कृतज्ञ मी, कृतार्थ मी - मा. वेंकय्या-श्रीमती उषा नायडू.

स्रोत: विवेक मराठी    दिनांक25-Nov-2019
|

नवे सदर - सखी सूत्र 

***मेधा किरीट***

 वेंकय्याजींच्या आजवरच्या वाटचालीबाबत उषाजी पूर्ण समाधानी आहेत. त्यांचा त्याग, कष्ट, पारदर्शक आणि प्रामाणिक मन, तसेच सर्वसामान्य माणसाबद्दल कळवळा ही वैशिष्टये उषाजींना विशेष भावतात. जोडीदाराविषयी हाच प्रश्न जेव्हा मा. वेंकय्याजींना विचारला, तेव्हा हा भाषाप्रभू क्षणभरासाठी मूक झाला. हळवे होत ते फक्त इतकेच बोलू शकले, ''God's Gift - प्रभूची कृपा.''

 

भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. वेंकय्या नायडू, आज भारताचे उपराष्ट्रपती आहेत. दोन वर्षांपूर्वी, 11 ऑगस्ट 2017 रोजी त्यांनी उपराष्ट्रपतिपदाची शपथ ग्रहण केली. त्याआधी काही दिवस याबाबत पार्टीच्या वतीने त्यांना कळवण्यात आले. इतक्या उच्च पदावर नियुक्ती होणे ही अभिमानाची बाब असल्याने अन्य कोणत्याही व्यक्तीला या घोषणेने नक्कीच आनंद झाला असता. पण वेंकय्याजींच्या डोळयात अश्रू तरळले. ते अश्रू आनंदाचे नव्हते, तर वियोगाचे होते.

'या सांविधानिक पदाने आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, आपल्याकडून ज्या अपेक्षा असणार आहेत त्यांच्या पूर्तीसाठी यापुढे पार्टी कार्यकर्ता म्हणून काम करता येणार नाही. पार्टीच्या कार्यालयात जाऊ शकणार नाही. पार्टीमध्ये किंवा पार्टीच्या वतीने बोलू शकणार नाही,' या पक्षवियोगाचे प्रतिबिंब त्या अश्रूंमध्ये उमटले होते. त्यांच्या पक्षावर असलेल्या अविचल निष्ठेचे दर्शन त्यातून घडत होते.

या संदर्भात बोलताना मा. वेंकय्याजी म्हणाले, ''मी सव्वा वर्षाचा असतानाच माझी आई वारली. माझ्या आयुष्यातली आईची रिक्त असलेली जागा मला कायम दु:ख देत असे, सलत असे. मात्र मी जेव्हा संघाचे, अभाविपचे, जनसंघाचे आणि सरतेशेवटी भाजपाचे काम करू लागलो, तेव्हा मनातली आईची रिक्त जागा या विचारसरणीने घेतली. या विचारसरणीने मला घडवलं, वाढवलं, माया केली, मोठं केलं. असे आंतरिक संबंध असलेल्या पार्टीशी उद्यापासून नातं तोडायचं या जाणिवेने मला वाईट वाटलं. असं असलं, तरी पार्टीचा आदेश मी नेहमीच शिरसावंद्य मानला. पुत्र ज्याप्रमाणे आपल्या मातापित्याचे ऋण मानतो, त्यातून उतराई होण्याची मनीषा बाळगतो, तीच माझी भावना आहे आणि पुढेही कायम राहील.''

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

शब्दप्रभू, उत्तम वक्ता, कुशल संघटक, जबाबदार प्रवक्ता, पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशी वैविध्यपूर्ण ओळख लाभलेला हा नेता मुळात अतिशय तरल, भावनाप्रधान व्यक्ती आहे, हे त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले.

