कालिदासाचं चिरंजीव मेघगान

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Nov-2019   
|


महाकवी कालिदासाच्या रचना हे संस्कृत साहित्याचे अलंकार, तर मेघदूत हे त्यातील लखलखतं रत्न! आजही आषाढाच्या प्रथम दिवशी या तीव्रकोमल दुःखाचं स्मरण होतं. आषाढमेघाच्या वर्षावानंतर मोहोरलेल्या जमिनीवर रूप-रंग-गंधांचे उत्सव सुरू व्हावेत, तसंच यक्षाची वेदना कालिदासाच्या प्रतिभाशाली लेखणीतून प्रवाहित झाली आणि संपूर्ण काव्यसृष्टीलाच बहर आला. जोवर आषाढाचा मेघ वर्षत राहील, तोवर कालिदासाने शृंगारलेली ही मधुर वेदनाही चिरंजीव राहील!

 

महाकवी कालिदासाच्या रचना हे संस्कृत साहित्याचे अलंकार, तर मेघदूत हे त्यातील लखलखतं रत्न! अद्भुत कल्पनाविलास, उपमा, भाषेचं वैभव, रसांची उत्कटता यांचा परमोत्कर्ष असलेलं हे तरल विरहकाव्य संस्कृतप्रेमींनीच नाही, तर प्रत्येक भारतीयाने एकदातरी वाचावं आणि त्याच्या रसास्वादाने तृप्त व्हावं! विदर्भातून हिमालयात एका विरही प्रेमिकाचा दूत बनून जाणाऱ्या मेघाच्या अत्यंत उत्कंठावर्धक, रोमांचक अशा प्रवासाचे पूर्वमेघ व उत्तरमेघ असे दोन भाग आहेत.

 

पूर्वमेघ

कश्चितकांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त

शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:।

यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु

स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥1

 

1॥ हातून घडलेल्या एका प्रमादामुळे आपला लौकिक गमावलेला कुणी एक शापित यक्ष. एक वर्षासाठी त्याच्या प्रियेपासून दूर राहण्याची शिक्षा भोगतो आहे. जानकीच्या स्नानाने पवित्र झालेली कुंडं आहेत अशा रामगिरी-रामटेकवरील एका पर्णाच्छादित आश्रमात.

 

- अलकानगरीतील या यक्षाला काम होतं ते कुबेराला त्याच्या रोजच्या शंकराच्या पूजेसाठी प्रातःकाली ताजी कमळं पुरवण्याचं. तो नेमाने पहाटे ताजी उमललेली कमळे तोडून नेऊन देई. पण त्याचा विवाह झाल्यावर पहाटे सखीजवळ थोडा अधिक वेळ मिळावा, म्हणून एकदा त्याने रात्रीच कमळं काढून ठेवली व सकाळी दिली. कुबेर पूजेला बसल्यावर, उमलू लागलेल्या कमळातून रात्रीच बंदिस्त झालेला भुंगा बाहेर आला व त्याला डसला! चाणाक्ष कुबेराने ओळखलं की ही कमळं रात्रीच तोडलेली आहेत नि त्या यक्षाचा प्रमाद उघडकीस येऊन तो शिक्षेला पात्र ठरला.

 

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी

नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ:।

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥2

- हा श्लोक मेघदूताचीओळख बनला व कालिदासाच्या जन्मतिथीचं भाग्य आषाढाच्या पहिल्या दिवसाला यामुळे मिळालं!

 


2॥ यक्ष विरहाने इतका सुकलाय की हातीचं सुवर्णकंकण केव्हाच गळून पडलंय! आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या डोंगराच्या शिखरावर झुकलेला, जणू त्याला धडका मारणारा हत्तीसारखा एक कृष्णमेघ तो पाहतो.

 

 


3॥ उत्सुकतेने जरासा पुढे येऊन डोळयातलं पाणी आवरून तो त्या मेघाला निरखतोय. कितीतरी वेळ भरल्या डोळयांनी तो कुबेराचा दास असलेला यक्ष त्या मेघाकडे पाहातच राहिलाय! असा ओथंबलेला मेघ पाहताना कुणीही प्रेमी जीव कासावीस होतो, तिथे हा तर प्रियेच्या आलिंगनाला आतुरलेला जीव, त्याची अवस्था काय वर्णावी!

 

 


4॥ त्याच्या मनात येतंय - आता श्रावणात तरी सखीला माझं क्षेम समजायला हवं, याकरता याच्याकरवीच निरोप पाठवला तर? अन या कल्पनेने फुलून येऊन यक्ष आता तिथेच फुललेल्या कुडयाच्या फुलांचं अर्घ्य त्या मेघाला देतोय आणि थोडं हसून त्याच्याशी गोड शब्दात बोलतो आहे.

 

 


5॥ खरं तर तो मेघ काही सजीव नाही की त्याच्याशी बोलावं. नुसतं बाष्प धूर वीज नि वारा यांचं मिश्रण कसं बरं संदेश पोहोचवू शकेल? पण प्रेमिकाला इतकं भान कुठलं! त्यामुळेच तो त्या मेघाशी बोलू पाहतोय.

 

 


6॥ तू इंद्राचा सचिव! हवं ते रूप धारण करू शकणारा असा आहेस, हे सारं जग जाणतं! कुण्या पाप्याची मदत घेण्यापेक्षा पुण्यवंताने नाही म्हटले तरी चालेल, म्हणून हा दुर्दैवी यक्ष तुझ्याकडे याचना करतोय!

 

 


7॥ पोळल्या मनांना तूच तर दिलासा देतोस, मग धन्याच्या रागामुळे विरहसंकटात सापडलेल्या माझा संदेशही पोहोचव! जा त्या यक्षांच्या अलकानगरीस, जिथे बाहेरील उद्यानांत असलेल्या शिवशंकरांच्या जटेतून वाहणाऱ्या चंद्ररसांत न्हाऊन निघालेली भवनं तुला दिसतील!

 

 

8॥ रस्त्यातून चालणाऱ्या ललना त्यांच्या कपाळावरच्या बटा मागे सारत मान उंचावून तुला पाहातील. सगळया प्रेमी, विरही मनांना तुझ्या येण्याने प्रिय व्यक्तीची आठवण होऊन आनंदच मिळेल.

माझ्यासारखा अभागी, पराधीन मात्र मीच असेन!

 


9॥ मंद वाऱ्यासह तू जेव्हा वाहत जात असशील, तेव्हा तुझ्या डावीकडे गाणारा चातकांचा थवा तुला गंधभारली सोबत करेल! गर्भाधान विधीची स्वप्ने रंगवत उडत निघालेले बगळे? तुझ्या जवळ येतील, तेव्हा गळयात त्यांची शुभ्र माळ ल्यालेला तू किती सुंदर दिसशील!

 

 


10॥ शेवटी तुला ती दिसेल. या तुझ्या बंधूची सखी, तुझी वहिनीच! कसेबसे दिवस मोजत आपली जीवनवेल सावरलेली. विरहाने कोमेजणाऱ्या फुलासारख्या स्त्रीहृदयाला एक आशेचा धागाच तर सावरून धरतो!

 

 


11॥ ज्या गर्जना ऐकू येता पृथ्वीवर फळाफुलांचे उत्सव सुरू होतात, पृथ्वीवर भूछत्रं उमलतात, त्या तुझ्या कर्णमधुर गर्जना ऐकून हंसही आनंदी होतील आणि कोवळया कमळतंतूंचं खाद्य बरोबर घेऊन तुला ते कैलासापर्यंत सोबत करतील!

 

 


12॥ राघवाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रामगिरी तुला प्रिय आहे व तोही तुझ्या आठवणीने व्याकूळ असतो नि तुझी गळामिठी पडताच उष्ण उच्छ्वास सोडत असतो. तरीही एकदा त्याला आलिंगन देऊन तू हिमालयाच्या मार्गावर पुढे नीघ!

 

 


13॥ जाण्याचा नीट मार्गही सांगतो, तो ऐक! जाता जाता जर थकलास तर जरा टेकण्यासाठी व गार पाणी पिण्यासाठीची विश्रांतिस्थळंही तुला सांगतो, तिथे तू खुशाल जरासा विसावा घे आणि क्षीण होणारा तुझा देह तिथल्या जलस्रोतांनी भरून घे, पण जाण्याआधी सखीला सांगायचा संदेश तुझ्या कानांनी पिऊन घे!

