शिल्पकार चरित्रकोश' प्रकल्प प्रताधिकारमुक्त

स्रोत: विवेक मराठी    दिनांक05-Oct-2019

महाराष्ट्र घडवणाऱ्या शिल्पकारांची चरित्रे वाचा आता मराठी विकीपिडियावर!

सा. विवेकचा 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' प्रकल्प प्रताधिकारमुक्त

 


विवेक समूह व हिंदुस्थान प्रकाशन संस्था यांनी 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण-शिल्पकार चरित्रकोश' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील आतापर्यंत प्रकाशित केलेले आठ कोश प्रताधिकारमुक्त केले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या सहयोगाने हाती घेण्यात आलेल्या या कार्याअंतर्गत 'इतिहास', 'साहित्य', 'विज्ञान-तंत्रज्ञान-शिक्षण', 'न्यायपालिका-प्रशासन-संरक्षण', 'कृषी-पशुसंवर्धन', 'चित्रपट-संगीत', 'दृश्यकला (चित्रकला-शिल्पकला-उपयोजित कला)' व 'प्राच्यविद्या-धर्मकारण' हे कोश आता सर्वांना विकीस्रोतावरील https://w.wiki/6fihttps://w.wiki/5z3 दुव्यांवर वाचता येणार आहेत. 


 

 

प्रत्येक विषयाच्या आवाक्यानुसार आतापर्यंत साडेसहा हजार पृष्ठांचे साहित्य प्रकाशित झाले आहे व यातील अनेक पृष्ठे रंगीतही आहेत. यासाठी प्रत्येक विषयावर संशोधन करणारे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळ, संशोधक, सल्लागार मंडळ निवडण्यात आले. या सल्लागार समितीत या विविध क्षेत्रांतील माहितगार व जाणकार मंडळींचा समावेश आहे. ज्यांनी या विविध क्षेत्रांत एकूण बारा वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य केले आहे आणि या क्षेत्राबाबत त्यांना मूलभूत माहिती आहे, या क्षेत्राच्या जडणघडणीत आणि विकासात ज्यांचे काही महत्त्वाचे योगदान आहे, अशा ज्येष्ठ मंडळींचा या सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. यात डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, बाळ फोंडके, भा.र. साबडे, डॉ. द.र. बापट, वसंत रोकडे, सुहास बहुलकर, सुधीर नांदगावकर, जयराज साळगावकर, विद्याधर ताठे, डॉ. अरुणा ढेरे, ले.ज. द.ब. शेकटकर, अभय टिळक, डॉ. अरुणचंद्र पाठक यांचा समावेश आहे.

 

या सल्लागार मंडळाच्या मदतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यक्तींची सूची तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे लिखाण करू शकणाऱ्या व्यक्तींची निश्चिती करण्यात आली. या व्यक्तींकडून चरित्र नोंदींचे लेखन करून घेऊन, प्रत्येक विषयानुसार विशेष तज्ज्ञ मंडळींवर या लेखनाच्या संपादनाची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक खंडाची प्रस्तावना म्हणजे त्या विषयाचा दोनशे वर्षांचा इतिहास आहे.

 


डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, डॉ. सुभाष भेंडे, डॉ. बाळ फोंडके, डॉ. अ.पां. देशपांडे, शरदचंद्र पानसे, लेफ्ट.जन. द. बा. शेकटकर, अविनाश पंडित, डॉ. दत्तात्रेय रघुनाथ बापट, सुहास बहुळकर, दीपक घारे, सुधीर वासुदेव नांदगावकर, डॉ. चैतन्य कुंटे, माधव इमारते, डॉ. अरुणचंद्र पाठक, विद्याधर ताठे या विषयतज्ज्ञांनी संपादित केलेले हे चरित्रकोश त्या त्या विषयातील अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरतील, असेच आहेत.

 

 

एकोणिसावे आणि विसावे शतक हे भारताचे प्रबोधनपर्व मानले जाते. भारतातील प्राचीन संस्कृती आणि पाश्चात्त्य देशांतून आलेली आधुनिकता यांच्या परस्पर संवांदातून आणि समन्वयातून जीवनाच्या विविध क्षेत्रांत मूलभूत परिवर्तन घडले. या सर्व परिवर्तनात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला. ज्या व्यक्तींनी हे परिवर्तन घडवून आणले, त्यांच्या कार्याची माहिती व त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा महाराष्ट्रातील नव्या पिढीला कळाव्या, तसेच या परिवर्तनाचा आलेख महाराष्ट्रासमोर ठेवावा, हा प्रमुख उद्देश ठेवून, महाराष्ट्राच्या सुवर्णमहात्सवाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकने 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' हा प्रकल्प हाती घेतला.

 

 

महाराष्ट्र ही कर्मभूमी मानून 19व्या व 20व्या शतकात सर्व क्षेत्रांतील प्रगतीसाठी स्वयंप्रेरणेने ज्यांनी आपला सिंहाचा वाटा उचलला आहे, योगदान दिले आहे, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या 6000हून अधिक शिल्पकारांचा परिचय या प्रकल्पाद्वारे करून दिला जात आहे. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 22 संस्था, तसेच 300 तज्ज्ञ या प्रकल्पात सहभागी झाले आहेत.

 

 

या प्रकल्पांतर्गत इतिहास, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान-शिक्षण, न्यायपालिका-प्रशासन-संरक्षण, कृषी-पशुसंवर्धन-सहकार, चित्रपट-संगीत, दृश्यकला (चित्रकला-शिल्पकला-उपयोजित कला), प्राच्यविद्या-धर्मकारण, आरोग्य, समाजकारण-राजकारण, उद्योग-अर्थकारण-पत्रकारिता, क्रीडा-नाटक असे (पंचवीस विषयांवरील) बारा खंड प्रकाशित करण्याची योजना आहे. ह्या प्रत्येक खंडात त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची चरित्रात्मक माहिती असलेल्या नोंदी आहेत.

 

आतापर्यंत प्रकाशित झालेल्या कोशांतील अंदाजे 3000 चरित्रनोंदींचा साधारण 5000 पृष्ठांचा महत्त्वाचा दस्तऐवज मराठी विकीस्रोतावर आणण्यासाठी सेंटर फॉर इंटरनेट ऍंड सोसायटीच्या माध्यमातून मराठी विकीसमूहासाठी समन्वयक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुबोध कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विकीसमूहातील सक्रिय सदस्य सुरेश खोले, आर्या जोशी यांच्या सहकार्याने शिल्पकार चरित्रकोशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर, कार्यकारी संपादक दीपक जेवणे, सहसंपादक चित्रा नातू-वझे यांनी या कामात विशेष लक्ष घातले.

 

 

राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटिकर, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, विनोद पवार अशा मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली चरित्रकोश डिजिटाइज करण्याचे पुढील काम सुरू आहे.

 

शिल्पकार चरित्रकोशाचे सर्व खंड प्रताधिकारमुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या विवेक समूहाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाशी मेळ साधत नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचत आहे.