सामाजिक कार्य हा मूळ उद्देश साधण्यासाठी राजकारण हे साधन असे मानणाऱ्या तत्त्वनिष्ठ राजकारण्यांची जी मांदियाळी आणीबाणीच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघाली, त्यांच्यापैकी वेंकय्याजी हे एक. मा. वेंकय्याजींच्या 'स्वर्ण भारत' या स्वयंसेवी संस्थेचे काम आंध्र प्रदेश, तेलंगण आणि आसपासच्या प्रदेशात पसरलेले आहे. या कामाची जबाबदारी आता त्यांच्या मुलीने घेतली आहे. स्व. नानाजी देशमुखांचे काम हे त्यांच्यापुढील आदर्श. नानाजींनी जसा राजकारणातून संन्यास घेत चित्रकूट येथे काम उभे केले, तसे पूर्णवेळ काम राजकीय निवृत्तीनंतर करण्याची मा. वेंकय्याजींचीदेखील आंतरिक इच्छा आहे. 2016 सालापासून पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला तसे त्यांनी सांगितलेही आहे. मात्र तूर्तास तरी पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्याचे स्वप्न त्यांनी देशहितासाठी आणि पक्षादेशामुळे बाजूला ठेवले आहे.

 

मा. वेंकय्याजी मूळचे नेल्लोरजवळच्या चेवटपालम या गावचे. एका शेतकरी कुटुंबात रंगय्या नायडू आणि रमणाअम्मा या दांपत्याच्या पोटी 1 जुलै 1949 रोजी त्यांचा जन्म झाला. आई लहानपणीच वारल्यामुळे, ते आणि त्यांची बहीण कौसल्याअम्मा, यांचे संगोपन आजी-आजोबांनीच केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बुच्चीरेड्डी पालेम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. नेल्लोर येथील व्ही.आर. महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रातील पदवी प्राप्त केली. उच्चशिक्षणाची ओढ त्यांना विशाखापट्टणम येथे घेऊन गेली. आंतरराष्ट्रीय कायदे यात विशेष अभ्यास करून त्यांनी आंध्र विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्याच काळात ते विद्यार्थी चळवळीचेसुध्दा नेतृत्व करीत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठीय विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

 

बालपणातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जुळली. विद्यार्थिदशेत असताना अ.भा.वि.प.चे काम करू लागले. 1972 साली जेव्हा 'जय आंध्र चळवळी'ने जोर धरला, तेव्हा काकाणी वेंकटरामण यांच्या नेतृत्वाखाली मा. वेंकय्याजी नेल्लोर विभागाचे नेतृत्व करत होते.


ते दिवसच अशांततेचे
, चळवळीचे होते. देशातील युवक देशातील परिस्थितीने गांजला होता. हा उद्वेग रस्त्यावर आला तो जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी घोषणेने स्थापन झालेल्या 'छात्र युवा संघर्ष वाहिनी'च्या रूपाने. स्व. नानाजी देशमुख जयप्रकाशजींच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. रा.स्व. संघसुध्दा या लढयात सामील झाला. त्या वेळी मा. वेंकय्याजी आंध्र प्रदेशाचे नेतृत्व करत होते. आणीबाणीविरोधात त्यांनी सत्याग्रह केला आणि त्यांना सरकारने तुरुंगात टाकले.


1977 ते 1980 या दरम्यान ते युवा मोर्चाचे प्रमुख होते.


तीक्ष्ण बुध्दिमत्ता
, भाषेवर प्रभुत्व आणि खुमासदार वक्तृत्व या गुणविशेषांमुळे अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. संघटनेत उच्च पदाची जबाबदारी निभावू लागले. सर्वात प्रथम त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली. तो त्यांच्या जिव्हाळयाचा विषय होता आणि त्या विषयाचा अभ्यासही होता. त्या वेळेस ते आंध्र विधानसभेत आमदार झाले. भाजपामध्ये राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पदांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. 1998पासून उपराष्ट्रपती होईपर्यंत ते राज्यसभेत खासदार होते. दक्षिण भारतीय भाषांप्रमाणेच, इंग्लिश आणि हिंदी भाषांत श्लेष करत भाषण करणे ही त्यांची एक खासियत. संघर्षमय आणि त्यागपूर्ण जीवन जगलेले मा. वेंकय्याजी, 1996 ते 2000पर्यंत राष्ट्रीय प्रवक्ता होते. 2002 साली ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्याआधी मा. वाजपेयीजींच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. या सगळया प्रवासात, पक्ष जे सांगेल ते करणारा निष्ठावान कार्यकर्ता हीच त्यांची खरी ओळख.


