नवमाध्यम आणि रोजगारनिर्मिती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक04-Nov-2019
|

***व्यंकटेश कल्याणकर***

काम करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी आवडीचं काम मिळविण्याकडे नव्या पिढीचा कल वाढत चालला आहे. तो अगदी रास्त आणि योग्यच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नवतंत्रज्ञानाच्या या वर्तमान प्रवाहात आपले छंद, आपली आवड आणि नवतंत्रज्ञान या सर्वांची सुंदरशी गुंफण करून ऑनलाइन, डिजिटल माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग कसे शोधायचे, वापरायचे यासाठी साध्या-सोप्या-सुलभ भाषेतील लेखनप्रपंच.


मित्रमैत्रिणींनो, काळ वेगाने पुढं जात आहे. त्याचा वेग ठरलेला आहे. त्या वेगाने आपला भवतालही समृध्द होत आहे. दररोजचं जगणं अधिकाधिक सुकर-सुलभ-सोपं होण्यासाठी नवनवीन संसाधनं विकसित होत आहे. तंत्रज्ञानाचे अभूतपूर्व, अविश्वसनीय, अकल्पित, अद्वितीय आविष्कार दररोज समोर येत आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही दोन ध्रुवांवरील अंतर क्षणाक्षणाला कमी कमी होत चाललं आहे. माणूस आता चंद्र, मंगळ तसेच इतर ग्राहांवर पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. समुद्राची खोली, आकाशाची उंची, ब्रह्मांडातील ग्राह-तारे यावरील संशोधनाबरोबरच सामान्य माणसाचं दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर कसं होईल, याकडेही लक्ष दिलं जात आहे. हे सगळं होत असताना जगण्यासाठी पैसा लागतो, हे वास्तव क्षणभरही विसरता येत नाही. त्यातच काम करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी आवडीचं काम मिळविण्याकडे नव्या पिढीचा कल वाढत चालला आहे. तो अगदी रास्त आणि योग्यच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नवतंत्रज्ञानाच्या या वर्तमान प्रवाहात आपले छंद, आपली आवड आणि नवतंत्रज्ञान या सर्वांची सुंदरशी गुंफण करून ऑनलाइन, डिजिटल माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग कसे शोधायचे, वापरायचे यासाठी साध्या-सोप्या-सुलभ भाषेतील लेखनप्रपंच.

आपण सारे 'डिजिटल प्रॅक्टिशनर'

नवतंत्रज्ञानाचा - विशेषत: डिजिटल माध्यमाचा - संगणक, स्मार्ट फोन आदी संसाधनांचा वापर करून पैसे कसे कमवायचे याबाबत प्रस्तुत लेखात आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर स्वत:ला मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणतात, त्याप्रमाणेच डिजिटल माध्यमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचे काम करणाऱ्या किंवा या क्षेत्राशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या प्रत्येकाने स्वत:ला डिजिटल एक्स्पर्ट न म्हणता डिजिटल प्रॅक्टिशनर समजणं गरजेचं आहे. कारण, प्रत्येक क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानात क्षणाक्षणाला होणारे बदल (अपडेट्स) हे अगदी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्यापासून ते मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स यांच्यापर्यंत कोणालाही संपूर्णपणे समजून-उमजून घेऊन संपूर्णत: ज्ञात करता येणं अशक्य आणि अव्यवहार्य आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या वेळी आपल्या क्षेत्राशी संबंधित काम सुरू करू, त्या वेळी इतर क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित अनेक बदल झालेले असतात आणि त्याबद्दल आपण संपूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही किंवा अगदी आपल्या स्वत:च्या क्षेत्राबद्दलही आपण संपूर्णपणे जाणून घेऊ शकू असंही नाही. शिवाय ज्या वेळी आपण स्वत:ला डिजिटल प्रॅक्टिशनर म्हणू, त्या वेळी आपण आपल्यातील शिकण्याची, समजून घेण्याची, सर्जनशीलतेची वृत्ती कायम राहते. त्यामुळे आपण सर्वांनी स्वत:ला डिजिटल प्रॅक्टिशनर समजायलाच हवं.

हे 'सेल्फ लर्निंग'चं जग आहे!

ज्ञान प्राप्त करण्याच्या अनेक पध्दतींपैकी स्वयंशिक्षण (सेल्फ लर्निंग) ही सर्वांत प्रभावी पध्दत आहे. यातून तुम्हाला ज्या गोष्टीची जिज्ञासा आहे, त्याबद्दलची माहिती तुम्ही मिळवता. त्या क्षेत्रासंबंधीच्या व्यक्तींना भेटता. अगदी अलीकडच्या काळात बघायचं झालं, तर गूगल आणि यूटयूब ही माध्यमं तुमच्या माहितीची भूक सहज भागवू शकतात. एका अर्थाने तुमचे गुरू होऊ शकतात. क्लासरूममध्ये बसून पध्दतशीरपणे तुमच्या प्रत्येक शंकांचं निराकरण करणं आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्याची शिक्षणपध्दती आता कालबाह्य होत चालली आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय शिकायचं आहे ते ठरवा, त्याप्रमाणे शोध घ्या आणि पुढे चला.