 

 
14॥ वाऱ्याने पर्वतांची शिखरंही उडून जातात की काय असं भय वाटून सिध्दसुंदरी जेव्हा मान वर करून पाहतील, तेव्हा त्यांना तू दिसशील. त्या जागी असलेली हिरवीगार बांबूची वने व वाटेत भेटणाऱ्या दिग्गजांच्या महाकाय सोंडांचे प्रहार चुकवून तू उत्तरेकडे सरक.

 

 


15॥ दूर दिसणाऱ्या त्या डोंगरांवरच्या जणू रत्नखचित इंद्रधनुष्यासम दिसणाऱ्या त्या कमानीत श्यामवर्णसा तू जेव्हा प्रवेशशील, तेव्हा ती कमान तुझ्यामागे मोरपिसाऱ्यासारखी शोभिवंत दिसेल.

 

 


मयूरपिच्छे ल्यालेल्या श्रीकृष्णासारखा तू भासशील!

 

 

16॥ आता जरा खाली पाहा.. तिथल्या भोळया शेतकरी ललना प्रेमाने तुझ्याकडे पाहातील. त्यांना भ्रूकटाक्ष जमणार नाहीत, पण तुला पाहून त्यांच्या डोळयात प्रेम उमटेल, कारण तू त्यांचा अन्नदाता आहेस! त्या प्रदेशात नांगरटीची कामं पूर्ण झालेली असतील. त्यावर तू शिडकावा केलास की मातीच्या सुगंधाचे लोट उठतील, ते भरून घेऊन पुन्हा हळूच तू उत्तरेकडे निघून जा!

 


17॥ वाटेत लागलेले वणवे विझवत थकून येणाऱ्या तुला तो आम्रकूट पर्वत आनंदाने माथ्यावर धरील.

 

मित्राचे उपकार स्मरून त्याचा आदर करणं हे तर सामान्यही करतात. मग तो उदार पर्वत कसा विसरेल तुला?

 


18॥ झाडांवरच्या पिकलेल्या आंब्यांनी पिवळसर दिसणाऱ्या त्या पर्वताच्या शिखरावर काळसर दिसणारा तू जेव्हा विसावशील, तेव्हा स्वर्गातून देवदांपत्यांनाही ते पृथ्वीच्या स्तनासारखे भासणारे दृष्य पाहावेसे वाटेल!

 

 


19॥ भिल्लिणींचा वावर असणाऱ्या रानजाळया जिथे आहेत, अशा गिरीवरती तू जरासा विसावा घे.

 

 


जलवर्षावामुळे आता तू हलका झालेला असशील, त्यामुळे अधिक जलद गतीने आता तू पुन्हा पुढे जा.

 

 


आता विंध्य पर्वताच्या पायथ्याशी तुला पर्वताच्या शिलाखंडांतून वाहत असल्यामुळे विखुरलेली, उन्मुक्त, चंचल अशी नर्मदा दिसेल!

 

 


20॥ पुढे तुला तिचं पात्र विस्तारलेलं दिसेल.

 

 

जांभळी वृक्षांनी ठायी ठायी अडवलेलं, ज्यात वनहत्तींचा मद मिसळलेला आहे असं त्या उग्रागंधेचं जल तू प्राशन करून घे. कारण तू आतून रिता असशील, तर तू वाहावत जाशील! तू पूर्ण, जलयुक्त असशील तर वारे तुला भरकटवू शकणार नाहीत!

 

- यक्षाच्या प्रेयसीकडे निघालेला संदेशवाही मेघाने कोरडं राहून कसं चालेल? मेघ बरसून रिता होतो आहे. वाटेत येणाऱ्या नद्या या त्याच्या प्रेयसीच! त्यांच्या भेटीसाठी खाली झुकून, ओठंगून, चुंबन घेऊन मेघ स्वत:ला पुन्हा भरून घेणार आहे. पण कालिदासाचं भान पाहा! उगमाजवळ नर्मदेत जलसाठाच मुळी फार नाही, त्यामुळे त्या वयाने लहान नि स्वभावाने अल्लड मुग्धेला फक्त वरून मायेने पाहा, असं तो मेघाला सांगतोय! नंतर ती जाणती झाली आहे. काठावरल्या जांभळी वृक्षांनी अडवलेलं तिचं खोल पात्र रानहत्तींमुळे शब्दश: 'मदभरं' झाल्याचं तो सुचवतोय! तिला प्राशून रस-भरित होऊन नव्या उत्साहाने मेघ निघालाय, पुन्हापुन्हा रिता होताना कुणालातरी भिजवत, काहीतरी रुजवत, कितीतरी फुलवत.

 

 


21॥ वर कदंबवृक्षाचे अस्फुट हिरव्या-पिवळया छटा असलेले लोलक, खाली जमिनीवर रानकर्दळींचे उसासून फुटू पाहणारे कोवळे कळे आणि आसमंतात मातीचा दरवळ! त्या गंधाने खुळावलेली हरणं तुला पुढचा मार्ग दाखवायला उडया मारत येतील.

 

 


22॥ मेघा, जिवलगा, माझ्याकरता घाईने पुढे जायचं तू ठरवशील, पण पुढे कुडयाच्या फुलांनी नटलेल्या डोंगरांतून मोर वर डोकावत असतील. त्यांचे पाण्याने भरलेले डोळे आणि त्यांच्या आर्त केका यांच्यात न गुंतता पुढे नीघ!

 

 


23॥ तुला पाहून केवडा असा उसासून उमलेल की वनाला शुभ्र कुंपणं आहेत असं भासेल, जांभळीची गर्द वनं पिकून भारावतील. कावळयांच्या घरटी बांधण्याच्या लगबगीने वृक्ष गजबजून जातील. स्थलांतर करणारे हंस विसावा संपवून निघण्याचा विचार करू लागतील.

 

 


24॥ पुढे विख्यात विदिशा नगरीशी आतुर खळाळती वेत्रवती तुझी वाटच पहात असेल. तुझा नाद ऐकून प्रेमाचं भरतं आलेली ती चंचला एक भुवई उडवून तुला आमंत्रण देईल, जिचं चुंबन अतिशय 'सेव्य' आहे!

 

 

25॥ पुढच्या 'नीच' पर्वतावर जरासा विसावा घेच.

 

पण कदंबांच्या बहराने दाटलेल्या त्या पर्वतावरून येणारे गंधाचे वाफारे केवळ कदंबाचे नव्हेत. त्या पर्वतातील गुहेगुहेत प्रणयाच्या लीला रंगत असतील, त्यातून येणारे ते गंधभारले उष्ण वाफारे आहेत. पौरजनांचं सगळं प्रमत्त तारुण्य तिथे एकवटलंय!

 


26॥ विश्रांती संपवून हलके हलके बरसत जा. तुझ्या त्या नाजूक पहिल्यावहिल्या सरींमुळे रानातल्या कोण्या छोटया नदीतीरावरच्या जाईच्या इवल्या कोवळया कळया भिजतील. त्यांना खुडायला आलेल्या माळिणी तुला दिसतील. त्या माळिणींच्या कानातली फुलांची कुंडलं उन्हाने सुकलेली असतील. मुद्रेवर घर्मबिंदू असतील.

 

 


त्यांच्यावर जराशी सावली धर, छायारूपाने तू त्यांचा 'मुखास्वाद' घे!

 

 


27॥ पुढे थोडी वाकडी वाट करून उज्जैन नगरीत गेल्यावर तिथले विस्तीर्ण सौध पाहून तर तू चकित होशीलच, पण तिथे जर थोडं विद्युन्नाटय प्रदर्शित केलंस, तर ते पाहताना तेथील रमणींचे विशाल नेत्र कसे विस्फारतात, त्या लोचनलीला न पाहता पुढे जाशील तर तुझ्यासारखा दुर्देवी तूच!

 

 


28॥ मग भेटेल निर्विन्ध्या! खळाळती. उत्फुल्ल.

 

 


कटितटावर बगळयांची मेखला मिरवणारी न् आवर्ताने लक्ष खेचून घेत जणू नाभी दर्शवणारी, धीट, आवाहक. ती तुझ्यावर लुब्ध आहे असं समज, कारण विभ्रम ही ललनांच्या प्रेमाची पहिली खूण असते!

 

 


29॥ जा. तिचा आस्वाद घे. भरभरून भरून घे तिला.

 

कारण पुढे प्रिया सिंधू तुला विरहिणी रूपात भेटणार आहे. खंगलेली, फिकुटलेली, सुतळीसारखा क्षीण प्रवाह झालेली. तिच्या तटावरचे वृक्षही वाळकी पाने ढाळत बसले असतील. तिला असा भेट, असा बरस, रिता हो पुरता. या सुभग क्षणाचं दान दुथडी भरभरून तिच्या पात्रातून वाहतं कर.

