केकशिल्पकार गौरी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक05-Nov-2019
|

 

*** ललिता कामतकर - भोयर *** 
 
नुकताच मुंबईतकेकॉलॉजी महोत्सवपार पडला आणि ह्या महोत्सवाची ह्या वर्षीची थीम होतीबॉलिवूड’. आलेल्या केकशिल्पांपैकीखिलजीया व्यक्तिरेखेच्या केकशिल्पाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पारितोषिक विजेतं ठरलं. ज्याच्या नुसत्या नजरेने दहशत बसावी असं अगदी जिवंत वाटणारं हे केकशिल्प साकारलं होतं ठाण्याच्या नामवंत केक आर्टिस्ट गौरी केकरे यांनी. या महोत्सवाच्या निमित्ताने गौरी ह्यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद.

 

 मंडळी, केक म्हटलं आपल्या डोळ्यासमोर केकशॉपमधले ठरावीक आकाराचे केक येतात. मात्र केकची दुनिया त्याहूनही मोठी आहे. विस्तारलेली आहे. कलावंतांच्या कल्पकतेने तिला खूप नवनवीन आयाम लाभले आहेत. केकशिल्प हा त्यापैकीच एक. हा निव्वळ थक्क करणारा प्रकार आहे.

  केकनिर्मितीतल्या या आधुनिक प्रकारात - केकशिल्पांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या काही मोजक्याच व्यक्ती आज आहेत. त्यापैकी एक ठाण्याच्या गौरी केकरे. साधे केक ते केकशिल्प इथवरचा त्यांचा प्रवास अत्यंत विस्मयजनक आहे. विशेष म्हणजे गौरी डेंटिस्ट आहेत. डेंटिस्ट आपल्याला केक आणि तत्सम पदार्थांपासून नेहमी लांब राहण्याचा सल्ला देतात. या डेंटिस्ट त्याला अपवाद आहेत.

 डेंटिस्ट ते केकॉलॉजिस्ट हा प्रवास करताना सुरुवातीच्या काळात असं काही ठरलं नव्हतं. आईवडील दोघंही डॉक्टर, व्यवसायात उत्तम जम बसलेले. मात्र त्यांच्या शाखा वेगळ्या. त्यातच बी.डी.एस.ची इंटर्नशिप चालू असताना गौरीचं श्रीकांत केकरेशी लग्न झाल्याने ते दोघे ठाण्यात स्थायिक झाले. तेव्हा नव्या शहरात डेंटिस्ट म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करणं, त्यासाठी लागणारी भलीमोठी आर्थिक गुंतवणूक करणं दोघांच्या आवाक्याबाहेरचं होतं. नवीन लग्न झालेलं आणि श्रीकांतही नव्या व्यवसायात जम बसवत असलेला. तेव्हा दुसर्या डेंटिस्टकडे नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यातून समाधानकारक पैसे मिळत नव्हते. दरम्यान पहिल्या मुलीचा - सईचा जन्म झाल्याने आणि घरी कोणी वडीलधारं माणूस नसल्याने तिला सांभाळण्यासाठी कामातून ब्रेक घ्यावा लागला तो ती वर्षाची होईपर्यंत. हॉस्पिटल व्यवस्थापनात पोस्ट ग्रॅज्युएशनदेखील केलेलं असल्याने, दुसरा जॉब निवडताना मुलीसाठी कामाची वेळ निवडता आली. काही कालावधीनंतर त्यांच्या दुसर्या मुलीचा जन्म झाला. तिच्या जन्माच्या वेळी काही कॉम्प्लिकेशन झाल्याने सगळी कामं बाजूला ठेवून तिच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक झालं. तेच गौरींनी केलं. त्यानंतर जवळजवळ दीड वर्ष त्या पूर्णवेळ घरी होत्या. मुलींचं सगळं गाडं सुरळीत लागल्यानंतर कामासाठी बाहेर पडायचं तर पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली असती. त्यातूनच वेगळं काही करावं हा विचार डोक्यात घोळायला लागला

