अरविंद इनामदार सच्चा वर्दीवाला

विवेक मराठी    16-Nov-2019
Total Views |

 
 
 
 
पोलीस महासंचालक अरविंद इनामदार! इनामदार म्हणजे सच्चा वर्दीवाला... वयाच्या अवघ्या 79व्या वर्षी त्यांचे निधन व्हावे यावर कुणाचेही विश्वास बसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर या वयाच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या, निवृत्ती नंतरही ते सक्रिय जीवन जगत होते.
 
 
‘‘रामराम देवा!’’ ही हाक आता ऐकू येणार नाही. कारण या हाकेवर फक्त आणि फक्त अरविंद इनामदार या नावाच्या व्यक्तीचाच कॉपीराइट होता. ही हाक जेथून येईल, त्या दिशेने एकच व्यक्ती ओ देऊ शकते याची देणार्‍याला खात्री असायची. ती व्यक्ती म्हणजे नुकतेच निधन झालेले, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार! इनामदार म्हणजे सच्चा वर्दीवाला... वयाच्या अवघ्या 79व्या वर्षी त्यांचे निधन व्हावे यावर कुणाचेही विश्वास बसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर या वयाच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या, निवृत्ती नंतरही ते सक्रिय जीवन जगत होते.

 

आणीबाणीच्या काळात ते नागपूरला पोलीस उपायुक्त म्हणून आले होते. तो काळ माझाही ‘कब’ रिपोर्टर असल्याचा होता. सामन्यत: पोलीस अधीक्षकांची जी प्रतिमा आपल्या मनात असते, त्याच्या अगदी विरुद्ध त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. फक्त पोलिसीपणाच त्यांना कमी होती असे नाही, तर साहित्य प्रांतातही त्यांचा भरपूर वावर होता. कुसुमाग्रज - तात्यासाहेबांपासून साहित्यातील त्यांचा संवाद सुरू होत. तात्यासाहेबांचे ते निमित्त होते आणि त्या कविश्रेष्ठांशी त्यांचा नियमित संपर्क होता.

पोलिसांच्या दृष्टीने सांगायचे झाले तर राज्यातील पोलिसांचे तेे आराध्य दैवत होते. त्यांच्या जीवनाची, हालअपेष्टांची आणि कमतरतांचीही त्यांना पूर्ण जाणीव होती - नव्हे, तर खडानखडा माहिती होती. अगदी डी.जी.पी. या सर्वोच्च पदापर्यंत गेले, तरी त्यांना स्वत:ला पांडू हवालदार संबोधताच अभिमान वाटायचा. पोलीस दलावर प्रेम करावे ते त्यांनीच. चुकलेल्या पोलिसांवर कारवाई करताना कठोर होणारे इनामदार दुसर्यांच क्षणी त्यांच्याशी माणुसकीने वागायचे आणि त्याला न्यायही द्यायचे. पण कधी कधी त्यांच्या या दृष्टीकोनाबाबत गैरसमजही व्हायचेे. नागपूरला पोलीस आयुक्तपदावर असताना चैतन्य या बंगल्यात ते नातवंडांबरोबर क्रिकेट खेळत होते. तेवढ्यात एका शिपायाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी त्याला तत्काळ कठोर शासन केले. कुणी त्याची शिफारस करायला आले, तेव्हा त्यांना रिक्तहस्ते पाठवताना ते म्हणाले, ‘‘मी काही नाटक कंपनी चालवत नाही, मी पोलीस खाते चालवतो. त्यामुळे पोलीस खात्याप्रमाणेच शिक्षा होईल.’’

नागपूरला असतानाचा किस्सा आहे. अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेने नागपूरच्या नामांकित गुंडाच्या डोक्यात दगड घालून त्याला यमसदनाला पाठविले होते. पोलिसांनी त्या महिलेला अटक केली. तपास सुरू असताना स्वतः इनामदार तिथे पोहोचले. काही वेळातच त्यांनी अजनीच्या पोलीस निरीक्षक व आणखी एकास निलंबित केल्याचे वृत्त आले. त्यांनी सांगितलेला तो किस्सा आगळावेगळा होता. ज्या महिलेवर गुंडाचा खून केल्याचा आरोप होता, तिने सांगितले होते - ‘‘मी विवाहित मुलगी आहे. मला एक लहान मुलगा आहे. नंतर पतिराजांशी न पटल्यामुळे मी वडिलांकडे राहते. नोकरी करते. जाता-येता हा गुंड त्रास द्यायचा. एकदा तर त्याने घरी येऊन सांगितले की माझी इच्छा पूर्ण केली नाहीस तर मी बलात्कार करीन. वडील हा सगळा प्रकार तक्रार म्हणून सांगायला अजनी ठाण्यात आले होते. त्यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांना सांगण्यात आले - अजून बलात्कार झाला नाही ना, बलात्कार झाल्यावर या, मग तक्रार घेऊ. या उत्तरानंतर मी माझा मार्ग पत्करला. त्या गुंडाशी प्रेमाचे नाटक करू लागले. एक दिवस त्याला रात्री मैदानावर बोलावले. त्याला झुलविले आणि जेव्हा तो अंगचटी जाऊ लागला, तेव्हा त्याचा काटा काढला. उचलला दगड आणि घातला डोक्यात.’’ हे सर्व कथन होताच दोन अधिकारी निलंबित झाले. पुढे तिने स्वसंरक्षणार्थ कृती केल्याची भूमिका पोलिसांनी घेतली व तिची मुक्तता झाली.

