राष्ट्रीय आनंदाचा दिवस

विवेक मराठी    09-Nov-2019   
Total Views |

रामजन्मभूमी मंदिर खटल्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका कार्यकर्त्याने मला फोन केला. आम्ही दोघेही भावनावश झालो, अंतःकरण भरुन आले होते. अशा वेळी फारसा संवाद करण्याची गरज नसते. न बोलताच भावना एकमेकांशी बोलत असतात. हा हृदयाचा संवाद असतो. तो शब्दात पकडता येत नाही.


आमच्या दोघांची अवस्था ही प्रातिनिधीक अवस्था आहे. देशातील करोडो हिंदुच्या मनातील हीच भावना आहे. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनात डोक्याला कफन बांधून जे उतरले होते, त्यांच्या मनातील ही भावना आहे. 1990च्या कारसेवेत कलकत्त्याचे कोठारी बंधु गोळीबारात ठार झाले. तरुण मुलांचा मृत्यू आई-वडिलांना बघावा लागला. केवढे दुःख झाले असेल त्यांना! आज त्यांचे हौत्मात्य फळाला आले. 90च्या कारसेवेत अशोकजी सिंघल यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. त्यांचे डोके फुटले, ते रक्तबंबाळ झाले. सांडलेल्या रक्ताच्या थेंबाथेंबाला न्याय मिळाला. याच कारसेवेत कोठारी बंधुबरोबर अनेक कारसेवक ठार झाले. आपण हिंदु आहोत आणि आपला विश्वास आहे की, आत्मा अमर आहे. एक शरीर सोडून तो दुसऱ्या शरीरात जातो. हे सर्व शरीरधारी आत्मे आज संतुष्ट असतील.

साबरमती एक्सप्रेसमध्ये अयोध्येतून येणाऱ्या कारसेवकांना गोदरा स्टेशनवर जिवंत जाळण्यात आले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. महान ध्येय गाठण्यासाठी तेवढाच त्याग करावा लागतो. जेवढे ध्येय उच्च, तेवढा त्यागही अधिक असतो, हा नियम आहे. त्याग करण्यास आणि तो ही आपल्या जीवनाचा कुणी मागे राहिला नाही. या सर्वांच्या त्यागातून एक समाजमन तयार झाले. रामजन्मभूमी विषयावर ते आग्रही झाले, पराकोटीचे आग्रही झाले. समाजाचा निश्चय सर्व समाजाला गती देत असतो, राजकारणालाही गती देत असतो, न्यायव्यवस्थेलाही तो जागे करतो. आपल्याला फक्त न्याय आणि न्यायच करायचा आहे, या भूमिकेवर समाजाचा निश्चय न्यायव्यवस्थेला आणतो.

याचा परिणाम 9नोव्हेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जन्मभूमी विवादाच्या निकालात दिसतो. सामान्यतः न्यायालय जे निर्णय देतात, त्याला आपण न्याय म्हणतो, तो न्याय असतोच असे नाही. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फक्त न्याय केला. आपल्याकडे न्याय, धर्म, निती, हे समानार्थी शब्द वापरले जातात. म्हणून असे म्हणावे लागते की, सर्वोच्च न्यायालयाने न्यायधर्माचे पालन करुन निरपेक्ष न्याय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती रंजन गोगोई, हे या निणर्यामुळे इतिहास घडविणाऱ्या न्ययामूर्तींच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. न्यायमूर्ती एच. आर. खन्ना, न्या. कृष्ण अय्यर, न्या. सुब्बा राव, न्या. सिक्रि, इत्यादी न्यायमूर्तींची नावे सर्वोच्च न्यायालयाची उंची वाढविणारे न्यायमूर्ती म्हणून घ्यावी लागतात. न्यायमूर्ती गोगोई या श्रेणीत आले आहेत. कारण त्यांनी रामजन्मभूमी विवादाचा विषय फक्त न्यायाच्या कसोटीवर घासून पाहिला आणि योग्य तो निर्णय दिला.

