हुशारीने वापरायला हवा असा जादुई दिवा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक06-Nov-2019
|

***ओमकार दाभाडकर***  

सोशल मीडिया हा शब्दप्रयोग मेंदूत रुळल्यामुळे आपण या अतिशय सुरेख फेनामेनाला फक्त विचार/मतांची देवाणघेवाण करण्याचा प्लॅटफॉर्म समजत आहोत. पण वस्तुस्थिती ही आहे की याच सर्व प्लॅटफर्ॉम्सना वेगवेगळया प्रकारे वापरलं जात आहे.
 

सार्वत्रिक उपलब्धता आणि पारदर्शक काटेकोरपणा या दोन्ही वैशिष्टयांमुळे सोशल नेटवर्किंग हा प्रकार एवढया जोमाने वाढतोय, रुजतोय. ही वैशिष्टं समजून न घेता सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना सामोरं जाता येणार आहे का?

इ.स. 700. युरोपातील एका छोटया प्रदेशाच्या राजाला त्याच्या हेरांनी पक्की माहिती दिली होती. त्याचा प्रधान राज्यात बंड घडवून आणण्याचे प्रयत्न करत होता. या प्रयत्नात असणाऱ्या इतर मंत्र्यांची, दरबारींची यादीच राजाच्या हातात होती. त्यात समाजातील प्रतिष्ठित मंडळी होती. या सर्वांना एका रात्रीत अटक केल्यास राज्यात खरोखर मोठाच असंतोष माजण्याची शक्यता होती - जे प्रधानाला हवंच होतं. राजा कात्रीत सापडला होता. त्याने आपल्या विश्वासातील महत्त्वाच्या लोकांना पाचारण केलं. सल्लामसलत करून राज्यभर विविध दवंडया पिटवण्याची योजना आखली गेली...

इ.स. 1944. अमेरिकेने दुसऱ्या महायुध्दात घेतलेली उडी आता अधिकाधिक खोल होत चालली होती. जनमानसात चिंतेचं वादळ होतं. सैनिकांची भरती मोठया प्रमाणावर होणं आवश्यक होतं. पण त्यासाठी तातडीने वातावरणनिर्मिती करावी लागणार होती. लगेचच प्रोपागंडा तज्ज्ञांची बैठक बोलावली गेली. ठरावीक संदेश, ठरलेल्या छायाचित्रांबरोबर वृत्तपत्र, बॅनर्स, पत्रकं यांद्वारे पसरवण्याचा निर्णय झाला. यंत्रणा कामाला लागली.


 

इ.स. 1980. भारतात 'आपल्याला हवा असलेला' सेक्युलर विचार रुजवण्यासाठी काय काय करता येईल, यावर गुप्त मंथन सुरू होतं. विविध पर्याय समोर आले. त्यातील एक - भगव्या रंगाला बदनाम करणं - हा विचार जोरकसपणे पुढे आला, पटवला गेला. त्यासाठी कला क्षेत्रातील दिग्गजांना हाताशी धरलं गेलं. कथा-कादंबऱ्यांतून, चित्रपटांमधून गुंडगिरी करणारे लोक भगव्या रंगाशी जोडले गेले. इतर सर्व लोक गरीब, सोशिक, दयाळू, कनवाळू दर्शवणं सुरू झालं. वृत्तपत्रांमधून त्या धाटणीची वाक्यं पेरली जाऊ लागली.

इ.स. 2015. अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक होण्यास एक वर्ष उरलंय. एकीकडे राजकीय पार्श्वभूमीची ऐतिहासिक साखळीच असणाऱ्या हिलरी क्लिंटन, दुसरीकडे फटकळ उद्योजक डोनाल्ड ट्रम्प. असमान दिसणारी निवडणूक कशी जिंकावी, यावर ट्रम्प कँपमध्ये खल सुरू आहे. विविध भागांतील लोकांच्या विविध भावनांना - सुख, दुःख, भीती, राग, द्वेष - अशा सर्व टि्रगर पॉइंट्सभोवती आख्खं डिजिटल कॅम्पेन बांधावं आणि त्यायोगे मतदार आकर्षित करावा, या कल्पनेवर सर्वांचं एकमत झालं. टीम कामाला लागली. पुढे इतिहास घडला.

