सीने जलन ऑंखो मे तुफानसा क्यूं है ?

विवेक मराठी    19-Nov-2019
Total Views |

मुंबईसारख्या स्वप्नाच्या नगरात प्रत्येकाच्या काळजात धगधगता अंगार आहे आणि डोळयात दबलेले वादळ. प्रचंड अस्वस्थता हृदयात दडवून, येथे प्रत्येक जण जगत आहे. मुझफ्फर अली दिग्दर्शित 'गमन' या सिनेमातील हे गीत. शहरयार यांनी लिहिलेली, जयदेव यांनी दिग्दर्शित केलेली आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली ही गझल, येथील प्रत्येकाच्याच वेदनेला शब्दरूप देते.

 

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी, औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. कारखाने, त्याला लागणाऱ्या सोयी, शहरात असल्याने, विकासाची दिशा शहरांकडे केंद्रित झाली. शहरांची महानगरे झाली.

कामाच्या शोधात गावातून, खेडयातून, नगरातून तरुण पिढी शहरात स्थलांतर करू लागली. इथे येताना, त्यांनी आपली भाषा, आपले रीतिरिवाज, आपली संस्कृती ही शहरात आणली. महानगरात यांचे संमिश्र विश्व आकाराला आले. एकीकडे उच्चभ्रू लोकांच्या गगनाला वेसण घालणाऱ्या इमारती होत्या आणि दुसरीकडे उपनगरे, झोपडपट्टया यांची वाढ होऊ लागली. मिळणाऱ्या वेतनानुसार, श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, दरिद्री असे वर्ग निर्माण झाले. आपापला स्तर बदलावा, तो वाढावा यासाठी धडपड सुरू झाली. माणूस कमालीचा व्यक्तिकेंद्रित झाला. पैशाला अमाप महत्त्व आले. समाजात राहूनही, समाजाशी असलेली सामाजिक आणि सांस्कृतिक नाळ तुटल्याने, माणूस एकटा पडत गेला.

सीने में जलन, ऑंखो मे तुफान सा क्यूं है

इस शहर मे हर शक्स परेशान सा क्यूं है

येथील प्रत्येकाच्या काळजात धगधगता अंगार आहे आणि डोळयात दबलेले वादळ. प्रचंड अस्वस्थता हृदयात दडवून, येथे प्रत्येक जण जगत आहे. मुझफ्फर अली दिग्दर्शित 'गमन' या सिनेमातील हे गीत.

हे गाणे तसे प्रश्नार्थक पण या प्रश्नाला मात्र, कुणाकडेही उत्तर नाही. 'गमन'चा नायक आहे मुंबई शहर. मुंबई, जगण्याचे अनेक मार्ग उपलब्ध करून देणारे शहर. समृध्दीची स्वप्ने दाखवणारे, काही भाग्यवंताच्या बाबतीत ते खरे करणारे शहर. असंख्य लोक, डोळयात स्वप्ने घेऊन, या शहरात येतात. कष्ट करण्याच्या तयारीने येतात. येणाऱ्या प्रत्येकाला ते आश्रय तर देते, सामावून घेते; परंतु त्यांच्या गुणांची, श्रमाची इथे कदर होते का? त्यांना आत्मसन्मान व किमान जीवनमानाचा तरी दर्जा मिळतो का? या प्रश्नांना हा सिनेमा स्पर्श करतो.

सिनेमा आहे ऐंशीच्या दशकातील. तेव्हा प्रीमिअर पद्मिनी टॅक्सी ही मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वाचे साधन होती. पेट्रोलचे भाव कितीही असो, तेव्हाही टॅक्सीचा प्रवास काही जणांनाच परवडणारा होता. ड्रायव्हर बहुधा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधून कामाच्या शोधात आलेले तरुण होते. त्यांच्याशी गप्पा मारताना लक्षात यायचे, सुखाच्या शोधात का असेना, स्वत:च्या जन्मभूमीची नाळ तोडणे, कुणासाठीही वेदनादायकच असते. 'गमन'ची कहाणी आहे अशाच एका टॅक्सी ड्रायव्हरची. गुलाम हसनची (फारुख शेख). उत्तर प्रदेशमधील एका खेडयात राहणारा हा तरुण आपल्या नववधूला आणि आईला सुखात राहता यावे म्हणून पैसे कमावण्यासाठी, मुंबईत काम शोधायला येतो. पैसे नसताना या नवीन शहरात राहण्यासाठी आसरा शोधणे सोपे नाहीच. जेमतेम शरीर टेकता येईल एवढीच जागा त्याला मिळते. आता बायको आणि आईला इथे बोलावणे अशक्य. नवीन लग्न झालेले आहे. पत्नीची ओढ आहे आणि आईची काळजी. गावची जमीन लबाडीने हडपली गेल्याने, आता परत जाण्याचे रस्ते मात्र बंद झाले आहेत.

