समरसतेचा वाटसरू : एक विचारयात्रा!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Nov-2019   
|

हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे लिखित 'समरसतेचा वाटसरू' या पुस्तकात 'समरसता' हा केवळ शाब्दिक वेगळेपणा नाही, तर ही संकल्पना कशी अधिक व्यवहार्य, अधिक भारतीय आहे, हे पंतगे यांनी एखादा शास्त्रीय प्रयोग सिध्द करावा तसे प्रचंड अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांतून सिध्द केले आहे.आत्मपर लिखाण असूनही आत्मप्रौढी नाही, ठाम वैचारिक भूमिका असूनही अभिनिवेश नाही व समतेबाबत जगातील सर्व विचारसरणींचा धांडोळा असूनही मांडणीत क्लिष्टता नाही, असे दुर्मीळ समाधान रमेशजी पतंगे यांचे 'समरसतेचा वाटसरू' हे पुस्तक देते. 'समरसता' हा केवळ शाब्दिक वेगळेपणा नाही, तर ही संकल्पना कशी अधिक व्यवहार्य, अधिक भारतीय आहे, हे त्यांनी एखादा शास्त्रीय प्रयोग सिध्द करावा तसे प्रचंड अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांतून सिध्द केले आहे. समाजातील जातिभेद, असमान व्यवहार हे सहजपणे मिटत जावेत याकरिता संघाने 'समरसता मंच' ही संकल्पना निश्चित केली. या कल्पनेचा उगम कसा झाला, त्यात रमेशजींचे मोठे वैचारिक योगदान असण्यामागची पार्श्वभूमी काय, संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांनी हा विषय कसा आग्राहाने लावून धरला व समरसता विषयाची नेमकी स्पष्टता येण्याकरता संघाच्या अभ्यासवर्गादी रचनांमधून व विविध कार्यक्रमांमधून हा विषय कसा रुजत गेला, हे पहिल्या तीन प्रकरणांतून समजते. त्याबरोबरच रमेशजींच्या या विषयातील वैचारिक लेखनाच्या प्रवासाचा समांतरपणे वहाणारा प्रवाहही पुस्तकातून दिसतो. 'मी, मनू व संघ' यासारखे त्यांचे पुस्तक क्रांतिकारक ठरले! त्याबरोबरच त्यांनी अमेरिकेच्या निग्राो चळवळीवर चार पुस्तके लिहिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची व विचारांची अत्यंत वेगळया दृष्टीने चिकित्सा व मांडणी केली.

 

असमानता, अन्याय व त्यावर शोधली गेलेली उत्तरे याचे जगभराचे बिंदू जोडून रमेशजींनी जगाच्या इतिहासाच्या संदर्भाने 'समता' या मूल्याचा जणू आलेखच काढला आहे. एखादा कार्यकर्ता संघटनेला एखादा विचार देण्यापूर्वी किती पारखून तपासून परिपूर्ण करून देतो व ते करताना तोदेखील कसा विचारसमृध्द होत जातो, हे वाचणे फार सुखावणारे आहे.