नेटवर्किंग प्लॅटफॉर्म

वरील चारही घटना काल्पनिक असल्या, तरी त्यांमधील महत्त्वपूर्ण धागा अगदीच अवास्तव नाही. माहितीची देवाणघेवाण दुतर्फी असण्यासाठी जे जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून एकतर्फी निकाल लावण्याचे प्रयत्न करण्याचा हा इतिहास फार पुरातन आहे. या इतिहासाने बरीच वळणं घेतली आहेत. मानवाने छपाई यंत्र तयार केल्यावर मिळालेलं वळण, टेलिकम्युनिकेशन सुरू झाल्यावर मिळालेलं वळण आणि आता सोशल नेटवर्किंग साइट्स पुढे आल्यावर मिळालेलं वळण, ही त्यातल्या त्यात परिणामकारण आणि खूप मोठा परिणाम साधणारी वळणं. या वळणांमधील कालखंडाचा विचार केल्यास लक्षात येईल की ही पुढील बदल घडून येणासाठी लागलेला काळ मोठया प्रमाणात कमी कमी होत गेलाय. अगदी काल-परवापर्यंत सुरू असलेली वैचारिक-राजकीय लढाई, वृत्तपत्र, मासिक, टीव्हीवरून थेट रोज हजारोंनी प्रसिध्द होणाऱ्या वेब आर्टिकल्स, फेसबुक पोस्ट्स, टि्वटर ट्वीट्स आणि व्हॉट्स ऍप मेसेजेसवर येऊन ठेपली आहे.

या नव्या प्रकारामुळे जुने-जाणते धुरीण चिंताग्रास्त झाले आहेत. तशी चिंता वाटावी असं चित्र आहेच. परंतु ज्या प्रकारे प्रत्येक जुनी पिढी नव्या पिढीकडे बघून ''आमच्याकाळी हे असं नव्हतं'' म्हणत, जणू काही विश्वाचा अंत समोर येऊन ठेपलाय अशा थाटात उगाचच उसासे सोडते, तसाच हा प्रकार होतोय. बदल घडलेत खरे. परंतु या बदलांमध्ये एक खास वेगळेपण आहे. ते समजून घेतलं की आहे ते वास्तव हे असं आहे हे मान्य करून आपण सर्वच त्याचा खुल्या मानाने स्वीकार करून त्यातून अधिकाधिक सकारात्मक फळ पदरात पाडून घेऊ शकू.

हे वेगळेपण आहे - उपलब्धता आणि काटेकोरपणा यांचं.

बहुतेक सोशल नेटवर्किंग साइट्स आणि एकूणच डिजिटल मीडिया प्लॅटफर्ॉम्सच्या संबंधातील चर्चा एकतर राजकीय अंगाने होतात वा ट्रोलिंग, फोटो मॉर्फिंग वगैरे 'न्यूआन्स'च्या प्रकारावर. कारण आपण मुळात सोशल नेटवर्किंगला नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणून बघू इच्छित नाही. सोशल मीडिया हा शब्दप्रयोग मेंदूत रुळल्यामुळे आपण या अतिशय सुरेख फेनामेनाला फक्त विचार/मतांची देवाणघेवाण करण्याचा प्लॅटफॉर्म समजत आहोत. पण वस्तुस्थिती ही आहे की याच सर्व प्लॅटफर्ॉम्सना वेगवेगळया प्रकारे वापरलं जात आहे. कारण हे पर्याय सर्वांना उपलब्ध आहेत. सर्वांच्या हातात. इंटरनेट आणि कल्पकता हवी, बस्स!


 

सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना हेच प्लॅटफर्ॉम्स वापरून कित्येकांच्या समस्या सोडवलेलं आपण बघितलं आहे. भारतीय रेल्वेनेसुध्दा यात चांगलं काम केलंय. कित्येक कंपन्या कस्टमर सपोर्टसाठी सोशल नेटवर्किंगचा अतिशय परिणामकारक वापर करत आहेत. इतकंच काय, पैठणी तयार करणाऱ्या कारागीरांपासून स्वतःच स्वतःची पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या लेखकांपर्यंत अनेकांनी आपली उत्पादने फक्त सोशल नेटवर्किंगचा वापर करून विकली आहेत. इतर माध्यमं आणि ही नवमाध्यमं यांच्या परिणामकारकतेतील फरक याच सर्वंकष उपलब्धतेमुळे आहे.

आपण आधी बघितलेली काल्पनिक उदाहरणं बघा. पहिली तीन उदाहरणं पाहताच हे चटकन लक्षात येईल त्या काळातील संदेशवहन एखाद्या अजस्र यंत्राप्रमाणे होतं. एकटयादुकटया लेखक, उद्योजक, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्याच्या आवाक्यातील गोष्टी नव्हत्या त्या. परंतु चौथ्या उदाहरणात जे घडलंय, ते सर्वांच्या आवाक्यातील होतं. (इथे योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक याबद्दल भाष्य नसून पर्यायाच्या उपलब्धतेची वस्तुस्थिती नमूद केली आहे.) त्यामुळे आता मोठे उद्योजक विरुध्द छोटे नव-उद्योजक, प्रस्थापित विरुध्द विद्रोही या सर्वांसाठी किमान सामान्य जनतेसमोर जाण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या बाबतीत एक समान पर्याय निर्माण झाला आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे काटेकोरपणाचा.

पुन्हा एकदा वरील चारपैकी पहिली तीन उदाहरणं पाहा. पहिल्या तिन्ही उदाहरणांमध्ये वापरले गेलेले समूह-संदेशवहन कार्यक्रम कितीही लक्षकेंद्रित (फोकस्ड) केले गेले, तरी ते अपेक्षित लोकांपर्यंतच पोहोचतील आणि हव्या त्या प्रमाणात पोहोचतीलच याची पूर्ण शाश्वती नाही. पण ट्रम्पच्या टीमने जी आखणी केली, त्यात अगदीच तुरळक अपवाद वगळल्यास 100% काटेकोरपणा आहे. व्यक्तीचं वय-शिक्षण-राहण्याचं ठिकाण-लिंग-आवड या सर्वांचा विचार करून, त्यानुसार वेगवेगळया समूहाला वेगवेगळा मेसेज दाखवता येतो. याला 'बिहेवियरल टारगेटिंग' म्हणतात. इतकंच नव्हे, हे सगळं किती जणांनी बघितलं, त्यातल्या किती लोकांनी ठरावीक कृती केली (व्हिडीओ बघणं, ठरावीक लिंक क्लिक करणं इ.) केली, याची पारदर्शक माहितीदेखील उपलब्ध होते.

हे अर्थातच वाचताना भयावह वाटू शकतं. माझी माहिती सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्न पडू शकतो. त्यावर पुढे चर्चा करूच. तूर्तास मुद्दा हाच की आपला संदेश, आपलं म्हणणं, आपली जाहिरात शेकडो-हजारो-लाखो लोकांना दाखवण्याची धडपड करणाऱ्या अनेकांसाठी हे अतिशय सोयीचं साधन आहे.

सार्वत्रिक उपलब्धता आणि पारदर्शक काटेकोरपणा या दोन्ही वैशिष्टयांमुळे सोशल नेटवर्किंग हा प्रकार एवढया जोमाने वाढतोय, रुजतोय. ही वैशिष्टं समजून न घेता सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना सामोरं जाता येणार आहे का?!

आता आपण येऊ समस्यांकडे.

सोशल नेटवर्किंगवर चर्चा करताना साधारण तीन प्रकारच्या समस्यांवर विशेष भर दिला जातो. आपली प्रायव्हसी, ट्रोलिंग आणि फेक न्यूज. तिन्हींकडे सविस्तर बघू या.

