वस्तुनिष्ठता वाद - आयन रँड

विवेक मराठी    30-Nov-2019
Total Views |

***रमा दत्तात्रय गर्गे***

 

आपण समाजात, समूहात आणि व्यक्तिगत जीवनात वावरताना जे आहोत ते आणि जे दर्शवत आहोत ते यांतील अंतर लक्षात घेत राहणे म्हणजे वस्तुनिष्ठतावादाकडे जाणे होय.


 

 

हिंदी चित्रपटांमध्ये आपण एक संवाद नेहमी ऐकत असतो, तो म्हणजे ''मै यहां बाप की हैसियत सें नही, एक इन्स्पेक्टर की हैसीयत से खडा हूं।'' जणू बाप आणि इन्स्पेक्टर या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात इतक्या सहजपणे हे वाक्य बोलले जाते. त्याहून आश्चर्य म्हणजे हे वाक्य समाजमानसाला पटणारे असते. समाजात वावरताना भूमिकेतच वावरले पाहिजे, याविषयी सामान्य लोकांमध्ये दुमत नसते.

 

 

आयन रँडला नेमके हेच सांगायचे आहे. माणसे माणसांना भेटतात त्या वेळी ते निव्वळ व्यक्ती म्हणून भेटत नाहीत. त्यांच्यामध्ये विशिष्ट सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी, समाजामुळे- धर्मामुळे प्रभावित झालेली मते, त्यांची स्वतःची सामाजिक स्थिती या सर्व गोष्टी एकमेकांना भेटत असतात. त्यामुळेच माणसा-माणसातले नातेसंबंध अत्यंत वरपांगी होऊन जातात.

 

 

समाज किंवा सामाजिक नियम किंवा धार्मिक, नैतिक संकल्पना यांनी व्यक्तीच्या मेंदूचा, मनाचा ताबा घेतलेला असतो. हे वळवलेले संस्कारित मन, मेंदू हेच व्यक्तिमत्त्व म्हणून समाजामध्ये वावरत असते.

 

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे वाक्य नेहमी ऐकतच आपण मोठे झालेलो असतो. मनुष्याला परस्परावलंबित्वामुळे सामाजिक प्राणी म्हणून जगणे भाग पडते. त्यातूनच समाज हा व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो. हळूहळू समाज हा व्यक्तीपेक्षा मोठा समजला जातो. मग व्यक्तीचे माणूसपण हरवून जाते. व्यक्तीचे समाजाशी असलेले संबंध हे त्याच्या निखळ अस्तित्वामुळे असत नाहीत, तर त्याच्या भूमिकेवरून ते ठरते आणि मूळ व्यक्ती हरवून जाते.

 

*आयन रँडने 'द फाऊंटनहेड' या तिच्या कादंबरीमध्ये हॉवर्ड रॉर्क हा नायक रंगवला आहे. वरवर पाहता हा अत्यंत निर्विकार वाटतो. परंतु त्याचा स्वच्छ, सुंदर, साधेपणा हा कोणत्याही विकाराच्या अधीन नसल्याने, तो शुध्द माणूस म्हणून आपल्या समोर येत जातो. हळूहळू त्याची ओळख पटत जाते आणि मग त्यातूनच रॉर्कच्या भोवती फिरणारी ही कादंबरी पुढे सरकते.* 

 

 

रॉर्क एके ठिकाणी म्हणतो, ''मी सार्वजनिक नियम पाळतो. सारं काही इतरांसारखं करतो. इतरांसारखे कपडे घालतो. तसेच जेवतो. तेच रस्ते वापरतो. पण मी काही गोष्टी नाही करू शकत इतरांसारख्या!''

 

 

त्याचे हे म्हणणे समजून घेणारा समाज त्याला मिळत नाही. जी चार माणसे मिळतात, तीही त्याच्यासारखीच याच प्रश्नांनी वेढलेली असतात.

 

 

या कादंबरीत एल्स्वर्थ टूही नावाची एक व्यक्तिरेखा आहे. हा सामाजिक दृष्टीने अत्यंत यशस्वी माणूस!! पण तितकाच धूर्त, चलाख! त्याला सर्वसामान्य लोकांची नस बरोबर सापडलेली आहे. त्याला रॉर्कची महत्ता कळत असते, पण जगरहाटीमध्ये तसे वागणे खपत नाही, हेही कळत असते. हा एका अर्थाने मुखवटयांचा व्यापारी आहे! इतिहास, संस्कृती, साहित्य, नीतिमत्ता, स्थापत्य या सगळया कलांना वापरून, मनुष्याला एक सामाजिक उत्पादन म्हणून तयार करणारा व्यापारी! कशाकडे पाहून कोणी काय प्रतिक्रिया द्यावी हेदेखील प्रशिक्षण देऊन शिकवणारा माणूस. माणसांना सामाजिक, धार्मिक पकडीत धरायचे आणि त्यांचे साचेबध्द विशिष्ट वळणाचे व्यक्तिमत्त्व तयार करायचे! आभासी प्रतिमांची निर्मिती करणारा हा मनुष्य.

