धर्मशास्त्राचे इतिहासकार भारतरत्न डॉ. पां. वा. काणे

विवेक मराठी    31-Oct-2019
Total Views |

संस्कृतचे गाढे अभ्यासक, महामहोपाध्याय, पुणे आणि अलाहाबाद विद्यापीठांकडून डी.लिट. पदवीने सन्मानित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, नॅशनल प्रोफेसर, लंडन युनिव्हर्सिटीच्या 'ओरिएंटल ऍंड आफ्रिकन स्टडीज'चे सन्माननीय फेलो, 'History of Dharmashastra' या ग्रांथाचे कर्ते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, राज्यसभा सदस्य, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांच्या जीवनकार्याचा हा संक्षिप्त परिचय.


धर्माखेरीज इतर कशावरही भारताच्या जीवनाची प्रतिष्ठा अशक्य आहे. या देशाचा प्राण आहे - धर्म; देशाची भाषा आहे - धर्म; देशाचा भाव आहे - धर्म. - स्वामी विवेकानंद

हिंदू धर्माची पताका अखिल विश्वात फडकवणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानांतून, लेखनातून हे वारंवार स्पष्ट केले आहे की भारताचा आत्मा कशात वसत असेल, तर तो धर्म ह्या संकल्पनेमध्ये. एकमेवाद्वितीय म्हणता येईल अशा 'धर्म' संकल्पनेचा आधुनिक काळात अनेक विचारवंतांनी आपापल्या परीने अर्थ लावला आहे. परंतु भारतीय 'धर्म' संकल्पना तिच्या ऐतिहासिक परंपरेसह, बारकाव्यांसह आणि व्यापकतेसह समजून घ्यायची असेल, तर आपल्याला वळावे लागते ते 'History of Dharmashastra' या ग्रांथाकडे.

प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या दृष्टीने धर्माचा वेध घेणारा 'History of Dharmashastra' अर्थात 'धर्मशास्त्राचा इतिहास' हा धर्मासंबंधी सखोल माहिती देणारा एक महत्त्वाचा ग्रांथ आहे. पाच खंडांमध्ये आणि 6500 हून अधिक पृष्ठसंख्येत विस्तारलेल्या या ग्रांथाचे कर्ते आहेत, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे.

बालपण व शिक्षण

चिपळूणजवळच्या पेढे उर्फ परशुराम नावाच्या खेडयात 7 मे 1880 रोजी पांडुरंग वामन काणे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा वेद, उपनिषदे, गीता यांचा सखोल अभ्यास होता. पण त्यावरच संतुष्ट न राहता 1878 साली वामन काणे यांनी बाँबे हायकोर्टाची परीक्षा दिली आणि त्याच वर्षी दापोलीत वकिलीला प्रारंभ केला. आपल्या नऊ अपत्यांतील थोरला मुलगा पांडुरंग याला त्यांनी बालपणीच ज्योतिषशास्त्रातील मूलभूत धडे देऊन अमरकोशातील काही सूत्रे शिकवली होती. 1897मध्ये दापोलीतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पांडुरंग काणे यांनी मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजात असताना दर वर्षी ते संस्कृत विषयात प्रथम येत. बी.ए.च्या शेवटच्या वर्षी त्यांना संस्कृत विषयासाठी मुंबई विद्यापीठाचा 'भाऊ दाजी' पुरस्कार मिळाला. 1902 साली ते एलएल.बी.ची प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढच्याच वर्षी संस्कृतसाठीचे 'झाला वेदान्त' पारितोषिक मिळवत एम.ए. झाले. कौटुंबिक जबाबदाऱ्या व लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असल्याने काणे यांना शिक्षण खात्यात माध्यमिक शिक्षक म्हणून किंवा कनिष्ठ न्यायालयात वकील म्हणून काम करणे क्रमप्राप्त होते. वकिलीचे काम करण्याची कल्पना त्या वेळी फारशी पसंत न पडल्याने काणे यांनी शिक्षण विभागात अर्ज केला आणि 1904मध्ये ते रत्नागिरी येथील सरकारी शाळेत रुजू झाले. पुढच्याच वर्षी ते STC (Secondary Teacher Certificate) ही परीक्षा संपूर्ण मुंबई प्रांतातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.


1911
ते 1918 या कालावधीत काणे यांनी दर वर्षी एक किंवा त्याहून अधिक संस्कृत पुस्तके लिहिली. त्यात विपुल टीपांसह तीन भागात लिहिलेली बाणाची कादंबरी, दोन भागांतील हर्षचरित व उत्तररामचरित यांचा समावेश होता.