 आमच्या फेसबुक पेजला like करासा. विवेक

गौरी सांगत होत्या, ‘त्या काळात विरंगुळा आणि हौस म्हणून मी बेकिंग सुरू केलं. मुलांना त्यांच्या आवडीचे वेगळं आणि चांगलं खाऊ घालावं हा त्यामागचा हेतू. लग्न होईपर्यंत मला स्वयंपाकातलं काहीही यायचं नाही. चहा आणि मॅगी एवढंच काय ते माझं पाककौशल्य. मी जे काही शिकले ते लग्नानंतर. त्यामुळे स्वयंपाक म्हणजे माझ्यासाठी आव्हान होतं. ते मी आनंदाने स्वीकारलं. त्यातूनच मी प्रोजेक्ट इंडियन कुकिंग नावाचा ब्लॉग सुरू केला. या ब्लॉगमुळे, त्यावर मिळणार्या प्रतिसादामुळे स्वयंपाकातील बारकावे शिकता आले. आणि पाककला हा आनंद मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे हे समजलं. आपण रोज जे पदार्थ खातो, त्यात काही नवीन प्रयोग करू शकतो का? त्यात थोडे बदल करून नवीन रेसिपी तयार करू शकतो का? हे शोधण्याचा माझा प्रयत्न असायचा. हे ब्लॉग प्रकरण जवळजवळ वर्षभर चाललं. त्या काळात मी बरेच प्रयोग केले. त्यातलंच एक होतं बेकिंग. सुरुवातीला मला ते फारसं जमलं नाही. ओव्हनमधून काढलं आणि थेट कचर्याच्या डब्यात टाकलं, असंही घडलं. पण जेव्हा माझा पहिला केक यशस्वी झाला, त्या वेळी मला जो आनंद झाला तो अवर्णनीय होता. माझा पहिला स्पाँजी केक, ज्या मुलीला नीट स्वयंपाक करता येत नव्हता तिचा केक इतका लुसलुशीत आणि स्पाँजी झालाय हा अनुभव खूप खास होता. तिथून खरा प्रवास सुरू झाला. केक, कप केक असे प्रकार सुरू झाले. त्यानंतर माझ्या मुलीने, सईने एकदा हट्ट केला की माझ्या वाढदिवसाला तिलाडॉल केकहवाय! माझ्या बर्थ डेला बरे का, तिच्या नव्हे. आता माझ्या वाढदिवसाला आम्ही तिघंच आणि डॉल केक आणायचा म्हणजे कमीत कमी चार किलोचा तरी ऑर्डर करावा लागला असता. एवढ्या केकचं काय करणार? खाणारी माणसं तीनच, त्यामुळे मी घरीच डॉल केक बनवण्याचा विचार केला. हीच माझ्या केकशिल्पांची सुरुवात.’
 

  त्या वेळी डोक्यात एकच होतं की हा केक बनला तर बोनस आणि बिघडला तर जे तयार होईल ते आपण खायचं. हे मुलीला सांगितल्यावर ती म्हणाली की चालेल. त्यानंतर जवळजवळ महिनाभर मी डॉल केकशी संबंधित माहिती इंटरनेटवर शोधत राहिले, वेगवेगळ्या साइट्सवर गेले, यूट्यूब व्हिडिओज पाहिले, हा केक नेमका कसा असतो, त्याला सपोर्ट कसा देतात, त्याला कार्व्हिंग कसं करतात, त्याला क्रीम कसं लावतात हे सगळं नीट समजून घेतलं. शिवाय त्यासाठी लागणारं क्रीम, वापरायचे खाद्य रंग कुठले वापरायचे, तयार झाल्यावर ती डॉल सांभाळायची कशी याचा अभ्यास केला. आणि फायनली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी डॉल केक बनवला. मनासारखा झाल्याने त्याचा फोटो काढला आणि फेसबुकवर टाकला. त्या पोस्टवर मला भरभरून मेसेजेस आले. कौतुकाचा नुसता वर्षाव झाला. असाच केक मलाही करून देणार का, अशीही अनेकांनी विचारणा केली. या सगळ्यातून माझा आत्मविश्वास वाढायला मदत झाली. मग त्यावर नीट विचार करून 15 ऑगस्ट 2013ला या व्यवसायात येण्याचं नक्की केलं.

  व्यवसायासाठी हेच क्षेत्र निवडण्यामागे काही महत्त्वाची कारणं होती. मुळात माझी खात्री पटली होती की baking is the right field for me. या निर्मितीतून मला आनंद मिळत होता. आणि हे काम मी घरातून करू शकत होते. त्यामुळे मला दोन्ही मुलींकडे लक्ष देता येणार होतं. आणि तिसरं म्हणजे व्यवस्थित पैसेही मिळत होते. मनाजोगी कमाई, घरून काम करण्याची सुविधा आणि मला त्यात वाटत असलेला इंटरेस्ट हे सगळं जुळून आल्याने याच क्षेत्रात काम करायचं नक्की केलं.”


