सोशल मीडियावर गुंतले मन हे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक06-Nov-2019
|सातत्याने मोबाइल सुरू करून पोस्ट्स तपासणारे सर्वच मेंदूमध्ये एक हाय अनुभवत असतात, ज्याचा सरळसरळ संबंध व्यसनाधीनतेशी असू शकतो. हे एक प्रकारचे व्यसनच असते. जरी मानसिक रोगांच्या वर्गीकरणामध्ये (डीएसएम) मोबाइलवर सतत हूक्ड असणे याचा व्यसन म्हणून अंतर्भाव केला गेला नसला, तरी त्यामुळे येणारी लक्षणे व्यसनाधीनतेसारखीच असतात. मोबाइल काढून घेतल्यावर प्रचंड अस्वस्थच नव्हे, तर आक्रमकदेखील होताना दिसतात, भावनिक बंदिस्तता किंवा थंडपणा, विड्रॉवलची लक्षणे सोशल मीडियाचा वापर अचानक बंद केल्यावरही दिसू शकतात.

नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत जातो आणि नवीन आव्हाने समोर उभी ठाकतात. अशा तंत्रज्ञानाचा जेव्हा गोडवा गायला जातो, त्या वेळेस म्हणावेसे वाटते, 'घी देखा लेकीन बडगा नहीं देखा'. जेव्हा पहिल्यांदा 'ई मेल्स' वापरात आल्या, त्या वेळेस 'आता पोस्ट खात्याचे काय काम?' वगैरे प्रश्न पडले होते. सीडीजवर आणि फ्लॉपीजवर कितीतरी माहिती साठवता येईल, गाणी ऐकणे सोप्पे होईल म्हणत म्हणत मग एमपीथ्रीचा जमाना आला, पुढे मायक्रोचिप्सची निर्मिती झाली, सिम कार्ड्सवाले मोबाइल्स आले आणि जगात एकदम संपर्क क्रांतीचा बाँब फुटला! या क्रांतीने आख्खे मानवी जीवनच आपल्या कवेत घेतले. कायकाय त्या मिठीत सामावले याचा आढावा घेतला, तर आपण अचंबित होतो. बाकी बाबींपेक्षाही मानसशास्त्राची अभ्यासक म्हणून मला या संपर्काच्या सागरी लाटांचे मनावर होणारे परिणाम खूप मनोज्ञ वाटतात. ज्या मानवी मनाने या बदलांची गाथा लिहिली, त्याच मनालादेखील या गाथेतील प्रत्येक गोष्टीने प्रचंड प्रभावित केले आहे. मग त्या राक्षसाची हमखास आठवण येते, जो त्याच्याच मालकाला सतत म्हणत असतो, ''काम सांग, नाही तर तुला खातो!''

मुद्दा या संपर्काच्या क्रांतीने मनावर झालेल्या परिणामांचा. अबालवृध्दांच्या जीवनाला समृध्द करण्याची अमोघ शक्ती या माध्यमांमध्ये आहे. ही माध्यमे म्हणजे मोबाइल, आंतरजाल, फेसबुक, इन्स्टाग्रााम, टि्वटर या संपर्क क्रांतीची साधने म्हणता येतील. आंतरजालाने माहितीचा अथांग सागर आपल्या बोटांजवळ आणून ठेवला. पूर्वी - म्हणजे ही माध्यमे नसताना अशी माहिती मिळवण्यासाठी जो आटापिटा करावा लागायचा तो कमी झाला खरा, पण मग जो ही माध्यमे यशस्वीपणे हाताळू शकला, तो खूप ज्ञानी गणला जाऊ लागला, मात्र फसगत झालीच. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे लोक विसरू लागले. केवळ माहितीचा साठा असलेली व्यक्ती भलेही माहितीपूर्ण वक्तव्ये करू शकत असेल, पण ती जर समृध्द जीवन जगण्याकरता त्या माहितीचा उपयोग करत नसेल, तर त्या माहितीला कवडीइतकेही मोल नसते हे कळायला हवे, हे या क्रांतीच्या गदारोळात फार क्वचित कुणाच्या लक्षात राहिले. पण एक सकारात्मक बाजू म्हणजे या तंत्रज्ञानाने अगदी केजी टू पीजी सर्व पातळयांवरील प्रोजेक्ट्सकरता संकलित माहिती उपलब्ध करून दिली. वेबसाइट्स हा एक जंगी खजिना आहे, फक्त माहिती शोधण्यासाठी परवलीचे शब्द वापरता यायला हवेत.

समाजमाध्यमांचा विचार करत असताना आठवतात टेलिफोन्स. केवळ पत्रांनी एकमेकांशी बोलणे-पेक्षाही प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा आवाज ऐकणे हे फारच थ्रिलिंग वगैरे वाटले होते त्या पिढीला आणि मग एकमेकांची खुशाली विचारणे ते अघळपघळ गप्पा मारणे इथपर्यंत टेलिफोन्सचा वापर येऊन ठेपला होता. पेजरवर केवळ संदेशांचे वहन व्हायचे, मात्र मोबाइलमुळे संवादांच्या आशयविषयात, पध्दतीमध्ये, इतकेच नव्हे तर वेळेमध्येदेखील आमूलाग्रा बदल घडले आहेत. आशयात बदल म्हणजे संवादात कॉपी-पेस्टचा समावेश करत जगाच्या कुठल्याही घडामोडींवर टिप्पणी करता येणे स्मार्टपणाचे द्योतक मानले जाऊ लागले. पूर्वी संवाद शब्दांद्वारा असायचा. आता त्याची जागा कधीकधी अक्षरे - उदा., ओकेऐवजी k घेतात, तर कधी मिम्स यांनी घेतली आहे. बहुतेक वेळा प्रतिक्रिया देताना शब्दांऐवजी इमोजीचा वापर केला जातो. मोबाइलवर केवळ खुणा वापरूनदेखील संवाद होऊ शकतो. सर्वसामान्यत: संवादाची वेळ, सभ्यतेला व शिष्टाचाराला अनुसरून असायची. मात्र आता मनात आले की टाकला संदेश असे होते. तरुणाईबद्दल काय बोलावे? त्यांची संवादांची - त्यापेक्षाही विशेष खास संवादाची वेळ रात्री 12नंतरची झालीय. पण त्यातला सकारात्मक मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरतो तो हा, की जगाच्या पाठीवर कुठेही असा, तुम्ही स्वजनांच्या सतत संपर्कात राहू शकता. याचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास वेगवेगळी समीकरणे दिसू लागतात. 'केव्हाही संपर्क करू शकू' या धारणेमुळे नियमित संवाद कमी झालेत का? घरातल्या आप्तांशी कधीही बोलता येईल म्हणून काही जणांनी संदेशच पाठवणे बंद केले, तर उलट काही वेळेस सतत संपर्क साधण्याच्या अट्टाहासाने घातही केला आहे. जी जोडपी एकमेकांशी नीट संवाद साधू शकत नाहीत, त्यांना एकमेकांबद्दलच्या वेगवेगळया शंकांनी घेरल्यामुळे एकमेकांचा पिच्छा पुरवण्याकरता मोबाइलचा उपयोग होऊ लागला आणि घराघरातली शांती भंग पावली.

मोबाइल ही काही श्रीमंतांचीच मक्तेदारी राहिली नाहीये. अगदी मोलकरणीपासून तर रस्त्यावर चौकाचौकात स्वस्त माल विकणारे स्थलांतरितदेखील मोबाइल वापरताना दिसताहेत. त्यातही स्मार्ट फोन्स वापरणाऱ्यांची संख्या वर्षागणिक 18% इतक्या झपाटयाने प्रचंड वाढतेय, 56 कोटी 60 लाख भारतीय मोबाइल व इंटरनेट वापरताहेत आणि या बाबतीत महिला अजिबात मागे नाहीयेत, ना ग्राामीण विभाग! सर्वांकडून समान वापर होतोय या उपकरणांचा. मात्र आपल्याला आणखीही काही वेगळे दिसायला लागले आहे. या तंत्रज्ञानाचा जितका उपयोग, तितकाच उपद्रवदेखील आहे हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाहीये, इतके आपले जगणे त्यामुळे ढवळून निघाले आहे.

मोबाइलवरचे अपडेटस बघत एक सर्वसामान्य व्यक्ती दिवसातून कमीतकमी 28 वेळा आपला मोबाइल चेक करते. दुसऱ्यांच्या प्रोफाइल्सवर डोकावत वेळ घालवण्यापेक्षा फक्त स्वतःचे खाते तपासून दुसरे निरर्थक स्क्रोलिंग बंद करणे जास्त गरजेचे. पण लक्षात कोण घेतो?

व्यक्तीने अपलोड केलेल्या इन्स्टाग्राामवरील किंवा फेसबुकवरील निवडक वेधक फोटोंना मिळणाऱ्या लाइक्समुळे तिच्या आत्मप्रतिष्ठेला खतपाणी मिळत असते, आत्मा सुखावतो म्हटले तरी वावगे होणार नाही. मात्र सुख शोधायची ही पध्दत आरोग्यपूर्ण नाही हे निर्विवाद, कारण ती व्यक्ती नकळत 'फेसबुक मत्सर' या भावनेला बळी पडत असते. स्टीना सँडर्स ही एक माजी मॉडेल, जिला इंस्टाग्राामवर 1 लाख 7 हजारहून जास्त लोक फॉलो करतात, ती सांगते की ''मी जेव्हा मित्रमैत्रिणींच्या पाटर्यांचे फोटो बघते, तेव्हा त्यात मला न बोलावल्याचे दु:खच जास्त होते व मला अधिकच एकटे वाटते.'' अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजीच्या एका सर्वेक्षणानुसार, फेसबुकचा सातत्याने वापर आरोग्याला घातक आहे असे बहुसंख्य लोकांना वाटते, पण तरीही ते सतत ऑनलाइन असतातच हा भाग अलाहिदा!

