फादर, साहित्यिकाचा मुखवटा सांभाळा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक08-Nov-2019   
|

विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्यातला धर्मप्रचारक/धर्मोपदेशक जागा झाला. त्याने त्यांच्यातल्या साहित्यिकाला मागे सारत,'धर्मांतरबंदी कायदा म्हणजे विवेकावर हल्ला आहे' असं विधान केलं. हा कायदा राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलेल्या मूलभूत स्वातंत्र्याचं उल्लंघन करतो असंही मत मांडायला त्यांनी कमी केलं नाही.


लालित्यपूर्ण भाषेत अपेक्षित तो संदेश पोचवणाऱ्या फादर दिब्रिटो यांनी चढवलेला मराठी साहित्यिकाचा मुखवटा त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत टिकतो
, की त्याआधीच गळून पडतो असा प्रश्न पडावा, असं त्यांचं अलिकडचं वक्तव्य आहे. लालित्यपूर्ण शैलीच्या शर्करावगुंठनाखाली त्यांनी आजवर जे काही थोडंथोडकं साहित्य प्रसवलं ते म्हणजे मराठी साहित्यातली अक्षरलेणी आहेत, असा भ्रम साहित्यिक वर्तुळातल्या दिग्गजांनी जाणीवपूर्वक करून दिला आहे. त्या शैलीआडून फादर म्हणून दिब्रिटो यांना जे काही पोचवायचं आहे ते न समजण्याइतके इथले सरसकट सगळे लोक भोळसट, भाबडे नाहीत याचेही भान या दिग्गजांना नाही. त्या तुटपुंज्या वाङ्मयीन कर्तृत्वावर त्यांना कोणी महान साहित्यिक उपाधी बहाल करत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही. आणि तसा विरोध आजवर कोणी केलाही नाही. मात्र जेव्हा त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्याचा घाट घातला गेला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याही त्यांच्या मर्यादित आणि मध्यम दर्जाच्या लेखनामुळे नाहीच तर त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने दिसणाऱ्या धर्मोपदेशकामुळे. त्याकडे कानाडोळा करत, जेव्हा त्यांनाच अध्यक्षपद देण्यावर शिक्कामोर्तब झालं तेव्हा दिब्रिटो महोदय किमान संमेलनाध्यक्षाच्या त्यांच्या कार्यकाळापुरती तरी ही झूल अंगावरून उतरून ठेवतील आणि साहित्यिकाची भूमिका तात्पुरती का होईना पार पाडतील, अशी माफक अपेक्षा होती. मात्र ते त्यांना काही जमत नाही या निष्कर्षाप्रत येण्याजोगी स्थिती आहे. या धर्मोपदेशकाच्या चेहऱ्यावर थोपण्यात आलेल्या साहित्यिकाच्या मुखवटयाचा गोंद आत्ताच निघू लागला आहे.

विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्यातला धर्मप्रचारक/धर्मोपदेशक जागा झाला. त्याने त्यांच्यातल्या साहित्यिकाला मागे सारत,'धर्मांतरबंदी कायदा म्हणजे विवेकावर हल्ला आहे' असं विधान केलं. हा कायदा राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलेल्या मूलभूत स्वातंत्र्याचं उल्लंघन करतो असंही मत मांडायला त्यांनी कमी केलं नाही. त्याची काळजी कायद्याची निर्मिती करताना घेतली गेली आहे. शिवाय, भारताची राज्यघटना म्हणजे काही ललित साहित्य नाही की जिचा अर्थ वाचणाऱ्याच्या आकलनक्षमतेनुसार बदलावा. त्यात अंतर्भूत असलेलं सर्व काही सुस्पष्ट आणि सर्वांसाठी समान आहे. तेव्हा ही विधानं बुध्दीभेदासाठी हेतूत: केली जातात, हे कळण्याइतकं समाजमन जागृत आहे याची फादरनी नोंद घ्यावी.