  केक शिल्प म्हणजेच फॉडन्ट केक हा प्रकार आजही आपल्याकडे नवीन आहे. आणि जेव्हा गौरी ह्या क्षेत्रात आल्या, तेव्हा तर हे सगळ्यांसाठीच नवीन होतं. त्या वेळी या क्षेत्राकडे कशा वळलात? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मुलीला सांभाळताना मी बरेचदा टीव्ही लावून ठेवायचे. फूड फूड किंवा टीएलसी, केक ऑफ वगैरे कार्यक्रम आवडीने बघायचे. हे बघून मला तेव्हा असं वाटायचं की, हे कसं करत असतील बरं? नक्की काय मटेरियल वापरत असतील, ते आपल्याकडे मिळेल का? आणि नशिबाने नेमक्या याच वेळी फॉडन्ट भारतीय बाजारपेठेत दाखल झाला. तोपर्यंत कोणीही केकमध्ये फॉडन्ट वापरत नव्हतं. त्याचा नेमका वापर कसा करतात, हेही जास्त कुणाला माहीत नव्हतं. मी ही गूगलवर सर्च केलं आणि कामाला सुरुवात केली. सुरुवातीचे माझे प्रयोग आणि अनुभव भयंकर होते. मी माझा पहिला फॉडन्ट केक बनवला, तो पूर्ण पावसात! तेव्हा एसी बंद होता आणि बाहेर धो धो पाऊस पडत होता. ते मिश्रण प्रचंड चिकट झालं होतं. कसाबसा मी तो पूर्ण केक केला. पहिल्या प्रयत्नाच्या मानाने सुंदर झाला होता. त्या वेळी मला ह्या अशा मटेरियलसह काम करायचं म्हणजे दिव्य वाटलं होते. त्याला चिकटपणा हवेतल्या आर्द्रतेमुळे आला होता हे समजलं. नंतर काम करत असताना त्यातले एकेक बारकावे कळत गेले. त्यातल्या खाचाखोचा कळत गेल्या. त्याचे जे मोजकेच क्लास होते, ते प्रचंड महाग होते. त्या वेळी ते मला परवडण्यासारखं नव्हतं. तेव्हा स्वत:होऊन शिकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता आणि म्हणून नेटवरून माहिती मिळवून फॉडन्टवर प्रॅक्टिस करायचे. मुलं झोपली की माझा सराव चालायचा. त्या वेळी ह्या क्षेत्रात माझ्या काही मैत्रिणी झाल्या होत्या, त्या मला मदत करायच्या. त्या या क्षेत्रात आज चांगल्याच प्रसिद्ध आहेत. ज्या वेळी मला काही अडचण यायची, त्या वेळी मला मदत करण्यासाठी त्या नेहमी असायच्या. त्यापैकीच एक म्हणजे पूनम मारिया प्रेम. ती खरं तर ह्या क्षेत्रातली माझी गुरूच. तिची मला खूप मदत झाली. त्या वेळी फॉडन्ट केक करणार्या ठाण्यातील मोजक्या लोकांपैकी मी एक होते. त्यामुळे साहजिकच माझ्याकडे भरपूर ऑर्डर्स येत. त्यातून एक नवीन आव्हान समोर आलं, ते म्हणजे फिगरिन्स, छोट्या मनुष्याकृती! हा म्हणजे एक अफलातून प्रकार, जो झपाट्याने प्रसिद्ध होत होता. मी ठरवलं की आपल्याला हा प्रकार जमायलाच हवा. त्यासाठी मी रात्ररात्रभर जागून ह्याचा सराव करायचे. इतकं मला ह्या प्रकाराने पछाडलं होतं की मी केवळ दोन-तीन तासच झोपायचे. शेवटी अपुर्या झोपेमुळे मला मायग्रेनचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी जागरणांना बंदी घातल्याने मी माझी दिनचर्या बदलली. स्कल्प्टिंग किंवा बस्ट केक जे मी आता करते, हे परदेशात आधीपासूनच प्रसिद्ध होते आणि मलाही त्याची आवड होती. म्हणून मी त्याबद्दल माहिती मिळवली आणि करायला सुरुवात केली. आधी काम ओबडधोबड व्हायचं, कधी नाक मोठं व्हायचं, कधी डोळे मोठे व्हायचे, कधी ओठ मोठे यायचे. मात्र ह्यातून मला बारकावे कळत गेले आणि माझा हात बसत गेला. दरम्यान माझा व्यवसाय सेट झाला होता. बर्यापैकी कमाई व्हायला लागली होती. त्यामुळे मग मी पुढचं शिकण्यासाठी मी ॅडव्हान्स क्लास लावला. मी एकटीच अशी होते, जिने बेसिक शिकता थेट ॅडव्हान्स कोर्सला प्रवेश घेतला होता. मी क्लासमध्ये पहिलं फिगरिन केलं ते म्हणजेडान्सिंग डॉल’. त्यात तिचा केवळ एक पाय खाली टेकलेला होता. मला तिला त्या एका पायावर बॅलन्स करायचं होतं आणि ही बाहुली अगदी अप्रतिम साकारली गेली.

  नंतर मी जसे जसे केक बनवत गेले, तसं तसं फिनिशिंग आणखी सुंदर होत गेलं. आज मी ह्या क्षेत्रात खास फिगरिन्ससाठी ओळखली जाते. मी श्रीलंकन कोलॅबरेशनसाठी श्रीलंकन ब्राइड केक केला होता, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.”

  ही कला नाशिवंत आहे, ह्याला शेल्फ लाइफ नाही, त्याबद्दल तुमचं काय मत? तुम्हाला काय वाटतं? तासन्तास केकसाठी केलेली मेहनत केक कापल्यावर क्षणात संपून जाते, त्याबद्दल काय सांगाल? असं विचारल्यावर गौरी म्हणाल्या की, “मी एवढा तासन्तास खपून केलेला केक कापून खाल्ला, ह्याचं मला वाईट कधीही वाटलं नाही. उलट मी एवढी मेहनत करून केलेला केक जर कापता तसाच ठेवला, तर मला जास्त वाईट वाटतं. मी हे काम करते आहे, त्याचा हेतू हाच आहे की त्या क्षणी त्या व्यक्तीला त्यातून क्षणभर नेत्रसुखही मिळावं आणि तो केक कापल्यानंतर खाण्याचाही आनंद मिळावा. जो केक मी बनवते तो दिसायला तर सुरेख असलाच पाहिजे, शिवाय चवीलाही अप्रतिम असावा याची केक आर्टिस्ट म्हणून मी काळजी घेतलीच पाहिजे. तो खाताना लोकांनी डोळे मिटून त्याचा आस्वाद घ्यावा आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडून दाद निघावी. हेच माझ्यातल्या केक आर्टिस्टसाठी महत्त्वाचं आहे. हे नेत्रसुख आणि स्वाद क्षणिक असले, तरी लोकांच्या मनात आयुष्यभरासाठी आठवणी तयार होतात आणि ते प्रचंड समाधान देणारं असतं. केक बघून कापणार्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आल्याचं अनेक जण सांगतात. माझ्यासाठी केक हे लोकांच्या त्यांच्या आप्तेष्टांसाठी असलेल्या अव्यक्त भावना अभिव्यक्त करण्याचं माध्यमही आहे. दिसायला तुम्ही कितीही सुंदर केक बनवला, परंतु तो चवीला चांगला नसेल, तर गिर्हाइक तुमच्याकडे परत कसं येईल? अशा वेळी दिसण्याबरोबरच स्वादाचा दर्जा उत्तम राखणं गरजेचं आहे. ह्याला अपवाद फक्त डिस्प्ले पीस, शोभेचे नमुने. ते असतातच फक्त प्रदर्शनाच्या हेतून तयार केलेले. त्यामुळे त्यात चवीला महत्त्व नसतं. थोडक्यात, माझी कला नाशवंत असल्याचा मला त्रास होत नाही. असा त्रास झाला असता तर मी ह्या प्रकाराकडे वळलेच नसते. शाश्वत कला म्हणून मी पेंटिंग किंवा शिल्पकलेकडे वळले असते. मी पेंटिंगसुद्धा शिकले आहे, शिवाय मी टेराकोटाचे गणपतीसुद्धा करते. जसे मातीचे गणपती विरघळतात, अगदी तसाच प्रकार केकचा आहे. जसे आपण गणपती दीड दिवस बसवून विसर्जित करतो आणि तरीही त्यातून आत्मिक समाधान मिळवतो, तसंच दीड दिवस खपून केलेला केक पाहून कोणीतरी त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस सेलिब्रेट करतोय, त्या चवीने तृप्त होतोय, यातूनसुद्धा आत्मिक समाधानच मिळतं.” 