स्वत:ची आवड ओळखा!

काळाबरोबर त्याच्या वेगानं पुढं जायचं म्हटलं तर आपण कुठे आहोत, हे वेळोवेळी तपासणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्यातील कौशल्यं, क्षमता काय आहेत हे जाणून घेणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर आपल्या मर्यादा काय आहेत आणि त्यावर मात कशी करायची, याकडेदेखील गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. समजा, तुम्ही मराठी भाषेत छान लेखन करता, तुम्हाला लिहिण्याची आवड आहे, तर तुम्हाला संगणकावर, स्मार्ट फोनवर अगदी सहज मराठी टायपिंग करता आलचं पाहिजे. समजा, तुम्हाला फोटो काढायला आवडतं, तर तुम्हाला उच्च दर्जाचे कॅमेरे कसे असतात वगैरे तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांत आधी तुमची आवड निश्चित करा आणि त्या संदर्भातील काय काय माहिती घेणं आवश्यक आहे हे तुम्हीच समजून घ्या आणि त्याप्रमाणे माहितीचा, तज्ज्ञाचा शोध घ्या. 

 

डिजिटल माध्यम म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक संसाधनांद्वारे तयार केलेलं, त्याद्वारेच पाहता येणारं, प्रसारित किंवा साठवून ठेवता येऊ शकेल असं माध्यम म्हणजे डिजिटल माध्यम. या माध्यमाद्वारे केवळ मशीनला वाचता येईल अशा स्वरूपाचं साहित्य तयार केलं जातं. त्यामध्ये सॉफ्टवेअर, डिजिटल इमेजेस, डिजिटल व्हिडिओ, वेब पेजेस, बेवसाइट्स, सोशल मीडिया, डेटा आणि डेटाबेस, डिजिटल ऑडिओ इत्यादी इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. थोडक्यात एक लक्षात ठेवा - जे पाहण्यासाठी आपल्याला डिजिटल डिव्हाइसेसचाच वापर करावा लागतो, ते म्हणजे डिजिटल माध्यम. जसं तुम्ही छापील वर्तमानपत्र हातात घेऊन थेटपणे वाचू शकता, तसं एखादी सीडी किंवा पेनड्राइव्ह घेऊन थेटपणे पाहू शकत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला सीडी प्लेअरची किंवा संगणकाची गरज भासते. सोशल मीडियामुळे उत्पन्नाची संधी मिळवून देणाऱ्या माध्यमांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने यूटयूब, फेसबुक, ब्लॉग या माध्यमांचा उल्लेख करता येईल.

 

डिजिटल माध्यमांचं अर्थकारण

कोणतंही माध्यम प्रभावीपणे कार्यान्वित होण्यासाठी त्यामागे मोठं अर्थकारण असतं. हे अर्थकारण समजून घेणं गरजेचं असतं. सर्वसामान्य भारतीयांना उत्पन्नाची साधनं उपलब्ध करून देणारी अनेक डिजिटल माध्यमं उपलब्ध आहेत. ज्याअर्थी ही माध्यमं तुम्हाला पैसे देतात, त्याअर्थी त्यांनाही काही लाभ होत असतो, हे साधं गणित आहे. त्यांना अनेक पध्दतींनी हा लाभ होत असतो. त्यापैकी सर्वात महत्त्वाची पध्दत म्हणजे जाहिरात. कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची सातत्याने जाहिरात करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं वापरली जातात - उदा., वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिनी वगैरे. यावरून सरसकट जाहिरात पोहोचविली जाते. म्हणजे समजा, महिलांसाठीच्या सौंदर्यप्रसाधनाची जाहिरात वर्तमानपत्रात दिलीत, तर संबंधित वर्तमानपत्र आणि पर्यायाने जाहिरात सर्व वाचक वाचतील. ज्या घरात फक्त महिला वर्तमानपत्रं वाचतात, अशाच घरात जाणाऱ्या वर्तमानपत्रात जाहिरात देता येणं अशक्यप्राय आहे. शिवाय डिजिटल माध्यमांचा (फेसबुक, व्हॉट्स ऍप, टि्वटर, इन्स्टाग्रााम, यूटयूब आदी) दररोज वापर वाढत आहे. जे लोक डिजिटल माध्यमं वापरतात, त्यांच्यापर्यंत जाहिरात पोहोचविण्यासाठी जाहिरातदार गूगलसारख्या मोठया कंपन्यांकडे एकदाच जाहिरात देतात. गूगलकडे ब्लॉग, यूटयूब यासारखी माध्यमं आहेत, जिथे काहीतरी कंटेंट असतो आणि ते पाहण्यासाठी यूजर्स येतात. शिवाय कोणत्या प्रकारचे, कोठून, किती वयाचे यूजर्स येतात, याबद्दलची सविस्तर आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध असते. समजा, जाहिरातदार सांगतो की ही जाहिरात मला फक्त महिलांना दाखवायची आहे, तर त्याप्रमाणे गूगल ती जाहिरात महिलांपर्यंत पोहोचवतो. मात्र गूगल स्वत: फार काही कंटेंट तयार करत नाही, तर इतरांनी तयार केलेल्या कंटेंटसह जाहिरात दाखवतो. मग इतर लोक कंटेंट का तयार करतील? तर असा कंटेंट तयार करणाऱ्या यूजरला जाहिरातदाराने दिलेल्या रकमेतील काही हिस्सा दिला जातो. हा झाला एक महत्त्वाचा भाग. मग त्यात आणखी बारकावे असतात. म्हणजे संबंधित यूजरने तयार केलेल्या कंटेंटवर किती जाहिराती दाखवायच्या, कशा दाखवायच्या, त्यावर किती लोकांनी क्लिक केलं तर किती रुपये मिळणार, वगैरे वगैरे. पण प्राथमिक स्तरावर हे अर्थकारण आपण समजून घेतलं तरी पुष्कळ. नंतर नंतर जसं जसं काम करू, तसं तसं आपण स्वत:च आणखी बऱ्याच बाबी शिकू शकू.

