पुण्यातील अतिवृष्टी कारणे आणि उपाययोजना

स्रोत: विवेक मराठी    दिनांक05-Oct-2019

***रवींद्र पाठक***

 

26 सप्टेंबर 2019 रोजी पुण्यात घडलेली अतिवृष्टीची घटना ही वातावरण बदलाचे केवळ एक स्वरूप आहे. त्याची एकापेक्षा एक अतिशय कुरूप रूपे आहेत, तीही या पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या समोर कधी न कधी उभे ठाकू शकतात. खरे तर आता वेळ हातातून निसटत आहे, विचार करू शकणाऱ्या प्रत्येक नागरिकाने वातावरण बदलाच्या प्रक्रियेला वैयक्तिक, सांघिक, प्रशासकीय, शासकीय जेथे कोठे आपण काम करतो त्या ठिकाणाहून योगदान दिलेच पाहिजे.


 

दि. 26 सप्टेंबर 2019च्या मध्यरात्री पुणे शहरात दोन-तीन तासांच्याच पावसाने असा काही हैदोस घातला की जवळजवळ 24 लोकांना प्राणास मुकावे लागले, अद्याप काही बेपत्ता आहेत, पुष्कळ जनावरे वाहून गेली, शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने वाहून गेली तितकीच बुडाली, कित्येक संसार उघडयावर पडले, लोकांमध्ये प्रचंड असुरक्षततेचे/भीतीचे वातावरण पसरले. अलीकडे महाराष्ट्रात ॠतुचक्र आणि पावसाचे स्वरूपही प्रचंड बदलले आहे, त्याची एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे ही चिंतेची बाब आहे आणि हे नक्कीच लोकांसाठी, प्रशासनासाठी आणि शासनासाठीही वेदनादायक आहे. यासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे, जेणेकरून लोकांना सुरक्षित वाटेल, त्याचप्रमाणे हॅपिनेस इंडेक्स वाढून राष्ट्रीय विकासाची गती वाढण्यास मदत होईल.

योग्य उपाययोजना होण्यासाठी नेमकी कारणे माहीत करून घ्यावी लागतील. थोडा सूक्ष्म विचार केला, तर अशाच स्वरूपाच्या घटनांना गत काही वर्षांत मुंबई, चेन्नई, नागपूर यासारख्या शहरांना सामोरे जावे लागले. केरळ राज्यातही गतवर्षी अशी घटना घडली आणि प्रचंड नुकसान झाले. या वर्षी सांगली-कोल्हापूरमध्येही प्रचंड नुकसान झाले तेही याच कारणाने. अतितीव्र पर्जन्य, नदीनाल्यांवरील अतिक्रमणे हा यामधील समान धागा आहे. वास्तविक असे अतितीव्र पर्जन्य थोडया कमी वारंवारितेने ग्रामीण भागातही होते, पण शहरीकरणाच्या अभावी तेथे नदीनाल्यांवरील निवासी अतिक्रमणे तुलनेने नगण्य असतात. त्यामुळे नुकसानीचे स्वरूप बदलते. तलाव फुटणे, शेती वाहून जाणे अशा स्वरूपाचे नुकसान त्या ठिकाणी अनुभवास येते.

यावरून या घटनेसाठी अतितीव्र पर्जन्य, कात्रज तलावातूनही विसर्ग होणे, नदी-नाल्यांच्या पात्रातील अतिक्रमणे, त्याचप्रमाणे सदोष नगररचना किंवा नगररचनेच्या अंमबजावणीतील त्रुटी ही प्रमुख कारणे आहेत, हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे आपत्तिव्यवस्थापन आणखी सुधारल्यास घटनांच्या परिणामांची तीव्रता कमी करता येईल. वातावरण बदल हे अतितीव्र पर्जन्यास प्रमुख कारण आहे, हे निर्विवाद. वातावरण बदलाचा परिणाम म्हणून यापुढे अशा घटना वारंवार घडणार असल्याने, फक्त झालेल्या घटनेची चर्चा करणे इतकाच या लेखनप्रपंचाचा उद्देश न ठेवता या घटना घडू नयेत यासाठी किंवा त्यांची तीव्रता घटविण्यासाठी एक जवाबदार आणि सुजाण समाजघटक म्हणून आपण नेमके काय करू शकू, याचाही आपण परामर्श घेऊ.

