पाच पांडव आणि द्रौपदीचं मंदिर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Nov-2019
|

***सुचरिता***

संपूर्ण भारतात पाच पांडव आणि द्रौपदीचं एकत्र अशी दोनच मंदिरं आहेत. एक दिल्लीला आणि दुसरं पुण्याजवळील तळेगाव येथे आहे. आजवर द्रोपदीच्या बाबतीत खूप उलटसुलट चर्चा, वाद, हे अनेक कथांतून ऐकून-वाचून आहोत. परंतु हे मंदीर पाहताना पुराणातल्या दुःखात एखादा सुखाचा क्षण सापडावा असे वाटले.


महाभारत हे विविध कलांच्या निर्मितीचे अक्षय स्रोत आहे. भारतातील विविधांगी कलांमधे याची रूपं दिसतात. भारतीय शिल्पकला तर पुराणांमधूनच जन्माला आली असावी. जसे निर्माते तसे कथांचे आविष्कार पहायला मिळतात.

पुण्याजवळील तळेगाव इथे पाच पांडव व द्रौपदीचं मंदिर आहे. द्रौपदीचा उल्लेख मी आवर्जून करते आहे, कारण इथं ते फक्त पांडवांचे मंदिर म्हणूनच प्रसिध्द आहे. हादेखील आपल्या संस्कृतीचा प्रभाव. असो.

मूळ गावात, अगदी आत हे मंदिर आहे. चावडी चुकाच्या मागल्या बाजुला राहत्या वस्तीत मंदिर आहे. जोतं जुनाट दगडी आहे. दोन खोल्यांचं साधं, घरासारखं देऊळ. बाहेर हे पाच भाऊ बसले आहेत आणि आत त्या सगळयांच्या जीवाची राणी गादीवर झोपली आहे! पाची जण ताठ बसले आहेत. सज्ज आणि दक्ष! त्यांना वळसा घालून आत गेलं की राणीचा शयनकक्ष आहे. हळू जायचं बरं का! पांचालीला आदर दाखवायला हवा. तिच्या पाचातलं कुणी पटकन रागाला यायचं नाही तर.

 

या मंदिराबद्दल उत्सुकता असण्याचं विशेष कारण आहे. संबंध भारतात पाच पांडव आणि द्रौपदीचं एकत्र अशी दोनच मंदिरं आहेत म्हणे. एक दिल्लीला आणि एक इथं. धुरपदा माय आत निवांत झोपली आहे आणि बाहेर हे पाच पती डोळयात तेल घालून जागत तिला राखताहेत. चेहऱ्यावर प्रेमळ मंद हास्य आहे. आजवर तिच्या वाटणीबद्दलच्या खूप उलटसुलट चर्चा, वाद, कथा ऐकून-वाचून झाल्या. त्यामुळं तिनं किती सोसलं, हे सगळं कसं चूक आणि अन्यायकारक आहे; या मुद्दयावर जवळपास सगळेच ठाम आहेत.

 

इकडे मला यातलं सुख जाणवतं आहे. एक बाई अशी निर्धास्त झोपते. आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही; तब्बल पाच पुरुष, तिचे पाच, तिला राखत जागताहेत! How secured and safe she must be feeling at the moment!

 

नाही... मग पुढे काय झालं, कुणी राखलं की नाही, भांडण, विकोपाला गेलेले वाद, युध्द ही सगळी सत्यं आहेतच. आणि ती सगळी मलाही ठाऊक आहेत नि पुन्हा ऐकायचीही नाहीत.

 

पण पहा ना! काळात गोठवलेला हा एक सुखाचा, समाधानाचा क्षण! आश्वस्ततेचा शांत भाव आहे तिच्या देहबोलीत. मधेच जागी होऊन ती हसऱ्या नजरेनं पहातेय. तिला भिंतीतल्या झरोक्यातून ताठ बसलेल्या दोघांच्या शरीराची कड दिसते आहे.

 

तुम्ही आहात! जागे आहात! मला या जगातल्या कुणाचीही या क्षणाला धास्ती वाटत नाहीये. कुणी राजा, सामान्य, देव, राक्षस.. कुणीही तुम्हाला ओलांडून माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीये. या इथं, निबीड अरण्यातल्या कुटीत, मी तुम्हा पाचांच्या सावलीत स्वस्थ आणि सुखी आहे.

 

ही द्रौपदी आधी कूस बदलायची. मग नेहमीप्रमाणे तिच्या डोक्याच्या मागच्या भिंतीत जो उंच झरोका आहे; तिथून कुणीतरी वाकून पाहिलं म्हणून तिनं कूस बदलणं थांबवलं म्हणे. आता ती एकटक बाहेर बघतेय. तिचे जागणारे राखणदार भरल्या, हसऱ्या डोळयांनी बघतेय!

देवळाची अवस्था फारशी बरी नाही. बंदच असतं ते. तिथल्या एका मुलानं किल्ली आणून उघडून दिलं, दिवे लावून दिले. भारतातल्या दोनातलं एक मंदिर असेल, तर हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ होऊ शकतं. मग व्यवस्था राखणं सोपं जाईल कदाचित.

मूर्तींना रंग दिलेले आहेत. त्यामुळं मूळ कलाकृतींवर काही स्थलकालदर्शक किंवा इतर खुणा असतील; तर त्या झाकल्या गेल्या आहेत. जवळच एक शिलालेख आहे. पण अंधारात दिसला नाही. मंदिराबद्दल इतर काहीही माहिती मिळाली नाही. कुणी, कधी बांधले ते ठाऊक नाही. शक्य असेल त्यांनी जरूर पहा. पुराणातल्या दुःखात एखादाच असा सुखाचा क्षण सापडतो. माणुसकीवरचा विश्वास मग उगाचच दृढ होतो.

इतकी गोड आणि मधुर कहाणी पहायला मिळाली. वेळ सार्थकी लागला. ज्या कुणा कल्पक कलाकाराने हे बांधलं त्याच्या रसिक भावनाप्रधानतेला सलाम आहे.

9511951970