उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र

विवेक मराठी    13-Nov-2019
Total Views |

श्री उद्धव ठाकरे

कार्याध्यक्ष, शिवसेना

दादर, मुंबई

विषय : हिंदुहृदयसम्राटांचा अनादर शिवसेनेकडूनच

नमस्कार उद्धवजी,

तुमच्या नावापाठचा "जी" खरे पाहता आदराने असायला पाहिजे होता पण तो केवळ "औपचारिक" आहे. मी स्व. बाळासाहेबांचा खुप आदर करतो, आजही एखाद्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणाची क्लीप ऐकली किंवा जुने कार्यक्रम बघितले की अंगावर काटा उभा राहतो. काय ते व्यक्तिमत्व होतं. आणि केवळ त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात केलेल्या आवाहनामुळे जनतेने तुम्हाला मतं देऊन सांभाळलं. 


पण त्या सांभाळण्याचा तुम्ही गैरफायदा घेतात आणि स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांची युती तोडलीत. बंद दरवाज्याआड झालेली चर्चा आणि निर्णय ना कधी जनतेला कळणार ना पक्षातील इतर नेत्यांना, पण जनतेने प्रचारा दरम्यान देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे निश्चित ऐकले. निवडणूक झाल्यानंतर निकालाच्या काही दिवस आधी अचानक शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी जाहीर झाली. शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या असत्या तर ती ग्राह्य देखील होती, पण मित्रपक्षापेक्षा ५०% जागा कमी मिळून देखील मुख्यमंत्रीपदासाठी दादागिरीची भाषा अत्यंत चुकीची होती. तारतम्य सोडून तुमचे सगळे नेते बेताल वक्तव्य करत होते, सामनाचा संपादक तर स्वतःला शिवसेना अध्यक्ष समजत होता. भाजपाच्या नेत्यांवर व्यक्तिगत पातळीवर टीका सुरु झालेल्या.शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवता, त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवले होते आणि इथे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला ट्रोल केले जात होते. खरंच संस्कार काय असतात ते देवेंद्र फडणवीसांकडुन शिकावे. एवढी खालच्या दर्जाची टीका होऊन देखील त्यांनी त्यांचा तोल नाही सोडला.

आमच्या फेसबुक पेजला
like करा : सा. विवेक  

तुमचा सपोर्ट नाही म्हणून त्यांनी सरकार स्थापनेला नकार दिला, त्यांनी कोणत्याही कॉंग्रेसला अॉफर दिली असती तर ते लोटांगण घालत आले असते पण भाजपाने तारतम्य बाळगलं. तुम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री या वेडाने झपाटले होतात त्या उन्मादाच्या भरात तुम्ही ज्यांना बाळासाहेबांनी फटकारले आणि ज्यांच्याविरोधात दंड थोपटले त्याच पक्षांशी हातमिळवणी केलीत. 

आणि शेवटच्या क्षणी जे झालं त्यात तुमची राजकारणातले आडाखे बांधण्याची समज आणि राजकीय परिपक्वतेचा अभाव दिसून येतो. मुख्यमंत्री पदाची औपचारीक घोषणा व्हायच्या आधीच केंद्रीय मंत्रीमंडळातुन तुमच्या पक्षाच्या मंत्र्याला खासदारकीचा राजीनामा द्यायला तुम्ही भाग पाडले, राज्यातील राजकारणासाठी देशाच्या सरकारमधुन बाहेर पडलात, ते देखील हातात समर्थन नसताना. यावरुन तुमचे निगोसिएशन स्किल्स किती कच्चे आहेत हेच दिसतं. मुलाने मुख्यमंत्री व्हावं ही अनेक आईवडिलांची इच्छा असेल पण म्हणून सक्रीय राजकारणाचा, विधानभवनाचा काहीही अनुभव नसणाऱ्या आदित्य ला मुख्यमंत्री ?