1. अतितीव्र पर्जन्य आणि त्याचा संबंध ः 24 तासांत 65 मि.मी. पाऊस झाल्यास (ताशी 2.70 मि.मी. या सरासरी दराने) त्याला आपण 'अतिवृष्टी' म्हणतो. पुण्यात त्या रात्री 3 तासांमध्ये 72 मि.मी. इतका (ताशी 37.33 मि.मी. या सरासरी दराने) पाऊस झाला - म्हणजे 1382% जास्त तीव्रतेने पाऊस पडला! यावरून पर्जन्याच्या तीव्रतेचा अंदाज आपणास यावा. नैसर्गिक दराने पर्जन्य झाल्यास एकतर त्यातील 25 ते 30% पाणी (जमिनीची जलग्रहण क्षमता तितकी असल्याने) जमिनीत शोषले जाते व उर्वरित पाणी प्रवाही होते. प्राप्त परिस्थितीत हे जवळजवळ संपूर्ण पर्जन्य पाणी प्रवाही झाले. पर्जन्याच्या प्रमाणाचा संबंध असाही येतो की त्या त्या ठिकाणचे पर्जन्याचे प्रमाण, तीव्रता, हरित आवरणाची घनता आणि प्रकार, मृदा प्रकार, भूरचना इत्यादी बाबींवरून, पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ओहोळ, नाले, ओढे, नदी (प्रवाह) अशी व्यवस्था निश्चित झालेली असते. थोडक्यात या सर्व घटकसापेक्ष त्या ठिकाणच्या प्रवाहाचा आकार, व्याप्ती, तळाचा उतार आणि पाणी वाहून नेण्याची निश्चित क्षमता ठरत असते. पर्यावरणाचा समतोल असला, तर प्रमाणशीर पाऊस पडतो आणि प्रवाह आपल्या मर्यादेत राहतो, किंवा सुरक्षित असतो; त्यापलीकडे पर्जन्यप्रमाण जसजसे वाढत जाईल, तसतसा हा प्रवाह विध्वंसक स्वरूप धारण करत जातो. त्यामुळेच प्रशासन प्रवाहांच्या बाजूला धोक्याची पातळी सीमांकित करत असते.

1382% जास्त तीव्रतेने सलग तीन तास पाऊस पडल्याने या प्रवाहांच्या वहनक्षमतेच्या कितीतरी अधिक पट पाणी अचानक प्रवाहित होण्याचा प्रयत्न करत होते, पण निचरा होत नसल्याने त्याची पातळी वाढत गेली, म्हणजे पाणी चढत गेले. त्यामुळे ते नाल्याच्या बाहेर बाजूला वसलेल्या वस्त्यांमध्ये शिरले. साधारणत: नुकसान झालेली ठिकाणे पाहिल्यास ती पर्वती दर्शन, अंबिल ओढा, ट्रेझर पार्क, कात्रज, अप्पर इंदिरा नगर, गंगाधाम, लक्ष्मी नगर, शिव दर्शन, नऱ्हे आंबेगाव, हिंगणे धायरी, राजेंद्र नगर, दत्तवाडी अशी आहेत. ही सर्व ठिकाणे टेकडयांच्या रांगांजवळ वसलेली आहेत. या ठिकाणी येणाऱ्या प्रवाहाला (तीव्र उतारावरून येत असल्याने) प्रचंड गती आणि म्हणून विध्वंसक क्षमता जास्त होती. त्यामुळे जास्त नुकसान झाले. कात्रज तलावातील साठा सायफनिंगने किंवा अन्य पध्दतीने कमी केला असता, तर त्याची पूरनियंत्रण क्षमता कार्यान्वित झाली असती आणि बऱ्याच प्रमाणात ही क्षती कमी झाली असती. तथापि तसा विचारही कोणाला शिवला नाही, हे केवळ यंत्रणेचे औदासीन्यच आहे.

