मैत्र जिवाचे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Dec-2019   
|

*** संदीप असोलकर***

मनोहर पर्रिकर म्हणजे निष्ठावंत संघस्वयंसेवक आणि धडाडीचा, बुध्दिमान राजकारणी असं चित्र समोर येतं. गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चाहते सर्वदूर होते. केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर आणि तिथे पदाची शान वाढवणारी कामगिरी करून दाखवल्यावर तर त्यांच्या चाहत्यांमध्ये अफाट वाढ झाली. एखादी तेजस्वी वीज काही क्षणांसाठी आकाश प्रकाशमान करून जावी, तसं पर्रिकरांचं राजकीय आयुष्य. कालावधीही तुलनेने थोडका आणि प्रचंड व्यग्रतेचा. अशा दिनक्रमात माणसाचं खाजगी आयुष्य जवळजवळ संपुष्टात येतं. पर्रिकरांसारख्या 'वर्कोहोलिक' व्यक्तीचा दिवस तर कामांभोवतीच फिरत राहतो. अशांना विरंगुळयासाठी सवड नसते आणि मित्र म्हणावेत अशांची संख्याही मोजकीच असते. पर्रिकरांचंही जवळच्या मित्रांचं वर्तुळ अगदी मर्यादित. मोजण्यासाठी दोन हातांची बोटंही खूप वाटावीत इतकं लहान. अशा मोजक्या मित्रांमध्ये समावेश होतो, नवी मुंबईतील उद्योजक संदीप असोलकर यांचा. एका कामानिमित्त त्यांची पर्रिकरांशी भेट झाली आणि अगदी अल्पावधीतच या ओळखीचं रूपांतर प्रगाढ मैत्रीत झालं. या नात्यातल्या काही क्षणांना त्यांनी दिलेला उजाळा.


parrikar_1  H x

दोन व्यक्तींमध्ये स्नेह जुळायला नेमकं काय कारण ठरेल सांगता येत नाही. औपचारिक कारणामुळे झालेली ओळखही एखाद्या गाढया मैत्रीची सुरुवात ठरते. माझ्या आणि मनोहर पर्रिकरांच्या मैत्रीबाबतीतही असंच घडलं. सुमारे सतरा वर्षांपूर्वी आमची कामानिमित्त झालेली ओळख आमच्या दोघांच्याही धकाधकीच्या आयुष्यातलं ओऍसिस बनली. या नात्याने माझं जगणं समृध्द केलं आणि जीवनाकडे पाहायची दृष्टी अधिक व्यापक केली. आमच्या दोघांमधल्या वयातलं अंतर, स्वभावातलं अंतर, जन्मभूमीतलं अंतर यातलं काहीही या मैत्रीच्या आड आलं नाही. या नात्यातून मला लाभलं ते निखळ प्रेम आणि एक मित्र म्हणून प्रचंड विश्वास.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

 

पर्रिकरांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कालखंडात एका प्रकल्पाच्या निमित्ताने आमची भेट झाली. पणजी शहराच्या नागरी वस्त्यांमधील सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी जो प्लँट उभारायचा होता, त्यासाठी टेंडर मागवण्यात आली होती. आमची कंपनी सांडपाण्याच्या पुनर्वापराच्या क्षेत्रात काम करणारी, साहजिकच आम्ही टेंडर भरलं. या टेंडरमध्ये मूळ प्रक्रियेला दोन पर्यायही सुचवायचे होते. आम्ही त्यासह टेंडर भरलं. या टेंडरमुळे - खरं तर दोन पर्याय सुचवल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटण्याचा योग आला. पहिलीच भेट झाली ती त्या प्रक्रियेसंदर्भातल्या त्यांच्या मनातल्या सर्व तांत्रिक शंकांचं निरसन करून देण्यासाठी. त्यांच्या प्रश्नांमधलं वैविध्य चकित करणारं होतं, त्या विषयातली त्यांची समज दाखवणारं होतं. आपण एका राज्याच्या मुख्यमंत्र्याशी बोलतो आहोत की टेक्नोक्रॅटशी, असा प्रश्न मला पडला. मनातल्या सर्व शंका संपल्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भेटायला बोलावलं. माझ्या दृष्टीने अपेक्षित त्या सर्व शंका संपल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीच्या एकाही प्रश्नाची पुनरावृत्ती न होता, शंकांची नवी फैर झडली. मी उत्तरं देत गेलो. या दुसऱ्या भेटीआधी मध्यरात्रीपर्यंत जागून या विषयासंदर्भातली आंतरराष्ट्रीय स्तरावरची माहिती त्यांनी इंटरनेटवरून मिळवून वाचली होती. सलग दोन दिवस झालेल्या प्रदीर्घ भेटीनंतर ते काम आम्हाला मिळालं. ते मंजूर करताना त्यांनी एकच अट घातली, ती म्हणजे... 'इथे कोणाला चहासुध्दा पाजायचा नाही.'

