'वात्सल्य'मूर्ती गजानन दामले

स्रोत: विवेक मराठी    दिनांक25-Nov-2019
|

***संजीवनी रायकर***

गजानन दामले हे तन, मन, धन या सर्व दृष्टींनी पूर्णपणे वाहून घेतलेले एक सेवाभावी, निष्ठावंत व सच्चे कार्यकतर्े, कर्तव्यकठोर आणि तितकेच प्रेमळ असे वात्सल्याचे आधारस्तंभ. जिद्द आणि स्वकर्तृत्व यांच्या जोरावर एक सामान्य व्यक्ती शिखरावर जाऊन पोहचू शकते, याचा वस्तुपाठच ऋषितुल्य गजानन दामले यांनी दिला आहे.
'वात्सल्य' संस्थेचे संस्थापक, विश्वस्त व कार्यवाह असलेले गजानन दामले - वय वर्षं 92 यांचं दि. 15 नोव्हेंबर रोजी दु:खद निधन झालं. अकाली म्हणता येणार नाही. तरीही तरुणाला लाजवेल अशा तडफेने ते कार्यरत होते. शेवटची 3-4 वर्षं थोडंसं विस्मरण आणि शारीरिक व्याधी यांनी ते त्रस्त होते. तरीही संस्थेचं काम अखंडपणे सुरूच होतं.

त्यांच्या निधनानंतर संस्थेच्या स्थापनेपासूनचा जीवनपट डोळयांसमोर तरळू लागला. सन 1979च्या मे महिन्यात 'विश्व हिंदू परिषदे'तर्फे माथेरानच्या वनवासी केंद्राला भेट देण्याचं ठरलं. तिथे दामले, अनंतराव कुलकर्णी, विनोद निजसुरे, डॉ. आठवले असे मुंबईचे कार्यकर्ते एकत्र आलो. अधूनमधून कधी माझ्या घरी शिवडीला, कधी आठवले यांच्याकडे दादरला, तर कधी चंपकनाथ यांच्या खारच्या घरी आम्ही भेटत असू.

 

अनंतरावांच्या सूचनेवरून 1980च्या मे महिन्यात मी गोव्याच्या मातृछायेत एक महिना मुक्काम ठोकला. परत आल्यानंतर आमच्या बैठकीत आपण अनाथ मुलांसाठी अशीच संस्था सुरू करावी, असं ठरलं. आम्ही 4-5 जण गाडी करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध संस्थांना भेटी दिल्या. पुण्याच्या कार्यालयात संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.

संस्थेचं रजिस्ट्रेशन करणं, घटना तयार करणं अशा अनेक गोष्टी तज्ज्ञ मंडळींच्या सहकार्याने करण्यात आल्या. आता जागेची शोधाशोध सुरू झाली. अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी कांजूरला जुन्या जागेचं नूतनीकरण करण्यासाठी इमारतींचं काम सुरू होणार हे समजलं. लगेच एक ब्लॉक घेण्याचं ठरलं. पण पैसा कुठून आणणार? षण्मुखानंद सभागृह घेऊन प्रसिध्द गायकाचा संगीताचा कार्यक्रम तिकीट लावून करण्याचं ठरलं. या उपक्रमात फारसा निधी जमला नाही. ती दगदग आपल्याला परवडणारी नाही. शेवटी देणगीची पुस्तकं काढून ओळखीची मंडळी, हितचिंतक यांच्याकडून निधी संकलनाचं काम हाती घेतलं आणि जागा मिळवली.

 

जागेचा ताबा मिळण्यापूर्वीच एक लहान अनाथ मुलगी आमच्याकडे अाली. तिला आम्ही गोव्याला मातृछायेत पाठवलं. अट ही की आमची जागा तयार झाल्यानंतर ती मुलगी पुन्हा आमच्याकडे पाठवायची. ती शकुनाची मुलगी आम्ही आणली. हळूहळू मुलं मिळू लागली. या मुलांचं संगोपन करून त्यांना दत्तक पालकांकडे सुपुर्द करणं, त्या मुलांचं शिक्षण, त्यांच्यावर उत्तम संस्कार करू शकतील असे पालक शोधणं, मुलं ही आपल्या राष्ट्राची संपत्ती, त्यांना इथलेच पालक मिळवून देणं हा हेतू डोळयासमोर होता. कधीकधी रत्नागिरी, जळगाव या ठिकाणीही जावं लागे. स्वत: दामले दुसऱ्या कार्यकर्त्याला घेऊन जात. प्रवास लाल डब्याच्या एसटीतूनच. कमीत कमी खर्च करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. 'मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे' असा त्यांचा स्वभाव होता. तन, मन, धन या सर्व दृष्टींनी पूर्णपणे वाहून घेतलेला एक सेवाभावी, निष्ठावंत व सच्चा कार्यकर्ता, कर्तव्यकठोर तितकंच प्रेमळ असे वात्सल्याचे आधारस्तंभ, मायेचं छत्र आज नाहीसं झालं. सर्व काम शिस्तीत आणि वेळच्या वेळी झालं पाहिजे यावर त्यांचं बारीक लक्ष असे. 

