या निर्णयाने सत्य आणि न्याय उजळला : सरसंघचालक

स्रोत: विवेक मराठी    दिनांक09-Nov-2019
|

भूतकाळ विसरून भव्य मंदिरनिर्माणासाठी एकत्र येण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना न्यायालयाच्या या निर्णयाने सत्य आणि न्याय उजळ झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दिली. न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. भागवत यांनी धैर्याने दीर्घ मंथन करून सत्य आणि न्याय उजळ करणाऱ्या सर्व न्यायमूर्तींचे तसेच सर्व पक्षांच्या विधीज्ञांचे आम्ही शतशः धन्यवाद व अभिनंदन करत असल्याचे सांगितले.


सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, "श्रीराम जन्मभूमीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाद्वारे या देशातील जनभावना, आस्था तसेच श्रद्धेला न्याय देणाऱ्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वागत करत आहे. अनेक दशके चाललेल्या दीर्घ न्यायप्रक्रियेनंतर हा विधीसंमत अंतिम निर्णय झालेला आहे. या दीर्घ प्रक्रियेत श्रीराम जन्मभूमीशी संबंधित सर्व मुद्द्यांचा अगदी बारकाईने विचार केला गेलेला आहे. सर्व पक्षकारांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडलेल्या तर्कांचे मूल्यांकन केले गेले आहे." या दीर्घ प्रक्रियेत विविध प्रकारे योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे व बलिदान देणाऱ्यांचे सरसंघचालकांनी यावेळी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. निर्णय स्वीकार करण्याची मनस्थिती व बंधुभाव कायम ठेवून सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शासकीय व सामाजिक स्तरावर सर्व लोकांनी केलेल्या प्रयत्नांचे सुद्धा आम्ही स्वागत व अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले. "अतिशय संयमपूर्वक न्यायाची प्रतीक्षा करणारी भारतीय जनतासुद्धा अभिनंदनास पात्र आहे. या निर्णयाकडे जय-पराजयाच्या दृष्टीने पाहिल्या जाऊ नये. तर, सत्य व न्यायाच्या मंथनातून प्राप्त झालेल्या या निष्कर्षास भारतवर्षातील संपूर्ण समाजाच्या एकात्मता व बंधुतेचे परिपोषण करणाऱ्या निर्णयाच्या रुपात पहायला व उपयोगात आणायला हवे. संपूर्ण देशवासीयांना विनंती आहे की, विधी आणि संविधानाच्या मर्यादेत राहून संयमित व सात्विक रीतीने आपला आनंद व्यक्त करावा." असेही डॉ. भागवत यांनी यावेळी सांगितले.

हा विवाद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुरूप पारस्परिक विवाद समाप्त करणारी पावले शासनाद्वारे लवकरच उचलली जातील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून आपण सर्व श्री रामजन्मभूमी स्थानावर भव्य मंदिराच्या निर्माण कार्यासाठी एकत्र येऊन आपल्या कर्तव्यांचे पालन करूया, असेही आवाहन यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

 

सरसंघचालक उवाच..

* धैर्याने दीर्घ मंथन करून सत्य आणि न्याय उजळ करणाऱ्या सर्व न्यायमूर्तींचे तसेच सर्व पक्षांच्या विधीज्ञांचे शतशः धन्यवाद व अभिनंदन.

* या देशातील जनभावना, आस्था तसेच श्रद्धेला न्याय देणारा हा निर्णय.

* संयमपूर्वक न्यायाची प्रतीक्षा करणारी भारतीय जनतासुद्धा अभिनंदनास पात्र.

* या निर्णयाकडे जय-पराजयाच्या दृष्टीने पाहिल्या जाऊ नये.

* देशवासियांनी संविधानाच्या मर्यादेत राहून संयमित व सात्विक रीतीने आपला आनंद व्यक्त करावा.

* आता भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून आपण सर्व श्रीरामजन्मभूमी स्थानावर भव्य मंदिराच्या निर्माण कार्यासाठी एकत्र येऊया.