 


30॥ मग पुढे जिथे अजूनही वृध्द लोक राजा उदयन व वासवदत्तेच्या कहाण्या सांगत असतील, ती अवंती नगरी असं खुशाल समज. पुण्यात्म्यांना जरासं पुण्य कमी पडलं की त्यांना पृथ्वीवर यावं लागतं. आणि असे साधुजन जिथे राहतात, तिथे ते साक्षात स्वर्ग उभा करतात. हा अनुभव जरूर घे!

 

 

- किती रसाळ, कोवळे, पक्व, सर्व प्रकारचे अनुभव घेत निघालाय मेघ. पण कुठल्याच मोहावर्तात न गुंतता पुढे निघालाय तो. मिळेल तिथे आनंद भरून घेणं नि जिथे नसेल तिथे तो वाटून टाकणं, परत रितं होऊन पुढल्या अनुभवाला सामोरं जाणं हे मेघाचं व्यक्तित्व किती मनोहर आहे! तर आता येत शिप्रा. तिच्या खळाळत्या चंचल व वेगवान प्रवाहामुळे तिला शिप्रा नाव पडलंय. पण इथं उज्जैनमध्ये तिचा प्रवाह शांत, धीरगंभीर आहे. आपल्या प्रत्येक वळणावर देखणं मंदिर, सुघट घाट आणि नेत्रसुखद दृश्य असलेली शिप्रा ही पूज्य नद्यांमधील एक. मोक्षदायिनी. त्यामुळे कालिदास हिच्याकडे प्रेयसीच्या नजरेने पाहात नाही.

 

 31॥ शिप्रेच्या पात्रात असंख्य अर्धोन्मीलित कमळकळया तरंगत असतील, त्यांवरून वाहताना गंधभारला झालेला नि कमळकळीइतका मुलायम स्पर्श करणारा वारा, ज्याची वाणीही सारसगीतं ऐकून मृदुमधुर झाली आहे, रतिक्लांत अशा रमणींची ग्लानी हरावी म्हणून तो त्याच्या मंद मंद झुळकांनी पुन्हापुन्हा आर्जवं करणाऱ्या प्रियकरासारखा त्यांच्या कानाशी हलकेच कुजबुजत असतो!

 

 


32॥ महालांच्या गवाक्षाच्या जाळयांतून येणारे रमणींचे केस सुकवणाऱ्या धुपाचे निळसर सुगंधी लोट तू भरून घे. तिथे उद्यानांत फिरणारे हौसेने पाळलेले मयूर माना उंच करून तुला निरखतील. त्यांना, फुलांनी नटलेल्या महालांना, त्या सुगंधी वातावरणातून आपल्या रक्तिम पाऊलखुणा उमटवत जाणाऱ्या ललनांना तू पाहाशील तर तुझे श्रम कुठल्या कुठे पळून जातील!

 

 


33॥ आता तिथलं महाकालाचं मंदिर प्रथम पाहा.

 

 


तिथला वाराही कमळांच्या केसरगंधाने नि त्याहीपेक्षा त्यात स्नान करणाऱ्या रमणींच्या तिक्त उग्रा गंधाने भरलेला आहे, तो तू मनमुराद सेवन कर! महाकालाचे भक्त त्यांच्या आराध्याच्या कंठासारखा तुझा नीलवर्ण पाहून तुझ्याकडे आदराने पाहातील.

 

 


34॥ संधिकालात तू तिथे पोहोचलास तर रविबिंब मावळेपर्यंत जरा तिथेच तरंगत राहा. मग सूर्यास्तानंतर मंदिरात महांकालेश्वराची आरती असेल. हे अतिपवित्र जागृत असं स्थान आहे. या मंगलारतीच्या वेळी तू तुझा दुंदुभीसारखा नाद तिथे प्रदर्शित कर. त्या आरतीला तुझ्या गडगडाटाचं पार्श्वसंगीत असणं, याहून तुझ्या या धीरगंभीर नादाचं सार्थक ते कुठलं! या शिवसेवेने तुझं जीवित धन्य होईल मेघा!

 

 


35॥ खाली आरतीनंतरची सेवा देण्याकरता नगरातील वारांगना, गणिका नृत्य सादर करतात. त्यांच्या मोहक पदन्यासाने त्यांच्या नाजूक कमरेवरच्या मेखलांतले नूपुर किणकिण करतात. लाल प्रकाश सांडत असलेल्या रत्नजडित अशा चवऱ्या ढाळून त्यांचे कोमल हात भरून येतात. पदन्यासाने त्यांची पावलंच काय, नखंदेखील दुखू लागतात. त्या थकल्या रमणींच्या अंगांगांवर तुझं जल हलकेच जर शिंपडशील, तर त्या सुंदर भाविणींचे टपोरे काळयाभोर पापण्यांचे नेत्र उंचावून त्या तुझ्याकडे पाहातील खास!

 

 

- आकाशाकडे हात उंचावलेली महाकालाची भव्य मूर्ती. संध्याकाळी अस्तमान रवीच्या किरणांमध्ये आपला मेघ म्हणजे रक्तवर्ण जास्वंदफूलच जणू. जेव्हा माजलेल्या गजासुराला शंकरांनी ठार केलं आणि ते रक्तरंजित ओलं गजचर्म त्यांनी त्रिशूलावर उंच धरलं होतं, ते स्मरून आता यक्ष मेघाला असं सुचवतोय,

 

 

36॥ तू त्या शंकराच्या उभारलेल्या बाहूभोवती कंकण कर. महाकाय, पाण्याने भरलेल्या, काळया पण रक्तवर्णी झांक असलेल्या तुला तसे त्या जागी पाहून पार्वतीला तोच प्रसंग खचित आठवेल, नि ती ते दृश्य हर्षभराने पाहील!

 


37॥ आता रात्र झालीय. सुईसुध्दा भेदू शकणार नाही असल्या अंधारात रमणी आपल्या प्रियकराला भेटायला निघाल्या असतील. तूच जरा विजा चमकवून त्यांना मार्ग दिसेलसे कर! कसोटीच्या दगडावर सोने घासून पाहता जशी लख्ख रेष उमटते, तशा वीजरेखा तू त्या कभिन्न अंधारावर ओढ! पण तितकंच कर. गरजू वा बरसू मात्र नको. आधीच हे साहस करताना बावरलेल्या त्या सुंदरींना, तू अजून गडगडाटाने भिववू नको!

 

 

38॥ अर्थात या सुंदरींना मार्ग दाखवायचं काम करून तुझी कांता म्हणजे वीज, थकलेली असेल. जिथे पारवे विश्रांतीसाठी टेकतात त्या सौधावर तुम्ही विश्राम करा.

 


पण सूर्योदय होताच नीघ बरं! 'प्रिय' कामासाठी जाणाऱ्याने उगा उशीर करू नये रे!

 

 


39॥ पण तू त्या उगवत्या सूर्यासमोर मुळीही थांबू नकोस. रात्री घरी न परतता अन्यत्र रमलेल्या आपल्या प्रियकराने केलेली मानखंडना सहन न झालेल्या रमणींची आसवं, त्यांचे प्रियकर या वेळी पुसत असतात. तसंच बरोबर सूर्यही कमळांवरचं दंव आपल्या कोवळया किरणांनी टिपत असतो. अशा वेळी तू त्याची किरणं अडवशील तर खचितच त्याच्या रोषाला पात्र होशील.

 

 


40॥ आता तसाच शांतपणे पुढे जा. प्रसन्न, शांत, स्थिर असं चित्त असो वा त्यासारखंच अचल 'गंभीरे'चं जल, तुझं देखणं प्रतिबिंब अशा नितळ ठिकाणी पडतंच. तू बिंबभावाने तिला भेट! तिच्यात असलेल्या मासोळया म्हणजे तिचे नेत्रकटाक्ष आहेत. माशांच्या उडया मारण्यामुळे तिच्यावर पांढरी कमळं फुलल्यासारखी खळबळ दिसेल. आणि अशा श्वेतकमलासारख्या कटाक्षांना टाळून पुढे जाणं म्हणजे काही फार सज्जनपणा नव्हे बरं! तेव्हा तिला अव्हेरू नको!