हा इतिहास घडविणारा निर्णय आहे. रामजन्मभूमी विवादाला काही राजकीय पक्षांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील झगडा असे स्वरुप दिले. मूळ प्रश्न आक्रमक बाबराने रामजन्मस्थानावरील रामाचे भव्य मंदिर पाडून त्याजागी मश्जिद बांधली हा होता. हा प्रश्न नुसता मंदिर की मश्जिद असा नव्हता. तो हिंदू विरुध्द मुसलमान असाही नव्हता. राजकारणासाठी त्याला धार्मिक स्वरुप देण्यात आले. मुसलमानांच्या मनात हे भरविण्यात आले की, हिंदू तुमच्या अधिकारावर अतिक्रमण करीत आहेत. आम्ही तुमच्या रक्षणासाठी उभे राहू. ज्या राजकीय पक्षांनी ही भूमिका घेतली, त्यांनी स्वतःचे वर्णन 'सेक्युलर पक्ष' असे केले.


त्यांना बांधील असलेला बुध्दीजीवी वर्ग देशात आहे. त्याने बुध्दीभेद करणारे अनेक विषय सुरु केले. रामायण खरोखर घडले का? अयोध्येत रामाजा जन्म झाला, याला पुरावा काय? कुणी म्हणाले राम अफगाणिस्तानात होता, तर एकाने रामाला मलेशियात पाठवून दिले. रामाच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडविण्यात आले. देशात कमी मंदिरे आहेत का? रामाचे मंदिर कशाला पाहिजे? त्या जागी हॉस्पिटल बांधा, शाळा बांधा. जन्मभूमी मुक्ति आंदोलन करणारे धर्मपिसाट आहेत, देशाला धोका आहे, संविधानाला धोका आहे, लोकशाही संकटात येणार आहे. ज्याची जशी बुध्दी धावेल, तसे त्याने आरोप केले, पुस्तके लिहिली, आणि रामजन्मभूमी मुक्ति आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 92साली बाबरी ढाचा कोसळल्यानंतर हिंदुत्त्ववाद्यांचे काम वीस वर्षे मागे गेले, असा एकाने शोध लावला, तर दुसरा म्हणाला तीन घुमट म्हणजे संसद, न्यायालये, सेक्युलॅरिझम हेच कोसळले आहेत.

देशाला सांप्रदायिकतेच्या वणव्यात घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता. जे प्रयत्न करीत होते. त्यांची भाषा मात्र तशी नव्हती. त्यांची भाषा मानवतेची होती, सर्वधर्म समभावाची होती, धार्मिक सहिष्णुतेची होती, राम-रहिम एकतेची होती. माणूस बोलतो काय आणि वागतो कसा, हे नीट समजून घ्यावे लागते. ज्यांच्या मनात हिंदू समाजाविषयी कसलाही आदरभाव नाही. हिंदू हितासाठी काम करणाऱ्या संघटनाविषयी द्वेषभावना आहे. त्यांना मुसलमानांचा उपयोग हिंदुशी लढण्यासाठी करायचा होता. यासाठी एका पक्षाने आपल्या पक्षाच्या झेंडयावर हिरवा रंग आणला. रंगानादेखील त्यांनी धार्मिक करुन टाकले. भगवा, हिरवा, पांढरा, अशी धार्मिक विभागणी त्यांनी करुन टाकली. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलन हे केवळ जन्मभूमी मुक्तिचे आंदोलन नव्हते. देशाला हिंदुविरोधी वटवटीपासून मुक्त करण्याचे ते आंदोलन होते.

हिंदू समाजाने ही सर्व वटवट शांतपणे ऐकून घेतली. त्याच्या मनावर आणि बुध्दीवर याचा फारसा परिणाम झाला नाही. ज्यांचे मडके कच्चे होते, ते संभ्रमित झाले. पण ज्यांचे मडके उत्तम भाजले होते, ते रामजन्मभूमी विषयावर अधिक दृढ झाले. या विषयावर तडजोड नाही. जन्मस्थानावर मंदिरच झाले पाहिजे. मंदिराऐवजी दुसरे काही चालणार नाही. मंदिरासाठी दुसरी जमीन नको. करोडो हिंदुची ज्या जमीनीवर श्रध्दा आहे, तीच जमीन म्हणजे रामजन्मभूमी पाहिजे आहे. तिचा आग्रह सोडला जाणार नाही. कुणी काही म्हटले तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागले तर पुन्हा आंदोलन केले जाईल आणि गोळया खाण्याची वेळ आली तर गोळयादेखील खाऊ. कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. हा दृढ निश्चय न्यायदेवतेला समजला आणि तिने या दृढ निश्चयाचा सन्मान केला.


