चिरंजीवी गिरिजा कीर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक02-Nov-2019
|

***डॉ. विजया वाड***


 

बाई मला खूप आवडायच्या. त्यांची विजयाही हाक कानात अजुनी घुमते. बाईंना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळायला हवे होते, सन्मानपूर्वक. त्यांची शब्दसेवा अपूर्व होती. बालसाहित्य, कथा, कांदबरी, आत्मकथा, प्रवासवर्णन! बाईंचे साहित्य दर्जेदार होते. माझ्यात नि त्यांच्यात साम्य एकच. आम्ही दोघीही बहुप्रसवा! खूप लिहिलं. लोकांना ते आवडलं हे आम्हा दोघींचही भाग्य!

गिरिजाताई आणि मी, आम्हा दोघीत 12 वर्षांचे अंतर आम्ही सार्याच लेखिका त्यांना वाकून नमस्कार करीत असू. त्यांनाही ते आवडे. मी त्यांच्या घरी गेलेले आहे. साहित्य सहवासमध्ये तरुणपणी चार जिने दडादडा चढता येत. अलीकडे माझे गुडघे दुखतात, तरी श्रीयुत कीर गेले तेव्हा मी गेले होते जिने चढून. त्या डोळ्यात बघत म्हणाल्या,‘‘आलीस?’’ अन् मग फक्त हातात हात, नयनात नीर अन् भरून आलेले ऊर!

आम्ही ठाण्याच्या बालसाहित्य संमेलनात बालकथा सांगायला तिघं एकत्र होतो. गिरिजाताई, राजू तांबे नि मी! मी नि राजू कथा सांगून गिरिजाताईंच्या पाठी बसलो होतो. त्या कथा सांगत असताना आम्ही कुजबुजलो. बाईंना राग येणे स्वाभाविक होते. पण त्यांनी आम्हाला माईकवरूनच झापले. ‘‘आपलं झालं ना? आता मला बोलू द्या! गप्प अगदी!’’ काय बिशाद होती आमची काही बोलायची!

चूक आमचीच होती. पण कथाकथन झाल्यावर त्या रागाचा मागमूसही नव्हता. छान गप्पा झाल्या आमच्या. नंतर आम्ही कितीतरी वेळा सभा संमेलनात आपुलकीने भेटलो, भेटत गेलो.

इयत्ता दहावीच्या कुमार भारतीत बाईंच्या साहित्यावर माझा एक रसग्रहणात्मक पाठ आहे. तो मी लिहावा, अशी बाईंची इच्छा होती. किती आनंदले मी. त्यांचे साहित्य झपाटल्यासारखे वाचून काढले. लेख बाईंना फोनवर वाचून दाखविला. तेव्हा म्हणाल्या, ‘‘छान लिहिलंयस विजया. मला एक प्रत पोष्टाने पाठव.

बाईंचं शब्दांवर विलक्षण प्रेम. शेवटपर्यंत लिहिता हात असण्याचं भाग्य त्यांना लाभलं. मी उदयाचलात असताना, पोदारची प्राचार्य असताना, विशेष कार्यक्रमांना त्यांना आवर्जून बोलावले नि त्याही आवर्जून आल्या. मोठे मोठे मानधनाचे आकडे सांगितले नाहीत. जे मला मॅनेजमेंटने मंजूर केले, ते आनंदाने स्वीकारले. मला त्या सांगत,‘‘विजया, फार सकाळी कार्यक्रम ठेवू नको. सकाळी माझा आवाज उठत नाही आणि जे सादर करायचं, ते सर्वोत्तम असावं ही माझी धारणा आहे.’’

चंद्रतनय स्वामींच्या एका कार्यक्रमाला आम्ही दोघी बरोबर गेलो होतो. पुण्याला येता-जाताचा चार-चार तासांचा सहप्रवास! मग एका खोलीत विश्राम! आनंदाची पर्वणी

तेव्हा आपले तुरुंगातले अनुभव बाईंनी सांगितले. जन्मठेपेच्या कैद्यांना बाई भेटत. प्रत्येकाची वेगळी कथा. प्रत्येकाची वेगळी व्यथा नि वेगळी-वेगळी परिस्थिती.