 

 

- मेघाला जिवंत व्यक्ती समजणं आणि निसर्गाच्या विविध रूपांना मानवी विभ्रमांची उपमा देणं हे फार सुंदर आहे. अन् नद्यांबद्दलचे किती तपशील कालिदासाला ठाऊक असावेत! गंभीरा नदी काही फार मोठी वा नामांकित नाही. पण तिचं वैशिष्टय म्हणजे तिचं निर्मळ मनासारखं नितळ पाणी! 'चेतसीव प्रसन्न' अशी ती आहे! मग मेघाचं प्रतिबिंब तिच्यात दिसणारच! 'माणसाच्या मनासारखं निर्मळ पाणी' असं म्हणून नदीला उपमा द्यावी असं निर्मळ मन मनुष्याकडे असण्यावर कालिदासाचा विश्वास आहे, याचा आनंद वाटतो.

 

 


यक्ष पुढे सांगतोय,

 

 

41॥ तनूवरून सरकलेलं निळं वस्त्र काठावरील बांबूंच्या शाखांनी सावरू पाहाणारी गंभीरा तुला दिसेल. असं मुक्त, अनावृत्त सौंदर्य पाहून तूच काय, कुणीही रसिक तिथून कसा बरं निघेल ?

 


42॥ पण तुझ्याच बरसण्याने जो गंधोत्सव चालू झालाय पृथ्वीवर, त्याचा आस्वाद घ्यायला वनात चल. तिथे हत्ती सोंडेच्या अग्रााने धरतीचे सुगंधी नि:श्वास पिऊन आनंदित होत असतील. रानातली उंबरं पिकून त्यांचा इतका घमघमाट सुटला असेल की तो वास तुला देवगिरीपर्यंत सोबत करेल.

 

 


43॥ तिथे कार्तिकेयाच्या वसतिस्थानावर तू फुलासारखा आकार धारण करून, जणू आकाशगंगेतल्या फुलांचा वर्षाव होतो आहे, असा अलवार पड! व्योम नदीच्या जलाने त्याला अभिषेक कर.

 

 


44॥ आणि मग तुझ्या वृष्टीने अन गिरीदरीत घुमणाऱ्या गर्जेनेने कार्तिकेयाच्या लाडक्या मयुराला आनंदी कर! पावसात न्हाल्यावर त्या मयुराच्या नेत्रकडांमध्ये चमकती चंद्रकोर उतरलीय असं भासेल. तेजस्वी नेत्र असलेलं त्याचं पीस माता गौरी कौतुकाने नाजूक कमळ धारण करावं तसं कानावर खोवते.

 

 


45॥ या कार्तिकेयाची पूजा करून पुढे नीघ. हातात वीणा घेतलेले ऋषिद्वय तुझ्या वर्षावामुळे कुठेतरी आश्रय घेतील, वाटेवरून बाजूला सरकतील नि तुझा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देतील. तिथे तुला भेटेल चर्मण्वती. घटकाभर भक्तिभाव मनात धारण कर नि रन्तिदेवाने केलेल्या यज्ञांची महती गाणाऱ्या या पुण्यसरितेला आदराने नमन कर.

 

 

- कालिदास काही हरेक जलप्रवाहाकडे देहिक भावाने पाहात नाही. एरवी सगळया प्रेमिकांकडून कुठे आलिंगन, कुठे अधरस्पर्श करून स्वतःला भरून घेणारा मेघ चर्मण्वतीपाशी केवळ आदराने वाकलाय, म्हणून त्याचा नीलवर्ण!

 

 


46॥ तर असा तू, जणू आकाशातून घनश्यामाचा रंग घेऊन आल्यासारखा नीलवर्ण, त्या प्रवाहावर झुकशील.

 

विशाल, पण वरतून पाहणाऱ्याला अगदी बारीक वाटणारा तो प्रवाहही असा सुंदर वलयकार आहे की जणू पृथ्वीने ल्यालेली मोत्यांची माळच. नि मेघ, तू त्याच्या मध्यावर असा शोभिवंत दिसशील की जणू कंठहारातलं नीलमण्याचं पदकच!

 


47॥ तिला लंघून जा, पण पुढे येणाऱ्या दशपुरात रेंगाळू नको. तिथल्या रमणी तुझ्याकडे नजरा उंचावून कटाक्ष टाकतील, त्यांची मोठी मोठी बुबुळं अन त्या बाजूचा डोळयांतला पांढरा रंग यांची शोभा मात्र पाहा! शुभ्र कमळं आणि त्यावर झुलणारे भुंगेच पाहातोय असं तुला वाटेल.

 

 


48॥ आता तू ब्रह्मावर्तावरून वाहशील. तुझी गार छाया त्या कुरुक्षेत्रावरून जाईल, जिथे अर्जुनाने आपल्या प्रतिसर््पध्यांच्या शिरकमलांवर असं शरसंधान केलं होतं, जसा तू आपले जलधारांचे बाण कमळांवर सोडतोस.

 

 

- आता पुढे आहे सरस्वती नदीचं पुण्यसलील. कोवळया वयांच्या अवखळ नद्या, मादक-तरुण नद्या आता मागे पडल्यात, की मेघही आता वयाने, प्रवासाने पक्व झालाय? यक्ष सांगतोय,

 

 


49॥ इथे मेघा तू खुशाल जलप्राशन कर, पण ते मनात भक्तिभाव ठेवून. तुझं अंतरंग सरस्वतीच्या पवित्र जलरूपी तीर्थाने अगदी शुध्द झालेलं असल्याने तू (जलप्राशनामुळे) काळा दिसशील, पण केवळ बाह्यरूपात!

 

 


50॥ आणि आता हे कनखल, जिथे साक्षात शेैलराज हिमाद्रीतून येणारी हिमधवल गंगा वाहत आहे. तीच ही सर्वश्रेष्ठ जाह्नवी, जिने सगरपुत्रांच्या स्वर्गारोहणासाठीचा सोपान म्हणून काम केलं होतं. ती गंगा, शंकराच्या जटा व त्यामध्ये विराजमान असलेल्या चंद्रम्याशी आपल्या ऊर्मींनी खेळते आहे, हे पाहून उमेचा मत्सर जागा होतो. ती क्रुध्द कटाक्ष टाकते तिच्याकडे. पण ही पाहा, हा जो धवल फेस तिच्या लहरींवर दिसतोय, तो फेस नव्हे! उमेला खिजवणारं तिचं अवखळ हास्य आहे हे!

 

 


51॥ तू असा झुकून पाणी पिऊ लागलास की गंगेवर तहान भागवायला आलेल्या ऐरावतासारखा दिसशील.

 

 


तुझी सावळी छाया गंगेच्या शुभ्र पाण्यात हलकेच मिसळेल. ते पाहाताना यमुनेच्या काळसर पाण्याची आठवण होऊन, गंगा-यमुना संगम इथे कसा? असा संभ्रम पाहणाऱ्याच्या मनात उत्पन्न होईल.

 

 


52॥ या पर्वतांच्या शिलांवर मृगकस्तुरीचा दरवळ आहे. हे गंगेचं जन्मस्थान. या शुभ्रधवल पर्वताच्या शिखरावर जरासा टेकशील, तर तू कसा दिसशील माहिती आहे का? जणू महादेवांच्या गौर नंदीने आपल्या शिंगांनी माती उकरलीय अन त्या चिखलाचं ढेकूळ त्याच्या शिंगांवर चिकटलंय!

 

 


53॥ या पर्वतावर देवदारांची दाटी आहे. झंझावाती वाऱ्यांनी एकमेकांवर फांद्या घासल्याने तिथे वणवे पेटतात नि फिरणाऱ्या गायींच्या जळत्या शेपटया ती आग पसरवतात. तू इथे भरपूर बरसून हा वणवा शमवायला हवास. शेवटी कुणाचं तरी कल्याण करण्यातच थोरांचं थोरपण असतं!

 

 


54 ॥ पण हो, तिथले शरभ जर उगाच तुला खेटू लागले डिवचू लागले, तर खुशाल हिमकणांचा बोचरा मारा कर त्यांच्यावर. तुझ्या माऱ्याने घायाळ होऊन ते वनात पळून जातील.

 

 


55॥ आणि मग जिथे श्री शिवशंकरांचं पाऊल उमटलं आहे, त्या स्थानाचं मनोभावे दर्शन घे, भक्तिभावे प्रदक्षिणा घाल. असं करणाऱ्यांना अंती शिवपद मिळतं, अशी या स्थानाची ख्याती आहे.