सर्वोच्च न्यायालयाचा 9 नोव्हेंबरचा निर्णय राष्ट्रीय विजयाचा निर्णय आहे. समाजाला धर्मगटात वाटून हा हिंदू धर्मियांचा विजय आहे, मुस्लिम धर्मियांचा पराभव आहे, असे त्याचे विश्लेषण करता येत नाही. सर्वोच्च न्यायलयाने धार्मिक झगडयाचा निर्णय केला नाही. जमिनीवरचा मालकी हक्क कोणाचा, तर तो रामलल्लाचा, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. मुसलमानांसाठी पाच एकर जमीन शासनाने द्यावी आणि तेथे मश्जिद बांधावी, असा न्याय न्यायालयाने केला. एकाला झुकते माप आणि दुसऱ्याला उपडे माप असे न्यायालयाने केले नाही. म्हणून त्याला न्याय म्हणायचा. अशा प्रकारचा न्याय करणे ही प्राचीन हिंदू परंपरा आहे. भारतामध्ये कोणत्याही उपासना पंथाला हीन लेखले जात नाही. आपल्या धर्माज्ञा अशा आहेत की, सर्वांचा योग्य तो सन्मान करावा, कुणावरही अन्याय करु नये. आदर्श हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी मश्जिद, दर्गे यांचा देवळांइतकाच सन्मान केला. पवित्र कुराण हाती सापडले असता, त्याचा आदरपूर्वक ते योग्य व्यक्तीला देण्याची व्यवस्था ते करीत असत.

 

ही आपली परंपरा आहे. म्हणून हा विजय कुठल्या एका धर्मगटाचा विजय नाही, कुठल्या एका धर्मगटाचा पराभव नाही, हा राष्ट्रीय अस्मितेचा विजय आहे. परकीय आक्रमणाखाली हा देश शेकडो वर्षे तुडवला गेला. त्याच्या श्रध्दास्थानांचा विंध्वस करण्यात आला. तो काळ गेला, आता आपले राज्य आले आहे. आपल्या राज्यात इंग्रजी साम्राज्याच्या निशाण्या आपण पुसत चाललो आहोत. व्हिटोरिया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झाले आहे. कलकत्त्याचे कोलकता झाले आहे. आणि मद्रासचे चेन्नई झाले. मुंबईतील प्रिन्स ऑफ वेलस्चा पुतळाआता राणीच्या बागेत गेला आहे. दिल्लीत औरंगजेब रोड इतिहासजमा झालेला आहे. हे बदल करावे लागतात. त्यात आपली अस्मिता प्रकट होते. आपल्या अस्मितेची स्मारके उभी करावी लागतात. स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यासाठी आवश्यक असतो.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोमनाथाच्या मंदिराचा विषय पुढे आला. सोमनाथाचे मंदिर मुस्लिम आक्रमकांनी अनेकवेळा फोडले. भग् सोमनाथ म्हणजे भग् देश. आता देश उभा करायचा आहे, तेव्हा सोमनाथाचे मंदिर उभे राहिले पाहिजे. सरदार वल्लभाई यांनी त्यात पुढाकार घेतला. आज सोमनाथाचे मंदिर उभे आहे. अयोध्येतील रामाचे मंदिरसुध्दा म्हटले तर मंदिर होईल, पण ते खऱ्या अर्थाने आमच्या अस्मितेचे स्मारक अशेल.. आम्ही कोण आहोत? युगानुयुगे भारतात राहणारे आम्ही भारतवासी आहोत. एक जीवनपध्दती विकसित करुन मनुष्याला परिपूर्ण मानव करण्याचा प्रयत्न करणारे आम्ही आहोत. या आमच्या वाटचालीतील रामाचे जीवन ही एक अवस्था आहे. आमच्या जीवनाचा तो सर्वार्थाने आदर्श आहे. या आदर्शाचे स्मारक हे आमचे राष्ट्रीय स्मारक आहे.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे अनेक प्रसंग येतात. राष्ट्र जीवनात आनंदाचे प्रसंगदेखील येतात. 9 नोव्हेंबर हा दिवस त्यातील एक दिवस आहे. हा राष्ट्रीय आनंदाचा दिवस आहे. राष्ट्राच्या अस्मितेच्या हुंकाराचा हा दिवस आहे. हा परमोच्च आनंदाचा दिवस आहे. आपल्या सनातन राष्ट्राला त्याच्या उज्जवल परंपरेच्या मार्गाने घेऊन जाणारा हा दिवस आहे.

रमेश पतंगे