दत्तक मुलांच्या घरी बारसं, वाढदिवस, मुंज, लग्न आदी कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहत. त्यांनी सर्वांशी जणू नात्याचे संबंध जोडले होते. विलेपार्ले ही त्यांची कर्मभूमी. तिथल्या प्रत्येक घरात 'वात्सल्य'चं पत्रक घेऊन देणगी गोळा करण्याचं काम करत. पार्लेभूषण आदी अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

 

'वात्सल्य'चा व्याप वाढला. विजयकुंजमधील एक ब्लॉक कमी पडू लागला. शेजारचा चढया भावाने खरेदी केला, तरीही स्वतंत्र इमारतीची आवश्यकता भासू लागली. प्रथम सानपाडा, नवी मुंबईची जागा मिळाली. तिथे बालिकाश्रम आणि वृध्दाश्रमाची टुमदार इमारत उभी राहिली. वृध्दांना नातवंडांचं प्रेम मिळावं, तसंच बालिकांना आजोबा-आजीची प्रेमळ छाया मिळावी हा हेतू होता. काही वर्षांनी कांजूरला सध्याच्या इमारतीसाठी जागा मिळाली. तिथेही हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंड, त्यात शासनाकडून शिशुगृहासाठी परवानगी मिळवली. ही जागा मुंबई महापालिकेची होती. संस्थेचं काम पाहून नाममात्र शुल्क 1 रु. चौ.फूटप्रमाणे जागा देऊ केली. 30 वर्षांच्या लीजने नियमानुसार जागा खरेदी केली. तीन मजली इमारत तयार झाली. शासकीय धोरण, अन्य काही कारणामुळे मुलांचा ओघ अपेक्षेप्रमाणे वाढला नाही, तेव्हा त्या जागेत जन्मत: शारीरिक, मानसिक आजारी अशा आजूबाजूच्या मुलांसाठी 'आकार' या केंद्राची सुरुवात अल्प शुल्क घेऊन त्या त्या विषयातील प्रशिक्षितांची नेमणूक केली. तसंच 'खुशी' हे बालक-पालक मार्गदर्शन केंद्रही सुरू केलं. गरजू मुलांसाठी संगणक प्रशिक्षण कोर्स सुरू केले.

शारीरिक व मानसिक व्यंग असलेल्या मुलांना पालक मिळेल म्हणून त्यांच्यासाठी 'संकल्प' केंद्र सुरू केलं. संस्थेबाहेरच्या मुलांबरोबर आमच्या मुलांनाही ट्रीटमेंट मिळत होती. महिला सबलीकरण, संसाराला थोडाफार हातभार लागावा या दृष्टीने. नाशिक येथील मुक्त विद्यापीठातर्फे रुग्ण साहाय्यक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. अनेक मुलींना रोजगारही मिळाले. खेडयापाडयातील गरजू व कमी उत्पन्न गटांच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू केलं. त्यांचा सर्व खर्च वात्सल्यतर्फे केला जातो. दर वर्षी 25 ते 27 मुली वसतिगृहात येतात. अशाच प्रकारे सानपाडा वास्तूतही जमेल तितके उपक्रम सुरू केले. अलिबाग या ठिकाणी एकही अनाथालय नाही याची जाणीव झाली. तिथेही छोटी जागा घेऊन 10 मुलांसाठी सेंटर सुरू आहे. तिथेही शारीरिक, मानसिक व्यंग अशा मुलांसाठी उपचार केंद्र नुकतंच सुरू झालंय. बदलापूरला मध्यवर्ती जागी मोकळा प्लॉट विकत घेतला आहे. तिथे आरोग्यसेवा केंद्र सुरू केलं आहे. तिथल्या मोकळया जागेत आरोग्यसेवा केंद्राबरोबरच वृध्दाश्रम किंवा अन्य काही सुरू करण्याचा विचार आहे.

वाढता वाढता वाढे असा कामाचा व्याप सुरू आहे. एका छोटया बीजाचा वृक्ष झाला. फांद्याही फुटल्या. या सर्व कार्यक्रमात अनेक सेवाभावी वृत्तीची माणसं जोडली गेली. महिलासुध्दा मोठया संख्येने कार्यकर्ते म्हणून काम करतात. अनेक सेवाभावी कार्यकर्ते हे जग सोडून गेले. काही शारीरिक अस्वास्थ्य वा अन्य कामामुळे त्यांना रोज येणं शक्य होत नाही, तरी 'वात्सल्य'चं काम शक्य तेवढं करतात. या सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य होणार नाही. तसंच एखाद्याचं नाव चुकून घ्यायचं राहिलं तर कायमची रुखरुख लागेल. विस्तारभयास्तव त्यांचा नामोल्लेख टाळला आहे. त्यांची मनापासून माफी मागते.

 

मुंबई महापालिकेत सर्व छोटया पदांवर सुरुवात करून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या दामलेजींचा महापालिकेत दांडगा संपर्क. त्यामुळे तिथल्या कामाची जबाबदारी त्यांच्याकडे. आमदार असल्यामुळे शासकीय कामाची जबाबादारी माझ्याकडे. अशी कामाची विभागणी होती. त्या कामाचा ते आवर्जून उल्लेख करीत. जिद्द आणि स्वकर्तृत्व यांच्या जोरावर एक सामान्य व्यक्ती शिखरावर जाऊन पोहोचते याचा वस्तुपाठच या ऋषितुल्य व्यक्तीपासून घ्यावा. हे प्रचंड कार्य याचि देही याचि डोळा पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं, यातच समाधान मानावं लागेल. इच्छाशक्तीच्या जोरावर 100 वर्षं तरी आयुष्य लाभेल, शतकमहोत्सव करण्याची संधी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा होती. पण ईश्वरेच्छा बलीयसी! त्याच्यापुढे कुणाचाच इलाज चालत नाही हेच खरं. 

अनेक तरुण मंडळी नव्याने सहभागी होत आहेत. दामलेजी, आपण सुरू केलेलं कार्य अखंडपणे चालू राहील. दामलेजी, आपण जिथे कुठे असाल तिथून आपल्या वात्सल्यवर मायेची पाखर घालाल ही खात्री आहे.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.

संस्थापक विश्वस्त व कोषाध्यक्ष

वात्सल्य ट्रस्ट