आपल्या काय आठवणार? यावरदेखील सोशल मीडियाचा परिणाम होत असतो. आपल्याला जुन्या आठवणींमध्ये रमायला आवडते, फेसबुक वगैरे आपल्याला ज्या आपल्या जुन्या स्मृती दाखवते ते मनोरंजक वाटते, पण हे सर्व सोशल मीडियाने सिलेक्ट केलेलेच आपण बघत असतो. इथे जी माहिती मिळते, त्यावर सोशल मीडियाचा अंकुश असतो किंवा फिल्टर्स असतात. तरीही ते स्मरणरंजन सुखावते. अगदी आपल्या साध्या जगण्यालादेखील सोशल मीडियाने भारून टाकले आहे. आपण जेव्हा एखाद्या सुंदर स्थळाला भेट देतो किंवा काही चांगले बघतो, तेव्हा त्या घटनेचा, त्या गोष्टीचा आस्वाद घेणे राहते बाजूला, आपण 'पिक्चर परफेक्ट' कसे दिसू किंवा उत्तम छायाचित्र कसे मिळेल? याकडेच आपले लक्ष लागून राहते. सर्वात वाईट तर तेव्हा वाटते, जेव्हा कुठेतरी अपघात होतो आणि लोक मदत न करता फोटो काढत बसतात. अशा वेळेस प्रथमोपचार म्हणून स्वतःचे मोबाइल्स बंद करावेत, हे बघ्यांना सांगायला हवे. अर्थात मोबाइलमुळे अपघातांची वेळेत माहिती मिळून मदतकार्य सुरू होऊ शकते, हे निर्विवाद आहे. सध्याच्या पूरपरिस्थितीत पाण्यात अडकलेली माणसे व पूरपरिस्थितीचा मिनिट टू मिनिट आढावा घेताना मोबाइलचा फार सकारात्मक उपयोग समोर आला. सोशल मीडियामुळे मदतीचा ओघ मिळवणे सोपे झाले. आपले सेल्फी काढून ते अपलोड करायचे वेड इतके प्रचंड वाढलेय की त्या नादात जीवदेखील गमावला तरुणाईने. घरच्या कार्यक्रमातदेखील असंख्य मुली, महिला, पुरुष, मुले त्या इव्हेंटचे फोटोच घेत बसतात, त्या नादात ते क्षण जगायचे राहून जातात आणि जगणे दिखाऊ होत जाते. अगदी काल-परवा एक नवी नवरी सासरी जात असताना वरातीमधूनच तिने स्वतःचा टिकटॉक व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला व ही गोष्ट व्हायरल झाली. एखादी व्यक्ती मनाने ज्या ठिकाणी असायला हवी तिथे नसतेच, सर्व काही केवळ फेसबुककरता, फोटोज व फूटेज आणि लाइक्सकरता केले जाते ही वैचारिक अपरिपक्वता तर आहेच, पण त्याही पुढे जाऊन हे सोशल मीडियाचे व्यसनच आहे, हे मान्य करावेच लागेल.

झोपेचे खोबरे करणारे माध्यम म्हणूनही फेसबुकचा उल्लेख करावा लागेल. आपण 'थकलोय' ही आपल्या मेंदूला जाणीव करून देणारे रसायन म्हणजे मेलाटोनीन. आपल्या डोळयापासून अगदी काही सेंटिमीटर अंतरावर असलेल्या मोबाइलच्या प्रकाशामुळे, तसेच आपण फेसबुकवर जे बघतो, त्यावरच्या मंथनातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना - तुलनेतून येणारा मत्सर, चिंता यामुळे मेलाटोनीनची निर्मिती प्रभावित होते, शांत झोप लागणे दुरापास्त होते. शांत झोप लागावी म्हणून झोपायच्या कमीत कमी 40 मिनिटे आधी मोबाइलपासून दूर राहायला हवे.