या कामाच्या वेगवेगळया टप्प्यावर, आम्ही चर्चेसाठी भेटत गेलो. सर्व प्रक्रिया समजून घेण्यात आणि सांगितल्याबरहुकूम ती होते आहे की नाही हे पाहण्यात त्यांना रस होता. ते मुख्यमंत्रिपदावरून बाजूला झाल्यावरही तो रस कमी झाला नाही. प्लँट उभारला जाईपर्यंत आणि तो कार्यान्वित झाल्यानंतरही ते प्लँटला भेट देत होते. जणू काही त्या प्लँटच्या यशस्वितेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरच होती. त्यांचं कामातलं झपाटलेपण हे असं असाधारण होतं. चकित करणारं होतं.

या कामादरम्यानच कधीतरी आमच्या अनौपचारिक भेटींना सुरुवात झाली. या भेटींमुळे 'वर्कोहोलिक' अशी कीर्ती असलेल्या या माणसाचं दुसरं रूप पाहण्याची मला संधी मिळाली. या प्रतिमेआड दडलेला कुटुंबवत्सल पिता आणि प्रेमळ स्नेही पाहायला मिळाला. त्यांच्यातल्या या भूमिकांना न्याय देण्याची सवड त्यांना नियतीने दिली नाही, तरी ते त्यांच्या परीने या भूमिका मन:पूर्वक जगायचा प्रयत्न करत होते, हे नक्की.


parrikar_1  H x

गोव्यातल्या असोल्या नारळासारखं कठोरतेचं कवच ल्यालेला, अंतरी स्निग्धतेचा ओलावा जपणारा हा माणूस. प्रिय पत्नीच्या अकालमृत्यूची वेदना निमूट सोसत, मुलांचं आईपण निभावणारा बापमाणूस होता.

तंत्रज्ञानाची आवड आणि समान मूल्यांवर असलेली नितांत श्रध्दा या समान धाग्यावर आमच्यातलं मैत्रीचं नातं विणलं गेलं होतं. म्हणूनच ते अगदी कमी कालावधीतही दृढ झालं असावं. असं असलं, तरी मैत्री आणि काम यांच्यात त्यांनी कधी गल्लत होऊ दिली नाही. किंबहुना ही गल्लत होऊ नये यासाठी ते कायमच जागरूक असायचे. राज्याचा प्रमुख या नात्याने एखादं काम सोपवताना कामाची गुणवत्ता, त्या विषयातली संबंधित व्यक्तीचीतज्ज्ञता हेच निकष कायम राहिले. राज्याचं हित सर्वोपरी, याचा त्यांनी स्वत:ला आणि समोरच्यालाही कधी विसर पडू दिला नाही. मी ही त्यांच्या या मताचा कायम आदरच केला.

***

अनेकदा आमच्या गप्पा चलू असताना एकीकडे कामाच्या फायली वाचणं, त्यावर सह्या करणं चालू असायचं... हे असं कसं करता? असं विचारल्यावर ते सांगायचे की, त्यातली कोणतीही फाइल उचलून मला त्यातला तपशील विचार. फाइलच्या विषयानुसार, विषयाच्या गांभीर्यानुसार फाइलचा कलर कोड ठरलेला असायचा. लाल फाइल म्हणजे तीन वेळा काळजीपूर्वक वाचायच्या. अष्टावधानी असण्याचा ते जणू वस्तुपाठ होते.

 

अंतर्बाह्य साधेपणा हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांच्या साध्या राहणीमानाची तर समाजमाध्यमांमधूनही खूप चर्चा झाली आहे. त्यासंबंधीचे अनेक किस्से फिरले आहेत. वागण्यातलं साधेपण हे त्यांचं एक वैशिष्टय होतं. एकत्र प्रवास करत असताना सकाळच्या वेळी ते अगदी सहज मला झोपेतून उठवायला येत असत. एका राज्याचा मुख्यमंत्री, नंतर संरक्षण मंत्री असतानाही त्यांनी यात बदल केला नाही किंवा असं करणं त्यांना कधी बिलो डिग्निटी वाटलं नाही.