प्रायव्हसीवर घाला नाही

आपण गूगलवर, फेसबुकवर आपलं अकाउंट सुरू करतानाच आपलं यूजर बिहेवियर सररास ट्रॅक करण्याची परवानगी देत असतो. आणि हे ट्रॅकिंग फार मोठया प्रमाणावर होत असतं. इतकं, की तुम्ही एकदा फ्लिपकार्टवर फिट बँडच्या पेजला भेट देऊन आलात की पुढील 7 वा 14 दिवस त्या जाहिराती तुमचा पिच्छा पुरवतात. एवढंच काय, तुम्ही मोबाइल ऍप वापरून प्रवासाचं तिकीट बुक केलंत, तर तुमच्या डेस्टिनेशनवर कुठले हॉटेल्स आहेत, तिथली प्रेक्षणीय स्थळं कुठली, ह्याची माहिती तुमच्या इनबॉक्समध्ये येते. अहो, बुक माय शोवरून चित्रपट-नाटकाचं तिकीट बुक केलंत, तर तुम्हाला अर्धा तास आधी गूगलचं रिमाइंडर येतं आपोआप...! अहो, मल्लू ऍप वापरताना आपण त्यांना आपणहोऊन माझा डेटा वाच बाबा! सांगतोच की...!

मग कसली प्रायव्हसी नि कसली सिक्युरिटी? हे भयावह वाटतं, नाही का? इथेच चुकतंय आपलं.

वरील सर्व उदाहरणं वैयक्तिक वा इंडीव्हिज्युअल सर्व्हेलन्सची नाहीत. ह्याला बिग डेटा म्हणतात. म्हणजे वरील सर्व उदाहरणांमध्ये माझा वैयक्तिक डेटा माझ्या नाव-गाव-पत्त्याच्या माहितीसमोर गोळा होत नसतो. हा नेमलेस, फेसलेस, आयडेन्टिटीलेस डेटा बँकचा प्रकार आहे. आणि हा डेटा इन्क्रिप्टेड असतो. उद्या गूगलचा एखादा कर्मचारी गूगल सर्व्हर हॅक करून वा त्यावर लॉगिन करून ओम्कार दाभाडकरने गेल्या बारा महिन्यांत कोणकोणत्या वेबसाइट्सना भेट दिली? अशी खास ओम्कार दाभाडकर स्पेसिफिक माहिती बाहेर काढू शकत नाही. तो फारफार तर अमुक भागात राहणाऱ्या, अमुक वयोगटातल्या, अमुक लिंगाच्या, अमुक आवडीनिवडी असणाऱ्या किती लोकांनी अमुक अमुक वेबसाइट्स/अमुक अमुक प्रकारच्या वेबसाइट्सना भेट दिली? अशा प्रकरची बिग डेटा आधारित माहितीच काढू शकतो.

तुम्हाला ती फ्लिपकार्टची जाहिरात जी दिसते, ती अशीच बिहेवियरल ट्रॅकिंग करून दाखवलेली असते. परंतु ती जाहिरात मला फेसबुकवर दाखवताना, ओम्कार दाभाडकरला अमुक फिटनेस बँडची जाहिरात दाखव असं फेसबुकला सांगितलेलं नसतं, तर वर म्हटल्याप्रमाणे ठरावीक वयोगटातील ठरावीक आवड असणाऱ्या किंवा ज्यांनी गेल्या 7-14 दिवसांत ठरावीक शब्द गूगलवर शोधले आहेत किंवा ठरावीक प्रकारच्या वेबसाइट्सना भेट दिली आहे, अशांना जाहिरात दाखव असा नियम ठरवलेला असतो.

यात भयावह काही नाही. अर्थात, तुम्ही आपणहोऊन तुमचे पासवर्ड ईमेलवर सेव्ह करून ठेवाल वा तुमची जन्मतारीख-लग्नाची तारीख असे सोपे पॅटर्न ठेवाल वा हलगर्जीपणे कोणत्याही वेबसाइटवर तुमचे डिटेल्स टाकत राहाल, तर तुमची खैर नाही. पण हा फसवणुकीचा प्रकार असतो. हा प्रायव्हसीवरील घाला वगैरे अजिबात नाही. आणि यात सोशल नेटवर्किंग या प्रकाराचा दोष नसून आपण सगळे हे नेमकं काय आहे हे समजून न घेताच इंटरनेटवर वावरत आहोत - हा आपलाच दोष आहे.

