'आझादी मार्च'चा फजितवडा!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक20-Nov-2019   
|

पाकिस्तानमध्ये सध्या पंतप्रधान इम्रान खान विरूध्द मौलाना फज़लूर रेहमान यांच्यात रणकंदन सुरू आहे. इम्रान खान यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी रहेमान यांनी केली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये रस्ते अडविण्यात आले. एकूणच इम्रान खान हे मौलनांच्या जाळयात अडकले आहेत. 

पाकिस्तानमध्ये रस्तोरस्ती रणकंदन होईल आणि मग त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना राजीनामा द्यायला लागेल, असे अनेकांना वाटत होते. त्यात 'जमियत उलेमा इ इस्लाम' या पक्षाचे प्रमुख मौलाना फज़लूर रेहमान यांचा प्रामुख्याने समावेश होता. पण बेडूक कितीही फुगवला तरी त्याचा हत्ती बनत नाही, तसेच फज़लूर यांच्या बाबतीत झाले आहे. त्यांनी इस्लामाबादचे सर्व रस्ते अडवायची घोषणा केली आणि त्यासाठी कार्यकत्यांना वेठीला धरले. इस्लामाबादमध्ये त्यांच्यापुढे केलेल्या भाषणात मौलाना फज़लूर रेहमान यांनी 'गिरती हुई दिवार को एक धक्का और दो' अशी घोषणा केली, पण पाकिस्तानी लष्कराच्या बळावर उभी असलेली ही भिंत कोसळली तर नाहीच, तर अधिक भक्कम झाली. उलट जमियतचे कार्यकर्ते थकले आणि त्यांनी गाशा गुंडाळला. हे कार्यकर्ते इस्लामाबादच्या थंडीला सामोरे जाण्याऐवजी चारदोन दिवस रात्री आपल्या नातलगांकडे वा अन्यत्र राहिले. पण असे किती दिवस चालणार? इस्लामाबादचे सर्व कामकाज सुरळीत चालू राहिले. वृत्तपत्रांनाही सुरुवातीला फज़लूर रेहमान यांच्याकडे लक्ष द्याावेसे वाटले. पुढे तेही कंटाळले आणि या नाकेबंदीच्या बातम्या आतल्या पानांवर गेल्या. अखेरीस फज़लूर रेहमान यांनी इस्लामाबादचा आपला तमाशा आवरून त्याऐवजी पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये रस्ते अडवायचा कार्यक्रम हाती घेतला. 

 

इम्रान खान यांनी घेतलेला फायदा

तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात इम्रान खान यांनी 2014मध्ये पाकिस्तान अवामी तेहरिकचे ताहिर उल काद्री यांच्याशी हातमिळवणी केली आणि याच तंत्राने त्यांना आव्हान दिले होते. तेव्हा काद्री संपले, आता कदाचित फज़लूर संपतील. त्या वेळी काद्री यांनी 13 जून 2014 रोजी नवाझ शरीफ सरकारच्या विरोधात 'इन्किलाब मार्च' काढला होता. तेव्हा सुरक्षा रक्षक आणि काद्रीसमर्थक यांची चकमक उडाली आणि त्यात अनेक कार्यकर्ते मृत्युमुखी पडले. काद्री यांनी 10 ऑगस्टपासून हे आंदोलन पुकारले होते. पाकिस्ताननिर्मिती दिनी 14 ऑगस्टला इस्लामाबादमध्ये लष्करी संचलनही होऊ द्यायचे नाही, असा त्यांनी डाव टाकला. इम्रान खान यांना ती आयतीच संधी वाटली आणि त्यात त्यांनी उडी घेतली. इस्लामाबादचे रस्ते अडविण्यात त्यांना तेव्हा यश आले, तरी नवाझ शरीफ यांनी त्यांच्यावर मात केली. इम्रान खान यांनी तेव्हाच्या सभांमधून शरीफ हे मोदींचे हस्तक असल्याचा आरोप केला होता. इम्रान यांनी शरीफविरोधी वातावरणाचा फायदा घेतला.

