यांचा अपेक्षित असा पराभव केला. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील पहिला आमदार बनण्याचा मान आदित्य ठाकरेंनी मिळवला आहे. वडाळा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, या मतदारसंघातून भाजपाच्या वतीने निवडणूक लढवली. परंतु शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी कोळंबकर यांच्या प्रचारावर बहिष्कार घातलेला असतानाही त्यांनी विजय मिळवत भाजपाच्या यादीत आणखी एका आमदाराचे नाव जोडले. कोळंबकर यांच्या रूपाने भाजपाचा एक आमदार मुंबईत वाढला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारानंतर वांद्रे पूर्व आणि धारावीमधील शाखांना भेटी दिल्यानंतरही वांद्य्राचा गड हातचा गेला आणि धारावीत वर्षा गायकवाड यांचा पराभव करण्यात शिवसेनेला यश आले नाही. भायखळ्यात एमआयएमचे वारिस पठाण यांचा पराभव करत शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी मोठा विजय मिळवला आहे. यामिनी जाधव यांनी पठाण यांचा पराभव करत भायखळ्यात खर्‍या अर्थाने शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला आहे. हा विजय मिळवत यामिनी जाधव यांनी भायखळ्यात महिला आमदार बनण्याचा बहुमान मिळवला आहे. आजवर या मतदारसंघातून पुरुष आमदार निवडून आले होते. प्रथमच एक महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील 18 जागांमधील भाजपाकडे 9, सेनेकडे 6 आणि राष्ट्रवादी 4 असे बलाबल होते. या निवडणुकीत मीरा-भाईंदरच्या जागेवर पाणी सोडावे लागले. नरेंद्र मेहता यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींचा फटका भाजपाला बसला. उल्हासनगरला कुमार आयलानी, कल्याण (पू.) गणपत गायकवाड, मुरबाडमध्ये किसन कथोरे, ठाण्यात संजय केळकर, ऐरोली येथे गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, भिवंडी (प.) महेश चौगुले, डोंबिवली रवींद्र चव्हाण या जागा भाजपाकडे आल्या. कल्याण (पू.) ही जागा प्रथमच मनसेने जिंकली.
पालघर जिल्ह्यात सहापैकी चार नवे चेहरे निवडून आले. यात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील (बोईसर), सेनेचे श्रीनिवास वनगा (पालघर), राष्ट्रवादीचे सुनील भुसारा (विक्रमगड) आणि माकपचे विनोद निकोले (डहाणू) यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात भाजपाला डहाणू आणि विक्रमगड या जागांवर पाणी सोडावे लागले.
 
रायगड जिल्ह्यात भाजपाने बर्‍यापैकी आघाडी घेतली. पनवेलची जागा त्या पक्षाने राखलीच, तर पेणची जागा नव्याने त्या पक्षात आलेल्या रवी पाटील यांनी जिंकली. रवी पाटील यांना 1 लाख 11 हजार 309 मते पडली. रवी पाटील यांचा 23 हजार 595 मतांनी विजय झाला. सेनेकडील उरणची जागा भाजपाचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी सुमारे पाच हजार 918 मतांच्या फरकाने जिंकली. सेनेचे मनोहर भोईर यांना 68 हजार 745 मते पडली. आश्चर्याची बाब म्हणजे विधानसभेच्या निर्मितीनंतर शेकापकडे असलेली अलिबाग विधानसभा मतदारसंघाची जागा सेनेचे महेंद्र दळवी यांनी जिंकली. शेकापचे पंडित पाटील यांचा त्यांनी सुमारे 32 हजार मतांनी पराभव केला. रायगड जिल्ह्यातून शेकाप पूर्णत: बाहेर गेला आहे. महाडची जागा सेनेचे भरत गोगावले यांनी सुमारे 21 हजार मतांनी जिंकली. राष्ट्रवादीकडील कर्जतची जागा सेनेचे महेंद्र थोरवे यांनी खेचून घेतली. सुरेश लाड यांचा 18 हजार 33 मतांनी पराभव झाला. श्रीवर्धनची जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश आले. राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी सेनेचे विनोद घोसाळकर यांचा सुमारे 36 हजार मतांनी पराभव केला.
 
राज्यात प्रतिष्ठेच्या बनलेल्या महत्त्वाच्या लढतीत कोकणचा उल्लेख आवर्जून केला जातो. कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील निवडणुकीतील लढतीत शिवसेनेचा वरचश्मा असून, भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. निवडणुकीसाठी मतमोजणीतील कोकणातल्या निकालातील आठ जागांपैकी सेनेला सहा जागा मिळाल्या आहेत. दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या ठिकाणी शिवसेनेचा आमदार झाला, तर कणकवलीमध्ये भाजपाच्या नितेश राणे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. चिपळूणची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे शेखर निकम यांनी जिंकली.
 
दापोली ही सेनेची हक्काची जागा मानली जाते. फडणवीस सरकारमधील ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश हे प्रथमच निवडणूक लढवत होते. आघाडीचे संजय कदम हे राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत होते. संजय कदम हे मुळात सेनेचे कार्यकर्ते. त्यांना उमेदवारी नाकारून ही उमेदवारी योगेश कदम यांना देण्यात आली होती. योगेश यांना 94 हजार 993 इतकी, तर संजय कदम यांना 81 हजार 262 मते मिळाली. योगेश यांचा 13 हजार 731 मतांनी विजय झाला. गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव हे 2014मध्ये निवडून आले होते. त्यांनी सेनेत प्रवेश घेतल्याने या निवडणुकीची चुरस वाढली होती. भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी आव्हान दिले होते. भास्कर जाधव यांना 78 हजार 614 मते मिळाली. तर बेटकर यांना 52 हजार 092 मतांवर समाधान मानावे लागले.

 
युतीला अपवाद ठरलेल्या चिपळूणच्या जागेवर राष्ट्रवादीचे शेखर निकम निवडून आले. गत निवडणुकीत सदानंद चव्हाण निवडून आले होते. या वेळी मात्र त्यांना राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी त्यांचा 29 हजार 595 मतांनी दारुण पराभव केला. रत्नागिरीची जागा सेनेचे उदय सामंत यांच्याकडे होती. या वेळी त्यांना राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांनी आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान सामंत यांनी लीलया परतवून लावले. सुदेश मयेकर यांचा त्यांनी चक्क 87 हजार 147 मतांनी पराभव केला. राजापुरात सेनेचे राजन साळवी यांनी राष्ट्रवादीचे अविनाश लाड यांच्यावर 11 हजार 893 मतांनी मात केली. मात्र 2014च्या निवडणुकीत त्यांनी 39 हजार मतांनी काँग्रेसचे उमेदवार राजन देसाई यांचा पाडाव केला होता. विजयातील हा फरक 28 हजारांहून अधिक आहे.
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या कणकवली मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे यांनी सेनेचे सतीश सावंत यांच्यावर 28 हजार 113 मतांनी मात केली. कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक यांनी अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा 14 हजार 215 मतांनी पराभव केला. राणे यांना 68 हजार 855 तर देसाई यांना 54 हजार 640 मते मिळाली. 2014च्या निवडणुकीत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा सुमारे 10 हजार मतांनी पराभव केला होता. सावंतवाडी मतदारसंघात सेनेचे दीपक केसरकर यांना 69 हजार 417 मते पडली. राजन तेली या अपक्ष उमेदवाराचा त्यांनी 13 हजार 25 मतांनी पराभव केला.
आता हा निकाल पाहिला तर लक्षात येईल की, प्रत्यक्षात या भागात युतीचा जोर कायम राहिला आहे. मुंबईसह कोकण म्हणतात तो मोठा भाग विधानसभा निवडणुकीतही भाजपा-शिवसेनेबरोबर राहिला आहे. मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खरेच विजय मिळाला का? निदान मुंबईत, कोकणात तरी नाही. या भागात भाजपाने आणि शिवसेनेने केलेले काम त्यांच्या उपयोगी पडले आणि लोकांनी या वेळीही त्यांना मते दिली. पण येथील जागा वाढवता आल्या असत्या का? तर भाजपाने मुंबईत एक जागा वाढवून घेतली आहे. कोकणातही भाजपाला एका जागेचा फायदा झाला आहे. पालघरमध्ये मात्र भाजपाची एक जागा कमी झाली आहे. एकंदरीत विचार करता मुंबईने आणि कोकणाने भाजपाला पुन्हा सत्ता दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही.