आरोग्यसेवेसाठी सीमोल्लंघन

विवेक मराठी    05-Oct-2019
Total Views |

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघन करून आसाममध्ये मोठा प्रकल्प हाती घेतला. आसाममधील सिबसागर या जिल्ह्याजवळ 'स्वर्गदेव सीउ का फा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.' या नावाने नवीन हॉस्पिटल आकाराला येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था नसणाऱ्या या भागातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.



औरंगाबाद येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित डॉ. हेडगेवार रुग्णालयाची महती आता केवळ मराठवाडयापुरती सीमीत राहिलेली नाही. सेवाभावी वृत्तीच्या डॉक्टरांनी तीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रकल्पाचा वटवृक्ष झाला आहे. केवळ रुग्णालयच नव्हे, तर अन्य समाजोपयोगी प्रकल्प आणि उपक्रम राबवून या रुग्णालयाने समाजजीवनात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. नाशिक येथे असणारे श्रीगुरुजी रुग्णालाय हा संस्थेचा औरंगाबाद शहराबाहेर असणारा मोठा प्रकल्प. वास्तविक वैद्यकीय क्षेत्रात सेवावृत्ती मनात कायम ठेवून प्रकल्प चालविणे तसे अवघडच. पण संस्थेतील डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मनातील सेवाभावनेला तडा बसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यातूनच महाराष्ट्राबाहेर आसामात सिबसागर या जिल्ह्याजवळ संस्थेचा नवा प्रकल्प आकाराला येतो आहे - 'स्वर्ग देव सीउ का फा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.'


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक :  https://www.facebook.com/VivekSaptahik/

आसामाचा प्रकल्प हा तसा अनपेक्षितरीत्या समोर आला. संस्थेच्या अजेंडयावर प्रकल्प नव्हता. संघाचे आसामात काम करीत असलेले प्रचारक सुरेंद्र तालखेडकर हे मूळ परभणीचे. ते एकदा औरंगाबादला आले असताना त्यांनी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला भेट दिली. आसामसारख्या राज्यात असे एखादे हॉस्पिटल तुम्ही का सुरू करीत नाही? असा प्रश्न त्यांनी प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अनंत पंढरे यांना विचारला. एवढया दूर हॉस्पिटल सुरू करण्याची संस्थेची ताकद नाही असे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या सिबसागर भागात हॉस्पिटल सुरू करण्याचा ओएनजीसीचा प्रस्ताव आहे, त्यासाठी प्रयत्न करावे असे सुचविले. त्यासाठी त्यांनी संस्थेकडे पाठपुरावा सुरू केला. संघाच्या प्रचारकाने याबाबत आग्रह धरल्यानंतर विश्वस्तांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. ईशान्य राज्यंात आरोग्यसेवेची गरज आहे, त्या अनुषंगाने प्रकल्पावर प्राथमिक विचार करावा, त्यासाठी त्या भागाला भेट द्यावी आणि मग निर्णय घ्यावा, असा संस्थेचा निर्णय झाला. त्यानंतर संस्थेतील काही डॉक्टर्स सिबसागर जिल्ह्यात भेटीसाठी गेले. भेटीच्या वेळी सिबसागर परिसरात असणारी दैन्यावस्था लक्षात आली. खेडयापाडयात प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था नव्हती. नियोजित प्रकल्पाजवळ असणाऱ्या एका खेडयाला डॉक्टरांनी भेट दिली. तेथे जलशुध्दीकरण केंद्र असूनही त्याचे उद्धाटन झाले नव्हते. त्यामुळे त्या गावात डायरियामुळे वर्षभरात 22 जणांचा मृत्यू झाला होता. ही भेट डॉक्टरांचे डोळे उघडणारी ठरली. तेव्हाच डॉक्टरांनी मनोमन ठरविले की प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करायचे. पण हे काम तसे सोपे नव्हते. ओएनजीसीच्या सहकार्याने प्रकल्प राबवायचा होता. त्यांनी संस्थेकडे काही तांत्रिक माहिती

 
मागितली. संस्थेची उलाढाल, मालमत्ता, मिळालेला नफा आदी पैशाच्या भाषेतील कॉलम त्यात होते. पण संस्थेचा हेतू सेवेचाच असल्यामुळे तशी माहिती फार देणे शक्य नव्हते. हा फॉर्म ओएनजीसीकडे गेल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला. तुम्हाला हे काम मिळणारच नाही असे सांगितल्यावर संस्थेने स्पष्टपणे सांगितले की पैसा मिळवावा हा त्यामागे काही हेतू नाहीच. सिबसागरसारख्या ठिकाणी सामाजिक काम करावे असे वाटत असल्याने प्रकल्प चालविण्याची तयारी आहे, असे संस्थेच्या पदधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यावर ओएनजीसीचे अधिकारीही भानावर आले. अखेरीस ओएनजीसीने हेडगेवार हॉस्पिटल पाहण्यासाठी पंधरा जणांचे पथक पाठविले. त्यांना देण्यात आलेली माहिती, प्रेझेंटेशन आणि काही प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर ते सर्व जण प्रभावित झाले. सर्वंानी एकसुरात डॉ. हेडगेवार हॉस्पिटलनेच हा प्रकल्प सुरू करावा असे सांगितले. 'अब ना नही कहनेका..' असे एका अधिकाऱ्याने स्पष्टपणे बजावले. मुख्य कार्यालयाला तशी शिफारस करण्यात आली. त्यानंतर ओएनजीसीने नियोजित प्रकल्पाचा आराखडा मागितला. आराखडा तयार करण्याचे काम पीडब्लूसीला (प्राइसवॉटरहाउस कूपर्स) या नामांकित एजन्सीला देण्यात आले. पीडब्लूसीने 55 लाख रुपये लागतील असे कळविल्यानंतर ओएनजीसीची तेवढे पैसे देण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी 22 लाख रुपये दिले. दरम्यानच्या काळात पीडब्लूसी, ओएनजीसीतील अधिकाऱ्यांशी बराच संपर्क आला. संस्थेचा सेवाभाव त्यांच्याही लक्षात आला. एके दिवशी डॉ. पंढरे यांना पीडब्लूसीच्या दिल्लीतील वरिष्ठांचा फोन आला. त्यांनी आराखडा मोफत करून देण्याचे ठरविले. फक्त प्रवास आणि निवास, भोजन खर्च द्यावा अशी विनंती केली. पीडब्लूसीचा हा खर्च आला दोन लाख वीस हजार. ओएनजीसीने दिलेल्या रकमेतून दोन लाख वजा करून सर्व रक्कम संस्थेने परत केली. आराखडा ओएनजीसीला सादर करण्यात आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत प्रेझेन्टेशन करण्यात आले.
 

''आसामसाठीच पैसा खर्च करू''


ओएनजीसीच्या 22 संचालकांसमोर नियोजित प्रकल्पाचे प्रेझेन्टेशन सादर करताना एक किस्सा घडला. पीडब्लूसीने सविस्तर माहिती दिल्यानंतर आयोजकांनी डॉ. पंढरे यांना बोलण्यास सांगितले. ''प्रकल्पाचा सर्व खर्च ओएनजीसी करणार आहे आणि आसामात प्रकल्पाची गरज आहे, सेवेची संधी मिळाली आहे, त्यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही'' असे डॉक्टरांनी सांगितले. प्रारंभीच्या काळात येणारा तोटा ओएनजीसी स्वीकारण्यास तयार असेल, तर आम्ही आव्हान स्वीकारू असे डॉक्टरांनी म्हटल्यावर सीएसआर फंडाचे काम पाहणाऱ्या प्रमुखाने आम्ही तोटा सहन करणार नाही, असे सांगितले. रुग्णालयाला फायदा झाला तर तुम्ही घेऊन जाणार आणि तोटा मात्र आम्ही सहन करावयाचा? असे या संचालकांचे म्हणणे होते. या प्रश्नावर डॉ. पंढरे यांनी स्पष्टीकरण दिले की ''अशा प्रकल्पाला सुरुवातीला तोटा येणारच. आम्ही फायदा घेऊन जाण्याचे काही कारणच नाही. फायदा झाला तर तो पैसा आसामासाठीच खर्च केला जाईल, त्या रुग्णालयात नव्या योजना राबविल्या जातील.'' तरीही संचालक मात्र साशंक होते. एका नामांकित खासगी वैद्यकीय संस्थेने प्रकल्पाला प्रारंभीच्या काळातील 25 कोटी तोटा गृहीत धरून अगोदर रकमेची मागणी केली होती, हे उदाहरण त्यांच्यासमोर होते. मात्र डॉ. पंढरे यांनी फायदा रुग्णालयासाठीच पुन्हा खर्च केला जाईल असे ठासून सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तुमच्या कार्याला सलाम अशा आशयाचे उद्गार काढले आणि प्रकल्पाला क्षणात मान्यता मिळाली.

 

या प्रकल्पासाठी ओएनजीसीने 317 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिबसागरपासून 12 कि.मी. अंतरावर असलेल्या राजाबारी भागात प्रकल्पाची जागा आहे. मार्च 2018मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ झाला. अडीच लाख चौ.फू. जागा असणाऱ्या जागेपैकी 35 हजार चौ.फू. जागेवर काम जवळपास पूर्ण झाले. हे काम नियोजित कालावधीच्या दीड वर्ष अगोदर पूर्ण झाले आहे. 2020पासून रुग्णसेवा देण्याचे ठरविले होते, पण या कामाला वर्षभर अगोदरच, म्हणजे एप्रिल 2019पासून प्रारंभ झाला. औरंगाबादहून तज्ज्ञ डॉक्टर्स ठरावीक दिवसांकरिता तेथे जातात. याशिवाय त्या भागातील डॉक्टर्स, कर्मचारी असे मिळून 160 जणांचा स्टाफ आहे. मागील सहा महिन्यांत गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महिन्याला पन्नास ते साठ शस्त्रक्रिया तेथे होतात. हजारावर सोनोग्राफी झाल्या असून, उत्कृष्ट सेवा देणारे रुग्णालय अशी ख्याती आसामात झाली आहे. प्रकल्पासाठी संघाचे क्षेत्र प्रचारक उल्हास कुलकर्णी, सुरेंद्र तालखेडकर याशिवाय प्रांत कार्यकर्ते निरुपम बउआ यांचे नेहमीच मार्गदर्शन असते. आगामी काळात रुग्णालयाचा आणखी विस्तार करण्याचे संस्थेने ठरविले आहे. लवकरच हॉस्पिटल 250 बेडचे होणार आहे. मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून परिसरात आरोग्यसेवा वाढविण्याचाही विचार आहे.


चीन सरकारलाही उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गतवर्षी एका परिषदेच्या निमिताने चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेत चीनच्या अध्यक्षांनी ''तुम्ही सामाजिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी काय नवीन करीत आहात?'' असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारीला (Public-private partnershipला) प्रोत्साहन देत काही उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले. त्यावर तीन-चार प्रकल्पांची माहिती अभ्यासासाठी मिळू शकेल का? असे विचारण्यात आल्यावर मोदी यांनी सिबसागर प्रकल्पाची माहिती दिली. ओएनजीसी आणि डॉ. हेडगेवार रुग्णालय एकत्रितपणे प्रकल्पावर काम करीत असून तुम्ही चिनी अधिकाऱ्यांना तेथे पाठवावे, असे मोदी यांनी सुचविले. या चर्चेच्या वेळी मोदी यांच्यासह चीनमधील भारतीय दूतावासातील प्रशांत लोखंडे नावाचे अधिकारी होते. ते ओएनजीसीत सहसचिवपदावर काम करीत होते. कालांतराने त्यांची दूतावासात बदली झाली. त्यांच्याशी डॉ. हेडगेवारच्या विश्वस्तांचा संपर्क आला होता. त्यांनी तातडीने डॉ. पंढरे यांना फोन करून प्रकल्पाची माहिती मागितली आणि चीन सरकारला सादर केली.

 

आसामातील लोक सांस्कृतिकदृष्टया उत्साही आहेत. पण काम थोडे उशिराने करावे याकडे त्यांचा कल असतो. कदाचित त्यासाठी तेथील हवामान हे कारण असावे. त्यामुळेच आसामी भाषेत ''लाहे लाहे..'' (हळूहळू) हे शब्द लोकप्रिय आहेत. तेथे कोणी कोणाला काम लवकर कर म्हटले की समोरच्याचे उत्तर ठरलेले असते, ''लाहे लाहे..'' पण प्रकल्पावर काम करणाऱ्या डॉक्टर्सनी व इतर मंडळींनी या शब्दाचा अर्थ पार बदलून टाकला आहे. कामाचा झपाटा आणि गती पाहून परिसरातील अनेक जण स्तंभित झाले आहेत. औरंगाबाद येथे असणाऱ्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे सीमोल्लंघन खऱ्या अर्थाने सर्वांनाच प्रेरणादायक ठरणारे आहे.

- कृष्णकुमार