ते नागपूरला पोलीस आयुक्त होते. अयोध्येला बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला, त्याने 6 डिसेंबरला नागपुरात तणाव होता. मोमीनपुरा भागात ते स्वतः गेले. ती संपूर्ण मुस्लीम वस्ती होती. इनामदारांनी ती पूर्ण वस्ती वेढून घेतली. प्रक्षुब्ध जमावाला सांगितले, ‘‘तुम्हाला काय करायचे ते या भागात करा, मी तुम्हाला या वस्तीबाहेर नागपूर शहरात जाऊ देणार नाही.’’ अतिशय प्रक्षुब्ध जमावाने त्यांना व पोलीस उपायुक्त सतीश माथुर यांना मोमीनपुर्‍यातील बडी मशिदीजवळ घेरले. आजूबाजूने दगडवर्षाव होऊ लागला. त्यांच्यावर विटाही फेकल्या जाऊ लागल्या. डोक्यावर हेल्मेट असतानाही एक वीट जबर वेगाने येऊन इनामदारांच्या डोक्यावर लागली. तो आघात एवढा जोरदार होता की, ते लागलीच बेशुद्ध झाले. माथुर यांनी त्यांना मशिदीत नेले व तोंडावर पाण्याचे हबके मारले. काही वेळाने इनामदार शुद्धीवर आले आणि त्यांनी आपल्या कमांडोंना गोळीबार करण्याचा आदेश दिला. पोलिसांजवळ त्या वेळी जी शस्त्रे होती, ती खूप जीवघेणी ठरली असती. त्याऐवजी पोलीस मुख्यालयातून रायफल्स मागविल्या आणि नंतर गोळीबार सुरू करायला सांगितला. त्याआधी जर गोळीबार झाला असता, तर मोमीनपुर्‍यात रक्ताचे पाट वाहिले असते. ज्या कमांडोजनी हा गोळीबार केला, त्यापैकी एक बच्चू तिवारी सांगतात - ‘‘स्वतः जखमी झाले असताना, आपल्या गोळीबाराने काय अनर्थ होऊ शकतो याची शुद्धीवर आल्याक्षणी जाणीव ठेवून त्या स्थितीतही रायफल्स येईपर्यंत किल्ला लढविणारे इनामदार साहेब आजही आठवतात.’’

तोच सांगतो - ‘‘त्या दिवशी जर मोमीनपुर्‍यातील जमाव मोमीनपुर्‍याबाहेर पडू शकला असता, तर नागपूर पेटल्याशिवाय राहिले नसते. त्याच दिवशी मोमीनपुर्‍यापासून मैल-सव्वा मैलावर असणार्‍या विधानभवनात विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. जमाव तिथे गेला असता तर काय झाले असते, याची कल्पनाच करवत नाही. पण इनामदारसाहेब होते, म्हणूनच...’’

नागपूरलाच पोलीस आयुक्त असताना अरविंद इनामदार शास्त्रोक्त संगीत शिकण्यासाठी महालात भय्याजी वझलवार यांच्या घरी जात. नागपूरला येण्यापूर्वी ते मुंबईला पं. अजय पोहनकर यांचे शिष्य होते. ते कधीकधी गंमतीने सांगत, ‘‘या दोघांमुळे मी तानसेन झालो नाही, कानसेन झालो. तानसेन फक्त 5% होतो.’’ संगीतामुळे तणाव मुक्त होतो, असेही ते आवर्जून सांगत.