राज्यपालांकडून आलेले आमंत्रण ही एक फॉर्मॅलीटी आहे हे देखील तुम्हाला कळु नये ? औपचारिक घोषणा व्हायच्या आत एकमेकांना पेढे भरवायला सुरूवात केलीत, निदान ते खाजगी तरी ठेवायचे. बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला शिवाजी पार्कवर शपथविधी ची घोषणा ? हीच शिवसेनेची मॅच्युरिटी ?

मोदी शहांची चाणक्यनीती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणली जाते, तुमच्या असहकारानंतर आखलेल्या व्युहात तुम्ही अलगद उतरलात आणि तोंडघशी पडलात. देशात मोदी नेतृत्वाखाली सक्षम सरकार असताना अशा प्रसंगात कॉंग्रेस तुम्हाला साथ देईल हा विचारच बालिशपणाचा आहे.

राज्यपालांनी राष्ट्रवादीला विचारले आहे सरकार स्थापनेसाठी, त्यांना एखादवेळेस कॉंग्रेस पाठींबा देईल आणि तुमचा पाठींबा देखील लागेल आणि तसे सरकार बनले तर तुमचा मुख्यमंत्री होईल ?

तुमची अवस्था दिलेरखानाच्या गोटात गेलेल्या संभाजी महाराजांसारखी झाली आहे, पण त्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी छत्रपतींचे पाय धरले. मोदी शहा छत्रपती नाहीत पण ते चाणक्य आहेत. बघा तुम्हाला चंद्रगुप्त होता येतंय का.

 

तुम्हाला सुबुद्धी प्राप्त होवो आणि बाळासाहेबांचा तुम्हाला साक्षात्कार होवो हीच एकवीरेच्या चरणी प्रार्थना

समर्थांनी संभाजी महाराजांना दिलेला बोध आठवतोय ?

अखंड सावधान असावें दुश्चित्त कदापि नसावें।

तजविजा करीत बसावें एकांत स्थळी १॥

कांहीं उग्र स्थिति सांडावी कांहीं सौम्यता धरावी।

चिंता लागावी परावी अंतर्यामीं २॥

मागील अपराध क्षमावे कारभारी हातीं धरावे।

सुखी करूनि सोडावे कामाकडे ३॥

पाटवणी तुंब निघेना तरी मग पाणी चालेना।

तैसें सज्जनांच्या मना कळलें पाहिजे ४॥

जनाचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला।

जन ठायीं ठायीं तुंबला म्हणजे खोटां ५॥

श्रेष्ठीं जें जें मिळविलें त्यासाठीं भांडत बसलें।

मग जाणावें फावलें गलिमांसी

ऐसें सहसा करूं नये दोघे भांडतां तिसर्यासी जय।

धीर धरोण महत्कार्य समजून करावें

आधींच पडला धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती।

याकारणें समस्तीं बुद्धि शोधावी

राजी राखितां जग मग कार्यभागाची लगबग।

ऐसें जाणोनियां सांग समाधान राखावें

आधीं गाजवावे तडाके मग भूमंडळ धाके।

ऐसें होतां धक्के राज्यास होती १०

समय प्रसंग ओळखावा राग निपटून काढावा।

आला तरी कळों द्यावा जनांमध्यें ११

राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक।

लोकांचे मनामध्यें धाक उपजोंचि नये १२

आहे तितुकें जतन करावें पुढें आणिक मिळवावें।

महाराष्ट्रराज्य करावें जिकडे तिकडे १३

लोकीं हिंमत धरावी शर्तीची तरवार करावी।

चढती वाढती पदवी पावाल येणें १४

शिवराजास आठवावें जीवित्व तृणवत् मानावें।

इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥

शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळीं ॥१६॥

शिवरायांचे कैसें चालणें शिवरायांचें कैसें बोलणे॥

शिवरायांचे सलगी देणें कैसे असें ॥१७॥

सकळ सुखांचा त्याग करून साधिजे तो योग

राज्यसाधनाची लगबग कैसी असे ॥१८॥

त्याहूनि करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष

या उपरी विशेष काय लिहावें ॥१९॥

जय जय रघुवीर समर्थ

जय हिंद जय महाराष्ट्र

कळावे

आपला एक महाराष्ट्र नागरिक

स्वप्नील सुनील गुप्ते