 

 त्याच वर्षी त्यांनी मुंबई विद्यापीठात Aryan Manners and Morals as depicted in the Epics या विषयावर निबंध सादर करून वाय.एन. मांडलिक सुवर्णपदक पटकावले.

संस्कृत अध्यापक ते वकील

1907 साली रत्नागिरीहून मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये काणे यांची बदली झाली. त्याच वर्षअखेरीस पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतच्या साहाय्यक प्राध्यापकच्या रिक्त झालेल्या पदासाठी काणे यांनी अर्ज केला. परंतु डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राचार्यांच्या मर्जीतल्या, शैक्षणिकदृष्टया काणे यांच्या तुलनेत फारशा पात्र नसलेल्या एका व्यक्तीस त्या जागेवर नेमण्यात आले. यासंबंधी पाठपुरावा करूनही काणे यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या अन्यायाने दुखावलेल्या काणे यांनी 1908मध्ये कायद्याची दुसरी परीक्षा दिली आणि सरकारी नोकरीतून बाहेर पडायचे ठरवले.


हा निर्णय प्रत्यक्षात येण्यास मात्र दोन वर्षे लागली. कारण वकिलीच्या क्षेत्रात प्रवेश करतानाच काणे यांनी ठरवले होते की, जिथे कठोर परिश्रम आणि बुध्दीचा कस लागतो, अशा ऍपेलट कोर्टातच (Appelate side of the High Court) काम करायचे. त्या काळी दाजी खेर हे ऍपेलट कोर्टातील मातब्बर असामी म्हणून ओळखले जात. त्यांनी काणे यांना सांगितले की, हायकोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी किमान दोन हजार रुपये गाठीशी असणे आवश्यक आहे. काणे यांच्याकडे त्या वेळी इतके पैसे अजिबातच नव्हते. साठीला आलेल्या आणि सहा भावंडांच्या शिक्षणाचा भार उचलत असलेल्या वडिलांकडूनही काही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. यातून मार्ग काढण्यासाठी काणे यांनी संस्कृतची दोन शालेय पुस्तके आणि कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक सटीप पुस्तक काढले. काणे यांना त्या वेळी संस्कृतच्या प्राथमिक व मध्यमा परीक्षांसाठी परीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. अशा विविध मार्गांनी 1911 सालच्या जूनअखेरीस त्यांनी दोन हजार रुपये जमवले, सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सनद मिळवली.

कारकिर्दीच्या प्रारंभीची दोन वर्षे जम बसण्यात काहीशी संथपणे गेली. तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून काणे यांनी 1912मध्ये 'हिंदू व महंमदीय कायदा' हा विषय घेऊन एलएल.एम. केले.



1926 साली भांडारकर इन्स्टिटयूटतर्फे 'व्यवहारमयूख' हा ग्रांथ प्रसिध्द झाला. त्याच्या प्रस्तावनेतच काणे यांनी History of Dharmashastra लिहिण्याचा आपला मानस असल्याचे नमूद केले होते.

 त्या काळी हायकोर्टात वकिली करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 60 टक्के गुण मिळवणे अनिवार्य असे. काणे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे खासगी शिकवणी वर्ग सुरू केले. त्यातून त्यांना नियमित उत्पन्नाचा एक स्रोत तर मिळालाच, त्याहून महत्त्वाचे म्हणजे कायद्याचे सर्व विषय विद्यार्थ्यांना एकटयानेच शिकवावे लागत असल्यामुळे काणे स्वतः त्या सर्वच विषयांत पारंगत झाले. 1915मध्ये Ancient Geography of Maharashtra या विषयावर संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठात 'Springar Research Scholar' म्हणून दोन वर्षांसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. पुढच्याच वर्षी वेदांतसूत्रावरील 'रामानुज भाष्य' शिकवण्यासाठी विल्सन कॉलेजमध्ये मानद प्राध्यापक म्हणून, तर 1917 साली मुंबईच्या Government Law College येथे प्रोफेसरपदी त्यांची नियुक्ती झाली. या पदावर ते सहा वर्षे कार्यरत होते.



वकिली कारकिर्दीतील उल्लेखनीय घटना

1917पासून 1953पर्यंत काणे यांची वकिली उत्तम प्रकारे सुरू होती. मुंबई हायकोर्टाव्यतिरिक्त केसच्या कामासाठी त्यांना खान्देश, नागपूर, पुणे, सातारा, सोलापूर, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी जिल्हा न्यायालयांमध्येही जावे लागे. बऱ्याच गरीब व गरजू व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी त्यांनी पैसे न घेता, उलट पदरमोड करून काम केले.

