WAHA - हिंदू विद्वानांचे जागतिक व्यासपीठ

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Nov-2019
|

*** प्रा. क्षितिज पाटुकले **

हिंदू समाजामध्ये शैक्षणिक आणि सर्जनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांनी एकत्र येऊन हिंदू ज्ञान विचार अधिक प्रभावीपणे जगासमोर मांडावेत आणि योग्य त्या ठिकाणी अपप्रचाराचा प्रतिवाद करावा, अशी ही संकल्पना आहे.

 

हरिद्वार येथे नुकतीच दि. 11 12 ऑक्टोबर 2019 रोजी जागतिक हिंदू विद्वत परिषदेची - World Association of Hindu Academicians - WAHA या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. हिंदू धर्म आणि जीवनप्रणाली यांचे देश-विदेशात संरक्षण, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करणाऱ्या आणि शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन वाहा या संघटनेची स्थापना केली आहे. यामध्ये 1) बीएपीएस स्वामीनारायण, 2) अमृतानंदमयी विद्यापीठ, 3) इस्कॉन - बंगळुरू, 3) विश्व हिंदू परिषद, 4) चिन्मय मिशन, 5) आर्ट ऑफ लिव्हिंग, 6) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, 7) गायत्री परिवार, 8) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, 9) अखिल भारतीय साहित्य परिषद, 10) भारतीय शिक्षण मंडळ, 11) विद्याभारती, 12) संस्कृत भारती, 13) विज्ञानभारती, 14) संस्कार भारती, 15) अधिवक्ता परिषद, 16) रामकृष्ण मठ, 17) इतिहास संकलन समिती, 18) शिक्षा उन्नत्ती न्यास इ. संघटना सहभागी झाल्या आहेत. या प्रसंगी चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल शर्मा, देवसंस्कृती विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. प्रणव पांडया, विश्व हिंदू परिषदेचे स्वामी विज्ञानानंद, प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय निमंत्रक जे नंदकुमार, हिंदू स्वयंसेवक संघ अमेरिका येथून मनोहरजी शिंदे, डॉ. रिचा कांबोज, डॉ. अनिता स्वामी, प्रा. क्षितिज पाटुकले, नेपाळहून डॉ. यू.के. भद्र, डॉ. शैलेंद्र मेहता, सिंगापूरहून हरिओम् जानी, सर्वोच्च न्यायालयातील युवा वकील ऍड. ईशकर्णा भंडारी, ऍड. साई दीपक इ. मान्यवर उपस्थित होते.

वाहाच्या स्थापनेमागची संकल्पना आणि उद्दिष्टे

भारत आज वेगाने प्रगती करणारे राष्ट्र म्हणून संपूर्ण विश्वात ओळखले जाते. केवळ अर्थिक आघाडीवरच नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण, जागतिक शांतता, सौहार्द इ. अनेक आघाडयांवर भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करीत आहे. हजारो वर्षांच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा जपताना संपूर्ण जगात सत्ता आणि समृध्दी यांचे संतुलन साधण्यासाठी भारत हर प्रकारे प्रयत्न करीत आहे. आध्यात्मिक विचारप्रणाली हे भारताचे अनोखे वैशिष्टय असून संपूर्ण जगाला भविष्यातील वाटचालीसाठी भारताकडून योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. मात्र याच वेळी भारतातील आणि विदेशातील काही भारताविरोधी विचारधारा आणि विचारगट एकत्र येऊन बारीकसारीक गोष्टींवरून सातत्याने भारताच्या बदनामीची मोहीम राबवत असतात. यासाठी विविध माध्यमांचा मोठया प्रमाणावर मुक्त हस्ते वापर केला जातो.

 

विकसित देशात ज्ञानाच्या क्षेत्रात विविध मान्यवर संस्थांमध्ये व कॉर्पोरेट जगात आज भारतीय हिंदू मोठया संख्येत कार्यरत आहेत. तसेच ते उच्च पदांवरदेखील कार्यरत आहेत. विशेष कौशल्याच्या क्षेत्रांत - उदा., वैद्यकीय क्षेत्र, कायदा, व्यापार, बायोटेक्नॉलॉजी, अंतराळ विज्ञान, गणित, इ. अनेक क्षेत्रांत भारतीय हिंदू व्यक्ती कार्यरत आहेत. हिंदू धर्म विचार आणि जीवनपध्दती ही संकल्पना व्यापक, विस्तृत आणि बहुआयामी आहे. ती एकसुरी, एकव्यक्तिकेंद्री आणि एकग्रांथकेंद्री अशा स्वरूपाची नाही. नानाविध विचार, संप्रदाय, प्रणाली ही हिंदू धर्माची विविधता आहे. त्यामुळे हिंदूंची वैयक्तिक प्रगती जरी मोठया प्रमाणावर असली, तरी हिंदू समाज म्हणून सांघिक आणि एकत्रित अशी दृश्य स्वरूपात आढळून येत नाही. हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्या मूलभूत संकल्पनांचा जागतिक शैक्षणिक आणि विद्वत क्षेत्रात नियोजनबध्द समावेश करण्याचा प्रयत्न फार थोडया प्रमाणात झालेला दिसून येतो. त्याचबरोबर हिंदू संकल्पनांचे प्रकटीकरण विविध संदर्भात विविध प्रकारे केले जाण्याची लवचीक परंपरा असल्याने त्यातून एकाच वेळी अनेक अर्थ निघण्याची शक्यता असते. वाचक आणि अभ्यासक यांनी त्यांच्या आकलनाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे ज्ञान ग्राहण करावे आणि त्याचा समष्टीसाठी उपयोग करावा, अशी हिंदू ज्ञानपरंपरेची रचना आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आजच्या तथाकथित आधुनिक एकविसाव्या शतकातील विद्वत जगात हिंदू विद्वानांची आणि हिंदू विचारांची अवकेलना होताना दिसते. अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये हिंदू विद्वानांची गळचेपी होते. त्यांना त्यांचा विचार योग्य पध्दतीने मांडण्याची संधी दिली जात नाही. मात्र हिंदूविरोधी विचारांना मोठया प्रमाणावर उचलून धरले जाते आणि सर्वत्र प्रसिध्दी दिली जाते. हजारो हिंदू प्राध्यापक, संशोधक आणि विद्वान याचा अनुभव घेत आहेत. दूरदर्शन चॅनलवरच्या चर्चा असोत किंवा देशविदेशातील व्यासपीठे असोत, त्यामध्ये योजनाबध्दरीत्या भारतीय हिंदू विद्वानांवर अन्याय केला जातो.

यावर उपाय म्हणजे हिंदू भारतीय विद्वान जगताचे संघटन आणि एकत्रीकरण. सर्वसामान्य भारतीय बांधवांमध्ये हिंदू धर्म आणि जीवनपध्दती हजारो वर्षांपासून रुजलेली आहे. त्यामुळे कितीही तकलादू प्रयत्न झाले, तरी हिंदू ज्ञानप्रवाह आणि संस्कृती झुकणारी नाही, हे निर्विवाद सत्य आहे. हिंदू विद्वत जगताचे एकत्र येणे ही आजची फार मोठी गरज आहे. विद्वत जन म्हणजे अकॅडेमिीशयन्स याचा अर्थ महाविद्यालयांतील आणि विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, समाजसेवक, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, वकील, डॉक्टर्स, सीए, कंपनी सेक्रेटरी, कलाकार, गायक, वादक, लेखक, साहित्यिक, पत्रकार इ. हिंदू समाजामध्ये शैक्षणिक आणि सर्जनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांनी एकत्र येऊन हिंदू ज्ञान विचार अधिक प्रभावीपणे जगासमोर मांडावेत आणि योग्य त्या ठिकाणी अपप्रचाराचा प्रतिवाद करावा, अशी ही संकल्पना आहे. हिंदू विद्वानांनी आणि प्रतिभावान बांधवांनी संपूर्ण विश्वामध्ये आत्मविश्वासाने हिंदू ज्ञानविचार आणि संस्कृती आजच्या काळाला अनुकूल अशा प्रकारे सर्वदूर पोहोचवावी, हा हेतू आहे. अनेकदा हिंदू धर्माबद्दल वाच्यता केल्याने किंवा त्याच्या बरोबर नाते दर्शविल्याने शैक्षणिक आणि विद्वान जगात हिंदू विद्वानांना एकटे पाडले जाते किंवा दुर्लक्षित करण्यात येते, असा अनुभव येतो. कारण त्यांचे संघटन नाही आणि त्यांना कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही.

'वाहा'मुळे हिंदू विद्वानांना एक सशक्त व्यासपीठ मिळेल, त्यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण होईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि एकत्रित प्रयत्नांनी जागतिक पातळीवर विलक्षण प्रभाव निर्माण होईल. याचबरोबर युवा हिंदू विद्यार्थी, संशोधक यांनाही योग्य त्या मार्गदर्शनाची गरज मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे हिंदू ज्ञानशास्त्रांवर आधारित विविध पातळयांवर विविध क्षेत्रांमध्ये संशोधनात्मक प्रकल्प आणि योजना उभ्या राहू शकतील. त्यांच्यामध्ये शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक साहाय्य आणि इतर सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध होईल. फक्त भारताला आणि हिंदूंनाच नव्हे, तर संपूर्ण विश्वाला त्याचा लाभ होईल. हिंदू युवा विद्वान संशोधकांना विविध प्रकारची साधने अणि साहाय्य उपलब्ध होईल. हिंदू भारतीय ज्ञानकक्षा अत्यंत व्यापक असून हिंदू परंपरांचा अणि संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन यामध्ये मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. हिंदू धर्मातील अनेक संकल्पना, ज्ञानशाखा आणि परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी त्यांच्या पुनरुज्जीवनासाठीदेखील या मंचाचा उपयोग होईल. तसेच या सर्वांच्या अभ्यासातून नवनवीन ज्ञानशाखांची निर्मिती होईल.

वाहा या संस्थेची स्थापना हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती यासाठी एक वरदान ठरेल याची खात्री वाटते. प्रत्येक अभ्यासू, प्रतिभावान, सर्जनशील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, समाजसेवक, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, वकील, डॉक्टर्स, सीए, कंपनी सेक्रेटरी, कलाकार, गायक, वादक, लेखक, साहित्यिक, पत्रकार इ. सर्वांनी वाहा संस्थेबरोबर स्वत:ला जोडून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. www.worldacademicians.org या संकेतस्थळाला भेट देऊन तेथे आपली माहिती भरून वाहाचे सभासद बनता येते. वाहाचे प्रतिनिधी म्हणून विद्वत जगतामध्ये आपली ओळख निर्माण करता येईल. भारतातील सर्व राज्यांतील तसेच विदेशातील सर्व भारतीय विद्वतजनांना वाहा मध्ये मुक्त प्रवेश आहे. आपण स्वत: तर वाहाचे सदस्य व्हावेच, तसेच आपल्या संपर्कातील सर्वांना वाहाचा सभासद बनण्यासंबंधी माहिती द्यावी व आग्राह करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहाच्या कार्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि मीडियाचा चांगला वापर करावयाचा असून त्याद्वारे ज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा विचार सर्वदूर पोहोचवायला साहाय्य मिळेल.


9822846918