गावाकडील कृषी संस्कृतीमध्ये जीवन स्थिर होते. येथील जीवन मात्र गतिमान आहे. जगण्याच्या प्रत्येक पायरीवर, स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष अटळ असल्याने, माणसे असंवेदनशील बनली आहेत. ट्रेनमधून प्रवास करताना, प्रवाश्यांच्या मनात एकच इच्छा आहे, ती कामावर वेळेवर पोहोचणे. त्यामुळे गाडीतून पडून एखादा माणूस मृत्यू पावला, तरीही त्याच्यासाठी कुणालाही वाईट वाटत नाही. त्यांच्याकडे तेवढा वेळच नाही. 

दिल है तो धडकने का बहाना कोई ढुंढे

पत्थर कि तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यों है

पोटाची खळगी भरण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी, धावत असणारा येथील प्रत्येकजण आपापल्या विवंचनेत अडकलेला आहे, तिथे इतरांकडे कुठे लक्ष जाणार!

जगण्यासाठीसुध्दा निमित्त लागते. ध्येय लागते. इथे तर प्रत्येक पावलाला लढाई आहे. तिला तोंड देताना माणूस थकून गेला आहे. या थकलेल्या देहात कुणासाठी सहानुभूती असणार! मन मारून जगण्याची एकदा सवय झाली की मनाचाही दगड होतो.

'गमन' या सिनेमात गुलामासारखंच जीवन जगणारी, साध्याशा स्वप्नांवर विश्वास ठेवणारी, ते पूर्ण होईल या आशेत आयुष्य रेटणारी असंख्य माणसे आहेत. बराच काळ मुंबईत घालवूनही, एक छोटीशी खोली घेणेसुध्दा कठीण आहे, हे त्याला मित्राच्या, लल्लूलाल तिवारीच्या, अनुभवातून समजते.

ह्या मित्राचे, एका मुलीवर प्रेम आहे. त्याला तिच्याबरोबर संसार थाटायचा आहे. पण जागेअभावी ही छोटीशी इच्छासुध्दा सहजासहजी पूर्ण होणे कठीण आहे. सुरुवातीला मुंबईचे हे दर्शन पाहून हबकलेला गुलाम हळूहळू मुंबईच्या जीवनाला सरावतो. टॅक्सी चालवायला शिकतो. प्रवाशांच्या अनुभवातून जग जाणायला आणि जगायला शिकतो. त्याच्या टॅक्सीत बसलेला, एक श्रीमंत माणूस, शारीरिक सुखाच्या आशेने, कामाठीपुरा येथील वेश्यावस्तीच्या चकरा मारतो. एक म्हातारा पारसी प्रवासी बदललेल्या मूल्यांचे वास्तव रूप दर्शवतो. एक त्याच्यासारखाच टॅक्सी ड्रायव्हर, आता काम मिळत नाही म्हणून मानसिक संतुलन गमावून बसतो.

तनहाई की ये कौन सी, मंजिल है रफीकों

ता-हद-ये-नज़र एक बयाबान सा क्युं है

महानगरात असमाधानी, निराश मनात भरून उरलेला एकटेपणा, अनेकांच्याकडे वसतीला येतो. कुणाशी जिवाभावाचा संवाद नाही. कारण त्यासाठी आपली माणसे नाहीत. वेळ जात नाही, मग निरर्थक गोष्टीत अर्थ शोधण्याची धडपड सुरू होते. स्वत:पासूनही माणूस दूर पळतो. माणसांचे ओठ हसतात, पण डोळे शून्यात असतात. आवश्यक असलेले मुखवटे घालता घालता स्वत:लाही फसवत असताना, माणसे शेवटी स्वत:चीच ओळख विसरतात.

क्या कोई नयी बात नज़र आती है हम में

आईना हमें देख के हैरान सा क्यों है

जगण्यासाठी धडपड करत असतानाच माणसे स्वप्न पाहत असतात. जिथे पोहोचायचे आहे, ते साधेसे स्वप्न पण या कसरतीत पूर्ण होईल याची शाश्वती नसते. हळूहळू डोळयांच्या फक्त खाचा उरतात. स्वप्ने विरून जातात. या अनोळखी वाटणाऱ्या शहरात एक ओळखीची खूण दिसावी, चेहरा दिसावा यासाठी प्रत्येक माणूस आसुसलेला असतो. शहरे आशा जागवतात आणि पूर्ण आयुष्य त्या आभासाचा पाठपुरावा करण्यात खर्ची पडते.

लल्लूलाल तिवारीची हत्या झाल्याने, गुलाम गावाकडे परतण्याचा निर्णय घेतो; पण तो निर्णय अंमलात आणणे त्याला शक्य होत नाही. पैशाचे सोंग आणणे कधीही शक्य नसते ह्या वास्तवाची जाणीव त्याला महानगरातून बाहेर पडू देत नाही.

शहरात कामाच्या शोधत आलेल्या एका माणसाची ही वेदना. शहरयार यांनी लिहिलेली, जयदेव यांनी दिग्दर्शित केलेली आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली ही गझल, येथील प्रत्येकाच्याच वेदनेला शब्दरूप देते.