या संपर्क क्रांतीचे जे असंख्य भले-बुरे परिणाम आहेत, त्यांचा थोडक्यात आढावा घेताना काही सकारात्मक मुद्दे लक्षात येतात, ज्यांचा मानवी जगण्यावर चांगला परिणाम दिसतो व जगण्याची गुणवत्ता वृध्दिंगत होण्यास मदत मिळते आहे उदा., स्व-आदर वाढीस लागतो, स्वीकृती मिळते, विविध समूहांमध्ये स्वीकार झाल्यास जोडले असल्याची भावना जागृत होते. आदर्श सापडणे सोपे जाते. आपल्या क्षेत्रातील तसेच समविचारी समान रुचीवाले लोक शोधणे, त्यांच्याशी संपर्क साधू शकणे, इतकेच नाही तर मैत्रीदेखील होण्याची शक्यता सोशल मीडियामुळे वाढली आहे. लोकांचा, स्त्रियांचा - खासकरून रिक्त-घरटे संलक्षणाच्या बळी स्त्रियांचा एकाकीपणा कमी झाला आहे.

या माध्यमातून आनंद अनुभवता येतो, पसरवता येतो. जे लोक सोशल मीडियावर असतात, पोस्ट्स टाकतात, इतरांच्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया देतात ते जास्त आनंदी असतात, असे एका पाश्चात्त्य विद्यापीठाच्या संशोधनात आढळले. शिवाय आनंदी पोस्ट्समुळे इतरांनादेखील आनंदाची अनुभूती मिळू शकते. याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होताना दिसतो. नेटवर उपलब्ध माहिती व फेसबुकीय पोस्ट्स वाचकांपैकी 40% वाचकांनी आपल्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवत आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलली, हे किती उत्साहवर्धक आहे, नाही? एकूण 60% डॉक्टर्सदेखील हे मान्य करतात की आरोग्यविषयक माहितीच्या उपलब्धतेमुळे ते देत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल जागरूकता वाढली आहे, सेवेची गुणवत्तादेखील वाढली आहे, शिवाय रुग्णाचे व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्यशिक्षण होणे सहज सोपे, सोयीचे झाले. विविध ऍप्समुळे वजन, आहार, व्यायाम यावर नियंत्रण ठेवण्याकरता मदत होऊ शकते, तसेच अन्य लोकांच्या प्रोत्साहनामुळे अशा प्रयत्नांमध्ये सातत्यदेखील टिकून राहू शकते. कधी अत्याचारपीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रान पेटवणे असो किंवा अडचणीतील महिलांना, बालकांना, वृध्दांना दिलासा मिळणे असो, आजारी व्यक्तीला आर्थिक मदत मिळून देणे असो या माध्यमाने मदतच झाली आहे. अगदी वृध्दांना घरपोच औषधे आणि अन्न मिळणेदेखील सुकर झाले आहे, हा फायदाच.

नातेसंबंधांच्या संवर्धनात मोबाइल निश्चितच उपयुक्त आहे, अर्थात याबाबत विरुध्द बाजूदेखील तितकीच तीव्र असणार हे गृहीत आहे. बहुसंख्य युवकांना - प्रामुख्याने 18 ते 29 या वयोगटातील युवकांना आपल्या प्रेमिकांशी जोडलेले राहण्यासाठी सोशल मीडिया खूप महत्त्वाची भूमिका निभावत आहे. काही जोडपी समोरासमोर बोलू शकत नाहीत असे सर्व एकमेकांना सांगणे टेक्स्ट मेसेजेसमुळे शक्य होत आहे. हे माध्यम वापरणाऱ्यांपेक्षा जे सोशल मीडिया वापरत नाहीत ते एकाकी असण्याची शक्यता दुपटीने अधिक असते. सोशल मीडियामुळे जुन्या मित्रमंडळींना शोधणे, त्यांच्या पुनश्च संपर्कात राहणे शक्य झाले आहे. शाळेतील मित्रमैत्रिणी या माध्यमातून 30-40 वर्षांनंतर पुन्हा जोडले गेले आहेत. हे सारे खरोखर सुखावणारे आहे.

प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, (आता चंद्रालाही दुसरी बाजू असते असे म्हणायला हवे, नाही?) त्याप्रमाणेच सोशल मीडियाची काळी बाजूदेखील निश्चित आहे आणि तिच्यामुळे या माध्यमाची प्रतिमा डागाळलेली आहेच. त्यांचादेखील आढावा घेऊ या. जे नकारात्मक परिणाम आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त आढळणारा मानसिक परिणाम म्हणजे कळत-नकळत सतत केली जाणारी तुलना. या तुलनेमुळे आपल्या जीवनातली त्रुटी, कमतरता याची जाणीव होत व्यक्ती दु:खी होत राहते आणि कुढत राहू शकते, त्या कमतरतेची तिला खंत वाटत राहते. सामाजिक अलिप्तता निर्माण होऊ शकते. सर्वसामान्यत: ज्या गोष्टींनी एखाद्याला आनंद मिळू शकेल अशा गोष्टींमधली रुची संपत जाते. असे अलिप्त लोक इतरांशी जसे प्रत्यक्ष वागतात, तसेच ते सोशल मीडियावरदेखील वागत असतात. अशा लोकांचे मित्र सोशल मीडियावरदेखील कमी असतात. त्यांच्या पोस्ट्सदेखील जास्त नसतात, तसेच ते फोटोजदेखील क्वचित टाकताना आढळतात. लोकांचे आभासी वागणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार असते, या माध्यमांवर सुरुवातीला केलेल्या संशोधनात अंतर्मुख व्यक्ती सोशल मीडियावर जास्त असतात असे आढळले होते. जगण्यात फसवेगिरी करणारे इथेदेखील फेक अकाउंटचा आधार घेत स्वतःच्या मनातील विकृत इच्छा पूर्ण करताना दिसतात, ज्यातून अभद्र भाषेचा वापर, अतिउद्दीपक पोस्ट्स, सवंग कॉमेंट्स करणे घडताना दिसते.

सातत्याने मोबाइल सुरू करून पोस्ट्स तपासणारे सर्वच मेंदूमध्ये एक हाय अनुभवत असतात, ज्याचा सरळसरळ संबंध व्यसनाधीनतेशी असू शकतो. हे एक प्रकारचे व्यसनच असते. जरी मानसिक रोगांच्या वर्गीकरणामध्ये (डीएसएम) मोबाइलवर सतत हूक्ड असणे याचा व्यसन म्हणून अंतर्भाव केला गेला नसला, तरी त्यामुळे येणारी लक्षणे व्यसनाधीनतेसारखीच असतात. मोबाइल काढून घेतल्यावर प्रचंड अस्वस्थच नव्हे, तर आक्रमकदेखील होताना दिसतात, भावनिक बंदिस्तता किंवा थंडपणा, विड्रॉवलची लक्षणे - म्हणजे जेव्हा नियमित व्यसनी व्यक्ती व्यसन करणे सोडते, तेव्हा जी लक्षणे असतात, उदा., हातापायांत थरथर किंवा रक्तदाबात चढउतार, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे इत्यादी लक्षणे - सोशल मीडियाचा वापर अचानक बंद केल्यावरही दिसू शकतात. बंगळुरूला चक्क फेसबुकच्या व्यसनातून सोडवण्याकरता पहिले फेसबुक व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले आहे.

'फिअर ऑफ मिसिंग आउट' (फोमो) ही एक विशिष्ट प्रतिक्रियादेखील सोशल मीडियाशी निगडित असलेली मानसिक स्थिती आहे. यात आपल्याला इतरांसारखी मौज करता येत नाहीये, आपण एकटे पडलो आहोत, आपण विशेष स्मार्ट नाही अशा प्रकारची भीती जाणवू शकते. तसेच फेसबुक अतिवापरामुळे व्यक्तीला अवसादाची (निराशेची)देखील जाणीव होऊ शकते. वरवर बघता फेसबुकमुळे आपण लोकांशी जुळलेलो आहोत असे जरी वाटत असले, तरी किंवा कितीही मोठी मित्रयादी असली, तरीही निराशेचे मळभ दाटून येऊ शकते. मूड्समध्ये बदल हादेखील अतिवापराचा दुष्परिणाम आहेच. आभासी जगात संवाद सोपा वाटतो, समोरची व्यक्ती अनोळखी असल्याने मनमोकळे बोलणे सोपे जात असावे, मात्र प्रत्यक्ष संवाद साधणे कठीण होत जाते. सोशल मीडियाच्या अतिवापराने एक उलट परिणामदेखील होतो - टेक्स्ट करणे सोपे असले, तरी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे कठीण होत जाते.

सर्वात वाईट परिणाम होतो तो आरोग्यावर. निद्रानाशासारख्या समस्या भेडसावू लागतात. त्यामुळे ताण आणि अवसादाची निर्मिती होते. राष्ट्रीय स्तरावरील एका संशोधनात असे आढळून आले की स्मार्ट फोन वापरताना आपण एका तासाला केवळ एक कॅलरी जाळत असतो, जे निष्क्रियतेचेच लक्षण मानायला हवे. यातूनच मग लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, चयापचायाचे काही विकार, हृदयासंबंधी विकार, रक्तचाप समस्या, श्वसनासंबंधी त्रास, संधिवात, मानेचा कॅन्सर, डोळयांचे त्रास असे अनेक विकार जडतात.

सोशल मीडियाने जर काही सर्वात जास्त प्रभावित झाले असेल, तर ते म्हणजे मानवी नातेसंबंध. जवळपास 25 टक्के स्मार्ट फोन धारकांना असे वाटते की मोबाइलमुळे त्यांचा जोडीदार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये, तर जवळपास 6 टक्के फोनधारक त्यावरून एकमेकांशी भांडत असतात. जोडीदाराच्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवरच्या पोस्ट्समुळे कधीकधीर् ईष्यादेखील वाटू लागते, एकमेकांच्या आधीच्या प्रेमप्रकरणांना उजाळा मिळतो व आताच्या जोडीदाराच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊ शकते. व्हॉट्स ऍपमुळे तर असे छुपे संवाद खूप सोपे झाले आहेत. ऑफिसमधील संबंध अधिक जवळचे होणे, त्यातून अनैतिक विवाहबाह्य संबंधांना खतपाणी मिळणेदेखील एक साधारण बाब बनून गेलीय. यातून घटस्फोटाकरिता निमित्त मिळत जातात, पुरावेदेखील मिळतात. एकीकडे नात्यांना घट्ट बनवणारे हे माध्यमच नात्यांचा ताणाबाणा उसवून विस्कटून टाकत आहे. एक आणखी वेगळीच गोष्ट समोर आली, ती म्हणजे एकमेकांच्या सतत संपर्कात राहिल्याने, भेटल्यावर एकमेकांना सांगण्यासारखे काहीच उरत नसल्याने जोडपी समोरासमोर आल्यावर गप्प बसू शकतात. अर्थात अशी जोडपीच मुळात कमी असणार, हा भाग अलाहिदा. सतत प्रतिक्रिया देत राहिल्याने दुसऱ्यांच्या जगण्याबद्दल सह-अनुभूती कमी होत जाते. या माध्यमामुळे जनरेशन गॅप वाढलीय म्हणणाऱ्यांना सांगायला हवे की याच साधनांमुळे भारतात बसून स्काइपवरून गप्पा करत अमेरिकेत असलेल्या नातवाशी मैत्री करणे सोपे झालेय किंवा व्हॉट्स ऍपमुळे कुटुंबाकुटुंबाचे समूह निर्माण होऊन त्यामुळे अनोळखी नातेवाईक जवळचे वाटू लागले आहेत, हे मुद्दाम दाखवावेसे वाटते. अगदी ताबडतोब पैसे पाठवणे, घरबसल्या खरेदीचा आनंद घेणे अशा छोटया छोटया गोष्टी तर कितीतरी. जोडीदाराची निवड करणेदेखील अधिक सुकर झालेय.

हे जग आभासीच आहे का? कधीकधी हो म्हणावे लागते, खासकरून जेव्हा जनमानसात स्वतःची व जोडीदाराची आदर्श प्रतिमा निर्माण व्हावी याकरिता फेसबुकवर बळेबळेच लटक्या प्रेमाचे प्रदर्शन दिसते तेव्हा. इथल्या पोस्ट्स उथळ वाटू शकतात, पण एक नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की आपली अभिव्यक्ती - मग ती सोशल मीडियावरची का असेना, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते. मूळ स्वभाव तिथेही झळकतोच. व्हर्चुअल जग म्हणजे आभासी जग. या जगाचे विभ्रमच इतके खास आहेत की व्हर्चुअल जग हे निव्वळ आभासी न राहता आपल्या दैनंदिन जगण्यात कधी शिरकाव करते आणि कधी पक्के ठाण मांडून बसते, ते आपल्याला कळतदेखील नाही. मानवी भावभावनांचा, आशा-आकांक्षांचा पुरेपूर अभ्यास करून आंतरजालीय विश्व अधिकाधिक आकर्षक केले जाते. बदलती जीवनशैली या सर्वांमुळे प्रत्यक्ष जगण्यात एक तुटकपणा येत गेला, हे आपण अनुभवतो. शहरीकरण, आधुनिकीकरण या सर्वातून हे अपरिहार्यपणे घडत गेले. माणसांचा प्रत्यक्ष संपर्क कमी कमी होत गेला. खरे तर आपण सर्वच मानवी सहवासाचे भुकेले आहोत. आपल्याला आत्मप्रतिष्ठा महत्त्वाची वाटते.

रोज तेच तेच बघून करून वाचून खाऊन नक्कीच कंटाळा येत असतो. जगण्यातला हा एकसुरीपणा दूर करण्यासाठी आंतरजालावर रुचिपालट करण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत, त्यातूनच आपल्या जगण्यावर दूरगामी परिणाम व्हायला लागतो. आभासी जगात कोणाचीही कोणाशीही मैत्री होऊ शकते. अगदी 'ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन' वगैरे इथे खरोखरच अनुभवायला येते. कधी नव्याने बंध निर्माण होतात, नव्याने झालेल्या ओळखी अधिक दृढ होतात, कुणाला तर अगदी सोलमेट वगैरे मिळून जातात. हे सारे खूप आनंददायक असते. 'जेवण झालं का?' या जागतिक महत्त्वाच्या प्रश्नाने संवादाची-ओळखीची सुरुवात होते. हळूहळू तीच व्यक्ती मनातले अधिक गहिरे भावबंध उलगडायला सर्वात जवळची वाटणारी, हक्काची व्यक्ती बनते. सकाळ-संध्याकाळ तिन्हीत्रिकाळ केवळ त्याच व्यक्तीशी गप्पा माराव्या असे वाटायला लागते. घरातल्या आप्तस्वकीयांशी भलेही विसंवाद असो, 'ही' व्यक्ती 'खिडकीत' आलेली दिसली की मूड बदलून जाऊ शकतो. स्त्री-पुरुषांची मनमोकळी मैत्री हा आंतरजालाने, प्रश्नांनी भंजाळलेल्या मनाला जगण्यासाठी दिलेला उ:शाप वाटू लागतो! हे इथेच थांबले तर काहीच हरकत नसते, मात्र कधीही न भेटलेले जीव एकमेकांना बघण्यासाठी, भेटण्यासाठी आसावू लागतात. खिडकीमधल्या संवादांनी आता समाधान मिळेनासे होते, त्यातून निर्माण होतात क्वचित शारीरिक गुंतागुंत असलेली नाती. अगदी दूर शहरांत राहणारी माणसे एकमेकांत मनाने गुंतू लागतात, कधी एकाच ठिकाणी राहणाऱ्यांना संपर्क साधणे अधिक सोपे करून देतात ही माध्यमे. कधी जिवाभावाचे सख्य लाभते आणि एका रटाळ आयुष्यात इंद्रधनुषी रंग भरले जातात.

असे असले, तरीही तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असते हे विसरून चालणार नाहीच. त्याचा उपयोग आपण कशासाठी करतोय? हे महत्त्वाचे ठरते. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये 'व्हॉट्स ऍपवरील संभाषणं' हे भांडणाचे कारण असेल, तर काय बोलायचे? सात वर्षे ज्या मोबाइलमुळे एकमेकांशी प्रेमाचे नाते टिकवून ठेवता आले, तोच मोबाइल लग्नानंतर भांडणाचं कारण ठरला आणि प्रेमविवाह केलेले ते जोडपे लग्नानंतर केवळ एकाच वर्षात घटस्फोटाच्या वळणावर येऊन थांबले.

आंतरजालावर झालेल्या मैत्रीचे रूपांतर पुढे कशात होते? हे बघणेदेखील मनोरंजक ठरेल. या माध्यमाचा ज्यांनी सर्जनशील वापर केला, त्यांना या माध्यमाने खूप समाधान आणि शांती मिळू शकली. न शमलेली लैंगिक वखवख शमवणे हा ज्यांचा उद्देश होता, त्यांनी स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. खोटया भूलथापा देणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे, इतकेच नव्हे तर एका व्यक्तीने अनेक महिलांशी असे संबंध जोडून त्यांना अश्लील मेसेजेस पाठवणे, फोटोग्रााफ्स परस्पर डाउनलोड करणे, ट्रोल करणे, ब्लॅकमेलिंग करणे असे भरपूर काही इथे घडते. जी व्यक्ती या माध्यमाला जबाबदारीने हाताळू शकते, तीच तरते. जे जगतांना इतरांना त्रास देत जगतात, त्यांचे दाखवायचे दात आंतरजालावर मात्र वेगळेच दिसतात. इकडे मारे समानतेची गाणी गाणारे घरी आपल्या पत्नीला हिंसक पध्दतीने वागवत असू शकतात, पण या फसव्या दुनियेत मात्र त्यांच्या उदारमताचा गवगवा असतो. हे न ओळखता त्या व्यक्तीशी केलेली मैत्री गोत्यात आणू शकते. स्त्री व पुरुष यांची मानसिकता वेगळी असते व असणार, यावर दुमत असायचे कारणच नाही. आंतरजालाचा स्त्रीवर आणि पुरुषांवर होणारा परिणामदेखील वेगवेगळा असतो. ते हे माध्यमदेखील वेगळया पध्दतीने वापरताना दिसतात. मध्यमवयीन स्त्रियांकरिता तर हे माध्यम जादूची कांडी ठरू शकते. मेनोपॉज, ऍंड्रोपॉजच्या आसपास असलेले स्त्री-पुरुष जरा निराशेकडे झुकलेले असू शकतात. अशांकरितादेखील अशी मैत्री एक नवीन आशा जागवते.

एकूण 58 कोटी 10 लाख इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 30% महिला आहेत. एकूण वापरकर्त्यांपैकी 41% शहरी विभागातील, तर 36% ग्राामीण विभागातील आहेत. शहरात राहणारी व्यक्ती आणि ग्राामीण विभागातील व्यक्ती यांचीही मानसिकता निश्चित वेगळी आहे, तरीही त्यांच्या माणूसपणाची जातकुळी एकच. मानवी मनाला जी एक स्वप्न बघण्याची खुमखुमी असते, ती या आभासी जगात पूर्ण होऊ शकते हे लक्षात आले की असंख्य जण या सर्वातून एक स्वप्नवत जग उभे करू बघतात. ज्यांना अशी स्वप्ने बघायची असतात, त्यांच्यासाठी तर आंतरजाल एक पर्वणीच आहे. त्यांच्या स्वप्नाळू डोळयांना या जगाची प्रचंड भूल पडते. आपले नावगावदेखील बदलून जगायची एक संधी मिळू शकते या आभासी जगात. त्यामुळे ज्यांना लपूनछपून काही व्यवहार करायचे असतात, ते फेक आयडी घेऊन वावरताना दिसतात किंवा आपला खरा चेहरा न कळू देता सहसा खरी न होणारी स्वप्ने बघायची मोकळीक मिळवण्याकरिता खोटी नावे घेत इथे वावरतात.

आभासी मैत्र खराखुरा आधार देणारे जिवाभावाचे मैत्रदेखील बनू शकतेच आणि मग जगणे भरजरी बनून जाते. एकाकी मनाला हा आधार परीसस्पर्शासारखा आमूलाग्रा बदलवणारा ठरू शकतो. स्त्रियांच्या बाबतीत त्यांची कौटुंबिक कुतरओढ, घालमेल कमी होण्यासाठी अशा सख्याचा फार मोलाचा हातभार असतो, त्यांना जणू काही पुनर्जन्म झाल्यागत वाटू शकते इतकी ताकद या सुरुवातीला आभासी वाटणाऱ्या, पण कालौघात संजीवक ठरणाऱ्या नात्यात असते. स्त्री-पुरुषांच्या स्नेहल मैत्रीला हे माध्यम पोषक ठरते आहे. यातून संशयकल्लोळदेखील निर्माण होतात, कधी ते खरेही ठरतात, त्यातून कौटुंबिक पातळीवर वादळे निर्माण होतात हे खरे आहेच, पण त्यापेक्षाही अशा नात्यांमधून स्त्री-पुरुषांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या शक्यताही समोर येतात. जे कधी पत्नीशी बोलले जाणार नाही किंवा बोलले जाऊ शकले नाही, असे काही सखीशी किंवा मैत्रिणीशी सहज बोलता यायला लागले आहे, तशी कबुलीही बरेच पुरुष देतात.

या मैत्रीला आभासी जरी मानले जात असले, तरी प्रत्यक्षातदेखील अशी नाती खूप घट्ट होऊ शकतात. सुरुवात जरी एकमेकांना प्रत्यक्ष न भेटता झाली असली, तरी एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेत अंतरीचे गूज समजून घेणारी सुहृद व्यक्ती त्या मैत्राच्या रूपाने सापडू शकतेच ना? फेसबुकवर एक पोस्ट टाकली की अक्षरशः काही मिनिटांत त्यावर प्रतिक्रिया मिळायला लागतात. एकमेकांना सुखावणाऱ्या कॉमेंट करून आपले व आप्तांचे अहं कुरवाळले जाऊ लागतात आणि हाच एक मानसिक पिंजरा बनून जातो. आपल्याला कुणीतरी नावाजावे ही आपली आंतरिक सुप्त इच्छा, जी जगण्याच्या धावपळीत बाजूला पडून गेलेली असते, तिला फुंकर घालून जागे केले जाते. पुरुष असो किंवा स्त्री, यांना आपल्या छोटयामोठया कर्तृत्वाला दाद मिळू शकते हे सुखावणारे असते. त्यातून आंतरजालावर फेरफटका वाढत जातो, इतका की जरा वेळ मिळाला की सर्वच ऑनलाइन असायचा प्रयत्न करतात. मोबाइलच्या रूपाने हातात जग आहे ही कल्पनाच सुखावणारी असते. मध्यमवयीनांमध्ये किंवा अन्य वयातल्याही ज्यांना जगण्यात थ्रील हवेय, नाटयमयता हवीय, काहीतरी 'हॅपनिंग' हवेय, त्या सर्वांकरिता आंतरजालाने खूप रोमहर्षक शक्यता निर्माण केल्यात, असे म्हटले तर अतिशयोक्ती असणार नाही.

डॉ. स्वाती धर्माधिकारी

9422806749

 मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक