पुन्हा भाजपा - सेनेचीच सरशी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक27-Oct-2019   
|
 
उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीच्या तुलनेत भाजपा-सेनेने चांगले यश मिळविले आहे. या भागात सर्वाधिक 13 जागा जिंकून भाजपा क्रमांक 1वर राहिला असून दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेने या विभागातील सगळ्या जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला, पण विधानसभेत राष्ट्रवादी व काँग्रेसने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले.
 
 
उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीच्या तुलनेत भाजपा-सेनेने चांगले यश मिळविले असून सर्वाधिक 13 जागा जिंकून भाजपा क्रमांक 1वर राहिला असून दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष आला आहे. धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील अपयशामुळे सेनेचा ग्राफ तिसर्‍या क्रमांकावर घसरला असून काँग्रेस चौथ्या क्रमांकावर कायम आहे. एम.आय.एम.चे आणि बंडखोरांचे यश युतीसाठी संकटाचा इशारा देणारा आहे.
या निकालांवरून लोकसभेचे वारे विधानसभा निवडणुकीत टिकले नाही, असे दिसले. लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेने या विभागातील सगळ्या जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला, पण विधानसभेत राष्ट्रवादी व काँग्रेसने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले. अर्थात या दोन्ही पक्षांना जागा करून देण्यात युतीच्या बंडखोरांनी संधी उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले.
एकनाथराव खडसे यांच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व गिरीश महाजन यांच्याकडे आले. मागील 5 वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठे यश मिळवून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखविले. विधानसभा निवडणुकीत मात्र जळगाव-धुळे जिल्ह्यात काही जागांवर आलेले अपयश त्यांच्यासाठी आगामी काळात आव्हान ठरणार असल्याचा इशारा ठरले आहे.
विभागात 35 जागा आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात 15 जागा असून भाजपा-सेना व काँग्रेस महाआघाडी दोघांना समान यश मिळाले आहे. बंडखोरांचे आव्हान असतानाही 6पैकी 5 जागा जिंकत भाजपाने वरचश्मा सिद्ध केला. शिवसेना मात्र 9 जागा लढवून 2 जागांवर थांबली. भाजपापेक्षा 1 जागा अधिक जिंकत राष्ट्रवादीने आपली ताकद वाढल्याचे दाखवून दिले. गेल्या वेळी या पक्षाला 4 जागा मिळाल्या होत्या, त्या आता 6 झाल्या. 9 जागा लढवून शिवसेनेचा वारू 2 जागांवर अडखडल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस व एमआयएम यांनी एकेक जागा जिंकल्या. सेनेने गमावलेल्या 2 जागा हे युतीचे अपयश दिसत आहे. एकूण नाशिक जिल्ह्यात युती व आघाडी दोघांनी समसमान यश मिळविले आहे.
नाशिक जिल्ह्यात भाजपासमोर बंडखोरांचे मोठे आव्हान होते. परंतु निकालांती भाजपा उमेदवारांनी आपापले गड कायम राखले. पेठ सुरगाणा भागात माकपचा विजय ठरलेला असायचा. या वेळी मात्र या भागातून माकपचा अस्त झाल्याचे दिसले.
नाशकात भुजबळांच्या रूपाने पुन्हा बळ मिळाल्याचे त्यांच्या वाढलेल्या जागांवरून दिसते. अर्थात येवल्यातून छगन भुजबळ जिंकले असले, तरी त्यांचे सुपुत्र पंकज नांदगावातून सेना उमेदवार सुहास कांदे यांच्यासमोर पराभूत झाले.
जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत होती नाशिक पूर्वची जागा. बाळासाहेब सानप यांनी भाजपाविरोधात बंडखोरीचे शस्त्र उपसले होते. त्यांना इतर पक्षांचेही पाठबळ मिळाले. परंतु अटीतटीच्या लढतीत अ‍ॅड. राहुल ढिकले विजयी ठरले.
जळगाव जिल्ह्यातही युतीची सरशी झाल्याचे दिसत असले, तरी बंडखोरीमुळे भाजपाला 3 जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यात मुक्ताईनगरचा निसटता पराभव आत्मघात ठरला आहे. रावेरला बंडखोरीने जागा गेली, तर अंमळनेर येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहानुभूतीचा लाभ मिळाल्याने तेथे भाजपा पराभूत झाला. गेल्या वेळी 7 जागा जिंकणार्‍या भाजपाला या वेळी 4 जागांवर विजय मिळविता आला. सेनेने मात्र 4पैकी 4 जागा जिंकत 100 टक्के यश संपादन केले. मुक्ताईनगरात भाजपाच्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या विरोधात जिंकलेले चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे बंडखोर होते. निवडून आल्यानंतर ते सेनेच्याच वळचणीला जाण्याची शक्यता असल्याने सेनेचे संख्याबळ भाजपाच्या पुढे गेल्याचे दिसते.राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या वेळी एका जागेवर जिंकली होती. तेव्हा पारोळ्यातून डॉ. सतीश पाटील जिंकले होते. या वेळी ते पराभूत झाले असून राष्ट्रवादीने अनिल पाटील यांच्या रूपाने अंमळनेरचा गड जिंकला आहे. जिल्ह्यातून अस्तंगत होत चाललेल्या काँग्रेसला रावेरमधून शिरीष चौधरींच्या रूपाने एकमेव विजय मिळाल्याने संजीवनी मिळाली.
जळगाव जिल्ह्यात भाजपा-सेनेसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे आव्हान दिसले नाही. मात्र बंडखोरांनी जेरीस आणल्याने भाजपाच्या जागा कमी झाल्या. सेना मात्र बंडखोरांना पुरून उरली व चारपैकी चारही जागा त्यांनी खेचून आणल्या. अर्थात चोपडा-यावल, भडगाव-पाचोरा या दोन मतदारसंघांत सेना उमेदवारांची आघाडी फारच कमी आहे.

 
चाळीसगावात बहुरंगी लढतीत भाजपाचे मंगेश चव्हाण यांनी विजय संपादन केला. जळगाव जिल्ह्याचा विचार करता जामनेरमधून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगावातून सुरेश भोळे हे भाजपाचे व सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मोठ्या फरकाने निवडून आले, तर इतर सगळ्या लढती अटीतटीच्या झाल्या.
या निवडणुकीत धुळे-नंदुरबार जिल्ह्यात काहीसे धक्कादायक निकाल लागले. महापालिका निवडणुकीत गोटे आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब विधानसभेच्या वेळी दिसेल हे अंदाज होते. मात्र त्यात एमआयएमच्या रूपाने नवे आव्हान उभे राहील असे कोणाला वाटले नव्हते. धुळे शहर मतदारसंघात सेनेचे हिलाल माळी, राष्ट्रवादीचे कदमबांडे व अनिल गोटे यांच्यात मतविभागणी होऊन एमआयएमचे डॉ. फारूक शेख यांनी बाजी मारली. हा निकाल भाजपा-सेनेच्या जिव्हारी लागणारा ठरला.
शिंदखेडे मतदारसंघातून पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांचा 43 हजाराच्या मताधिक्याने विजय झाला. शिरपूरमध्ये अमरीशभाई पटेल यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढल्याने काशीराम पावरा जवळपास 50 हजाराच्या मताधिक्याने निवडून आले. साक्रीत अपक्ष मंजुळा गावित यांनी भाजपाचे मोहन सूर्यवंशी व काँग्रेसचे डी.एस. आहेर यांचा पराभव केला. कुणाल पाटील यांच्या रूपाने काँग्रेसने धुळे ग्रामीण मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. एकूण धुळे जिल्ह्यात भाजपाने 2 जागांवर, काँग्रेस, एमआयएम व अपक्ष यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. सेनेला धुळे शहराच्या रूपाने मिळालेली जागा जिंकण्यात अपयश आले.
नंदुरबार जिल्हा हा पूर्वापार काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड मानला जातो. मात्र ती जागा आता भाजपाने घेतली आहे. या वेळी नंदुरबार जिल्ह्यातील 5 पैकी 2 जागा भाजपा व 2 काँग्रेसने जिंकल्या आहेत. विजयकुमार गावीत खानदेशात सर्वाधिक - म्हणजे 1 लाखाहून अधिक मतांनी निवडून येणारे उमेदवार ठरले. शहाद्यात भाजपाने राजेश पाडवी हे नवखे उमेदवार दिले. परंतु त्यांनी काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांचा 7 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. 
एकूण महाराष्ट्रात सर्वदूर राष्ट्रवादी काँग्रेस चांगले यश मिळवीत असताना नाशिक वगळता या पक्षाला उत्तर महाराष्ट्रात फारसे चांगले यश मिळालेले नाही. धुळे, जळगाव व नंदुरबार हे तिन्ही जिल्ह्यांचा विचार करता फक्त जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरची एकमेव जागा या पक्षाला मिळविता आली. काँग्रेसही नवापुर, अक्कलकुवा व रावेर ह्या जागा मिळवून थांबली.
एकूण नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रात पुन्हा भाजपा-सेनेचीच सरशी झाली असे दिसते.