त्यातील नमूद करण्याजोगे एक उदाहरण म्हणजे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एका विधवेला विठोबाचे चरणस्पर्श करून दर्शन घेण्यास विरोध झाला. त्या वेळी काणे तीन वेळा स्वखर्चाने पंढरपूरला गेले आणि त्यांनी या महिलेच्या बाजूने सात दिवस कोर्टात खटला चालवून तिला न्याय मिळवून दिला.

 


History of Dharmashastraच्या पाच खंडांची केवळ अनुक्रमणिकाच 289 पृष्ठांची आहे, यावरून या ग्रांथाचा आवाका लक्षात येईल.

 

असाच एक उल्लेखनीय खटला म्हणजे सरकार विरुध्द पुण्यातील डेक्कन कॉलेज. या खटल्यासाठी काणे यांनी डेक्कन कॉलेजच्या लोकांना मदत केली. नंतर काणे यांच्या विनंतीवरून त्या काळचे सुप्रसिध्द बॅरिस्टर जयकर यांनी डेक्कन कॉलेजसाठी हा खटला मोफत लढला आणि 1938मध्ये डेक्कन कॉलेज बंद होण्यापासून वाचवले. 1927 साली काणे हे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष असताना महार समाजातील काही लोकांनी ब्राह्मण सभेच्या गणेशोत्सवात महार मेळा घेऊन श्रींचे जवळून दर्शन घेण्याची अनुमती मागितली. काणे यांनी या गोष्टीला तत्काळ अनुमोदन दिले. परंतु कार्यकारिणीतील काही सदस्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. तेव्हा यावर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. या सभेत काणे यांच्या बाजूने बरीच अधिक मते पडली. परवानगीविरोधात असलेल्या सदस्यांनी निर्णयाला आव्हान दिले व प्रकरण कोर्टात गेले. न्यायालयाने या विषयावरून होऊ शकणारे संभाव्य वादंग, हिंसा यांचा विचार करून प्रकरण 'जैसे थे' ठेवण्याचा (temporary injunction) निर्णय दिला. कालांतराने तक्रारकर्त्यांनी तक्रार मागे घेतली. भारतीय राज्यघटनेने 1950 साली अस्पृश्यता हद्दपार केली, परंतु 1927 सालच्या या घटनेतून काणे यांचे पुरोगामित्व अधोरेखित होते.
 

साहित्यिक कारकिर्द

1911 सालीच 'Bombay Government Sanskrit Series'साठी भट्ट नीलकंठकृत 'व्यवहारमयूख' या ग्रांथाचे सटीप संपादन करण्याचे काम काणे यांनी सुरू केले होते. परंतु वैयक्तिक आयुष्यातील विविध घडामोडींमुळे नंतर ते काम काहीसे मागे पडले. 1917मध्ये 'व्यवहारमयूख'चे काम पुण्याच्या भांडारकर इन्स्टिटयूटकडे हस्तांतरित झाले. काणे यांनी हे काम पूर्ण करावे, यासाठी भांडारकर संस्थेचे अधिकारी आग्राही होते. त्यानिमित्ताने काणे यांनी धर्मशास्त्रविषयक विपुल साहित्य वाचले.

 

धर्मशास्त्राचा इतिहास लिहिताना डॉ. काणे यांची भूमिका काय होती, ते त्यांच्याच शब्दांत -

My main aim has throughout been to discover, to collect, classify and interpret the facts of the various departments of Dharmasastra and my endeavour has been, as far as in me lies, to present the truth with detachment and intellectual integrity and without bias to show the continuity, developments and transformations in Indian beliefs, rites and usages throughout the ages and, while bringing the past in its causal relations with the present, to indicate and suggest future trends and changes in these matters.


साहित्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कौटिलीय अर्थशास्त्र, नाटयशास्त्र, कोकण-विदर्भाचा सांस्कृतिक व भौगोलिक इतिहास, मराठी भाषेचे व्याकरण अशा अनेकविध विषयांवर त्यांनी लेखन केले. 'साहित्यदर्पण' (सटीप), 'मदनरत्नप्रदीप' (संपादित) 'कात्यायनस्मृतिसारोध्दार:' (सटीप, भाषांतर व प्रस्तावनेसह) तसेच 'History of Indian Poetics' इत्यादी पुस्तके, विविध जर्नल्समधील लेख, प्रस्तावना, समीक्षा अशा स्वरूपांतील एकूण वीस हजारांहून अधिक पृष्ठसंख्या होईल एवढे लेखन त्यांच्या नावावर आहे. असे असले, तरी काणे प्रामुख्याने ओळखले जातात ते त्यांच्या History of Dharmashastra या ग्रांथासाठी. भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रांथ म्हणून आज जगभरातील विद्वान History of Dharmashastra या ग्रांथाचा आधार घेतात. धार्मिक, सामाजिक, नागरी कायदे बनवताना भारतीय संसदेनेही मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी History of Dharmashastraचा आधार घेतला आहे. धर्म संकल्पनेचा उगम, विस्तार, त्यात विविध कालखंडात होत गेलेले परिवर्तन, तसेच भारतातील धार्मिक आणि सामाजिक नीतिनियम यांचे विस्तृत, सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन काणे यांनी या पाच खंडात विस्तारलेल्या ग्रांथात केले आहे.

तीन दशकांहून अधिक काळ चालू असलेल्या ह्या एवढया मोठया प्रकल्पाचे काम काणे यांनी किती परिश्रमपूर्वक केले, हे जाणून घेणे खरेच उद्बोधक आहे.

History of Dharmashastra

धर्मशास्त्रात अंतर्भूत होणाऱ्या सुमारे हजारेक विषयांवर या ग्रांथाच्या पाच खंडांमध्ये विचार केला आहे. संस्कृत भाषेचे व्यासंगी असणाऱ्या, परंतु इंग्लिश भाषा न जाणणाऱ्या शास्त्री-पंडितांना चर्चेचे मुद्दे समजावेत यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या संदर्भग्रांथांनी सुसज्ज अशा मोठया ग्रांथालयांची भारतात असलेली कमतरता विचारात घेऊन अभ्यासकांच्या सोयीसाठी, अक्षरशः हजारो संस्कृत उध्दरणे, स्पष्टीकरणे या ग्रांथाच्या तळटीपांमध्ये दिली आहेत.

 

'धर्म' या संकल्पनेचे इंग्लिश वा अन्य कोणत्याही भाषेत शब्दशः भाषांतर करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन काणे यांनी प्रारंभीच केले आहे. धर्माची व्याख्या ते पुढीलप्रमाणे करतात:

 

The writers on Dharmasastra meant by dharma not a creed or religion, but a mode of life or code of conduct, which regulated a man's work and activities as a member of society and as an individual and was intended to bring about the gradual development of a man and to enable him to reach what was deemed to be the goal of human existence.

 

पहिला खंड

सुमारे 760 पृष्ठे इतका विस्तार असलेला History of Dharmashastraचा पहिला खंड 1930 साली प्रसिध्द झाला. या खंडात अत्यंत महत्त्वाच्या धर्मशास्त्रकारांबरोबरच, तुलनेने कमी प्रसिध्द असलेल्या धर्मशास्त्रविषयक साहित्यिकांचा व त्यांच्या साहित्याचा ऐतिहासिक क्रमाने (chronological order) परिचय करून देण्यात आला आहे.

History of Dharmashastraच्या पहिल्या खंडात ऋग्वेदापासून सुरू झालेला धर्मसंकल्पनेच्या प्रवासाचा वेध छांदोग्य उपनिषद, तैतिरीय उपनिषद, भगवद्गीता, मनुस्मृती व अन्य स्मृतींच्या आधारे प्रथम घेतला आहे. गौतम, आपस्तंभ, वसिष्ठ, मनू, याज्ञवल्क्य यांच्या धर्मशास्त्रविषयक विचारांचा परामर्श घेऊन धर्मशास्त्रविषयक साहित्यनिर्मितीचा कालखंड ठरवण्याच्या दृष्टीने बौधायन, कात्यायन, जैमिनी, पतंजली यांच्याबरोबरच पाश्चात्त्य अभ्यासक ब्यूलर, मार्क्सम्युलर यांच्याही मतांचा विचार केला आहे. गौतमाची धर्मसूत्रे ही धर्मशास्त्रावरील उपलब्ध साहित्यातील सर्वात प्राचीन सूत्रे समजली जातात. या धर्मसूत्रांचे, तसेच बौधायन, आपस्तंब, हिरण्यकेशी, वसिष्ठ धर्मसूत्रांचे विस्तृत व सखोल विवेचन केले आहे. या महत्त्वाच्या धर्मशास्त्रकारांखेरीज शंख-लिखित धर्मसूत्र, मानव-धर्मसूत्र, विष्णू, हरित, वैखानस, अत्री, उ:शनस, कण्व, कश्यप, गार्ग्य, च्यवन, जतुकर्ण, देवल, बुध, बृहस्पती, भारद्वाज, शततप, सुमंतु आदींच्या धर्मसूत्रांची चिकित्सा करून कौटिलीय अर्थशास्त्राचा धर्मशास्त्राशी असलेला संबंध पौर्वात्य व पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मतांची समीक्षा करत स्पष्ट करून दाखवला आहे. स्मृतिवाङ्मय - उदा., मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, नारदस्मृती इत्यादी, रामायण-महाभारत ही महाकाव्ये, पुराणे यांच्यातील धर्मशास्त्रासंबंधी भागांच्या माहितीबरोबरच अगदी इ.स.च्या अठराव्या शतकातील धर्मशास्त्रविषयक ग्रांथांची, भाष्यांची माहिती या खंडात देण्यात आली आहे.

 

1942 साली डॉ. काणे यांना 'महामहोपाध्याय' या सन्मानाने गौरवण्यात आले, तर 1946मध्ये अलाहाबाद विद्यापीठाने त्यांना 'डी.लिट.' दिली. 1947-49 ही दोन वर्षे डॉ. काणे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवले.
 

शिलालेखांवर व ताम्रपटांवर कोरलेल्या धर्मशास्त्रातील आज्ञा याचीच साक्ष देतात की, धर्मशास्त्र हा विषय केवळ पोथ्या-पुराणांपुरता बंदिस्त आणि मर्यादित नसून किमान दोन हजार वर्षे त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर प्रभाव होता.

दुसरा खंड

1941मध्ये प्रसिध्द झालेल्या सुमारे साडेतेराशेहून अधिक पृष्ठांच्या दुसऱ्या खंडात वर्ण, संस्कार, यज्ञ, आश्रमव्यवस्था याबरोबरच श्रौत विधींविषयी अत्यंत विस्तृत विवेचन आहे.

 


1949नंतरही पुढील तीन वर्षांसाठी त्यांनीच विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर राहावे, अशी त्यांना विनंती करण्यात आली; मात्र काणे यांनी ही विनंती अमान्य केली, कारण History of Dharmashastraचे काम लवकर पूर्ण करणे आवश्यक होते.
 

दुसरा खंड दोन भागांत विस्तारला आहे. धर्माचे प्रकार - उदा., साधारण-धर्म, वर्णाश्रम-धर्म आदींचा विचार या खंडात केला आहे. सत्य, दान, मनोनिग्राह, नैतिक मूल्ये, मानवी जीवनाचे ध्येय मानलेले चार पुरुषार्थ यांच्याबरोबरच वर्णव्यवस्था, तिचा उगम, त्याअंतर्गत येणारे नीतिनियम, हक्क, कर्तव्ये इत्यादींचा सविस्तर ऊहापोह येथे केला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत केले जाणारे उपनयन, विवाहादी संस्कार, त्यांचा उद्देश, विवाहाचे प्रकार, नियोग, विधवा विवाह, सती अशा प्रथांविषयी चिकित्सक माहिती येथे वाचायला मिळते. मानवी जीवनातील विविध टप्प्यांची कल्पना करणारे चार आश्रम व त्यासंबंधीचे नियम, देवयज्ञ, मनुष्ययज्ञ (अतिथीसत्कार), श्रौतयज्ञ इत्यादींचा अंतर्भाव असलेली यज्ञ संकल्पना, आहारविषयक, आचारविषयक, दानविषयक नीतिनियम यांचाही समावेश या खंडात करण्यात आला आहे.

तिसरा खंड

History of Dharmashastra म्हणजे भारताचा प्राचीन आणि मध्ययुगीन धार्मिक आणि सामाजिक कायदा असे शीर्षकातच स्पष्ट करणाऱ्या या ग्रांथाचा तिसरा खंड 'राजधर्म, व्यवहार आणि सदाचार' या तीन विषयांनाच पूर्णपणे वाहिलेला आहे.

राज्यकारभार, प्रशासन व न्यायव्यवस्था याविषयी ऐतिहासिक काळापासून करण्यात आलेले चिंतन समग्रापणे मांडणारा तिसरा खंड सुमारे 1100 पृष्ठांचा असून तो 1946 साली प्रसिध्द झाला. 'राजधर्मात' राज्याची सात अंगे, राजाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मंत्रीमंडळ, राष्ट्र, दुर्ग, कोष, मित्रराष्ट्र, सैन्य आदींचा विचार करण्यात आला आहे. धर्मशास्त्राचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या न्यायव्यवस्थेसंबंधित विविध विषयांचा समावेश 'व्यवहार' यामध्ये होतो. 'व्यवहार' या संज्ञेचा अर्थ, न्यायसंस्थेबाबतचे कौटिल्याचे विचार, न्यायनिवाडा, साक्षीदार, हत्या, चोरी, दरोडेखोरी, बलात्कार, जुगार, शिक्षा, शिक्षेचे प्रकार, भागीदारी, दत्तकविधान, स्त्रीधन असे अनेक विषय येथे हाताळले आहेत. आचरणाशी संबंधित विषयांवर 'सदाचार' यात विवेचन केले आहे. श्रुती-स्मृतींनी सांगितलेले सदाचाराचे नियम, त्यांचे उल्लंघन, प्राचीन काळातील तसेच आधुनिक भारतातील रूढी, मान्यता यांचा यात विचार केला आहे.

 


1953 साली भारताच्या राष्ट्रपतींनी डॉ. काणे यांना राज्यसभा सदस्यत्वासाठी नामांकित केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी 1958पर्यंत काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी हिंदू दत्तक कायदा, हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा अशा अनेक समित्यांमध्ये काम केले. भारत सरकारने 'सेन्ट्रल इन्स्टिटयूट ऑफ इंडिअन स्टडीज' स्थापन करावी, यासाठी त्यांनी जोरदार शिफारस केली. सहा वर्षे राज्यसभा सदस्य म्हणून काम केल्यावर 1959 साली भारत सरकारने 'National Professor of Indology' या पदावर डॉ. काणे यांची नियुक्ती केली.

चौथा खंड

सुमारे साडेनऊशे पृष्ठांचा चौथा खंड 1953 साली प्रसिध्द झाला, ज्यात आठ प्रमुख विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पहिल्या विभागात पातक, प्रायश्चित्त, कर्मविपाक यांचे सखोल विवेचन केले आहे. ऋग्वेदातील पातक संकल्पना, पातकांचे प्रकार, ऋत संकल्पना, कर्मसिध्दान्त, प्रायश्चित्त, त्याचे प्रकार, स्वर्ग-नरक यांच्या कल्पना इत्यादींची चर्चा केली आहे. दुसऱ्या विभागात मृत्युपश्चात करावयाचे विधी (अंत्येष्टी), अशौच, शुध्दी, परलोकविद्या यांचा विचार केला आहे. तिसरा विभाग श्राध्द या विषयाशी संबंधित असून चौथ्या विभागात काशी, गया, कुरुक्षेत्र, मथुरा, वृंदावन आदी विविध धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रांबद्दल तपशिलात चर्चा केली आहे.

 पाचवा खंड

साडेसतराशेहून अधिक पृष्ठसंख्या असणारा पाचवा खंड अनुक्रमे 1958 आणि 1962 साली दोन भागांत प्रसिध्द झाला. अनेक कारणांमुळे सुमारे पाच वर्षे हा खंड छापखान्यात होता. तो प्रसिध्द झाला त्या वर्षी, म्हणजे 1962 साली काणे यांचे वय ब्याएेंशी होते. आत्तापर्यंत प्रसिध्द झालेल्या सर्व खंडांचा, म्हणजेच धर्मशास्त्र या विषयाचा संक्षिप्त आढावा घेणारे, शंभरहून अधिक पृष्ठसंख्या असणारे पाचव्या खंडातील समारोपाचे प्रकरण विशेष मननीय आहे.

पाचव्या खंडाच्या पहिल्या विभागात व्रते व धार्मिक उत्सव यांचा आढावा घेताना ऋग्वेदात उल्लेख केलेल्या व्रतांपासून वैदिक साहित्यात, स्मृती वाङ्मयामध्ये वर्णिलेले व्रतांचे माहात्म्य, व्रतांचे प्रकार तसेच नवरात्री, दिवाळी, मकरसंक्रांती, महाशिवरात्र इत्यादी उत्सवांविषयी माहिती दिली आहे. दुसऱ्या विभागात काल, मुहूर्त, दिनदर्शिका यावर चर्चा करून ज्योतिषाचा धर्मशास्त्रावरील प्रभाव व परस्परसंबंध यांचे विवेचन आहे. तिसरा विभाग सुख-समृध्दीसाठी केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शांतींबाबत वैदिक काळापासूनची माहिती देतो. चौथ्या विभागात पुराणे आणि धर्मशास्त्र याबद्दल चर्चा आहे. पाचव्या विभागात पुराणांची आणि बौध्द धर्माचा प्रभाव कमी होण्याच्या कारणांची चिकित्सा केली आहे. सहावा विभाग तंत्रशास्त्र व धर्मशास्त्र यातील संबंधांची चर्चा करतो, तर सातव्या विभागात मीमांसांचा व धर्मशास्त्राचा तौलनिक मागोवा घेताना मीमांसेतील महत्त्वाचे सिध्दान्त स्पष्ट केले आहेत. आठव्या विभागात सांख्य, योग व तर्क यांचे धर्मशास्त्राशी असलेले नाते उलगडून दाखवले आहे. नवव्या विभागात विश्वोत्पतिशास्त्र, कर्मसिध्दान्त व पुनर्जन्म संकल्पनेची चिकित्सा केली आहे. दहाव्या विभागात वैदिक कालखंडापासून इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत दिसून येणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या मूलभूत वैशिष्टयांचा आणि संकल्पनांचा आढावा घेऊन भविष्यातील तिच्या वाटचालीचा कल दर्शवला आहे.


 
   'धर्मशास्त्राचा इतिहास' लिहिण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या डॉ. काणे यांची कामाची पध्दतही समजून घेण्यासारखी आहे. 

धर्मशास्त्रावरील साहित्य वाचताना डॉ. काणे यांना महत्त्वाचे वाटलेले पुराणातील उतारे व संदर्भ त्यांनी विषयानुरूप मांडणी केलेल्या शंभर वह्यांमध्ये नोंदवून ठेवले होते. त्यातील काही वह्या पाचशे पानीही होत्या! रामायणाचे, महाभारताचे अनेक वेळा सखोल वाचन करून त्यांनी त्यावर विस्तृत टीपा काढल्या होत्या.

प्रत्येक खंडाचा शेवटचा (final) खर्डा ते आपल्या हस्ताक्षरात लिहून काढत. त्यांना स्वतःला टायपिंग फारसे चांगले जमत नसे. त्यामुळे एका निष्णात टायपिस्टकडून ते ही फायनल प्रत टाइप करून घेत व पुण्याला छपाईसाठी पाठवत. तीन वेळा, तर क्वचित चार वेळाही ते प्रूफांची तपासणी करत. त्यापैकी एक प्रूफ तपासणीसाठी संस्कृत विद्वानाकडे पाठवण्यात येई. त्याने स्पेलिंगमध्ये, संस्कृत शब्दांच्या रोमन लिपीतील लेखनामध्ये (diacritical marks) काही बदल सुचवल्यास, काणे स्वतः ते बदल तपासून, योग्य वाटल्यास त्यांचा अंतर्भाव प्रतीत करत. मजकुरात बदल करण्याची परवानगी मात्र त्या संस्कृत अभ्यासकाला नव्हती. तिसऱ्या प्रूफ रीडिंगमध्ये सर्व बदल समाविष्ट करून अंतिम छपाईसाठीची प्रत ते तयार करत. काणे मुंबईत राहत, तर छापखाना व भांडारकर इन्स्टिटयूट पुण्यात होती. त्यामुळे प्रूफांची व प्रतींची देवाणघेवाण पोस्टामार्फतच करावी लागे. साहजिकच हे सर्व वेळखाऊ काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागे. धर्मशास्त्रावरील संस्कृत हस्तलिखिते वाचण्यासाठी काणे स्वखर्चाने भारतात विविध ठिकाणी भेटी देत. पुणे, बडोदा, बनारस, मद्रास, तंजावर, उज्जैन या ठिकाणी तर त्यांनी अनेक वेळा जाऊन हस्तलिखिते मिळवली, आवश्यक वाटले तेव्हा त्यांच्या प्रती बनवून घेतल्या. भारतात त्या काळी युरोप किंवा अमेरिकेतल्यासारखी उत्तम व परिपूर्ण ग्रांथालये उपलब्ध नसल्यामुळे विदेशी जर्नल्समध्ये प्रसिध्द झालेले काही महत्त्वाचे लेख, तसेच तिकडे उपलब्ध असलेल्या काही दुर्मीळ हस्तलिखितांच्या प्रतींच्या मायक्रोफिल्म्स काणे यांना बनवून घ्याव्या लागत. या सर्व कामासाठी त्यांना कुठलाही वेगळा निधी मिळत नसे. आधुनिक काळात संशोधनासाठी उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही सोयीसुविधांविना त्यांनी हा सर्व खटाटोप दोन-चार वर्षे नाही, तर तब्बल सदतीस वर्षे केला, हे पाहून खरेच स्तिमित व्हायला होते. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात निर्माण झालेली कागदाची तीव्र टंचाई, त्याच काळात सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई विद्यापीठातून व अन्य मोठया ग्रांथालायांतून हलवण्यात आलेली दुर्मीळ ग्रांथसंपदा अशा अनेक कारणांनी खंडांच्या निर्मितीस आणखी विलंब झाला. वाढत चाललेले वय आणि शिल्लक राहिलेल्या कामाचा प्रचंड आवाका पाहून काणे यांना त्याचा ताणही यायचा. पण खंडांचे काम पूर्ण झाले नाही तर या लेखनासाठी कष्टपूर्वक जमवलेले मोलाचे संदर्भ, साहित्य वाया जाईल आणि भारतीय धर्म, संस्कृतीच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे असलेले काम अर्धवट राहून चालणार नाही, या भावनेतून काणे यांनी फार परिश्रमाने ते तडीस नेले. History of Dharmashastraच्या अखेरच्या खंडाच्या वेळी वयाची एेंशी वर्षे पार केलेल्या काणे यांची प्रकृती खालावली होती. परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अत्यंत नेटाने त्यांनी हा खंड पूर्णत्त्वास नेला. त्या दरम्यान 1958मध्ये त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. लहानपणापासूनच त्यांना अल्सरचा बराच त्रास होता. परंतु आहार-विहाराचे कडक पथ्य सांभाळून डॉ. काणे यांनी आयुष्यभर झटून एवढे मोठे कार्य केले.