 

‘‘का केला खून?’’ ..महान चूक. ‘‘असं घडायला नको होतं हो बाई! ’’ नि मग अश्रूंचा प्रपात, प्रचंड तगमग.

बाई मला म्हणाल्या,‘‘येरवडा तुरुंगानं मला खूप वेगळं जगच दाखवलं नाही, तर माणसांच्या अंतरंगाचंही दर्शन घडवलं. विजया, माणूस मुळात वाईट नसतो गं! परिस्थिती वाईट असते नि खूनासारखा मोठा वाईट गुन्हा आपल्या हातून घडलाच कसा? याचा विचार मनात येऊन तो माणूस मला म्हणतो,‘असं घडायलाच नको होतं बाई.’ ती त्याची जखमी अवस्था मला साहवत नाही गं विजया.’’

अमेरिकेत कथाकथनाचे प्रयोग करणार्या मला तरी वाटतं त्या पहिल्याच मराठी लेखिका असतील. नंतर अनेकांनी अमेरिका दौरे केले. पण त्या पायोनियर! असे मला वाटते हं! वन ऑफ दी पायोनियर्स तर सौ टका

संसारात मुलांनी, सुनांनी त्यांना कुटुंबसौख्य पुरेपूर दिले. सुखी, समाधानी आयुष्य खूप कमी लोकांना लाभते. पण बाईंना सार्यांनी छान जपले. मायेने, प्रेमाने, आदराने

त्यांचे शंभरावे पुस्तक आले तेव्हा आम्हा सर्व शब्दप्रेमी लेखिकांना खूप आनंद झाला. लता गुठे, गौरी कुलकर्णी या गिरीजाताईंच्या लाडक्या साहित्यिक लेकी होत्या

एक मात्र आहे, इंग्रजी लेखिकांना जसे धनात्मक तृप्ततेचे आयुष्य शब्दकृपेने लाभते, ते भाग्य मराठी लेखिकांना आज एकविसाव्या शतकातही मिळत नाही. ही सार्याच लेखिकांची खंत गिरीजाताईंच्या वाट्यालाही आली.

 

अनुराधाच्या त्या सहसंपादिका होत्या, तेव्हा त्यांनी इतके लिहिले की अक्षरधनाने त्यांचे आयुष्य खर्या अर्थाने श्रीमंत झाले आणि वाचकांच्या आवडत्या लेखिका हे बिरुदही त्यांना मिळाले

मी बालकोश तयार करीत होते. 365 दिवस पुरतील एवढ्या 365 कथा आणि 365 बालकविता. कथा-कविता महाराष्ट्रातील शंभर लेखकांच्या. अकारविल्हे! ते ज्ञ! या कोशवाङ्मयात बाई असणारच नि होत्याही! यातील सारी चित्रे मुलांनी काढली कथा वाचून! पण बाईंची कथा चित्राविना राहिली. ‘‘का रे? चित्र कुठाय?’.. ‘‘गोष्ट समजली नाही,’’ मुलाचे उत्तर. बाईंपर्यंत पोहोचवले. मनावर दडपण होते

‘‘गोष्ट मजकडे परत दे. सोपी करून देते.’’ बाईंचे अगदी सहज उत्तर. इतका आनंद झाला म्हणून सांगू. बाईंनी सोपी केली गोष्ट आणि त्याच मुलाने चित्रही काढले, उत्कृष्ट! ये हुई ना बात

खेड्यातस्कूलटीचरम्हणून करिअर सुरू केलेल्या गिरिजाताई 100च्या वर पुस्तके लिहून अमर झाल्या आहेत. आभाळ भरून आलंय, वीज-वादळ-वर्षा, सर्वोत्कृष्ट गिरिजा कीर... किती किती पुस्तके! नि किती आठवणी! पण येणार्या प्रत्येकाला एक दिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. हे कितीही नकोसं, कटू वाटलं, तरी सत्य आहे. बाई, तुम्हास अखेरचा दंडवत!

 

राहील सदा शब्दांचा तुमचा ध्यास,

शब्दांसोबतचा देशविदेशचा प्रवास,

आमच्या आठवणीत सुंगधी फुलागत

बाई.. तुम्हास बहु आदरे दंडवत दंडवत!’

 

ओम शांती !