 

 


56॥ तिथल्या किन्नर स्त्रिया शंकराची स्तुतिस्तोत्रं गात आहेत. तिथे असलेल्या वेळूच्या बनांतून वाहणारा वारा मधुर साथ करत आहे. आता उणीव आहे ती फक्त तालाची. तुझ्या घनगंभीर गर्जनांनी मृदंगाची साथ या गायन-वादनाला मिळणार आहे.

 

 


57॥ पुढे मात्र पर्वताच्या एका चिंचोळया नेढयातून तुला मार्ग काढायचा आहे. क्रौंच वा हंस पक्षी ये-जा करायला वापरतात तो पर्वताच्या उतरत्या कडांवरील फटीसारखा मार्ग परशुरामाने पर्वत फोडून बनवला आहे. तुला थोडं झुकून, थोडं तिरकं होऊन त्यातून निसटायचं आहे.

 

 


वामनावतारातल्या उचललेल्या विष्णुपदासारखा त्या वेळी तू दिसशील!

 

 


58॥ मग जा कैलास पर्वतावर! तिथली उत्तुंग शिखरं इतकी धवल आहेत की जणू अप्सरांना अवलोकन करण्यासाठीचे आरसेच! तो पर्वत उचलताना रावणाला धाप लागली होती. त्याची शुभ्र कमळासारखी शिखरं पाहून असं वाटतं की दररोज महादेव जी क्रीडा करतात, त्यातलं त्यांचं विकट हास्यच पर्वतरूपाने थिजलं आहे.

 

 


59॥ हस्तिदंत कापल्यावर जसा दिसतो, अशा शुभ्र पर्वतावरून काजळकाळया कांतीचा तू जेव्हा सरकत जाशील, तेव्हा ते दिव्य दृश्य पाहून असं वाटेल की जणू गौरकाय हलधर बलरामच खांद्यावर काळी कांबळ पांघरून निघाला आहे.

 

 

60॥ गिरिजेचा कोमल हात हातात घेण्यासाठी शंभू आपल्या हातचे सर्पकंकण काढून ठेवून तिचा हात धरून चालू लागले, तर तू त्यांना मदतरूप व्हावंस. आपला जलभार हिमामध्ये परिवर्तित करावास, जेणेकरून तुला कठीण बनता येईल. मग पायरीपायरीसारखा तू पुढयात पसरलास, तर गौरीमाता त्या सोपानावरून वरच्या रत्नखचित प्रदेशापर्यंत सुखाने चढून जाईल. हे पदस्पर्शाचं भाग्य मेघा, तू जरूर भोगावंस!

 


61॥ तिथे क्रीडा करणाऱ्या अप्सरा आपल्या रत्नजडित कंकणांनी तुला असा स्पर्श करतील की तुझ्या वरच्या कठीण बर्फाच्छादित कवचाला भोकं पडतील, अन तुझ्या पोटातल्या थंडगार पाण्याचे फवारे उडू लागतील! या रमणींची ग्राीष्मातल्या दाहापासून सुटकेसाठीची ही क्लृप्ती! त्या तुझ्या जलधारांत न्हातील, बागडतील, त्याचा तूही मनमुराद आनंद लूट! त्यांच्या खोडयांचा जर तुला फारच त्रास होऊ लागला, तर तू जरासं गर्जून त्याना भिवव अन आपली सुटका करून घे!

 

 


62॥ मानसरोवरात सुवर्णाची कमळं डोलत असतात. ते दिव्यजल तू प्यावंस. तिथे साक्षात ऐरावत असेल. थोडा वेळ उगी गंमत म्हणून, त्या ऐरावताच्या मुखाला तू झाकावंस! तिथल्या कल्पतरूंशी जरा लगटावंस अन त्याच्या पर्णभारातून असं हळुवार फिरावंस की जसं एखादी नृत्यांगना आपले रेशमी वस्त्र खेळवेल!

 

 


63॥ आणि कैलासाच्या मांडीवर सुखाने, लाडाने विसावलेली, भव्य उत्तुंग प्रासादांनी नटलेली, प्रियकराच्या सान्निध्यात असताना आपल्या ढळलेल्या वस्त्राचं भान उरू नये, तशी जिच्या अंगावरून गंगा वाहते आहे, ती.. तीच माझी अलकापुरी! ती आपल्या प्रासादरूपी केशसंभारात मेघांचा गजरा माळते. त्याच्यातून ओघळणाऱ्या जलबिंदूच्या मुक्तमालांची सुरेख जाळी ती परिधान करते!

 

 

- अशा रम्य अलकानगरीत मेघ पोहोचला.. इथे मध्यांतर!

 

 


मेघाच्या या प्रवासात मनाने त्याच्यासोबत राहताना वाटेतील नद्या, पर्वत, वृक्ष, पुष्पभार, रमणी, त्यांच्या लीला या साऱ्यात आपणही गुंगून जातो. सामान्य माणसाला जी शक्य नाही ती इतकी दीर्घ निसर्ग परिक्रमा कालिदास बसल्या जागेवरून अनुभवायला देतो. सृष्टीच्या या समृध्द दर्शनाने अन कालिदासाच्या प्रतिभेने आपण मुग्ध होऊन जातो.

 

 


उत्तरमेघ

 

 


आता प्रवास संपलाय. उत्सुकता आहे ती प्रत्यक्ष प्रियेपर्यंत पोहोचेपर्यंत यक्ष मेघाला आणखी काय काय दाखवणार आहे याची.

 

 


1॥ तू जसा आकाशात असतोस, तसेच तिथले प्रासाद गगनचुंबी आहेत. तुझ्यातल्या पाण्यासारख्या त्यांच्या फरशा आहेत, स्फटिकासारख्या चमकदार! तुझ्या बाजूला रंगीत इंद्रधनू, तशी त्या प्रासादात रंगीत चित्रे! तुझ्या जलबिंदूसारखी चमकदार तिथली हिरेमाणके. तुझ्यासोबत लखलखती सौदामिनी, तशा तिथल्या ललना! तुझ्या घनगंभीर नादासारखे तिथले मृदंगवादन.

 

 


2॥ तिथल्या सुंदरींचे शृंगार ऋतूनुसार बदलतात! शरदात गेलास तर त्यांच्या हाती ताजी कमळं दिसतील. हेमंत ऋतूत त्यांच्या केसांत कुंदकळया दिसतील. शिशिर ऋतूत लोध्राच्या पिवळया परागांचे मुखलेपन त्या करतील व त्यांची त्वचा अधिक गौरकाय दिसेल. वसंतात त्या कुवरकाची फुलं वेणीत माळतील, तर ग्राीष्मात त्यांच्या कानांत शिरीषाच्या फुलांचे नाजुक झुबे डोलत असतील! तू येतोस त्या वेळी, म्हणजे वर्षा ऋतूत, कदंबाच्या फुलांचे लोलक त्या भांगात सजवतील!

 

 


3॥ अलकानगरी म्हणजे केवळ आनंदलोक आहे!

 

 


तिथे डोळे भरलेच तर ते आनंदाश्रूंनी. कुणाला ज्वर भरलाच तर तो मदनाचा असतो, अन मीलन हा त्यावरचा उपाय! ताटातूट, वियोग हेही असतं, पण प्रेमातल्या कलहामुळे, तात्पुरतं! इथे मुळी यौवनाशिवाय दुसरं वयच नाही कुणाला. आम्ही यक्ष सदोदित यौवनाचाच उपभोग घेत असतो!

 

 

4॥ तिथल्या प्रासादांचे सौध स्फटिकासारख्या सुंदर मण्यांनी सजवलेले आहेत. रात्री त्यांवर आकाशीच्या नक्षत्रांची फुलं पसरलेली दिसतात. तुझ्या आवाजासारखे मृदंगाचे ध्वनी जेव्हा कानात वाजत असतात, अशा वेळी यक्ष आपल्या रमणींसह सुराप्राशन करत असतात. ती सुरा साक्षात कल्पतरूंपासून मिळवलेली असल्याने त्यातून रतिमद नुसता ओसंडत असतो!

5॥ ज्या मंदाकिनीच्या किनारी ही नगरी आहे, तिची शोभा पाहा. तिच्या तटांवर मंदार वृक्षांची दाट छाया असते. तिच्या शीतल जलावरून वाहून वायूही मंथर होतो. तिच्या काठची वाळूही इतकी सोनेरी झगमगती आहे की देवांनाही प्रिय अशा सुंदर यक्षकन्या आपले दोन्ही हात वाळूत रोवून, त्या वाळूत (सुवर्ण)मणी मिसळून ते पुन्हा शोधण्याचे खेळ खेळतात!