 


भुवनेश्वर बाम यांचं BB Ki Vines हे यूटयूब चॅनल भारतातील टॉप 10पैकी एक असून त्याचे 71 लाख सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनलवर किशोरवयीन मुलांना आवडेल असे मनोरंजन व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्यातून भुवनेश्वरचं मासिक उत्पन्न जवळपास 2 कोटींपर्यंत पोहोचतं.

पैसे मिळविण्याचं माध्यम कोणकोणतं?

डिजिटल माध्यमाद्वारे तुम्ही अनेक पध्दतींनी पैसे कमावू शकता. यूटयूबशिवाय अन्य बरीच माध्यमं पैसे कमाविण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही -

1) यूटयूब चॅनल

2) स्वत: काढलेल्या पेंटिंगची/फोटोची/कलाकृतीची (शिल्प वगैरे) ऑनलाइन विक्री

3) ब्लॉग रायटिंग

4) सोशल मीडिया सेलिब्रिटी

5) फेसबुक लाइव्ह व्हिडिओ

6) फेसबुक मार्केटप्लेस

7) स्वत:च्या उत्पादनांची/सेवेची ऑनलाइन विक्री

8) संलग्न विपणन (ऍफिलिएट मार्केटिंग)

ऑनलाइन पूरक व्यवसाय

1) ऑनलाइन कामं मिळवणं

2) सोशल मीडिया मॅनेजमेंट

3) डिजिटल मार्केटिंग

4) किंडल बुक

यूटयूब चॅनलद्वारे उत्पन्न

ऑनलाइन पैसे कमाविण्याचा सर्वांत प्रभावी, कल्पक आणि सर्जनशील प्रकार म्हणजे यूटयूब. यूटयूबद्वारे पैसे कमाविण्यासाठी तुमच्याकडे संगणक ज्ञानाबरोबरच व्हिडिओ शूटिंग (मोबाइल किंवा कॅमेऱ्याद्वारे), व्हिडिओ एडिटिंग वगैरे प्राथमिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला यूटयूबवर चॅनल तयार करावे लागते. यासाठी यूटयूबवर तुमचं अकाउंट असणं गरजेचं असतं. जर तुम्ही जीमेल वापरत असाल, तर जीमेलसाठी वापरत असलेला यूजर नेम आणि पासवर्ड दिला की तुम्ही यूटयूबला लॉग-इन करू शकता. कारण यूटयूब आणि जीमेल ही गूगलचीच सेवा आहे. जीमेलच्या एका यूजर नेम पासवर्डवरून तुम्ही गूगलच्या सर्व सेवा वापरू शकता. यूटयूबला लॉग-इन करून तुम्ही तुमची स्वत:चे यूटयूब चॅनल तयार करू शकता. त्यासाठी गूगलने उपलब्ध करून दिलेले मार्गदर्शन तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करून समजून घेता येईल : http://bit.ly/UtubeGuide.

 यूटयूबवर कशा प्रकारचे व्हिडिओ तयार करायचे?

सुरुवात कोठून करायची हा सर्वांत मोठा प्रश्न असतो. मात्र, एकदा तुम्ही सुरुवात केलीत की तुम्हाला स्वत:ला अनेक गोष्टी समजत जातील. सर्वांत आधी सुरुवात करताना तुमची आवड किंवा तुमचं कौशल्य ओळखा.