 

म्हणूनच त्याला रॉर्क आणि त्याची मैत्रीण डॉमिनिक यांच्याविषयी तीव्र घृणा असते. कारण ते या साच्यांबद्दल सारं काही जाणून असतात. किंबहुना या साच्यांची जाणीव होणे, यात राहून स्वचा शोध घेत येणार नाही हा साक्षात्कार होणे हाच वस्तुनिष्ठतावादाचा आरंभबिंदू आहे. टूही हे जाणून असतो.

 

एकदा एल्स्वर्थ टूही डॉमिनिकला म्हणतो, ''शहाणपणाशी किंवा विचारीपणाशी झगडता येते. पण अविचाराशी कसे काय झगडणार तुम्ही? तुझी अडचण कुठे होते मी सांगतो. तुम्ही अविचारी लोकांचा योग्य तो मान ठेवत नाही. असं बघ, अविचार आणि अविचारी समाज हा आपल्या आयुष्यातील फार मोठा नि महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याशी पंगा घेतला तर तुमचे काही खरे नाही. संधीच नाही जिंकायची!''

 

 

टूही हे सगळे सांगताना आदर्शवाद सांगतो. पण वस्तुनिष्ठतावादात आदर्शवादाला काहीच स्थान नाही. आदर्शवादात काय केले पाहिजे हा विचार प्रमुख असतो. मग कर्म करणारी व्यक्ती, तिची समज, योग्यता, अंतरंग यांच्याशी काहीच देणेघेणे नसते.

 

 

यातूनच समाजात दुहेरी व्यक्तिमत्त्वाची माणसे उदयाला येतात. वरवर आध्यात्मिक भाषा बोलणारी, पण व्यवहारात भ्रष्ट वागणारी. मूल्ये सार्वजनिक ठिकाणी वापरणारी आणि व्यक्तिगत जीवनात हीन वर्तन करणारी माणसे! आतून पोखरलेल्या संसारात हसतमुखाने सण-समारंभ साजरी करणारी माणसे.

 

 

हॉवर्ड रॉर्कने बांधलेल्या मानवी आत्म्याच्या मंदिरावर खटला चालतो. तेव्हा डॉमिनिक कोर्टात जे बोलते, त्यावरून आयन रँड वाचकाला नेमकेपणाने वस्तुनिष्ठतावादाचा गाभा समजावते. डॉमिनिक म्हणते, या मंदिराचे अस्तित्व म्हणजे आपणा सर्वांना धोका आहे. हॉवर्ड रॉर्कने मानवी आत्म्याचे मंदिर उभारले. त्याने शक्तिशाली, अभिमानी, स्वच्छ, सुबुध्द आणि निर्भय मानवाची कल्पना केली. मानवाचे पराक्रमी रूप त्याने पाहिले. त्याने त्या प्रतिमेसाठी असे एक मंदिर बांधले. या ठिकाणी गेल्यानंतर मानवाला अनुभव येईल तो उन्नयनाचा. उत्कट आनंदाचा!! निरपराध असल्याच्या जाणिवेतूनच अशा जातीचा उत्कट अनुभव येऊ शकतो. सत्य समजून घेणे, तेच मूल्य आत्मसात करणे, स्वतःमधील क्षमता प्रत्यक्षात आणण्याची परिसीमा करणे, हे सारे जमणे मानवाला शक्य वाटावे अशा माणसासाठी त्याने ते मंदिर बांधले. त्याला वाटले, अशी उत्कटता म्हणजेच आनंद आणि आनंद हा मानवाचा जन्मसिध्द हक्क आहे!! पण टूही म्हणतो की, मानवाच्या मनात त्याच्या क्षुद्रतेचे भान जागवणे किंवा त्याच्या मनात पवित्र भय निर्माण करणे, त्याला भयाने गुडघे टेकायला लावणे, लोळण घ्यायला लावणे हेच उन्नयन! एल्स्वर्थ टूही म्हणतो की, मानवाने स्वतःची क्षुद्रता मान्य करून क्षमायाचना करीत राहणे, कारुण्याचा धनी होणे हेच त्याचे उदात्त कर्तव्य होय. मुक्तीसाठी ईश्वराच्या दारात गुडघे टेकून बसले पाहिजे. ही मानवतेची परिभाषा आहे. टूही मानवतावादी आहे.

 

 

आपल्याला या तत्त्वज्ञानाच्या पहिल्या पायरीचा सुलभ परिचय करून देते. कादंबरी लिहिण्यामागे लेखिकेचा तोच उद्देश आहे. तिने प्रस्तावनेत याबाबत स्पष्ट लिहिले आहे.

 

 

आपण समाजात, समूहात आणि व्यक्तिगत जीवनात वावरताना जे आहोत ते आणि जे दर्शवत आहोत ते यांतील अंतर लक्षात घेत राहणे म्हणजे वस्तुनिष्ठतावादाकडे जाणे होय.