 


6॥ निरीचे रेशमी बंध सख्याने खेचताच बावरलेल्या व लाजेने लाल झालेल्या रूपगर्वितांना काय करावे सुचत नाही! निदान हे दिवे तरी मालवू, म्हणून त्या आपल्या बंद मुठींना उघडून त्या ज्योती वारू जातात, पण हातात हिरे असल्यामुळे प्रकाश नाहीसा होत नाहीच!

 

 


7॥ त्या उत्तुंग प्रासादांच्या जाळीदार गवाक्षांतून ढग वाऱ्याचं बोट धरून आत जातात. मग त्यांच्या ओलाव्यामुळे तिथल्या भिंतींवरची चित्रं पुसट झाली की चोरटेपणा वाटून, धुराप्रमाणे पातळ होऊन त्या जाळीतून निसटायला पाहतात.. अन् स्वतःच विस्कटून जातात!

 

 

8॥ तू नसलास की रात्री चंद्राचे हात या युगुलांच्या मंचकाच्या छतापर्यंत सहज पोहोचतात. त्या छताला लटकलेले चंद्रकांत मणी त्या किरणांच्या स्पर्शाने पाझरू लागतात. त्या पाझरलेल्या रसाने दोघांची चांदणी रात्र फुलते अन त्या चंद्रस्पर्शी थेंबांमुळे रमणींचा प्रियतमाने दिलेला शीण निघून जातो!

 


9॥ अलकानगरीच्या विलासाला काय सीमा! तिथे घराघरांत वित्ताचा पूर आहे. जिथे तिथे कुबेराची स्तुतिस्तोत्रं गायली जातात अन् अशा नगरातील विलासी पौरजन नगरसीमेवरच्या वारांगनांच्या उपवनांत सतत विहार करत असतात व रंभांना आपली गूजं सांगण्यात दंग होतात.

 

 


10॥ या नगरीचं रात्रीजीवन कसं आहे, याचे पुरावे तुला सकाळी मार्गामार्गांवर दिसतील. रात्रिगामी सुंदरींच्या केसांतील गजरे, कानात माळलेली कुंडलं गळून पडलेली दिसतील. गळयातील मुक्तमाला ओघळून त्यातले मोती विखुरलेले दिसतील! याच रस्त्यांवरून त्या अधीर अभिसारिका गेल्या असतील हे तुला उमगेल!

 

 


11॥ तर अशी ही अलकानगरी! इथले अधिपती कुबेर असले, तरी साक्षात् शिवशंभोंचा इथे निवास! त्यांच्या भीतीने कामदेव आपले भृकुटीचे धनुष्य ताणून, त्याला कटाक्षांचे शर लावून, प्रेमीजनांना विध्द करण्याचं काम करू धजत नाहीत! पण त्याचं काम परस्पर इथल्या रमणींनी त्यांच्या भुवया उंचावून टाकलेल्या नजरबाणांनी होऊन जातं!

 

-------------------------------------------------
 हे सुधा नक्की वाचा 


-------------------------------------------------------

12॥ या मदनाच्या उत्सवाला लागणारी विविध रंगीत वस्त्रं, नाना परींची पानं-फुलं, शृंगारासाठी विविध आभूषणं, पायाला लावायला लाल आळता आणि नेत्रांना कटाक्ष कौशल्य शिकवण्याला, उत्तेजन द्यायला मधुरस सुरा! हे सारं तिथे एका कल्पवृक्षाकडून मिळतं!

 


13॥ अशा या नगरीत, मेघा, कुबेराच्या निवासाच्या उत्तर दिशेला आहे माझं घर! इंद्रधनूसारख्या मनोरम तोरणामुळे माझं घर दुरूनही दिसून येतं. तिथे एक बाल मंदार वृक्ष असेल फुललेला. बहराने नम्रपणे वाकलेल्या त्याचा मोहर हाताने खुडता येतो. या बालतरूवर माझ्या प्रियेचं पुत्रवत् प्रेम आहे!

 

 


14॥ तिथेच कोपऱ्यात उतरत्या पायऱ्यांवर पाचू जडवलेली एक विहीरही आहे. त्यात दाटली आहेत देठाशी रत्नं जडवलेली सुवर्णकमळं! त्यात पोहणारे हंस तिथे इतके रममाण झालेत की तुझ्या येण्याने ते बिचकणार नाहीत वा जवळच असलेल्या मानसरोवराकडं जावं असं त्यांच्या मनातही येणार नाही.

 

 

15॥ त्या पलीकडेच एक नीलमण्यांनी जडवलेला उंचवटा आहे. त्याला सभोवतीने सोनेरी कर्दळींचा वेढा आहे. ते स्थान माझ्या प्रियेचं फार आवडतं आहे. विजा चमकू लागल्यावर तुझा निळा रंग तसाच चमकतो अन अशा वेळी तिची आठवण येऊन मी कासावीस होतो.

- पाहता पाहता मेघ अगदी प्रियेच्या दारात पोहोचला!

 

आता यक्षाच्या दारातल्या बागेचं वर्णन. इथे कालिदासाने संस्कृत साहित्यातील 'कुसुमप्रसूती' या रम्य संकल्पनेचा परिचय दिलाय. सर्वच झाडांना पुष्पसंभवासाठी काही आगळे डोहाळे लागतात, अशी ही कल्पना.

 


पिंपळीला फुलण्याकरता सुंदर स्त्रीचा स्पर्श लागतो. अरणीला दृष्टिक्षेप. माठाला आलिंगन. चाफ्याला तिच्या स्मिताने, आंब्याला तिने घातलेल्या फुंकरीने, रुद्राक्षाला तिच्या गायनाने आणि अमलताशाला तिच्या नर्तनाने कुसुमप्रसूती होते. यक्षाच्या बागेतील रक्त अशोक म्हणजे सीतेचा अशोक अन त्याच्या शेजारी आहे बकुळ. पैेकी अशोक फुलतो सुंदर स्त्रीच्या लत्ताप्रहाराने, तर मादक रंग-गंधाची फुलं असलेल्या बकुळीला फुलण्यासाठी लागते सुंदरीच्या मुखातून आलेली मद्याची चूळ! यक्ष सांगतोय की

 

 

16॥ नव्या पालवीने मंडित असे हे दोघे आपली पानं हलवून जणू माझ्या पत्नीला त्यांचे डोहाळे सांगत आहेत!

 

17॥ त्या दोन वृक्षांच्या मध्ये एक सोन्याची छत्री आहे. तिच्या खाली पाचूंनी मढवलेला स्फटिकशुभ्र हिऱ्यांचा चौथरा आहे. माझी प्रिया आपल्या कंकणांचा नाद करून त्या तालावर ज्या तुझ्या लाडक्या मयुराला नाचवते, तो मयूर संध्याकाळी त्या छत्रीवर येऊन बसतो.

 


18॥ तर या साऱ्या लक्षणांवरून तुला माझं घर ओळखता येईल. दारात शंख पद्मादि मंगल चिन्हं रेखलेली असतील. पण आत मात्र ती म्लान वदनाने बसलेली असेल. सूर्य मावळल्यावर कोमेजून जाणाऱ्या कमळासारखी!

 

 


19॥ आता तू असा हलकेच सानुला बालमेघ होऊन खाली जा. मघाशी सांगितलं त्या रत्नखचित स्थानी जरा विसावा घे अन मग हळूच आत डोकाव. कसा पाहाशील? तुझ्या विजा इतक्या हळुवारपणे चमकू दे, जसे लुकलुकते काजवे! त्या मंद प्रकाशात तुझी सुभग दृष्टी तिचा हळूच वेध घेऊ दे!

 

 


20॥ आणि तिथे ती असेल. कशी? सतेज मुलायम कांती, दातांच्या कुंदकळया, तोंडल्यासारखे लाल ओठ, पुष्ट अवयवांनी भारावलेली गजगामिनी, पण कृशकटी, अन् नजर बावरलेल्या हरणीसारखी! अशी ही सुंदरा खचित विधात्याने प्रथम निर्मिली असेल!

 

 


21॥ ती अबोल आहे, त्यात एकाकी पडलेली विरहिणी. कसेतरी दिवस ढकलताना लहान पोरीगत दिसू लागली असेल. शिशिराच्या गारठयाने कमळवेली कशा दिसतात ना, कसनुश्या, तशी दिसू लागली असेल ती.