 


1956 साली डॉ. काणे यांना संस्कृत भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1960 साली पुणे विद्यापीठाने त्यांना 'डी.लिट.' देऊन गौरवले. 1963 साली भारत सरकारने डॉ. काणे यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील प्रदीर्घ आणि महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. 
 

संस्थात्मक कार्य, पुरस्कार आणि सन्मान

डॉ. काणे अनेक नामांकित संस्थांचे सदस्य व पदाधिकारी होते. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ते सलग दहा वर्षे होते. 1938 साली स्थापन झालेल्या 'भारतीय विद्याभवन' या संस्थेचे ते मानद सदस्य होते. भांडारकर इन्स्टिटयूटच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक वर्षे ते इन्स्टिटयूटच्या नियामक मंडळावर होते. 'मुंबई मराठी ग्रांथसंग्राहालय', 'ब्राह्मण सभा' आदी संस्थांमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम केले. 'Bombay Asiatic Society'च्या कार्यकारिणी समितीवर त्यांनी 45 वर्षे काम केले. सोसायटीतर्फे निघणाऱ्या जर्नलच्या संपादक मंडळावरही ते बरीच वर्षे होते. काणे यांच्या विद्वत्तेविषयी आणि ग्रांथांविषयी आदर असणाऱ्या डॉ. बी.सी. लॉ या विद्वान गृहस्थांनी एशियाटिक सोसायटीला काणे यांच्या नावाने पी.व्ही. काणे सुवर्णपदक देण्यासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली. काणे यांना आस्था असलेल्या धर्मशास्त्र, अलंकारशास्त्र अशा विषयांत संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला दर तीन वर्षांतून एकदा ही शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी ही योजना होती. आजही बाँबे एशियाटिक सोसायटीतर्फे वरील विषयांत संशोधन करणाऱ्या एका अभ्यासकाला हे पारितोषिक देण्यात येते.

History of Dharmashastraच्या रूपाने डॉ. काणे यांनी भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा संकलित केला आणि पुढच्या पिढयांकडे सुपुर्द केला. हा ग्रांथ इंग्लिश भाषेत लिहून भारतीय विचारधारेचे हे संचित त्यांनी जगभरातील जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून दिले. डॉ. काणे यांना दीर्घायुष्य लाभले. 8 मे 1972 रोजी वयाच्या ब्याण्णऊव्या वर्षी त्यांचे निधन झाले. काणे यांचे जीवन आणि कार्य यांचा आढावा घेतला असता नजरेत भरते ते त्यांचे संस्कृतविषयीचे प्रेम आणि सखोल ज्ञान, त्यांचा स्वाभिमान, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची विजिगीषू वृत्ती, कार्याप्रती असलेली अढळ निष्ठा, चिकाटी, जिद्द, परिपूर्णतेचा ध्यास आणि त्यासाठी अपरिमित कष्ट सोसण्याची तयारी. महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे आणि त्यांचे History of Dharmashastra हे बुध्दी आणि परिश्रम यांच्या मिलाफातून केवढे उत्तुंग काम उभे राहू शकते, याचे एक अजोड उदाहरण आहे. भारतीय संस्कृतीच्या कोंदणात स्थान मिळवलेल्या या भारतरत्नाला मनोभावे वंदन!

डॉ. निरुपमा जोशी

9890104859

nirjos@yahoo.com