समजा तुम्ही छान कविता करता, तर तुमच्या आवाजातील व्हिडिओ रेकॉर्ड करा. तुम्ही छान गाता, तर तुमच्या आवाजातील व्हिडिओ रेकॉर्ड करा. तुम्हाला खाण्याचे पदार्थ करायला आवडतात, तर तुम्ही पदार्थांची रेसिपी आणि ते पदार्थ तयार करतानाचा व्हिडिओ शूट करा. तुम्हाला एखाद्या सामाजिक-राजकीय विषयावर भाष्य करायला आवडत असेल, तर तुम्ही त्या प्रकारचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. अशा प्रकारातील तुमची गरज ओळखा आणि त्या प्रमाणे काय व्हिडिओ करता येईल, ते ठरवा. व्हिडिओ तयार करताना अगदी साध्या स्मार्ट फोनवरही तुम्ही तो रेकॉर्ड करू शकता. सुरुवातीपासूनच उच्च दर्जाचा व्हिडिओ असण्याची गरज नाही. तयार केलेल्या व्हिडिओला एडिट किंवा प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला संगणकावर VSDC हे विनामूल्य सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. याशिवाय थेट मोबाइलवरच एडिट करण्यासाठीही अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. 

श्रध्दा शर्मा या yourstory.comया ब्लॉगमधून मासिक 12 लाख रुपये उत्पन्न कमावतात.

 
 
केव्हा सुरू होणार उत्पन्न?

यूटयूब चॅनल सुरू केल्यानंतर आपल्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मात्र एक लक्षात ठेवा - उत्पन्न सुरू होण्यापूर्वी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. गूगलच्या तांत्रिक परिभाषेत तुम्हाला जर जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करायचं असेल, तर तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर्स (म्हणजे ज्यांनी तुमच्या चॅनलवर येऊन सबस्क्राइब बटणावर क्लिक केलं आहे) आणि मागील बारा महिन्यांत एकूण 4000 तास तुमच्या चॅनलवरील व्हिडिओ बघितले गेले पाहिजेत. म्हणजे समजा, तुम्ही दहा मिनिटाचे दहा व्हिडिओ केले असतील, तर 40 जणांनी ते दहाही व्हिडिओ संपूर्ण दहा मिनिटं बघितलेले असावेत. या दोन अटी तुम्ही पूर्ण केल्यात की त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ Monetizationसाठी पाठविता येतो. Monetization म्हणजे तुमचा व्हिडिओ जाहिरात दाखवण्यासाठी आणि त्यातून तुम्हाला पैसे देण्यासाठी पात्र आहे किंवा नाही, हे तपासणं. ही तपासणी यूटयूबद्वारे केली जाते. अनेकदा ती यांत्रिक पध्दतीने केली जाते, तर क्वचित प्रकरणी मानवी हस्तक्षेप केला जातो. या सर्व प्रक्रियेला कोणतीही कालमर्यादा नाही. तुम्ही अगदी दोन महिन्यांतही या सर्व पात्रतेच्या अटी पूर्ण करू शकता. तुमचा कामाचा वेग जेवढा जास्त, तेवढा तुम्हाला उत्पन्नाचा मार्ग लवकर मिळू शकतो.

 

काय असावं यूटयूब व्हिडिओमध्ये?

व्हिडिओमध्ये काय असावं आणि काय नसावं याबाबत यूटयूबने काही मार्गदर्शन केले आहे. त्यापैकी काही ठळक बाबी -


1) हलती दृश्यं (स्टिल, व्हिडिओ, ऍनिमेशन किंवा अन्य काहीही) आणि आवाज ऐकायला यायला हवा.

 

2) लोकांना आवडेल, त्यांचं रंजन करेल आणि त्यांना खिळवून ठेवेल असा कंटेंट.

 

3) सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये वापरलेलं कंटेंट, चित्रं, व्हिडिओ, आवाज हा तुम्ही स्वत: तयार केलेला असावा किंवा त्याचे स्वामित्व हक्क (कॉपीराइट्स) तुमच्याकडे असायला हवेत किंवा गूगलद्वारे अटींच्या अधीन राहून मोफत उपलब्ध असलेला कंटेंट असायला हवा.

 

4) याशिवाय यूटयूबने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमात राहूनच व्हिडिओ तयार करावेत.

 

स्वत:च्या कलाकृतींची ऑनलाइन विक्री

तुम्ही जर चित्रकार असाल किंवा हौस म्हणून एखादं चित्र काढलं असेल आणि ती विकावं अशी तुमची इच्छा असेल, तर artplusmarketing या संकेतस्थळाने चित्रं/छायाचित्रं ऑनलाइन विक्रीसाठी काही संकेतस्थळं सुचवली आहेत. त्यामध्ये आर्टपल (artpal.com) या संकेतस्थळाचा समावेश आहे. चित्र, छायाचित्र, डिजिटल आर्ट, शिल्प, काचेचं शिल्प, स्वत: तयार केलेली ज्वेलरी, हस्तकला इत्यादी प्रकारची कलाकृती विकण्यासाठीचं हे अत्यंत प्रभावी संकेतस्थळ आहे. विशेष म्हणजे या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी किंवा कलाकृती विकण्यासाठी किंवा कलाकृती विकल्यानंतर कोणतंही कमिशन आकारण्यात येत नाही. याशिवाय हे संकेतस्थळ तुम्हाला तुमच्या कलाकृतीची जास्तीत जास्त जाहिरात करण्यासाठी मदत करतं. या संकेतस्थळाद्वारे तुम्ही थेट मूळ स्वरूपातील चित्र (कलाकृती) विकू शकता किंवा त्याच्या प्रती विकू शकता किंवा प्रिंट-ऑन-डिमांड (मागणीप्रमाणे छपाई) करण्याची सुविधाही खरेदीदाराला उपलब्ध करून देऊ शकता. याशिवाय artpal.com, singulart.com, Displate.com, artfinder.com, http://gallery.azucarmag.com/, Saatchiart.com, Society6.com, artsper.com या संकेतस्थळांद्वारेही कलाकृतींची विक्री करता येते.artpal.com, singulart.com, Displate.com, artfinder.com, http://gallery.azucarmag.com/, Saatchiart.com, Society6.com, artsper.com

 

तुमच्याकडे या गोष्टी असणं अनिवार्य

- सतत नवं शिकण्याची इच्छा, आवड

- माहिती घेऊन प्रयोग करण्याची मानसिकता

- सातत्याने कल्पक, सर्जनशील, नावीन्यपूर्ण विचार करण्याची तयारी.

- आपण ज्या माध्यमात (फेसबुक, यूटयूब वगैरे) काम करत आहोत, त्या माध्यमांमध्ये होत असलेल्या बदलांविषयी - म्हणजेच अपडेट्सविषयी सतत अद्ययावत माहिती घेण्याची तयारी.

- जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणे मनापासून काम करण्याची तयारी.

 
ब्लॉग रायटिंग

तुम्हाला तर लिहिण्याची आवड असेल, तर तुम्ही ब्लॉग रायटिंगद्वारेही आपण पैसे कमावू शकतो. तुमचा ब्लॉग एखाद्या विषयाला वाहिलेला (उदा., कथा, कविता, पुस्तक परिचय, चित्रपट परीक्षण, पाककृती किंवा अन्य) असावा. तुम्हाला एकापेक्षा अधिक विषयात लिहिण्याची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्लॉग तयार करू शकता. ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्ही गूगलची ब्लॉगर (blogger.com) किंवा तत्सम ब्लॉगर प्लॅटफर्ॉम्स (wordpress etc.) वापरू शकता. ब्लॉगरद्वारे ब्लॉग कसा तयार करायचा हे पाहण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या - http://bit.ly/HowtoCreateBlog


एकदा तुमचा ब्लॉग तयार झाला की त्यावर तुम्ही सातत्याने लेखन करणं आवश्यक आहे. तुम्हाला जाहिराती सुरू करण्यासाठी गूगल ऍड सेन्स अकाउंट तयार करणं गरजेचं आहे. (ऍड सेन्स अकाउंट तयार करण्यासाठी भेट द्या : http://bit.ly/gasaccount
)

ब्लॉगद्वारे उत्पन्न मिळविण्यासाठी हे आवश्यक -

1) एकदा तुमचा ब्लॉग तयार झाला की त्यावर तुम्ही सातत्याने लेखन करणं आवश्यक. लेखन जास्तीत जास्त वाचनीय असावं.

2) ब्लॉग तयार करून किमान 60 दिवस झालेले असावेत.

3) ब्लॉगवर किमान 30 पोस्ट असणं गरजेचं.

4) दररोज किमान 300 युनिक यूजर्सनी तुमच्या ब्लॉगला भेट देणं आवश्यक.

 

गूगल ऍड सेन्सशिवाय ब्लॉगवरील जाहिरातीसाठी खालील संकेतस्थळं उपलब्ध आहेत. प्रत्येक संकेतस्थळाचे नियम आणि पात्रतेच्या अटी वेगवेगळया आहेत. त्या त्या संकेतस्थळावर जाऊन तुमच्या ब्लॉगला जाहिरात कशी पोस्ट करायची याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त करू शकता.

adgebra.in

media.net

https://propellerads.com/

infolinks.com

publishers.adsterra.com

popads.net

तुम्हाला जर लेखनाची खूप आवड असेल आणि पुस्तक प्रसिध्द करायची इच्छा असेल, तर तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय ई-बुक प्रसिध्द करू शकता. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे - https://kdp.amazon.com/enUS/

 

सोशल मीडिया सेलिब्रिटी

अलीकडे सोशल मीडियाद्वारे स्वत:च्या प्रतिमा निर्मितीची जणू काही स्पर्धाच लागली आहे. या स्पर्धेत जर तुम्हाला रस असेल आणि तुमचे मोठया प्रमाणात फॉलोअर्स किंवा फ्रेंड्स असतील, तुमच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळत असेल (साधारण 500+ लाइक्स वगैरे) तर तुम्ही सोशल मीडिया सेलिब्रिटी होऊ शकता. एकदा तुम्ही सोशल मीडिया सेलिब्रिटी झालात की तुमच्या प्रोफाइल किंवा पेजद्वारे तुम्ही एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात पोस्ट करू शकता. त्याद्वारे जाहिरातदाराकडून तुम्ही काही शुल्क घेऊ शकता. अर्थातच यासाठी तुम्ही तुमच्याच फेसबुकद्वारे किंवा ऑफलाइन जाहिरात करू शकता. अलीकडच्या काळात हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलावंत, उत्तम लेखक किंवा तरुणाईला - विशेषत: किशोरवयीन मुला-मुलींना प्रभावित करणारे सोशल मीडिया सेलिब्रिटी ठरत आहेत. सोशल मीडियामध्ये फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्रााम तसेच अन्य काही सोशल साइट्स सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या सर्वांवर किंवा यापैकी कोणत्याही एका साइटवर तुम्ही तुमची प्रतिमा निर्मिती करून सोशल मीडिया सेलिब्रिटी होऊ शकता.


अमित अगरवाल (Labnol.org) हे भारतातील टॉप 10 ब्लॉगर्सपैकी एक असून त्यांनी ब्लॉग सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच त्यांना महिन्याला 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागलं. ते त्यांच्या ब्लॉगमधून तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण वजा माहिती देतात.

   

नव्याने सोशल मीडिया सेलिब्रिटी व्हायचं असेल तर -

तुमच्या अकाउंटवर प्रभावी, आकर्षक आणि यूजर्सच्या नजरा खेचून घेणारा मजकूर असायला हवा.

इतर कोठेही सापडणार नाही अशा युनिक कंटेंट तुमच्याद्वारे प्रसारित व्हायला हवा.

मजकुराच्या सादरीकरणात वैविध्य असायला हवं. म्हणजे केवळ टेक्स्ट, इमेज, जीआयएफ इमेज, व्हिडिओ, लाइव्ह व्हिडिओ वगैरे

तुमचा मानवी चेहरा (प्रत्यक्ष जसा आहे तसाच) व्हिडिओद्वारे लोकांना दाखवणं गरजेचं, ज्याद्वारे यूजर्सचा विश्वास संपादित करता येऊ शकतो.

 

फेसबुक लाइव्ह व्हिडिओ

फेसबुकवर ज्याप्रमाणे आपण एखादा मजकूर, फोटो, व्हिडिओ पोस्ट करू शकतो, त्याचप्रमाणे आपण समोर जे काही घडत आहे ते जसं दूरचित्रवाहिनीत लाइव्ह दिसतं, तसंच आपण फेसबुकद्वारे लाइव्ह प्रसारण करू शकतो. तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाइलद्वारे लाइव्ह प्रसारण करू शकता. हे लाइव्ह सुरू असताना ते जर 300 यूजर्स एकाच वेळी पाहत असतील, तर तुम्हाला जाहिरात मिळते. म्हणजे तुमच्या लाइव्हदरम्यान तुम्हाला ऍड ब्रेक मिळतो. ऍड ब्रेकदरम्यान साधारण काही सेकंदांच्या जाहिरातीतून तुम्हाला उत्पन्न मिळतं.

 

फेसबुक मार्केटप्लेस

फेसबुकवर मार्केटप्लेस नावाची एक सुविधा आहे. (भेट द्या : https://www.facebook.com/marketplace/) येथे तुम्ही तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात करू शकता. त्यास उत्तम प्रतिसाद मिळतो आणि तुम्हाला उत्पन्नाची संधी प्राप्त होते. यासाठी तुम्हाला डाव्या बाजूला Sell Something हा पर्याय निवडावा लागतो. काही वर्षांपूर्वी फेसबुकची लोकप्रियता कमी होत असल्याचे चित्र निर्माण झालं होतं. त्या वेळी अधिकाधिक यूजर्सना आकर्षित करण्यासाठी फेसबुकने मार्केटप्लस ही सुविधा आणली असून त्यावर खूप लक्ष दिलं आहे. त्यामुळेच तुमच्या पेज अथवा पर्सनल प्रोफाइलपेक्षाही मार्केटप्लेसवर अपलोड केलेली पोस्ट अधिक यूजर्सपर्यंत पोहोचते.


स्वत:च्या उत्पादनांची/सेवेची ऑनलाइन विक्री

समजा, तुम्ही घरच्या घरी खाद्यपदार्थ वगैरे तयार करत असाल किंवा ज्वेलरी किंवा तत्सम काही तयार करत असाल किंवा ब्युटी पार्लरच्या सेवा देत असाल, तर अशा उत्पादनाची/सेवांची ऑनलाइन विक्री करून तुम्ही पैसे कमावू शकता. ऑनलाइन विक्रीसाठी तुम्ही amazon.com, flipkart.com, eBay.com, alibaba.com, Shopclues.com, Snapdeal.com, Bigbasket.com या काही संकेतस्थळांवर तुमचे उत्पादन/सेवा ठेवू शकता. त्यासाठी बहुतेक ठिकाणी विक्री झाल्यानंतर कमिशनशिवाय अन्य कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.


संलग्न विपणन (
Affiliate Marketing)

ऑनलाइन उत्पन्नाचा हा एक साधा आणि खूप सोपा पर्याय आहे. तुम्ही तुमची फेसबुक पोस्ट, ट्वीट, ब्लॉग, यूटयूब चॅनल किंवा अगदी व्हॉट्स ऍपच्या पोस्टद्वारेही या माध्यमातून पैसे कमावू शकता. संलग्न विपणन म्हणजे इतर संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांची जाहिरात करायची. जाहिरातीची योग्य नोंदणी ठेवली जाते आणि तुम्ही केलेल्या उत्पादनांच्या विक्रीवर तुम्हाला साधारण 1 ते 12 टक्के कमिशन मिळतं. यासाठी तुम्ही amazon.com, fliptkart.com, eBay.com, alibaba.com, Shopclues.com, Snapdeal.com, Bigbasket.com या संकेतस्थळावरील सर्व (काही अपवाद वगळता) उत्पादने विकू शकता. त्यासाठी तुम्ही गूगलवर affiliate with (ज्या संकेतस्थळावरील उत्पादनाची जाहिरात करायची आहे त्या संकेतस्थळाचं नाव) असे सर्च केलं की तुम्हाला संबंधित लिंक सापडू शकते. त्याद्वारे तुम्हाला उत्पादनांचा प्रकार आणि कमिशनची टक्केवारी दिलेली आहे. तेथे तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे.

तुम्ही नोंदणी करून जाहिरात करायचं उत्पादन निश्चित केलं की तुम्हाला एक लिंक आणि त्या उत्पादनाच्या विविध आकारातील इमेजेस प्राप्त होतात. मग या लिंक्सची आणि या इमेजेसची तुम्ही कोणत्याही माध्यमातून जाहिरात करू शकता. अगदी फक्त लिंकसुध्दा व्हॉट्स ऍपद्वारे शेअर करू शकता. या लिंकवर क्लिक करून जे कोणी संबंधित उत्पादन खरेदी करतील, त्यावरील कमिशन तुम्हाला नोंदणी करताना दिलेल्या बँक खात्यात जमा होते. एखाद्या उत्पादनाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ तयार करून व्हिडिओमध्ये तुम्ही ही लिंक शेअर करू शकता.

 

ऑनलाइन कामं मिळवणं (मुक्त व्यावसायिक)

तुम्हाला या ऑनलाइन उत्पन्नाच्या प्रकारात पडण्याऐवजी घरात बसूनच काम हवं असेल, तर तशीही सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. त्यासाठी freelancer.com, Upwork.com, Truelancer.com, Toptal.com, Guru.com ही संकेतस्थळं उपलब्ध आहेत. या संकेस्थळांवर ज्यांना काही काम करून घ्यायचं आहे ते त्यांचं काम पोस्ट करतात. त्यानंतर जे जे काम करणारे नोंदणीकृत यूजर्स आहेत ते कामात स्वारस्य दाखवून दर नोंद करतात. ज्यांचे दर कमी असतील त्यांना काम मिळतं. दराबरोबरच तुमचा पूर्वानुभव, तुम्ही संबंधित संकेतस्थळाद्वारे केलेलं काम, त्यावर इतरांनी दिलेला अभिप्राय इत्यादी मुद्दे विचारात घेतले जातात. येथे तुम्ही डेटा एंट्रीपासून ते लेखन, डिझायनिंग वगैरे दर्जाची सर्व प्रकारची कामं करू शकता. तुम्ही या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता. यापैकी काही संकेतस्थळांवर नोंदणीनंतर प्रत्यक्ष कामं मिळविण्यासाठी काही शुल्क आकारलं जातं, तर काही संकेतस्थळावर तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्हाला मिळणाऱ्या रकमेवर कमिशन आकारलं जातं.

 


कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोटयाशा गावातील विष्णू वजार्डे हे नातेसंबंध या विषयावर यूटयूब चॅनलद्वारे कल्पक भाष्य करतात. त्यातून त्यांना महिन्याला साधारण एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. तोच त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. त्यांचे जवळपास 10 लाख फॉलोअर्स आहेत.

