संघटित, सुसूत्रबध्द स्त्री शक्तीचे विशाल दर्शन

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Nov-2019
|

राष्ट्र सेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका स्व. सरस्वतीताई आपटे यांच्या पंचविसाव्या स्मृतिवर्षानिमित्त व लातूर शहर संचलनाच्या बाराव्या, म्हणजे तपपूर्तीनिमित्त देवगिरी प्रांतातील 14 जिल्ह्यांतील राष्ट्रसेविकांचे सघोष पथसंचलन रविवार 24 नोव्हेंबर 2019 रोजी लातुरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सघोष पथसंचलनात एकूण 1 हजार 276 गणवेशधारी सेविका सहभागी झाल्या होत्या.


संघटित, सुसूत्रबध्द स्त्री शक्तीचे विशाल दर्शन लातूरकरांना झाले. निमित्त होते वं. ताई आपटे यांच्या पंचविसाव्या स्मृतीचे. त्यासाठी राष्ट्र सेविका समितीने देवगिरी प्रांताचे लातूर येथे प्रांतसंचलन आयोजित केले होते.

लातूर शहरातील पथसंचलनाला बारा वषर्े पूर्ण झाली, या निमित्ताने ऑगस्ट महिन्याच्या प्रांतीय बैठकीत या प्रांतीय पथसंचलनाचे लातूरलाच आयोजन करण्याचे ठरले.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक
 

संचलनासाठी शहरातील जास्तीत जास्त महिलांची उपस्थिती असावी यासाठी वेगवेगळया महिला संघटना, मुलींच्या शाळा, महाविद्यालयातून संपर्क वाढवणे सुरू केले. गणवेशाच्या साडया, ओढण्या मागवणे, कॅनव्हास बुटांची उपलब्धता करून देण्याबाबत दुकानदारांशी संपर्क साधणे, पंजाबी डे्रसेसचा पॅटर्न सेविकांना समजावून सांगणे सुरू झाले. थोडक्यात, संपूर्ण गणवेशावरच उपस्थितीवर लक्ष केंद्रित केले. हे झाल्यावर संचलनात सणसम्यक चालण्याचा सराव शाखांवर सुरू झाला.

 

सेविकांचा उत्साह वाढवणारी आणखी एक बाब होती, ती घोषपथकाची. प्रांताकडून प्रत्येक जिल्ह्याला त्यांचा घोषगण असावा अशी सूचना दिलीच होती. लातूर शहरात गेली अकरा वर्षे संचलनात घोष पथक असायचे, पण ते तरुणी आणि बालसेविकांचे. या वेळी महिलांचे स्वतंत्र घोषपथक तयार करायचे ठरले. मग आवड असणाऱ्या महिलांना एकत्र करून रचना शिकवणे, सराव घेणे सुरू झाले. सातत्याने सराव ही अवघड बाब मोठया प्रयत्नाने झाली. सणवार, लग्नसमारंभ आणि महत्त्वाचे साथीचे रोग या सर्व गोष्टींचे अडथळे पार करत एकोणचाळीस महिला आणि एकोणचाळीस तरुणी, बालसेविका यांची दोन स्वतंत्र घोषपथके संचलनासाठी सिध्द झाली.

मैत्रिणींच्या आणि नातेवाइकांच्या भेटीने प्रत्येकीचे मन प्रफुल्लित झाले. आपण कशी तयारी केली आणि किती उत्सुकतेने इथे आलो आहोत या गप्पांना खूप जोर चढला. अधिकारी गणांना वाकून नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेण्यात त्या धन्यही झाल्या.

तासाभराच्या सरावानंतर शिस्तीत गण तयार करून मंडळी कडक उन्हात मैदानावर आसनस्थ झाली. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष अंबाजोगाई येथील सोमेश्वर हॉस्पिटलच्या सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सारिका शिंदे, राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदाताई जोशी या प्रमुख पाहुण्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून पश्चिम क्षेत्र बौध्दिक प्रमुख डॉ. लीना गहाणे, देवगिरी प्रांत कार्यवाहिका रत्नाताई हासेगावकर, लातूर जिल्हा कार्यवाहिका जगदेवी लातुरे उपस्थित होत्या. त्याचबरोबर देवगिरी प्रांताच्या कार्यकारिणीतील सर्व अधिकारी गण उपस्थित होता. या पथसंचलनासाठी देवगिरी प्रांतातीत तेरा जिल्ह्यांतील व लातूर शहरातील मिळून पंधराशे ते सोळाशे सेविका उपस्थित होत्या.