  स्टुडिओबद्दल विचारलं असता गौरी सांगतात, “माझा केकचा स्टुडियो म्हणजे माझी ही खोली. मी वन बीएचकेपासून ह्या कामाची सुरुवात केली. त्या वेळी हे सगळं काम मी डायनिंग टेबलवर करायचे आणि बेकिंग किचनमध्ये. नंतर हळूहळू व्याप वाढत गेला. व्यवसायाशी संबंधित वस्तू वाढत गेल्या. आता स्वतंत्र खोलीशिवाय पर्याय नव्हता, कारण मी क्लासेस घेणंसुद्धा सुरू केलं होतं. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता होती. त्यामुळे आम्ही ह्या तीन बीएचकेमध्ये राहायला आलो.”

  गौरींचा कामाचा व्याप वाढला असला, तरी मुलांची शाळेची वेळ, जेवणाची वेळ गौरी कटाक्षाने पाळतात. शिवाय घरी असलं की रात्रीही काम करता येतं हा एक फायदाच आहे. बरेचदा रात्री उशिरापर्यंत जागून काम करायची वेळ येते. अलीकडे त्यांनी केकॉलॉजीसाठी खिलजी तयार केला. त्यासाठी त्यांनी जवळजवळ 10 रात्री सतत जागून काढल्या.

  बॉलीवूड ही स्पर्धेची थीम असल्याने एवढे पर्याय असताना शिल्पासाठी खिलजी ह्या पात्राची निवड का केली, यावर त्यांनी सांगितलं की, “महोत्सवाची थीम बॉलीवूड होती आणि बॉलीवूड म्हटलं की आधी विचार केला जातो तो ग्लॅमरस, देखण्या नायक-नायिकांचा. चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असलेला खलनायक मात्र दुर्लक्षितच राहतो. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा ह्या थीमबद्दल ऐकलं, तेव्हाच मी ठरवलं की मी केकमधून खलनायक साकारणार. मला काहीतरी श्ररीसशी ींहरप श्रळषश करायचं होतं. एकतर नुकताच येऊन गेलेला हा चित्रपट आणि त्यात रणवीरने साकारलेली खिलजीची भूमिका मला भावली होती. म्हणून मी खिलजीची निवड केली.”

  खिलजीचा चेहरा पूर्ण झाला त्या रात्री झालेली एक गंमत गौरी सांगतात - त्या आपलं काम संपवून फिनिशिंग पूर्ण करून, लाईट वगैरे बंद करून स्टुडिओबाहेर आल्या. बाहेर गेल्यानंतर लक्षात आलं की त्यांचा चार्जर आताच राहिलाय. त्या चार्जर घ्यायला आपल्या स्टुडिओमध्ये गेल्या आणि लाइट लावल्यावर स्वतःच खिलजीला पाहून दचकल्या. इतका तो हुबेहूब आणि अप्रतिम झाला होता. काम उत्तम झाल्याची पावतीच मिळाली जणू! दुसर्या दिवशी त्यांची मदतनीसही त्याला पाहून दचकली. शिवाय स्टुडिओत काम करताना खिलजी आपल्याकडे रोखून बघतोय असं तिला सारखं वाटत राहिलं. मिशन खिलजी यशस्वी झालं होतं. ह्या महोत्सवात गौरीच्या ह्या कलाकृतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला - खिलजीबरोबर सेल्फी घेण्यासाठी रसिकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.

  या क्षेत्रात टिकायचं तर वेगळा विचार करावाच लागतो. यावर बोलताना गौरी म्हणाल्या, “या क्षेत्रात सतत नवीन द्यायला लागतं. लोकं माझ्याकडे येण्यासाठी मी काहीतरी खास देणं अपेक्षित आहे. ह्या व्यवसायात कितीतरी जण येतात आणि जातात, परंतु जो वेगळेपणा देतो तोच टिकतो. आणि ह्या वेगळेपणासाठी लोक पैसे खर्च करायलाही तयार असतात. तेव्हा नावीन्य टिकवणं फार महत्त्वाचं आहे. मी क्लासेसही घेत असल्याने, तेच तेच शिकण्यासाठी कोण माझ्याकडे का येईल? मी जर काही तरी नवीन शिकवणार असेन तरच माझ्याकडे शिकणारे येतील ना! त्यामुळेही आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची सवय लागली.”