या लेखासंदर्भात मुलाखत घेण्यासाठी जेव्हा त्यांच्या पत्नी श्रीमती उषाजी यांच्याशी बोलले
, तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता त्या लगेच तयार झाल्या. मात्र या संवादात एक अडचण होती, ती म्हणजे भाषेची. यावर त्यांची मुलगी दीपा यांनी एक तोडगा काढला. उषाजी जे तेलगूतून सांगतील ते इंग्लिशमध्ये लिहून देण्याची तयारी दीपा यांनी दर्शवली. त्यांच्या सहकार्यामुळेच या ज्येष्ठ नेत्याच्या सहचरीचे अंतरंग समजून घेता आले.


आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील श्रीरामपुरम गावात उषाजींचा जन्म झाला. स्व. अल्लुरी चिन्ना मस्तनिय्या आणि स्व. कौशल्या अम्मा यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. वडील शेतकरी होते आणि आई गृहिणी. उषाजींचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. त्यांच्या घरचे वातावरण आणि वळण परंपरागत चालीरितींना मानणारे होते. त्या वेळच्या प्रथेनुसार लहान वयातच विवाह झाला. वेंकय्याजींचे स्थळ नात्यातले असल्याने दोन्ही घरांना एकमेकांची माहिती होती. मुलाचे शिक्षण
, वागणूक आणि घर पाहून घरातल्या मोठयांनी हा विवाह जुळवला. विवाहानंतर मा. वेंकय्याजींमुळे संघाच्या विचारसरणीशी उषाजींचा परिचय झाला. वेंकय्याजींच्या कामाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. त्यांच्या कामामुळे संघ, संघकार्य हे उषाजींच्या आस्थेचे, आपुलकीचे विषय झाले ते कायमचे. सरत्या काळाबरोबर वेंकय्याजी जे काम करत आहेत, ते चांगले आहे, समाजहिताचे आहे यावरचा त्यांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला.

घर सांभाळणे ही उषाजींची मुख्य जबाबदारी होती. ती त्यांनी आनंदाने स्वीकारली आणि यशस्वीपणे पार पाडली. लग्न लवकर झाल्याने सुरुवातीच्या काळात घरातल्या वडीलधाऱ्यांना मदत हे मुख्य काम असे. हळूहळू त्यात वाढ होत गेली. आपल्या पतीने स्वत:ला पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतले आहे याची उषाजींना जाणीव होत गेली. त्यांच्या कामाला पत्नी म्हणून त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. घर, संसार, नातेवाईक, गावातील संबंध, मुलांना वाढवणे, त्यांना चांगले वळण लावणे याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली आणि प्रापंचिक तापांपासून वेंकय्याजींना मुक्त ठेवले. घरातल्या जबाबदाऱ्या निभावताना कुचराई तर दूरच, त्याबाबत तक्रारीचाही कधी सूर लावला नाही. त्यामुळेच वेंकय्याजी आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले.