 

 


22॥ सतत आसवं ढाळून डोळे सुजले असतील. सतत उष्ण उसासे टाकल्याने ओठांनाही कोरड पडली असेल. केसांची रचना करत नसेल. त्यामुळे जेव्हा ती अशी तळव्यावर हनुवटी टेकून बसत असेल, तेव्हा मुक्तकेशात झाकून गेलेलं तिचं मुख म्लान दिसेल. जसं तू आच्छादल्यावर चंद्र दिसतो तसं.

 

 


23॥ बहुधा ती देवापाशी मागणं मागत बसलेली दिसेल किंवा मग माझ्याच चिंतनात असेल. मी कसा कृश झालो असेन.. असा विचार करत असेल किंवा तिच्या लाडक्या मैनेच्या पिंजऱ्याशी उभी राहून तिला विचारत असेल, तूही तर लाडकी होतीस त्याची, तुला नाही का त्याची सय येत?

 

 


24॥ कदाचित एखादं जुनंच वस्त्र नेसून ती वीणा वाजवत बसली असेल. माझ्याच नावाला गुंफून गीतं गात असेल. पण जुळवलेल्या तारा डोळयातल्या पाण्याने भिजत असतील! अन मग कैक वेळा घोटलेल्या तानाही ती विसरत असेल!

 

 


25॥ किंवा मग आता शापातले किती दिवस राहिले, हे आठवण्यासाठी उंबऱ्यावर एक एक फूल ठेवून दिनगणना करत असेल... किंवा मग मी आल्यानंतरच्या आमच्या भेटीची सुखचित्रं मनाशी रंगवत असेल.

 

बहुतेक रमणी, विरहिणी असंच तर करतात!

 

26॥ कामात तिचा दिवस कसातरी सरत असेल, पण रात्र वैरीण होऊन उभी ठाकते. अन मग अर्ध्या रात्री दुःख भराला येऊन ती तशीच तळमळत कुठेतरी जमिनीवर पडली असेल, म्हणून तू सुखसंदेश देणारा बनून खिडकीसमोर जा.

 


27॥ पूर्वेच्या क्षितिजाला चंद्रकोर टेकावी, तशी ती पलंगाला पाठ लावून बसलेली असेल. त्या चंद्रकलेला पाहून माझ्यासवे व्यतीत केलेल्या रंगरात्री आठवून ती आसवांनी रात्र शिंपीत असेल.

 

 


28॥ त्या ओल्या चंद्रिकेला पाहून क्षणभर तिचे नेत्र सुखावतीलही, पण लगेचच माझ्या आठवणीने भरून येतील. कमळाची कळी उमलू लागावी नि तितक्यात आभाळ भरून यावं नि अंधारलं असं वाटून तिने पुन्हा मिटू पाहावं, तसा तिच्या पापण्यांचा खेळ सुरू असेल.

 

 


29॥ मी नसल्याने ती केसाला तेलही लावत नसेल. तिचे रूक्ष झालेले केस गालावर असतील. उष्ण श्वासांनी नाजूक जिवणी कोरडी पडली असेल. स्वप्नात तरी मला भेटता यावं म्हणून ती निद्रेसाठी तळमळत असेल. पण पापण्यांत साठून राहिलेल्या पाण्यामुळे निद्रेसाठी तिला पापण्या मिटताच येत नसतील!

 

 


30॥ कसेतरी बांधलेले तिचे केस, त्यात फुलं तर नसतीलच, सारा गुंता झाला असेल. विरहांती जेव्हा मी तिला भेटेन, तेव्हा मीच तो हळुवार हातांनी सोडवेन. ते रूक्ष केस तिच्या कपाळावर भुरभुरत असतील अन नखं वाढलेल्या बोटांनी ते सारतासारता ती त्रासत असेल.

 

 


31॥ अशी ती आभूषणविरहित कृशांगी जेव्हा मंचकावर तळमळताना दिसेल, तिचं पुन्हा पुन्हा कूस बदलणं पाहून तुझ्या आतला ओलावा जलरूपाने वाहू लागेल! ज्यांच्या आत असा ओलावा असतो, त्यांची मनं करुणेने भरलेली असतातच!

 

 


32॥ मी हे पुरते जाणतो की तिच्या मनात माझ्याविषयी अपार प्रेम आहे. माझ्यापासून दुराव्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हे माझं दुर्दैव मी तुला उगा सांगतोय असं समजू नकोस. तू ते डोळयाने पाहाशील तेव्हा तुलाही ते पटेल.

 

 

33॥ रूक्ष केसांत अडकून पडलेली काजळविरहित तिची नजर! आता काही मादक द्रवही घेत नसल्याने नेत्र भृकुटी विक्षेपही नाहीत, अशी ती. मात्र तुझ्या जाण्याने होणाऱ्या शुभशकुनामुळे तिचा डोळा फुरफुरेल. पाण्यात मासोळीने हालचाल केली की निळं पाणी कसं डचमळतं तसं ते दिसेल!

 


34॥ तिचे केळीच्या स्तंभासारखे अंक मीलनान्ती माझ्या हाताने मी चुरीत असे. माझ्या नखक्षतविरहित असे तिचे अंक माझ्या हाताचा स्पर्श लाभत नाही म्हणून स्फुरण पावत असतील!

 

 


35॥ पण ती गाढ झोपेत असली तर मात्र जरा थांब. कारण याचा अर्थ ती नक्कीच स्वप्नात माझ्या मिठीत असेल. तू जागं केल्याने ती मिठी तुटल्याचं तिला अपार दुःख होईल!

 

 

36॥ त्या माधवी लतेला जसा तुझ्या आर्द्र, शीतल, हळुवार स्पर्शाने उठवतोस, तशी एक ओलसर अलवार फुंकर गवाक्षातून घाल. तिला जाग येऊन आश्चर्याने ती गवाक्षाकडे पाहू लागली की किंचितशा विजा चमकवून तिचं लक्ष वेधून घे.

 


37॥ आणि मग तिला सांग, हे सौभाग्यवती, मी तोच आहे जो गर्जना करून आपल्या सखीची वेणी सोडवायला आतुरलेल्या पांथस्थांना परतवाटेकडे वळवतो, तोच मी, मेघ, तुझ्या पतीचा सखा!

 

 


38॥ मग ती अशी आदराने अन आनंदाने तुझ्याकडं मान उंचावून पाहील, जसं सीतेने अशोकवनात प्रकटलेल्या हनुमंताकडे पाहिलं होतं. प्रत्यक्ष भेट नसल्याने किंचित कमी भासला, तरी स्त्रियांना पतिभेटीइतकाच आनंद त्याच्या संदेशाने होत असतो.

 

 


39॥ मेघा, सांग तिला की तिचा नाथ प्राणांतिक विरहवेदना सोसतो आहे, पण तो रामगिरीवर सुखरूप आहे. तो तुझी सारखी आठवण काढतो, तुझ्याच क्षेमाची काळजी करतो, तो तुला कल्पनेनेच खेंव देत आहे.

 

 


मेघा, अतिशय विकल झालेल्या जिवाला आधी हेच सांगून दिलासा द्यावा लागतो!

 

 


40॥ तुझ्यासारखीच त्याचीही दशा आहे. तोही असाच झुरतो आहे - जळतो आहे, तप्त अश्रू ढाळतो आहे, सुकला आहे, खंगला आहे. तुला प्रत्यक्ष सदेह भेटायला तो आतुर उतावीळ आहे, पण दैव आडवं आल्याने तो केवळ कल्पनेत तुला भेटतो आहे. जी जी तुझी दशा ती ती त्याची असणं, हे त्या भावाच्या रूपाने त्याचं तुला भेटणंच आहे!

 

 


41॥ खरं तर जी गोष्ट सर्वांसमक्ष सांगण्याजोगी आहे, तीसुध्दा तुझ्या ओठांचा निसटता स्पर्श गालांना मिळावा या आशेने तुला कानात सांगायला लावे, असा तो रसिकश्रेष्ठ आता ओठ, कान या साऱ्यापासून दूर गेलाय. म्हणून आता तो अप्रत्यक्षपणे या शब्दांतून माझ्याकरवी तुला भेटायला आलाय.

 

 


42॥ हे भामिनी, कोमल लतेमध्ये मला तुझे मुख दिसते, हरिणींच्या नेत्रात तुझे नेत्र, मोरपिसारा पाहून तुझा केशसंभार आठवतो, पूर्णचंद्राला पाहता तुझे मुखबिंब स्मरते नि नदीचा खळाळता प्रवाह तुझ्या भ्रूकटाक्षांची याद देतात. पण हाय! एकाही ठिकाणी सगळी संपूर्ण तू दिसत नाहीस!