 

या वेळी आणखी एक नवीन आणि विलक्षण प्रकार घडून आला, तो म्हणजे अचानक पाण्याचा लोंढा येणे. वडगाव पुलाजवळ कार आणि दुचाक्या चालकासहित वाहून गेल्या आणि त्यांचे मृत्यू झाले ते या अचानक आलेल्या लोंढयामुळे. या वेळी सर्वत्र असेच लोंढे आले, त्याच्याही कारणात समानता म्हणजे 'भिंत पडून लोंढा येणे' असे आहे. अतिपर्जन्य आणि पाण्याची प्रचंड गती यामुळे प्रवाहाच्या बाहेर पाणी पसरले आणि चढले. त्यामुळे या फुगवटयाच्या संपर्कात आलेल्या भिंती कोसळल्या आणि मोठमोठे लोंढे घुसून प्रवाह आणखी विध्वंसक झाले. पाण्याच्या या अकस्मात आलेल्या तीव्र गतीच्या प्रवाहाने लोकं, गुरेढोरे, वाहने, सामानसुमान प्रचंड प्रमाणात क्षतिग्रस्त झाले. ट्रेझर पार्क या उच्चभ्रू पण लवणामध्ये असलेल्या इमारतीची कंपाउंड भिंत तुटून अंडरग्राउंड पार्किंगमधील शेकडो वाहने बुडाली. हे टाळता आले, तर त्याचे परिणामही टाळता येतील यास प्रत्यवाय नसावा.

 

2) प्रवाहाच्या बाजूची अतिक्रमणे - मोठमोठया शहरांमध्ये पोट भरण्यासाठी येणारी मंडळी जागा दिसेल तेथे पथारी टाकतात. पुन्हा त्याचे झोपडपट्टयांमध्ये पध्दतशीरपणे रूपांतर करणारी प्रचंड कार्यतत्पर व्यवस्था आमच्या प्रत्येक शहरामध्ये दुर्दैवाने आहे. नद्यांच्या बाजूला आयत्याच जागा मोकळया असतात, त्याचा फायदा ही मंडळी घेतात आणि तेथे प्रथम झोपडपट्टया, मग लहानसहान इमारती आणि मग टॉवर्स उभे राहतात. त्याचबरोबर शहरात होणाऱ्या बांधकामांचा राडारोडा, कचरा, मृत जनावरे इत्यादी अतिशय बेजवाबदारपणे या नाल्यांमध्ये टाकली जातात, याची परिणती नदीचे प्रवाहक्षेत्र घटून (अफ्लक्स) पाण्याचा फुगा येण्यात आणि पाणी पसरण्यात होते. शहरांमध्ये नद्यांच्या बाजूला राहणे म्हणजे आत्महत्याप्रवण क्षेत्रात राहण्यासारखेच आहे. त्यामळे फक्त नुकसानच होते असे नाही, तर नुकसानाची तीव्रता आणि व्याप्तीही वाढते. भ्रष्ट राजकीय व प्रशासकीय व्यवस्था, बांधकाम क्षेत्रात संघटित गुन्हेगारांचा शिरकाव, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कुचकामी नियंत्रण ही याची कारणे आहेत. रेड लाइन, ब्ल्यू लाइन या गोष्टी लोकांच्या सुरक्षेपेक्षा पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापरल्या जातात!

 

सदोष नगररचना किंवा नगररचनेच्या अंलबजावणीतील त्रुटी - शहरांचे फ्रिंज एरियामध्ये एन ए, ले आउट्स यांच्या निकषांची पायमल्ली, गुंठेवारी पध्दत, ले आउट्समधील ओपन एरिया विक्री करणे, काहीतरी कारण दाखवून तेथे बांधकामे करणे, जास्तीत जास्त क्षेत्राचे काँक्रीटीकरण झाल्याने 100% पर्जन्य नद्यांमध्ये येणे, हरित पट्टयांचा अभाव, शहरांजवळच्या टेकडया, जंगले हव्यासाने नष्ट करणे, शहरांच्या सांडपाणी व्यवस्थापनातील प्रचंड अपयश या बाबी या सदराखाली मोडतात आणि त्यामुळे ही स्थिती उद्भवते.