''आजच्या तरुण मुलींना कदाचित हे पटणार नाही, पण घर-संसार सांभाळणं हेच माझं ध्येय आणि करियर होतं. पक्षाच्या, संघपरिवाराच्या कार्यकर्त्यांचं आतिथ्य करणं, त्यांची काळजी घेणं, मतदारसंघातील लोकांच्या अडचणी ऐकणं, सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहणं हाही माझ्या कामाचा भाग होता. ते सर्व मी आवडीनं केलं.'' उषाजींनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ''जरी मी राजकारणात सक्रिय भाग घेतला नाही, तरी तिथल्या सर्वांशी जिव्हाळयाचं नातं निर्माण करून ते जपणं हे मी मन:पूर्वक केलं. त्यामुळे आजही माझं सगळयांशी आपुलकीचं नातं आहे. मला आवर्जून भेटायला येणारेही अनेक आहेत. त्याचबरोबर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मी आवडीने स्वीकारली होती. त्यात माझा आनंद होता. पतीला त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सांसारिक व्यापातून दूर ठेवणं आणि त्याच्या कामात मन:पूर्वक साथ देणं हादेखील मोठा पाठिंबा असतो. खूप तरुण वयात त्यांना आमदार म्हणून निवडून आलेलं पाहिलं. हा एक माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग आहे. त्यानंतर ते राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले, खूप अभिमान वाटला. त्यांना मंत्री म्हणून आणि आता उपराष्ट्रपती म्हणून काम करताना पाहणं हा एक सुखद अनुभव आहे.''

 


रा.स्व.संघाच्या मुशीत तयार झालेल्या कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे राष्ट्रभक्ती
, समाजकारण, सेवा आणि त्याग यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणीबाणीविरोधी चळवळीत सहभागी झाल्याने कठोर तात्विक पाया मिळाला. त्यानंतर किरीट सोमैया यांच्यासारखा समविचारी, ध्येयनिष्ठ जीवनसाथी मिळाला. त्यांच्याबरोबरच्या सहजीवनात संघर्षमय सहजीवनाची सवय अंगी बाणली. त्यांच्या खासदारकीच्या कालखंडात दिल्लीत बराच काळ राहण्याचा योग आला. तिथे पक्षातल्या अन्य खासदार/मंत्र्यांच्या पत्नीशी परिचय झाला. मैत्र जुळलं. आमच्यासारखं अनेकांचं दांपत्यजीवन हे 'सखा- सखी' सूत्रात बांधलेलं आहे याची जाणीव झाली.

या सख्यांची खासियत अशी की, त्यातल्या बहुतेकींनी आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने स्थान निर्माण केलं होतं. कर्तबगारीत त्याआपल्या जोडीदारापेक्षा कांकणभरही कमी नव्हत्या, पण प्रसिध्दीच्या वलयापासून अंतर ठेवून होत्या. त्यांची नोंद इतिहासात व्हावी अशीही त्यांची मनिषा नाही. पण त्यांच्या जीवनकथेतून पुढील पिढीला मार्गदर्शन व्हावे असे मला वाटले. त्यासाठी हा लेखनप्रपंच. या सखी सूत्रातून त्यांच्या सहजीवनाची एक छोटीशी झलक दाखवण्याचा प्रयत्न आहे. 'सखी सूत्र' म्हणजे माझ्या सख्यांचे त्यांच्या सख्याबरोबरचे प्रेमरज्जू आहेत.

हे लिखाण सर्वस्वी माझे आहे. त्यामुळे ह्याची सर्व जबाबदारी माझी आहे. किरीटजी, नील सोमैया किंवा अन्य कुणीही हे लेखन प्रकाशित होण्याअगोदर वाचलेले नाही, हे आवर्जून नमूद करते.

या लेखमालेची सुरुवात भारताचे उप राष्ट्रपती मा. वेंकय्या नायडू आणि त्यांच्या पत्नी उषा नायडू यांच्यावरील लेखाने करताना आनंद होत आहे.