गोव्याला असताना मला मोठा अपघात झाला, त्या वेळी आपली सगळी कामं बाजूला ठेवून मी मध्यरात्री शुध्दीवर येईपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये थांबले होते. इतकंच नाही, तर पुन्हा पहाटे सहा वाजता माझी विचारपूस करायला हजर झाले. पुढचे 3 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो, ते तिन्ही दिवस ते किमान 3 वेळा तरी चौकशीसाठी येत होते. जवळच्या माणसांबद्दलचा असा अकृत्रिम जिव्हाळा त्यांच्या मनात होता. त्याचं दर्शन खूप कमी जणांना होत असे.


गोव्यातला आमच्या घरातल्या कूकशीही त्यांची चांगली मैत्री होती. त्याला ते काही टिप्सही द्यायचे. मी गोव्यात नसलो तरीही ते घरी येऊन जेवून जायचे.

सरकारी कामं मी कधी फारशी केली नाहीत. मात्र खाजगी कामांच्या निमित्ताने मी गोव्यात वरचेवर जात असे. मी गोव्यात आलोय असं कळलं की ते नक्की भेटत असत.

parrikar_1  H x

गोव्याच्या मातीवर, इथल्या माणसांवर असलेलं त्यांचं प्रेम हे असाधारण कॅटॅगरीत मोडणारं होतं. जन्मभूमीवरच्या प्रेमापायी, संरक्षण मंत्रिपदासारखी जबाबदारी मिळाल्यावरही दिल्लीत जायला नाखूश असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांशी त्यांची असलेली अटॅचमेंट. यामुळेही दूर दिल्लीत जायला त्यांचं मन तयार नव्हतं.

निवडक लोकांच्या मैफलीत रमणारा तो माणूस होता. अशा मोजक्यांच्या सान्निध्यात ते खूप खुलायचे. थट्टामस्करी करायचे. जोक सांगायचे. जुन्या आठवणी रंगवून सांगून खूप हसायचे आणि हसवायचेही. मित्रांच्या नकला करायचे. जुन्या आवडत्या चित्रपटांबद्दल बोलायचे. मात्र या मैफलीत एखादा जरी अनोळखी माणूस असेल, तर हेच पर्रिकर अगदी शांत बसून राहायचे.

***

पर्रिकर संरक्षण मंत्री झाल्यावर निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले यांनी मला फोन केला. त्यांना पर्रिकरांना भेटायचं होतं. मी पर्रिकरांना फोन करून हे सांगितलं. त्यांनी गोखलेंचा नंबर मागितला. मी दिला. तसं मी गोखलेंनाही सांगितलं. काही वेळातच मला गोखलेंचा फोन आला. आनंदातिशयाने आणि आश्चर्याने त्यांना काही मिनिटं बोलताच येत नव्हतं. ते म्हणाले, ''अहो खुद्द संरक्षण मंत्री फोन करून माझ्याशी बोलले.'' मी म्हटलं, ''हो, ते मघाशी म्हणाले होतेच मला.'' त्यावर त्यांनी सांगितलं, ''अहो, प्रत्यक्ष भेट तर लांबच, अशी संरक्षण मंत्र्यांनी स्वत:हून फोन करायची प्रथा नसते. मला तरी माझ्या कारकिर्दीत हा अनुभव नाही, म्हणून आश्चर्य वाटलं.'' गोखले यांनी भेटायची इच्छा प्रदर्शित केल्यावर पर्रिकरांनी त्यांना सांगितलं, ''मुद्दाम मला भेटायला येऊ नका. जेव्हा दिल्लीत याल तेव्हा भेटा. अपॉइंटमेंट वगैरे काही नाही.'' लष्करी शिस्त अंगी बाणलेल्या गोखलेंसाठी हे खूप आश्चर्यकारक होतं. मी त्यांना सांगितलं, ''दिल्लीत याल तेव्हा भेटा, हीच त्यांनी दिलेली भेटीची वेळ आहे. तुम्हाला जसं सांगितलं आहे तसेच ते भेटतील.''