 

आपत्तिव्यवस्थपनातील त्रुटी - आपल्या आपत्तिव्यवस्थापन यंत्रणांना सक्षमीकरणासाठी प्रचंड वाव आहे. आपत्ती येण्यापूर्वी या यंत्रणांनी लोकांना सजग करणे, सुरक्षित ठिकाणी हलविणे अपेक्षित असते. परंतु महापालिका क्षेत्रातील स्थिती अशी आहे की जेव्हा लोकांचा आक्रोश होतो, तेव्हा या यंत्रणा कार्यरत होण्यासाठी हालचाली सुरू करतात आणि मग लोकक्षोभाच्या धनी होतात. या यंत्रणांनी अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना शक्य तितक्या लवकर सजग करणे, सुरक्षित ठिकाणांची व्यवस्थित माहिती देणे इतक्या जरी गोष्टी केल्या, तरी नुकसानाची मात्रा खूप खाली आणता येते.

उपाययोजना

अल्पकालीन - यामध्ये पूरप्रवण क्षेत्रातील अनधिकृत रहिवाशांना कठोरपणे इतरत्र स्थलांतरित करणे, पूररेषा अद्यावत आणि इअरमार्क करणे, पूररेषेच्या आतील अतिक्रमणे हटविणे आणि पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेणे, नगररचनेत दोषांचा आढावा घेऊन योग्य सुधारणा करणे या बाबी येतात. नदी-नाल्यांच्या प्रवाहातील मानवनिर्मित अडथळे दूर करणे, काही ठिकाणी प्रवाह कुंठित होत असेल तर त्याचा अभ्यास करून रिव्हर ट्रेनिंग करणे इत्यादी.

दीर्घकालीन उपाययोजना - यामध्ये अशा क्षेत्रात येणारे प्रवाह अंशत: अगर संपूर्ण इतर सुरक्षित ठिकाणी वळविता येत असतील तर तसे करणे, अंडरग्राउंड सांडपाणी वहन व्यवस्थेमध्ये पूरप्रवाह सोडणे आणि पंपिंगने त्याचा विसर्ग वाढविणे, ऍलर्ट सिस्टिम स्वयंचलित आणि कार्यक्षम करणे, लोकशिक्षण, मॉक ड्रिल्स, दृक-श्राव्य माध्यमातून जाहिराती आणि विशेषतः आपत्तीसमयी नेमके काय करावे आणि काय टाळावे याबद्दल लोकजागृती इत्यादी बाबी येतात.

जपानमध्ये भूमिगत पोकळया तयार करून पुराचे पाणी त्यात वळविले जाते. त्यामुळे प्रवाहही नियंत्रित राहतात आणि भविष्यातील पाण्याची सोयही होते. पुण्याच्या पाणीपुरवठयाचा गंभीर प्रश्न पाहता असाही विचार झाला पाहिजे. अशा (मेट्रो स्टेशनसारख्या) पोकळया तयार करणे आणि त्यामध्ये पाणी वळविणे सहज शक्य आणि दुहेरी फायद्याचेही आहे. सांगलीच्या पुरानंतर तेथे अशा स्वरूपाची व्यवस्था करण्याचा गांभीर्याने विचार चालू आहे, त्यामध्ये पुण्याचाही समावेश व्हावा.