वंदनीय ताई आपटेंचे व्यक्तिमत्त्व समईमध्ये शांतपणे तेवणाऱ्या ज्योतीसारखे होते. त्यामुळे शांतपणे तेवणाऱ्या समईच्या ज्योतीची आरास व्यासपीठावर केली होती. बाजूलाच छोटया चौथऱ्यावर वं. मावशी, वं. ताई व भारतमाता यांच्या प्रतिमा आणि घोषातील वाद्यांची दंड, खड्गांची सुशोभित मांडणी केली होती. मान्यवरांच्या हस्ते त्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

 

''एकविसाव्या शतकातही महिलांना हिंसाचाराला सामोर जावे लागते, तेव्हा नुसता कायदा करून होत नाही, तर महिलांनी स्वतःच्या व समाजाच्या उत्कर्षासाठी राष्ट्रसेविका समितीच्या उपक्रमात सहभागी व्हावे'' असे अध्यक्षीय मनोगतातून डॉ. सारिका शिंदे यांनी आवाहन केले.

 

प्रमुख वक्त्या डॉ. लीना गहाणे यांनी आपल्या विस्तृत वक्तव्यात अनेक पैलूंचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, ''तसे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे त्यांचे पथसंचलन होतच असते. पण हा प्रांताचा, पथसंचलनाचा खटाटोप एवढयासाठी की एकत्र येणे जास्त आनंदाचा क्षण, तसा मजबुतीचाही क्षण असतो. एकत्र येण्याने विश्वास, मैत्री वाढून संघटन मजबूत होते. पुन्हा पुन्हा केल्याने मजबुती वाढते. जिल्हा संचलन काढतोच, पण प्रांतीय जिल्हे एकत्र येऊन पथसंचलनाचे भव्य आयोजन करतो. ही सुंदर संकल्पना इथे साकार झाली.

वं. ताईंनी आयुष्यभर स्त्री शक्ती संघटनाचा ध्यास घेऊन कार्य केले होते. आज आपण स्त्री शक्तीच्या संघटनांचे भव्य प्रकटन केले आहे. ताईंना हीच खरी मानवंदना'' असे लीनाताईंनी म्हटले. स्त्री शक्ती म्हणजे केवळ महिलांनी एकत्र येणे नव्हे, तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मान देऊन, आदर करून तिच्यासोबत सहकार्याने उभे राहणे होय. या दृष्टीने आपण एकत्र येऊन संघटितपणे काम केले, तर ते अधिक स्थिर व प्रभावी होऊ शकेल असा विश्वास डॉ. लीनाताईंनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. गहाणे म्हणाले, ''तेजस्वी हिंदू राष्ट्रनिर्मिती हेच समितीचे ध्येय आहे. तेज म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास. सूर्य आपल्या सहस्ररश्मीने जसा झळाळतो, तशी एक एक व्यक्ती घडली, तर समाज-राष्ट्र घडते. आपल्याला समितीच्या शाखास्थानांवर हेच काम करायचे आहे. तेजस्वी हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी एक एक सेविका तयार करायची आहे. यासाठी आपण सूर्यतेजाचे सातत्य अनुसरायचे. नियमित शाखेत जाऊन, उत्सवात सहभागी होऊन संघटना मोठी करायची आहे.

 

प्रशिक्षण आणि नैपुण्य घेऊन आज आपणे इथे आलो आहोत, त्याचे भव्य प्रकटनही केले, त्यामुळे समाज प्रभावित होईल. आज्ञापालनाचा आदर्श समाजासमोर ठेवून हा प्रभाव परिणामकारक करायचा असेल, तर समाजाला संघटनेचे महत्त्व पटवून देऊन त्यात त्याचा सहभाग वाढवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी शाखांची संख्या वाढवून तेथील प्रभावी कार्यक्रमांची जबाबदारी आता इथल्या सगळया सेविकांची आहे. घरच्या जबाबदाऱ्या आणि संघटनेचे काम यांचे सम्यक साधत आपल्याला राष्ट्रोध्दाराचे काम करायचे आहे'' असा विचार उपस्थित सेविकांपुढे डॉ. गहाणे यांनी मांडला.


माधुरी पूर्णपात्रे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व नंदा कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले. श्रुती देशमुख यांनी वैयक्तिक पद्य व भावना मुळे यांनी सांघिक पद सादर केले. मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणापासून सुरू झालेले हे पथसंचलन देशिकेंद्र विद्यालय
, शिवाजी चौकातून मुख्य रस्ता, तहसील कार्यालय, अशोका हॉटेल, मिनी मार्केटमार्गे राजस्थान शाळेच्या मैदानावर परत आले. पंधराशे ते सोळाशे महिलांचे सघोष पथसंचलन पाहण्यासाठी लातूरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. कौतुकाने पथसंचलनाचे धूमधडाक्यात स्वागतही केले.

 

चैतन्याने सळसळणाऱ्या कार्यक्रमाचा निरोपाचा टप्पा समोर आल्यावर मात्र सगळयांचेच मन हेलावले. डोळयांच्या कडा ओलावल्या. लातूरकरांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक करत पुन्हा असा योग नक्की यावा म्हणत निरोप घेतला गेला. घोषगणातील महिलांना तर 45 मिनिटे वाद्य वाजवत चालण्याचा थकवा जाणवत नव्हता. उत्कट राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेमुळे त्यांचा उत्साह दुणावला होता.
 

स्मिता संजय अयाचित

7588388796