अरविंद इनामदारांना त्यांच्या समृद्ध पोलिसी जीवनात अनेक प्रसगांना सामोरे जावे लागले. त्यांच्या काळातच जळगाव सेक्स स्कँडल पुढे आले. त्यांनी या प्रकरणी मीरा बोरवणकर यांना चौकशीसाठी नेमले. त्यांनी महिलेशी संपर्क साधला. त्यांना विश्वासात घेतले, त्यांची निवेदने घेतली. साक्षी नोंदविल्या व गुन्हेगारांना गजाआड केले. आपल्या यशाचे किस्से सांगतानाच ते अपयशाचेही किस्सेही रंगवून सांगायचे. मुंबईला ऑपेरा हाउसजवळ एका ज्वेलर्सकडे 27 जण सीबीआय अधिकारी म्हणून आले व त्यांनी जवळजवळ 27 लाखांचे दागदागिने लंपास केले. या प्रकरणाचा पुढे चित्रपटही झाला. पोलिसांनी जंग जंग पछाडले. या तपासाच्या कामात पुढे न आलेले कोट्यवधी रुपयांचे दागिने प्रकरण उजेडात आणले व गुन्हेगारांना दंडित केले. पण प्रकरणाचा तपास लागला नाही, याची खंतही त्यांना होती.

पोलिसांनी लाच घेतली वगैरे बातम्या आल्या की त्यांना वाईट वाटे. ते सांगत, ‘‘हो, आमच्या खात्यातही काही ब्लॅक शीप्स आहेत. पण आमचे खाते अतिशय गौरवशाली आहे. व्हाइट शीप्स खूप आहेत.’’ महाराष्ट्राचे माजी डी.जी.पी. सूर्यकांत जोग यांना ते गुरुस्थानी मानत. राजकारण्यांशीही त्यांचे जवळचे संबंध होते. पण पोलिसीगिरीत त्यांना राजकीय हस्तक्षेप अजिबात सहन होत नसे. यशवंतरराव चव्हाण यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता. ते सांगत, ‘‘मी धुळ्यात नवीनच नोकरीला लागलो होतो. 29-30 वर्षांचा असेन. तेव्हा शेतकरी आंदोलन जोरात सुरू होते. शेतकरी धुळ्यात चव्हाणसाहेबांना घेराव घालणार होते. मी तो घेराव टाळला. चव्हाण साहेबांना सांगतिले, सर, आपण शिष्टमंडळाला भेटावे. त्यांनी विचारले, किती वाजेपर्यंत येईल? मी सांगितले, 10 वाजेपर्यंत. ते म्हणाले, मी रात्री साडेदहापर्यंत वाट पाहीन. रात्री शेतकरी नेते आलेच नाहीत. दुसर्‍या दिवशी साडेसातला यायला मी त्यांना राजी केले. नेहमीच्या 5 जणांच्या शिष्टमंडळाऐवजी 25 जणांचे व्यापक शिष्टमंडळ आले. पण चव्हाणसाहेब त्यांना भेटले. या भेटीनंतर घेराव टाळण्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले आणि माझी ओळखही पक्की ठेवली. ते पुढे देशाचे उपपंतप्रधान झाल्यावर त्यांनी मला खास जेवायला आमंत्रित केले.’’

अरविंद इनामदार त्यांना संस्कृतही छान येत होते. त्यांना संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता मुखोद्गत होती. पण ते जेव्हा वर्दीतअसत, तेव्हा ते कोणापुढेही झुकले नाही. त्यामुळेच ज्या मुंबईवर त्यांचे प्रेम होते, त्या मुंबईचे त्यांना पोलीस आयुक्त होता आले नाही. ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले, पण जेव्हा राजकीय हस्तक्षेप वाढू लागला, तेव्हा राजीनामा देऊन मुदतपूर्व निवृत्ती घेतली. त्यांच्या या मुदतपूर्व निवृत्तीबद्दल पोलीस खाते नेहमीच हळहळत राहिले.

पत्रकारांशी त्यांचा नेहमीच स्नेह होेते. अगदी संपादकांपासून ते नवख्या पत्रकारांपर्यंत सर्वांशी गाढ मैत्री होती. कुणाशीही मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे व टिकविणे हा त्यांचा स्वभाव होता व तो अंतिम श्वासापर्यंत कायम होता. पदांनी ते वरवर जात राहिले, पण त्यांच्या मूळ स्वभावात मात्र बदल झाला नाही. ते अरविंद इनामदारच राहिले होते. ‘‘रामराम देवा’’ म्हणून दिलखुलास हाक देणारे. पण आता ती हाक कानी येणार नाही. मात्र त्यांचे अस्तित्व कायम राहील, जाणवत राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.