त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये केवळ लष्कराच्या कृपेवर इम्रान निवडून आले. काद्रींच्याच तंत्राने फज़लूर रेहमान यांनी इम्रान खान यांना धमकावले, पण त्यात त्यांना यश आले नाही. ते आले नाही हे उत्तमच झाले, कारण यात हिंसाचार होऊन इम्रान खान यांचा बळी पडला असता, तर फज़लूर हे धर्मांध नेते त्यांच्या आवाक्यापेक्षा अधिक मोठे बनवले गेले असते.डथ रेहमान यांच्या धरण्यांमध्ये प्रामुख्याने म्हातारे-कोतारे, मध्यमवयीन दिसत होते, तर तेव्हा इम्रान यांच्या उडीने त्यात तरुण मंडळी खेचली गेली. त्या वेळी नवाझ शरीफ यांनी वापरलेले तंत्रच इम्रान यांनी आता वापरले. इस्लामाबादला दरम्यान पाऊस झाला, तेव्हा या सर्व धरणेबाजांना इम्रान खान यांनी आश्रय पुरवला. त्यांनी फज़लूर यांच्याशी चर्चा करायला पंजाब विधिमंडळाचे सभापती परवेझ इलाही यांना पाठवून दिले. इम्रानखान यांनी राजीनाम्याची मागणी वगळता त्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली. मात्र त्या इतर मागण्यांमध्ये फारसा दम नव्हता. इम्रान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ हा पक्ष गेल्या वर्षी लष्कराच्या पाठिंब्याने सत्ता काबीज करून बसला, हे सगळया जगाला माहीत आहे. पाकिस्तानी लष्कराला भुट्टो खानदानाची पाकिस्तान पीपल्स पार्टी किंवा नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग यांच्यापैकी कोणीही सत्तेवर नको आहे. त्यापेक्षा त्यांना बडबडखानांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ हा पक्ष चालणार आहे. इम्रान खान यांच्या हातून मोठया चुका होत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पक्ष लष्कराला चालणार आहे. त्यातून लष्करप्रमुख ख्वाजा कंवर बाज्वा यांना आणखी मुदतवाढ मिळाल्याने त्यांची तक्रारही उरलेली नाही. इम्रान खान यांनी राजीनामा दिला तर अन्य कोण सत्तेवर यायला हवे, हे मौलाना फज़लूर सांगत नाहीत. याचा अर्थ त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी जर नॅशनल असेंब्ली बरखास्त केली नाही, तर त्यांच्याच पक्षाचा कोणी सत्तेवर येऊ शकतो. त्यांचे सरकार बडतर्फ करून नव्याने निवडणुका घेतल्या जायला हव्यात, ही मौलानांची मागणी होती, पण ती दिवाळखोर पाकिस्तानला सध्या तरी परवडणारी नाही. आपल्या राजीनाम्याच्या मागणीला इम्रान दाद देत नाहीत म्हटल्यावर फज़लूर यांनी इस्लामाबादमधून काढता पाय घेणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेद देण्यासाठी चारही प्रांतांमधले रस्ते अडवायची दुसरी योजना बनवली. क्वेट्टा-चमन रस्ता बंद केला. त्यांनी कराचीचे रस्ते अडवायचा प्रयत्न केला. ते इतरही रस्ते बंद करणार आहेत. त्यात त्यांना यश येईल असे नाही. या सगळया अडवाअडवीच्या खेळातून फज़लूर यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान मुस्लीम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांनी काढता पाय घेतला. नव्याने निवडणुकांना सामोरे जायला हवे, ही जमियत उलेमा इ इस्लामची मागणी मान्य होणारी नाही. त्याने काहीही साध्य होणार नाही. मौलानांनी मागल्या रविवारपर्यंत इम्रान खान यांना राजीनाम्यासाठी मुदत दिली, पण ती उलटल्यावरही इम्रान आहेत तिथेच आहेत.