परकीयांच्या सततच्या आक्रमणामुळे या देशात शेकडो वर्षं झालेली धर्मांतरं आणि त्यापायी हिंदूधर्मीयांचा झालेला अनन्वित छळ या सगळया ऐतिहासिक घटनांपासून फादर अनभिज्ञ आहेत असं समजावं का? सर्वसमावेशक आणि उदार दृष्टी असलेल्या हिंदू धर्मातील लाखो करोडोंचं जोरजबरदस्तीने झालेलं धर्मांतर, त्याच्या कटू कहाण्या देशभर विखुरलेल्या आहेत. मुस्लीमांनी तलवारीच्या, अमानुष अत्याचारांच्या जोरावर आणि ख्रिश्चनधर्मीयांनी सेवेच्या आवरणाखाली हिंदू धर्मातील विविध जातीजमातींच्या लोकांना आपापल्या धर्मात ओढण्याचं कुकर्म वर्षानुवर्षं केलं. धर्मांतर हेच ज्यांच्या सेवाकार्याचं मूळ प्रयोजन त्यांनी विवेकाच्या गप्पा माराव्या याहून मोठा विनोद तो कोणता?

धाकदपटशा, कोणतंही आमिष वा अंधश्रध्देचा आधार घेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला धर्मांतरासाठी फूस लावण्यात येते, त्यासाठी गोड शब्दांच्या आधारे तिची दिशाभूल केली जाते तेव्हा हा विवेकवाद कुठे गेलेला असतो? असा प्रश्न आजवर कधी फादरना पडला का? अशा प्रकारच्या धर्मांतराला बंदी घालण्याने विवेकाचा गळा घोटला जातो, असं समजणं आणि दुसऱ्याचीही तशी समजूत करून देणं हे त्यांचं शहाणपणाचं बोलणं आहे की धूर्तपणाचं? धर्मांतर हा फक्त इतिहासच नाही तर या देशाच्या काही भागांत आजही ते वास्तव आहे. आणि ते फादर दिब्रिटोंच्या गावीही नसेल असं समजायचं कारण नाही.

या देशाला लागलेल्या धर्मांतराच्या ग्रहणाचे किती भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात, याची जाणीव ज्या द्रष्टया समाजसुधारकांना झाली त्यांनी त्याविरोधात सातत्याने जागर केला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद होते, महर्षी दयानंद होते आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीही होते. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून सेवाकार्याच्या आवरणाखाली चालू असलेलं ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम हे अनैतिक आहे असं जाहीरपणे सांगत महात्मा गांधींनी या धर्मप्रसाराला कायम विरोध केला होता. 'जर कोणालाही दुसऱ्या धर्माचा विनाश करून स्वत:च्याच धर्माचे अस्तित्व ठेवण्याची स्वप्ने पडत असतील तर मला माझ्या हृदयाच्या खोलीपासून त्यांची कीव करावीशी वाटते', असं स्वामी विवेकानंद स्पष्टपणे नमूद केलं. या दोघांच्याही उद्गारांना भारतात चालू असलेल्या धर्मांतराची पार्श्वभूमी होती, त्याविषयी केलेलं सखोल चिंतन होतं.

हिंदूंमधील गोरगरीब, अडाणी, अल्पशिक्षित, भाबडी आणि आमिषाला बळी पडणारी माणसं हे यांचं 'सॉफ्ट टार्गेट'. हिंदू धर्मातील विषमतेपायी तुम्हांला अशी वागणूक मिळते असं सांगत त्यांचा धर्म बदलायचा आणि त्यांना आपल्यात घेताना त्यांच्यासाठी वेगळी प्रार्थनास्थळं उभी करायची, ही यांची समता. स्वातंत्र्यकाळात असलेली ख्रिश्चनांची लोकसंख्येची टक्केवारी आणखी काही वर्षांनी दहापटीने असा विश्लेषकांचा काढलेला निष्कर्ष आहे. हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला असेल असं दिब्रिटो यांना वाटतं? धर्मांतराचं हे विष 'स्लो पॉयझन'सारखं आजही या देशात भिनतं आहे त्याचीच ही आकडेवारी द्योतक आहे.

तेव्हा इतरांना विवेकवाद शिकवण्याआधी जर वास्तव समजून घेतलं तर फादर दिब्रिटो अशी प्रसारमाध्यमांना आकर्षित करणारी पोकळ विधानं करणार नाहीत. जे मानाचं स्थान त्यांना मराठी सारस्वताने देऊ केलं आहे त्याचा वापर त्यांनी आपले छुपे अजेंडे राबवण्यासाठी करू नये. समाज जागा आहे आणि जागरूकही. तेव्हा आपला साहित्यिकाचा मुखवटा वर्षभर टिकून कसा राहील याची त्यांनी काळजी करावी, हेच बरं.