ट्रोलिंग टाळणंच योग्य

ट्रोलिंग ही समस्या खरं तर अजिबात चर्चिण्याजोगी नाही. ट्रोलिंग हा प्रकार पूर्वापार चालत आलेला आहे. फक्त तो ठरावीक लोकांना करता यायचा, ठरावीक वाचक/प्रेक्षकांपर्यंत मर्यादित असायचा. आता तो अगदीच पब्लिक झालाय. मोठया प्रमाणावर होत असल्याने अर्थातच त्यातील भडकपणा वाढला आहे. परंतु हा प्रकारसुध्दा आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहोत, आपण कसे वावरत आहोत, का लिहीत/बोलत आहोत याचं भान असलं की अगदीच निरुपद्रवी होऊन जातो.

पत्रकार-विचारवंतांना सतत शिव्याशाप सहन कराव्या लागतात. परंतु आपण या लोकांकडे लक्ष देऊन बघितलंत तर लक्षात येईल की आपणहोऊन चिथावणी देणाऱ्या लोकांना जास्त ट्रोलिंग सहन करावी लागते. जे लोक शांत व फोकस्ड चर्चा करतात, त्यांच्यावर ट्रोलधाडी अभावाने पडतात. कारण तिथून फारसा मसाला आणि हवा तसा प्रतिसाद मिळत नाही! तेव्हा ट्रोलिंग टाळणं सोपं आहे - आपणहोऊन चिथावणी देऊ नका, कधी ट्रोल झालाच तर दुर्लक्ष करा!

झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीच्या एका आगाऊ सोशल मीडिया हँडलरमुळे जे काही झालं, ते सर्वश्रुत आहे. त्या प्रकरणामुळे झोमॅटोला जे नुकसान झालं, ते कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. त्या हँडलरने आगाऊपणा केला, म्हणून ट्रोलिंग योग्य ठरतच नाही. पण इतरांनी त्यातून शिकायला हवं हे मात्र नक्की!

फेक न्यूज

शेवटी - फेक न्यूज! पुन्हा - बातम्या पेरणे हा प्रकार नवा नाही. आता तो मोठया प्रमाणात होतोय आणि फक्त आम्हीच हवं ते हवं तसं दाखवू ही मक्तेदारी मोडली गेलीये, म्हणून ही ओरड होतीये. अर्थात, म्हणून खोटया बातम्या पेरणं समर्थनीय ठरत नाहीच. परंतु जसजसा सोशल नेटवर्किंग हा प्रकार रुळत-रुजत जाईल, तसतसा या प्रकारावर आपोआपच आळा बसेल. फेसबुकने फॅक्ट-चेकिंगवर विविध उपाय अमलात आणायला सुरुवात केली आहेच. परंतु खरा फरक तेव्हा पडेल, जेव्हा सामान्य जनताच 'आला मेसेज की कर फॉरवर्ड' या सवयीला मोडता घालेल. स्रोत-गांभीर्य याची सांगड घालण्याची सवय जडली की फेक न्यूज आपोआप आटोक्यात येतील. आणि हे घडेलच. थोडासा काळ जाऊ द्यावा लागेल, इतकंच.

सोशल नेटवर्किंग ही दशकभर जुनी क्रांती आहे. अजूनही ती घडतीये. हळूहळू ती स्थिरावेल. त्यातून एक-दोन पिढया जातील. मग सगळं सुरळीत झालेलं असेल. त्या वेळी इंस्टाग्रााम-टि्वटर-फेसबुकचं नेमकं काय करायचं असतं, यावर वेगळं काही लिहिण्या-बोलण्याची गरज उरणार नाही. कारण तोपर्यंत हा जादुई दिवा आपल्या आवाक्यात आलेला असेल. एकदा आवाक्यात आला की तो किती सुरेख चमत्कार घडवतो, याचीसुध्दा कल्पना आपल्याला आलेली असेल!

ओम्कार दाभाडकर

9890757722

7710097620

[email protected]