 

या प्रकारच्या कामात एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व कामं इतर देशांपेक्षा भारतात कमी दरात करून घेतली जाऊ शकतात. त्यामुळे भारतातील यूजर्सना सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. नव्याने मातृत्व प्राप्त झालेल्या महिला, परदेशी गेलेल्या आणि नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या महिला, तसंच फ्रीलान्स काम करणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त आहे.

सोशल मीडिया मॅनेजमेंट

सोशल मीडिया मॅनेज करणं हा अलीकडे एक मोठा व्यवसाय झाला आहे. कोणताही छोटा-मोठा उद्योग-व्यवसाय-सेवा-व्यक्ती यांची प्रतिमा निर्मिती करणं हे एक महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे या ऑनलाइन पूरक व्यवसायाकडेही तुम्ही वळू शकता. यासाठी तुम्हाला स्वत:ला भारतामध्ये प्रचलित असलेल्या फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्रााम, यूटयूब वगैरेसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सबद्दल इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. जर ती नसेल तर तुम्ही ऑनलाइन ती प्राप्त करू शकता. मात्र, शिकलेल्या माहितीचं सातत्याने प्रात्यक्षिक करत राहणं गरजेचं आहे. एकदा का तुम्ही या बाबी शिकलात की तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट करू शकता. राजकीय व्यक्ती, कंपन्या, संस्था-संघटना यांना योग्य प्रकारे सोशल मीडियाचं महत्त्व पटवून स्पर्धात्मक दरात त्यांना अशी सेवा देऊ शकता. यामध्ये दैनंदिन सोशल मीडिया पोस्टिंग (मजकूर लेखन, डिझायनिंग वगैरे), मल्टिमीडिया इंटरॅक्टिव्ह कंटेंट क्रिएशन वगैरे करून त्याचा मासिक/साप्ताहिक अहवाल करणं या आणि अशा आनुषंगिक बाबींचा समावेश असू शकतो. या माध्यमातून तुम्ही तुमची छोटीशी स्टार्टअप कंपनीही सुरू करू शकता.


डिजिटल मार्केटिंग

अलीकडच्या काळात डिजिटल मार्केटिंगला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. डिजिटल मार्केटिंगलाच इंटरनेट मार्केटिंगही म्हटलं जातं. डिजिटल म्हणजेच मोबाइल, संगणक अशा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसद्वारे केलेली जाहिरात म्हणजे मार्केटिंग. या प्रकारच्या मार्केटिंगमध्ये गूगल, फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्रााम वगैरे माध्यमांचा वापर केला जातो. कोणतंही उत्पादन किंवा सेवा असली तरीही त्याचं डिजिटल मार्केटिंग करता येणं शक्य आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग या विषयाचा खोलात अभ्यास करणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने फेसबुकवरील सशुल्क जाहिराती (Facebook Paid advts.), गूगल ऍड्स वगैरेबाबत तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय डिजिटल मार्केटिंगचं धोरण (Digital Marketing Strategy) तयार करणं, आवश्यक मजकूर (विविध भाषांतील), इमेजेस, ग्रााफिक्स, जीआयएफ इमेजेस, व्हिडिओज तयार करणं गरजेचं असतं. या सर्व बाबी तुम्ही स्वत: करण्यापेक्षा तुमच्या 2-3 मित्रांचा एक समूह तयार करून त्याद्वारे ही सारी कामं करू शकता. विशेष म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं महत्त्व आणि त्याचा उपयोग अपेक्षित ग्रााहकांना पटवून देण्याचं जाहिरात कौशल्यही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही पूर्वतयारी झाली की तुम्ही या क्षेत्रातील स्टार्टअप तयार करू शकता.


मित्र-मैत्रिणींनो
, ऑनलाइन पैसे कमावण्याचे माध्यम हे क्षेत्र खूप व्यापक आहे. इथे तुम्हाला काही महत्त्वाच्या जास्तीत जास्त माध्यमांची माहिती दिली आहे. तुमच्या ऑनलाइन उत्पन्नाच्या विचारांना दिशा मिळावी हा यामागचा उद्देश. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरील सर्व माध्यमांचा वापर करून आपण दरमहा किती रुपये कमावू शकतो, याबाबत काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे किती दिवसात तुम्हाला उत्पन्न सुरू होईल, याबाबतही निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र एक निश्चितपणे सांगता येईल की तुम्ही जेवढया वेगाने, मनापासून, प्रामाणिकपणे काम कराल, तेवढं लवकरात लवकर तुम्हाला उत्पन्न सुरू होईल. चला, तर मग आपल्या हातातील या प्रभावी माध्यमांचा प्रभावी वापर करू या आणि आर्थिक समृध्दीच्या दिशेने वाटचाल करू या.

(समाजमाध्यम अभ्यासक, तंत्रशिक्षक, पुणे)