संरक्षण भिंतींच्या रचनेमध्ये सुधारणा - या वेळी संरक्षण भिंती पडून लोंढा वाढण्याने नुकसानाची तीव्रता वाढल्याचे दिसून आलेले आहे. भविष्यात अशी वृष्टी होण्याच्या शक्यता जास्त आहेत, त्यामुळे यावरही उपाय शोधला पाहिजे आणि त्याची चोख अंलबजावणी केली पाहिजे. संरक्षण भिंती या केवळ मालमत्तांचे सीमांकन, सुरक्षितता, मोकाट प्राण्यांच्या वावरास अटकाव आणि प्रायव्हसी या कारणाने बांधलेल्या असतात. त्यामुळे अशा भिंतींच्या एका बाजूला पाणी साठल्यास त्या पडू शकतात, जशा या पुरात पडल्या. ऑॅगस्ट महिन्याच्या पावसामध्ये संरक्षक भिंती पडून पुष्कळ बांधकाम मजुरांचेही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भिंती पुरामध्येही टिकाव धरतील अशा प्रकारे त्यांच्या संकल्पनांमध्ये (डिझाइनमध्ये) सुधारणा करण्याचीही तितकीच गरज आहे.

 

यासाठी जमिनीपासून 6 ते 9 इंच उंचीवर या भिंतींना योग्य आकाराचे झरोके सोडणे आणि (मोकाट कुत्री वगैरे येऊ नयेत म्हणून) त्यामध्ये स्टील बार्स बसविणे, प्रायव्हसीची जेथे गरज असेल त्या ठिकाणी, झरोक्यामध्ये ग्रिलच्या आतील बाजूला धातूची अगर लाकडी लटकती प्लेट बसवावी, ज्याला वरच्या बाजूला हिंजेस बसवावेत, अशी रचना केल्यास या लेव्हलला पाणी आले की पाण्याच्या दाबाने ती प्लेट आपोआप आतील बाजूस उघडेल आणि पाणी पसरेल, जेणेकरून भिंतीवर पाण्याचा दाब वाढणार नाही, त्या त्या भागात पाणी चढणार नाही आणि भिंत पडून एकदम येणारे लोंढे आणि अंगावर पडून होणारे मृत्यू टळतील.

 

यामुळे संरक्षण भिंतींचे सुशोभीकरणही होईल आणि सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण भिंतींमध्येही आपण ही सुधारणा करू शकतो.

हे सर्व जरी केले, तरीही ती केवळ मलमपट्टी आहे हे प्रत्येकाने अतिशय स्पष्टपणे ध्यानात घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची गरज आहे. याचा कायम उपाय म्हणजे, कार्यक्षम वातावरण बदल नियंत्रण करणे हे आणि हेच आहे. अन्यथा आपण सर्व जण आत्महत्येस सिध्द झाल्यासारखेच आहे, नव्हे, अतिशय वेगाने मृत्यूला कवटाळण्यासाठी अधीर आहोत, इतकाच त्याचा अर्थ आहे. पुण्यात घडलेली घटना ही वातावरण बदलाचे केवळ एक स्वरूप आहे. त्याची एकापेक्षा एक अतिशय कुरूप रूपे आहेत, तीही या पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या समोर कधी न कधी उभे ठाकू शकतात. खरे तर आता वेळ हातातून निसटत आहे, विचार करू शकणाऱ्या प्रत्येक नागरिकाने वातावरण बदलाच्या प्रक्रियेला वैयक्तिक, सांघिक, प्रशासकीय, शासकीय जेथे कोठे आपण काम करतो त्या ठिकाणाहून योगदान दिलेच पाहिजे, तर आणि तरच आपल्या पुढील पिढया इथे खेळण्याबागडण्यापेक्षा श्वास घेऊ शकतील, इतके हे गंभीर आहे.


वातावरण बदल म्हणजे नेमके काय
, त्याची नेमकी कारणे, वेगवेगळया पातळयांवरील उपाययोजना हे पुढील लेखाच्या माध्यमातून पाहू. एक मात्र नक्की - या स्थितीस तुम्ही-आम्ही, अगदी जगातील सर्वच जण थोडयाफार प्रमाणात जबाबदार आहोत आणि वेळ न दवडता उपाययोजना न केल्यास त्याच्या अतिगंभीर परिणामांमधून - म्हणजे भयाण नष्टचर्यातून कुणाचीही सुटका नाही. म्हणून या स्थितीस ठीक करण्यासाठी आपापले योगदान देण्यास कटिबध्द राहू.