जमिनीवरून पाय न सुटलेला माणूस म्हणजे पर्रिकर. एकदा दिल्लीत आमचं एकत्र जेवायचं ठरलं. भेट रात्रीची होती. माझी कामं आटोपल्यावर मी माझ्या हॉटेलरूममध्ये आराम करत बसलो होतो. संध्याकाळच्या सुमारास त्यांचा फोन आला. ''असशील तसा ये, गाडी पाठवतो.'' त्यांच्याच घरी जायचं म्हणून मी तसाच ट्रॅकपँट-टीशर्टमध्ये गाडीत जाऊन बसलो. घरी पोहोचलो तर हे तयारच होते. लगेच गाडीत येऊन बसले आणि म्हणाले, ''अरे, आज आपलं जेवायला भेटायचं ठरलं खरं. पण त्याआधीच मी एकांना पार्टीसाठी येतो म्हणून कबूल केलं होतं. ते विसरलो. आता दोघं मिळून तिथे जाऊ.'' मी या उत्तराने थक्क झालो. ज्यांच्याकडे चाललो होतो त्यांच्याशी माझी ओळख नाही आणि त्या पार्टीला मी असा गबाळया वेशात चाललो होतो. पर्रिकर नेहमीसारखेच बुशशर्ट, पँट, पायात साध्या चपला घालून होते. त्या पार्टीत आम्ही दोघेच ऑड मॅन आउट होतो. पण त्यामुळे तिथे वावरताना पर्रिकरांना जराही अवघडल्यासारखं झालं नाही. बुजले नाहीत. मी मात्र यजमानांची माफी मागितली. जेव्हा साधेपणा असा 'इनबिल्ट' असतो, तेव्हा अवघडलेपण येत नाही हे त्यांच्या वागण्यातून लक्षात आलं.

दिल्लीत दिलेली संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांना खूप आवडली होती. त्यांच्यातल्या टेक्नोक्रॅटला भावणारं आणि बुध्दीला चालना देणारं ते काम होतं. त्यामुळे कामाच्या बाबतीत ते समाधानी होते. भावलं नाही ते दिल्लीतली खाणं, दिल्लीची हवा. त्याचबरोबर, कोण कोणत्या हेतूने आपली भेट घ्यायला येईल या विचारामुळे ते अनोळखी व्यक्तींना भेटताना अतिशय दक्ष असायचे.

***

मांसाहारात खेकडे, चिंबोऱ्या आणि मासे त्यांना अतिशय प्रिय. त्यांच्या आजाराचं निदान होण्याअगोदरचा एक आठवडा आम्ही दोघं एकत्र जेवत होतो. आता या योगायोगाचं मला खूप आश्चर्य वाटतं आहे. त्या काळात मी कामानिमित्त गोव्यात होतो. जेवण हे निमित्त असायचं आमच्या भेटीला. कारण तेवढाच वेळ कामाव्यतिरिक्त ते काही वेगळया विषयावर बोलायचे. या आठवडयाभरात शेवटची जेवणासाठी भेट झाली ती त्यांनी मला दिलेली पार्टी होती. तीन तास गप्पा मारत झालेलं ते जेवण मी कधीच विसरू शकणार नाही. मांसाहाराचा मनसोक्त आस्वाद घेत झालेलं ते जेवण पर्रिकरांचं शेवटचं जेवण ठरलं.

वर्षभराच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यातल्या असाधारण योध्दयाचं खूप जवळून दर्शन झालं. सगळया ट्रीटमेंटचा त्यांना होणारा त्रास समोरच्याला दिसत असला, अस्वस्थ करत असला तरी ते स्वत: त्याबद्दल कधी चकार शब्द बोलत नसत.

कॅन्सरशी त्यांनी जी झुंज दिली, ती केवळ प्रबळ इच्छाशक्तीवर. अमेरिकेतली ट्रीटमेंट संपवून पहिल्यांदा ते आले, तेव्हा त्यांच्यात झालेली सुधारणा अविश्वसनीय होती. त्या उत्साहात त्यांनी झपाटयाने कामही सुरू केलं होतं. आपल्याकडे थोडे दिवस उरले आहेत हे त्यांना समजलं होतं. तेव्हा सगळी उरलीसुरली एनर्जी फक्त हातात असलेल्या कामासाठी वापरायची या भावनेने ते काम करत होते. काही मोजके लोक वगळता त्यांनी अनौपचारिक भेटीही बंद केल्या होत्या, त्यामागे हाच विचार होता की हातात असलेला क्षण न क्षण काळजीपूर्वक वापरायचा आहे. सत्कारणी लावायचा आहे.


शेवटच्या काळात मला त्यांच्याबरोबर बराच काळ घालवता आला ही माझ्यासाठी मोठी ठेव आहे. ते जाण्याअगोदर
4 दिवस मी गोव्याहून मुंबईला परतलो. त्या वेळी ते ''रविवारी परत ये'' असं मला म्हणाले. मी रविवारचं तिकीटही काढून ठेवलं होतं. मात्र ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी होतं, हे नंतर समजलं.

(शब्दांकन - अश्विनी मयेकर)