  गौरी ऑनलाइन क्लासेसदेखील घेतात. जेव्हा त्यांनी क्लास घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचाकडे आजूबाजूच्या परिसरातलेच विद्यार्थी येत. हळूहळू ठाणे, मुंबई आणि उपनगरांतूनही मुलं शिकायला येऊ लागली. नंतर त्यांच्याकडे अगदी दिल्ली, गुजरात, राजस्थान, कलकत्ता येथूनही क्लासची विचारणा होऊ लागली आणि त्यांच्यासाठी म्हणून गौरींनी ऑनलाइन क्लास घ्यायला सुरुवात केली.

  सुरुवातीच्या काळात ज्या लोकांनी त्यांच्या ह्या कामाबद्दल नावड दाखवली, विरोध केला, ते आज त्यांचं कौतुक करताना थकत नाहीत. शिवाय घरचे तर आहेतच, त्या जेव्हा बाहेरगावी वर्कशॉपसाठी जातात, तेव्हा त्यांचे पती श्रीकांत, त्यांच्या आई आणि सासूबाई त्यांच्यामागे घराची आणि मुलांची काळजी घेतात. ह्या वेळी गौरींनी सासूबाईंचा एक किस्सा शेअर केला. गौरींच्या सासूबाईंना वाटायचं की आपली सून एवढी हुशार आहे, डॉक्टर आहे, तर तिने त्याच क्षेत्रात काम करावं? ते सोडून सुनेने हा व्यवसाय स्वीकारला, तेव्हा त्या फारशा समाधानी नव्हत्या, पाठिंबा होताच, पण थोड्या साशंकही होत्या. हळूहळू गौरींचा जसा ह्या कामात जम बसत गेला, तसं गौरी केकरे नाव सर्वश्रुत झालं. त्यांच्या सासूबाई इंदोरच्या कोण्या नातेवाइकाकडे कार्यक्रमाला गेलेल्या असताना त्यांना कोणीतरी विचारलं, “त्या मुंबईच्या मोठ्या केक आर्टिस्ट गौरी केकरे तुमच्या कोण?” त्या वेळी सासूबाईंचा चेहरा खुलला आणि त्या मोठ्या कौतुकाने म्हणाल्या, “गौरी ना? ती माझी सून!” त्या वेळी अभिमानाने सासूबाईची मान उंचवली, हे सांगताना गौरी हळव्या होतात. त्यांचे पती श्रीकांत - जे फिल्ममेकर आहेत ते सांगतात की, “माझ्या क्षेत्रात वेळेचं काहीही बंधन नसल्याने सुरुवातीला लागणार्या आर्थिक मदतीपलीकडे मी गौरीसाठी विशेष काही करू शकलो नाही, ह्याचं मला पूर्वी वाईट वाटायचं. मात्र तिने हे जे शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, त्यामुळे मला तिचा प्रचंड अभिमान वाटतो.”

  आज गौरी केकशी संबंधित नामांकित कंपन्या - उदा., षरल, मॅजिक, अल्टिमेट टूल्स ह्यासारख्या मोठ्या उत्पादक कंपन्यांच्या ब्रँड ॅम्बॅसॅडर आहेत, शिवाय त्यांना ह्या क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलंं आहे. केकव्यतिरिक्त त्या फॉडन्टची फुलं, फिगरिन्स वगैरेदेखील इतर बेकर्सना पुरवतात. बेकिंगशी संबंधित सर्व गोष्टी शिकवल्या जातील अशी स्वतंत्र अकादमी सुरू करायचं त्यांचं स्वप्न आहे. मर्यादित सुविधांच्या साथीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गौरींनी घेतलेली ही गगनभरारी निश्चितच कौतुकास्पद आहे आणि तेवढीच प्रेरकही!

 ऋेपवरपीं म्हणजे काय, तर हा आयसिंगचाच एक प्रकार आहे. मात्र यात कुठंलही क्रीम किंवा लोणी वापरता, पिठीसाखर आणि कॉर्नसिरपच्या मिश्रणाने तयार होणारा कणकेसारखा गोळा आयसिंग/फ्रॉस्टिंग म्हणून वापरला जातो. याचं वैशिष्ट्य म्हणजे यातून अगदी शिल्पकलेप्रमाणेच कुठलीही वस्तू, चेहरा, प्राणी, पक्षी साकराले जाऊ शकतात. फोडन्टच्या या वैशिष्ट्यांमुळेच केकचे पारंपारिक रुप पालटून गेले आहे.