'स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला दिली' हे इतिहासात शिकवले जाते. ही तत्त्वे वस्तुतः निरपराधांच्या रक्ताने माखलेली आहेत, याकडे रमेशजी आपले लक्ष वेधतात. युरोप व अमेरिका या दोहोंनी लावलेला समतेचा अर्थ व त्यांच्या इतिहासात समता या मूल्याचा झालेला क्रमशः विकास सविस्तरपणे आपल्याला सांगतात. या देशांना अभिप्रेत असलेली समता ही बहुतांशी राजकीय होती. ती प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड हिंसा झाली आहे. त्यांची समतादेखील सापेक्ष आहे, त्यांच्या भूमीवरील लोकांपुरती सीमित आहे. भारतीय समानता, बंधुता ही विश्वव्यापी आहे. आपल्याकडील राजकीय तत्त्वज्ञानालादेखील भारतीय अध्यात्माचा पाया आहे. बाबासाहेबांनीही हिंसामूलक समतेचा धिक्कारच केला. बाबासाहेबांनी घटनेत स्वातंत्र्यासह समता, बंधुता या तत्त्वांचा अंगीकार केला, तेव्हा त्यांनी स्पष्ट म्हटले की मी ही तत्त्वे परदेशातून उसनी घेतलेली नाहीत, तर मला बुध्दाच्या जीवनातून ही मूल्ये गवसली. त्यामुळे या मूल्यांचा त्यांना अभिप्रेत असलेला आविष्कारही अधिक व्यापक होता. कायद्याची मर्यादा त्यांना ज्ञात होती. त्यामुळे समाजाला या तत्त्वांची आनंददायक अनुभूती यायची, तर या तत्त्वांना धर्माचे अधिष्ठान मिळायला हवे, असे बाबासाहेब म्हणत. हिंदू तत्त्वज्ञानातून मांडले गेलेले 'सर्वत्र एकच चैतन्य भरून राहिले आहे' हे तत्त्वज्ञान केंद्रस्थानी ठेवून समतेचा विचार धर्म व विज्ञान दोहोंनीही कसा मांडला आहे, हे रमेशजी सांगतात. क्वांटम फिजिक्सचे अभ्यासक शास्त्रज्ञदेखील यातील संकल्पनांचा उपनिषदांत उल्लेख आहे, हे मान्य करतात. मात्र हे सांगतानाच अतिउत्साही मंडळींना त्यांनी दिलेला इशाराही महत्त्वाचा आहे - या सारखेपणातून आपण एवढेच म्हणावे की उपनिषदे या भाकडकथा नाहीत, तर वेगळया प्रकारचे शास्त्रीय सिध्दान्तच आहेत. पुढे दीनदयाळजींनी मांडलेली एकात्म मानव दर्शनाची संकल्पना सांगताना ते ताओ ऑफ फिजिक्स या काप्राच्या पुस्तकाविषयी माहिती देतात. या दोघांच्याही चिंतनातील समान धागा चकित करणारा आहे. 'विश्वाकडे पाहण्याचा एक विशाल दृष्टीकोन हे पुस्तक देते. तशी अनुभूती मला आपल्याकडच्या विचारवंतांची पुस्तके वाचताना येत नाही. आपले विद्वान मनुस्मृती, वर्णद्वेष यातून बाहेरच येत नाहीत, त्यामुळे त्यांचे लिखाण ज्ञानसमृध्दतेची अनुभूती देत नाही' ही त्यांची प्रामाणिक खंत आहे! जीवनाच्या अंतिम सत्याचा शोध घेणारे जगाच्या दोन टोकांना असलेले विचारवंत परस्परांना न भेटताही कसे एकाच प्रकाराने विचार मांडतात, एवढेच आपण लक्षात घ्यावे, त्यांनी आमचेच विचार कसे मांडले असा अभिनिवेश आपण बाळगू नये, हा त्यांचा प्रामाणिकपणा पुस्तकात सर्वत्र जाणवतो.

मनाचा असा खुलेपणा असणारा माणूसच अभ्यासाने समाजाला नवा विचार देऊ शकतो. समतेप्रमाणेच 'स्वातंत्र्य' या संज्ञेचाही त्यांनी समग्रा धांडोळा घेतला आहे. परकीय सत्तेपासून मिळवण्याचे राजकीय स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी. मुक्ती. सामाजिक एकोपा संपला व संकुचित विचार दृढ झाले की पारतंत्र्य येतेच. पण केवळ पारतंत्र्यातून सुटका म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक स्वातंत्र्य निर्माण करणे, परतंत्र विचारातून मुक्त होणे हेही महत्त्वाचे आहे.