 - मेधा किरीट

 मुलांविषयी सांगताना उषाजींच्या शब्दांमध्ये त्यांच्याविषयीचे कौतुक, अभिमान डोकावत होता. ''आमच्या मुलांनी लहानपणापासूनच वडिलांची तत्त्वनिष्ठा आणि त्यांचं सच्चरित्र पाहिलं. मुलांना त्यांच्या वडिलांचा अभिमान आहे. त्यांचा आदर्श नकळत मुलांनीही अंगीकारला आहे. ते दोघे त्याच मार्गावरून वाटचाल करत आहेत.'' वेंकय्याजी आणि उषाजी यांना हर्षवर्धन आणि दीपा ही दोन मुले आहेत. दोघेही उच्चशिक्षित आणि राजकारणापासून दूर आहेत. हर्षवर्धन यांचा स्वत:चा व्यवसाय आहे, तर मुलगी दीपा या वेंकय्याजींच्या 'स्वर्ण भारत ट्रस्ट'चे काम पाहतात. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठे काम उभे केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि विकासाचा विचार केंद्रस्थानी ठेवून या संस्थेचे काम चालते.

वेंकय्याजींच्या आजवरच्या वाटचालीबाबत उषाजी पूर्ण समाधानी आहेत. त्यांचा त्याग, कष्ट, पारदर्शक आणि प्रामाणिक मन, तसेच सर्वसामान्य माणसाबद्दल कळवळा ही वैशिष्टये उषाजींना विशेष भावतात. त्या म्हणाल्या, ''बालपणातील खडतर आयुष्यापासून बोध घेऊन जी भूमिका, जे काम, जी तत्त्वं त्यांनी जीवनाच्या सुरुवातीलाच स्वीकारली त्यापासून ते कधीही दूर गेले नाहीत. स्वयंशिस्त, विचारधारा हा त्यांच्या कार्याचा पाया आहे.

 

अगदी लहान वयातच ते मातृसुखाला पारखे झाले. त्यांच्या नातेवाइकांकडून त्यांना समजलं की वेंकय्याजींनी खूप शिकावं, हे त्यांच्या आईचं स्वप्न होतं. त्यांनी वकील व्हावं अशी आईची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या आईची इच्छा पूर्ण केली याचं मला कायम कौतुक वाटत आलं आहे. ते वकील झाले. खूप कर्तबगार झाले. त्यांच्यासारखा जोडीदार मला लाभला ही माझ्यावर देवाने आणि दैवाने केलेली मेहेरनजर आहे असं मी मानते'' असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

जोडीदाराविषयी हाच प्रश्न जेव्हा मा. वेंकय्याजींना विचारला, तेव्हा हा भाषाप्रभू क्षणभरासाठी मूक झाला. हळवे होत ते फक्त इतकेच बोलू शकले, ''God's Gift - प्रभूची कृपा.'' हे उषाजींचे केवळ कौतुक नाही, तर मन:पूर्वक साथ देणाऱ्या सहचराविषयी वेंकय्याजी किती कृतज्ञ आहेत, त्याचे प्रतिबिंब त्या दोन शब्दांमध्ये सामावले आहे.

थोडे थांबून ते पुढे म्हणाले, ''मी नक्की काय करतो याबद्दल पूर्णपणे माहीत नसतानाही तिने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. मी जे करतो आहे ते समाजाच्या भल्यासाठीच आहे याची तिला पूर्ण खात्री होती. त्यामुळे तिने आनंदाने मला पाठिंबा दिला. सर्व प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची धुरा स्वत:च्या शिरावर घेतली, समर्थपणे वाहिली. मला त्यासाठी काहीही तोशिस पडली नाही. आणखी काय हवं?''

वेंकय्याजींच्या शेवटच्या प्रश्नार्थक वाक्यातच उत्तर सामावले आहे. हेच ते 'सखी सूत्र', जे उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा तोल सांभाळते, त्यांच्या आयुष्याच्या पाया बनते, त्यांना सगळया व्यवधानांशी बांधून ठेवते. उषाजी यात पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत आणि त्याविषयीची कृतज्ञता वेंकय्याजींच्या मनात आहे. खरेच, याहून आणखी काय हवे?

[email protected]