 

पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीच्या नव्याने निवडणुका घ्यायच्या, तर तिथल्या प्रांतांच्या विधिमंडळांनाही बरखास्त करावे लागते. निवडणूकपूर्व नव्वद दिवसांमध्ये काळजीवाहू नियुक्त पंतप्रधानांचा कारभार चालतो. ते कोणत्याही पक्षाचे नसतात. तिथल्या कायद्याानुसार निवडणुका या तीन महिन्यांच्या अवधीतच पार पडणे आवश्यक असते. राजीनाम्याच्या अटीखेरीज मौलानांच्या इतरही काही अटी आहेत. मौलानांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख ख्वाजा कंवर बाज्वा यांनाही इशारा दिला. त्यांनी लष्कर अंगावर घालून दडपशाही केली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असे म्हटले, पण त्यांचे हे बोल ऐकायला समोर कार्यकर्तेच उरलेले नव्हते. 

 

 

मौलानांची राजकीय महत्त्वाकांक्षा

 

 

मौलाना फज़लूर रेहमान हे लष्करशाहीचे अपत्य नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यांना वापरून घेतले गेले आहे. पाकिस्तानमध्ये झिया उल हक हे सत्तेवर असताना, त्यांच्या विरोधात लोकशाहीच्या फेरस्थापनेसाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन चालवलेल्या आंदोलनात मौलानांनी भाग घेतलेला होता. त्यानंतर त्यांना याच पक्षांनी राजकारणात नको तेवढे महत्त्व दिले. फज़लूर यांचे वडील मौलाना मुफ्ती महमद यांच्या पाठिंब्यासाठी झियांचे प्रयत्न होते. त्यांना ते आपल्या मजलिस ए शूरामध्ये घेऊ इच्छित होते. त्यानंतरच्या काळात मौलानांना राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या, पण त्या कधीच पूर्ण झाल्या नाहीत. पाकिस्तानमध्ये धर्मांध राजकीय पक्ष कधीच यशस्वी होत नाहीत, हे पाकिस्तानच्या राजकारणाचे एक वैशिष्टय आहे. पाकिस्तानचा जमात ए इस्लामीसारखा पक्ष असो की जमियत उलेमा इ इस्लाम, त्यांच्या दोन-चार जागा निवडून येण्याव्यतिरिक्त ते मतदानावर फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत. मात्र त्यांनी शिट्टी वाजवायचा अवकाश की रस्तोरस्ती गर्दी जमते. त्या गर्दीचीच त्यांना भुरळ असते. त्यातून त्यांना नाही म्हटले तरी आसुरी आनंद मिळतो. तसाच तो मौलानांनी घेतला. हे मौलाना फज़लूर रेहमान पाकिस्तानातल्या सर्व मदरशांचे प्रमुख आहेत. त्यामुळे सर्व पक्ष त्यांच्यापासून सांभाळून असतात. यापलीकडे त्यांचे महत्त्व शून्य आहे. एकदा ते 'ट्रॅक टू डिप्लोमसी'अंतर्गत 2003मध्ये भारतात येऊन गेले आहेत, पण त्याव्यतिरिक्त त्यांच्या नावावर जमा काही नाही. 

 

 

इस्लामाबादच्या रस्त्यावर धरणे धरणाऱ्या जमियतवाल्यांना पाकिस्तानी लष्कराने अडवून ठेवले, तरी त्यातल्या कोणाला आत टाकले नाही. मात्र जरा जास्त गडबड त्यांनी केली तर अगदी टोकाचा प्रतिसाद मिळेल, अशी लष्कराने तंबी दिली. त्यासाठी त्यांनी मोठमोठे कंटेनर रस्त्यात आणून उभे केले. त्यावर रेहमान यांचे म्हणणे असे की, त्यावरून उडया मारून इस्लामाबादपर्यंत पोहोचण्याचे आमचे प्रयत्न असतील. पण त्यांनी एकदाही उडी मारली नाही. मौलानांनी पाकिस्तानी लष्कराला 'तुम्ही आमच्या धरण्यात हस्तक्षेप कराल तर याद राखा' असा दम दिला, पण तोही यथातथाच होता.

 

 

समजा, *इम्रानखान यांनी राजीनामा दिला तर मौलाना फज़लूर रेहमान हे त्यांच्या आकारापेक्षा खूप मोठे होतील ही लष्कराला वाटणारी भीती होती. तसे घडणे फक्त कल्पनेतच शक्य होते. पाकिस्तानी लष्कर हे कडवे देवबंदीसमर्थक आहे. म्हणजेच त्यांच्यात आणि फज़लूर रेहमान यांच्यात अगदी काडीइतकाच फरक आहे.* आजवर पाकिस्तानात अल्ला, आर्मी आणि अमेरिका यांचेच राज्य चालायचे असे म्हटले जात असे. त्यापैकी अमेरिकेचे वर्चस्व संपले, पण तिथे चीन आला आणि अमेरिकेची आठवणही होणार नाही इतकी मदत चीनकडून पाकिस्तानला मिळू लागली. ही मदत धर्मादाय किंवा मैत्रिपूर्ण देणगी अशा स्वरूपात नाही, तर ती कर्जाऊ रूपाने आहे. म्हणजेच ती फेडायची वेळ येईल, तेव्हा पाकिस्तानचे डोळे पांढरे होतील आणि तेव्हा कदाचित त्यांना अमेरिका आठवेल. 

 

 

मौलानांचे दुखणे

 

 

मौलाना हे खट्टकच्या दारूल उलूम हक्कानियाचे राजकीय फळ आहे. ते अफगाण तालिबानांचा नेता मुल्ला महमद उमर याला कनिष्ठ होते. हे दोघेही मौलाना समिउल हकचे 'विद्यार्थी' होत. गेल्या 39 वर्षांत ते जमियत उलेमा इ इस्लामचे अमिर बनले. 1980च्या दशकात त्यांचे राजकारण अनेकांना बुचकळयात पाडून गेले. त्यात डावे उदार मतवादी होते, तसे उजवे धर्मांधही होते. आज त्यांच्याबरोबर स्वत:ची फरफट होऊ देणाऱ्या राजकीय पक्षांना ते पेचात टाकत आहेत. नवाझ शरीफ असोत की त्यांची कन्या मरियम, किंवा बंधू शाहबाज आणि बिलावल भुट्टो असोत की त्यांचे वडील आसिफ अली झरदारी, यांच्यापैकी कोणालाच सध्या स्वतंत्र आवाज राहिलेला नाही. त्यांच्यावर स्वतंत्रपणे भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेत आणि त्यांना पाकिस्तानी न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. स्वाभाविकच त्यांची कोंडी होत आहे. मौलानांचे दुखणे काय? तर ज्या इम्रान खानांना ते राजकारणात अतिशय कनिष्ठ मानतात, त्यांनी मियांवलीमध्ये मौलानांचा पराभव केला आहे. मौलाना फज़लूर रेहमान हे एकदा राष्ट्रीय असेंब्लीमध्ये पंतप्रधानपदासाठी एका मताने जफरुल्लाखान जमाली यांच्याकडून पराभूतही झाले आहेत. ही त्यांची आणखी एक दुखणाईत बाजू. 

 

एक काळ असा होता की मौलानांचा पक्ष जमियत उलेमा इ इस्लाम खैबर पख्तुनख्वाच्या प्रांतिक विधिमंडळात इतरांबरोबर सत्तेत होता. आज तिथे त्यांच्या हातून सत्ता गेली आणि ती इम्रान खानांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या हाती पडली. स्वाभाविकच तिथे असलेल्या धार्मिक झुंडशाहीला काही प्रमाणात आळा बसला. म्हणजे पाकिस्तान मुस्लीम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्या दृष्टीनेही तिथे धोकाच आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये इम्रान खान यांना लोकप्रियता मिळाली ती त्यांनी पाकिस्तानी लष्कराला 'फटा' भागात कारवाई करण्यास आव्हान दिले तेव्हापासून. त्याच्या जोरावरच त्यांचा पक्ष त्या प्रांतात सत्तेवर आला. ही मौलानांची आणखीही दुखरी बाजू आहे. अशा परिस्थितीत या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांची अवस्था 'धरले तर चावते आणि सोडले तरी चावते' अशीच आहे. सर्वात वाईट अवस्था आजारी असणाऱ्या आणि इम्रानकडून छळ सोसणाऱ्या नवाझ शरीफ यांची आहे. मधल्या काळात शरीफ यांची नाडी लागत नव्हती आणि ते काही काळच सोबती आहेत, असे वाटत होते. तेव्हा इम्रान खान यांची पाचावर धारण बसली होती. त्यातून ते तूर्त सुटले आहेत.