बाबासाहेब याच सामाजिक स्वातंत्र्याकरिता आग्राही होते. निसर्गात रंग-रूप-क्षमता-शक्ती यात विषमता आहेच. पण ती स्वीकारून तिला विविधता म्हणून पाहणे व तिच्या आधारावर अधिकारात भेदभाव न करणे, तिच्यातून एकाच समाजाचे आविष्करण होणे हे घडायला हवे. सर्वात एकच चैतन्य व म्हणून सर्वांशी सम व्यवहार हेच हिंदू तत्त्वज्ञान सांगते. ही समता राजकीय सामाजिक समतेच्याही पुढे जाते व विश्वातल्या यच्चयावत सजीव-निर्जीवाला लागू होते. आपली स्वातंत्र्याची कल्पनाही अशीच पुढे नेते. 'स्व'तंत्र व्हायचे तर आधी 'स्व' समजून घेतला पाहिजे. ते समजून घेण्याचे सामर्थ्य गीता देते. 'जो जे वांछील तो ते लाहो' इतके अमर्याद स्वातंत्र्य फक्त भारतीय चिंतनातच मिळू शकते! पण दुसरीकडे माझे तत्त्वज्ञान मला माझा विश्वाशी असलेला संबंध, एकत्व, समरसता सांगते व माझे स्वातंत्र्य संकुचित व आत्मकेंद्री न राहता विश्वव्यापी होते. विश्वाच्या कल्याणातच माझे कल्याण हे समजते. हे विश्वचि माझे घर हा वैश्विक ध्येयवाद हे संघाचे मूल्य आहे. संघाने जो समतेचा मार्ग चोखाळला तो निरपेक्ष प्रेमाचा. देशाबद्दल मातृभाव व समाजाबद्दल बंधुभाव असेल तरच समता व स्वातंत्र्य या मूल्यांचे रक्षण होऊ शकते. हीच समरसता.


जातिभेदातून पूर्णतः बाहेर येऊन बंधुभावाने सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे म्हणजे समरसता. समरसता हा शब्द न वापरताही हाच विचार संविधानात कसा प्रकट झाला आहे
, हे रमेशजी अखेरीस सांगतात. संविधानाचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यावर अनेक पुस्तके लिहिली. शेकडो व्याख्यानांतून संविधानाचा अर्थ पोहोचवण्याचे मौलिक काम केले.

पुस्तकाच्या अखेरीस त्यांनी जी खंत व्यक्त केली आहे, ती महत्त्वाची आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सामाजिक सुधारणांची आंदोलने संपली व राजकीय, आर्थिक फायद्याकरिता समाजकारणाचा वापर होऊ लागला. जातिअंताची भाषा बोलणारे जातीच्याच आधारे अस्मिताजागृती करून मोठे होऊ लागलेत. अधिक मागास म्हणवण्याकरता चढाओढ, महापुरुषांचे जातीय वाटप या बाबींची खंत आहेच, पण भविष्यात याहूनही निराळया अशा नवनवीन भेदभावांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक विषमता हा मोठा प्रश्न बनेल. त्याला उत्तर शोधण्याचा प्रवास हा समरसतेच्याच वाटेवरून करत राहावा लागणार आहे. आपण सारे समान आहोत, एका राष्ट्राचे नागरिक आहोत, पुढे जाऊन मानवजातीचे घटक आहोत व त्याही पलीकडे म्हणजे एकाच चैतन्याचा अंश आहोत, हा भाव मनात ठेवून जीवनव्यवहार करणे म्हणजे समरसता व्यवहारात आणणे.

संकल्पनांच्या मुळाशी जाऊन त्या समजावून दिल्यामुळे विषयाचा आवाका खूप मोठा आहे. अनेक संकल्पना स्पष्ट करतानाच वाचकांच्या मनात जबरदस्त वैचारिक घुसळण करण्याचे काम हे पुस्तक करते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी अवश्य अध्ययन करावे असा हा दस्तऐवज आहे. पुढील आवृत्तीच्या वेळी प्रकाशकांनी मुद्रितशोधनावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे!

समरसता ही संज्ञा हा विचार समाजात पूर्णतः रुजणे हे या वैचारिक घुसळणीचे सुंदर फलित असेल!

 

समरसतेचा वाटसरू

ले. रमेश पतंगे

प्रकाशक - गुरुकुलम् प्रकाशन, चिंचवड.

पृष्ठे - 200

मूल्य - 260 रुपये.