 

 


43॥ तू माझ्यावर रुष्ट आहेस नि मी तुझी समजूत घालायला तुझ्या पायाशी बसलोय, असं चित्र मला रेखाटायचं असतं. गेरू, शिळा सारी सिध्दता मी करतो.. पण ऐन वेळी डोळे भरुन येतात नि वाहू लागतात... समोरचं काहीच दिसत नाही मग. इतकंच कळतं की अशीदेखील आपली भेट होऊ नये, चित्रातसुध्दा, इतकं आपलं नशीब वाईट आहे!

 

 


44॥ क्वचित स्वप्नात तू मला दिसतेस. त्या तुला मिठीत बंद करावे, धरून ठेवावे यासाठी मी आकाशाकडे पाहून बाहू पसरतोही, पण माझे ते अवकाशात पसरलेले कृश रिकामे हात पाहून वनदेवतांनाही रडू कोसळतं. त्यांचे मोत्यांसारखे टपोरे अश्रुबिंदू मग पानांवर टपटपत रहातात!

 

 


45॥ आणि मग त्या भिजल्या भुईतून तुझ्या गंधाचे लोट येत राहतात. माझ्या शिणल्या तनुचा दाह करत राहतात. माझी जराही दया त्याला येत नाही! असा हा पोळणारा ग्राीष्म सरणार तरी कधी??

 

 


46॥ मी मग असा वेडा होतो की देवदारांचा गंध असलेल्या, हिमालयाकडून दक्षिणेकडे वाहत येणाऱ्या वाऱ्यांनाही मी कवळू पाहतो. कारण कदाचित् ते येताना, गुणवती गे, तुला स्पर्शून आले असतील!

 

 

- हा यक्षाचा विलाप. इतका काळ 'मी नसल्यामुळे तिला कसं वाटत असेल, कशी माझी आठवण येत असेल' असं होतं. म्हणजे वर्णन तिचं, पण केंद्रस्थानी तो! पण यात दिसते ती त्याची तगमग. जानकीला गमावल्यानंतर राम कसा कासावीस झाला असेल, वनांतरी कसा भिरभिरला असेल, सैरभैर झाला असेल, तो विलाप आठवणारा हा यक्ष विलाप. हा खरा मेघदूताचा गाभा. प्रियेच्या प्रेमात बुडल्याने शिक्षा झालेला, रामगिरीवर अस्वस्थ होऊन, एकुटवाणा, वेडयासारखा साऱ्या भवतालात तिलाच पहाणारा. एका मेघाकरवी तिला आपलं हृद्गत पाठवणारा यक्ष पुढे म्हणतोय...

 

 


47॥ तुझ्याविना प्रिये, या रात्री सराव्यात तरी कशा? या रात्री क्षणाइतक्या लहान व्हाव्यात नि जाळणारे दिवसाचे प्रहर पळभरातच संपून जावेत... हे चंचलनयने! मी तुझ्या वियोगामुळे असेच वेडे विचार करत राहतो! 

 

 

48॥ पण मग सुखद भविष्याची कल्पना करून मीच माझ्या मनाला दिलासा देतो. तूही हा काळ धीराने सोस. सखे, अगं या अंधाऱ्या रात्रीनंतर परत उजाडणारच आहे. सुखदुःखाचं हे चक्र कुणाला चुकलंय?

 

49॥ आता फक्त चार महिने उरलेत विरहाचे. शयनी एकादशीनंतर उत्थान होतंच. मग शरदाच्या धुंद चांदण्या रात्री आपण साजऱ्या करू. आता जे मनोरथ रचत आहोत ते तेव्हा एकत्र पूर्ण करू!

50॥ तुला आठवतं? एकदा अशीच माझ्या गळयांत हात घालून निजली असताना अचानक तुला जाग आली, घामाने डबडबलेली तू. भयाने जागी झालीस, अन हुंदके देऊ लागलीस. किती मिनतवाऱ्या केल्यावर तू कारण सांगितलं होतंस की 'मी तुला दुसरीबरोबर पाहिलं रे स्वप्नात! '

 

 

51॥ या फक्त तुझ्या-माझ्या गोष्टी सांगितल्याने तुला खूण पटेल की हा खराच माझा दूत आहे. ऐक सखे, कुणी काहीही म्हटलं तरी त्यावर विश्वास ठेवू नको. दूर राहिलं की प्रीत उरत नाही असं का म्हणतात, ते मला कळत नाही. उलट पाहा ना, विरहाने आपल्यातील प्रेम कसं फुलतं, वाढतंच आहे! प्रेमाचा रस चाखायलाच कुणी नसल्याने ते रसाचं भांडार वाढतच चाललं आहे! 

 

 

- कालिदासाने उत्कटतेने विरह मांडला, थेट शृंगारिक भाषा वापरली, जी प्रसंगी अश्लीलही म्हणवली गेली. पण शृंगारिक वर्णन करताना ते उत्तानतेकडे जाणार नाही याचं भान, कामुकता दाखवायची पण त्यात बीभत्सता कणमात्रही डोकावू द्यायची नाही, यासाठी तो विश्ववंद्य ठरतो. रसाचा, सुंदरतेचा आस्वाद घेणारी अशी स्वच्छ, कलासक्त, निर्भय नजर तो आपल्याला देतो, त्याने आपली रसिकताच उन्नत होते. भोग-उपभोग आणि आस्वाद यातला फरक दाखवतो. सौंदर्याचा सन्मान करायला शिकवतो. तिच्या शरीराचं वर्णन करतानाही त्यासाठी तो जे शब्दालंकार वापरतो, तिकडेच लक्ष जातं. अप्रतिम सुंदर प्रमाणबध्द अशी मूर्ती असावी नि कुणी रसिक भाविक पुजाऱ्याने एकेक अलंकार-फुलं वाहून तिचं सोंदर्य पळापळाने वाढवत न्यावं अन शेवटी एक उदबत्ती लावून त्या दृश्याला, अनुभवाला एकदम अपार्थिवात न्यावं तसा हा अनुभव.

 

 

शेवटी मेघाला परत येऊन सखीकडून काही संकेत आणून द्यायची विनंती करून यक्ष त्याला एक सुंदर आशीर्वादही देत आहे.

 

 

52॥ असं सांगून, हे मेघा, तू त्या प्रथमविरहिणीला आश्वस्त कर. शंभूचा नंदी ज्याच्याशी ढुशा मारून खेळतो, त्या हिमालयाला सोडून तू परत माघारी धाव घे. सखीकडून काही संकेताची खूण असलेला संदेश घेऊन ये. मग पाहा, प्रातःकाळी कोमेजत असलेल्या कुंदकळीसारखं झालेलं माझं जगणं कसं तरारतं ते! 

 

 

53॥ या तुझ्या बंधूचं काम आनंदाने करशील ना मेघा? तुझं मौन म्हणजे नकार नव्हे, होकारच आहे, होय ना? मला माहीत आहे तुझी रीत. मोठया मनाचे लोक न बोलता कृतीतून स्नेह दाखवून देत असतात. तूही गर्जना न करता तहानलेल्या चातकांना जल देऊन त्यांची तृषा शांत करतोस! 

 

 

54॥ ही माझी आग्राहाची विनंती पाळच मित्रा! थोडी अनुचित वाटली, तरी माझी पीडा जाणून कणव वाटून तरी हे काम करच! त्यानंतर तू सुखाने चांगल्या प्रदेशात जा. भरपूर जलप्राप्ती होऊन तू वर्षावैभवाने फुलून जा. आणि मग दामिनीसह रत होऊन सदा सुखी राहा! तुझ्या नशिबात तिच्या ताटातुटीचं दुःख कधीही न येवो! 

 

 

असं हे मेघगान! आजही आषाढाच्या प्रथम दिवशी या तीव्रकोमल दुःखाचं स्मरण होतं. आषाढमेघाच्या वर्षावानंतर मोहोरलेल्या जमिनीवर रूप-रंग-गंधांचे उत्सव सुरू व्हावेत, तसंच यक्षाची वेदना कालिदासाच्या प्रतिभाशाली लेखणीतून प्रवाहित झाली आणि संपूर्ण काव्यसृष्टीलाच बहर आला. जोवर आषाढाचा मेघ वर्षत राहील, तोवर कालिदासाने शृंगारलेली ही मधुर वेदनाही चिरंजीव राहील! 

 

विनीता तेलंग

9890928411