सरदार पटेलआणि हैदराबाद मुक्तिसंग्राम

विवेक मराठी    14-Dec-2019
Total Views |

***भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे***

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात ५६५ संस्थाने होती या संस्थानांना भारतात विलीन करून भारताला एकात्म स्वरूप प्राप्त करून देण्याचे अशक्यप्राय कार्य तत्कालीन गृहमंत्री, भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून शक्य झाले. 


sardar vallabhbhai patel_

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक दैदिप्यमान पर्व म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्राम. हैदराबादचा मुक्ती लढा  कर्मयोगी संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला आणि तत्कालीन गृहमंत्री,भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टीने काश्मीरपेक्षा हैदराबाद अधिक महत्वाचं होतं. हैदराबाद राज्य जणू भारताच्या पोटात होतं. त्यामुळेच वल्लभभाई एकदा म्हणाले होते, “शरीरातून पोट बाहेर काढलं तर शरीर जिवंत कसं राहणार?” हैदराबाद स्वतंत्र होणं म्हणजे वल्लभभाईंचं एकात्म भारताचं स्वप्न भंग पावण्यासारखं होतं. हैदराबादचा संस्थानिक सातवा निजाम मीर उस्मान अली खान विविध प्रसंगी हेतूतः आपण स्वतंत्र राज्यं असल्याचं दाखवून देत होता. पाकिस्तानला 20 कोटींचं कर्ज मंजूर करणं, काँग्रेस नेत्यांना तुरुंगात डांबण आणि रझाकारांच्या कारवाया या बाबी अत्यंत चिंताजनक होत्या. इतर संस्थानांबरोबरच निजामाशी करार करावा असे वल्लभभाईंना वाटत होतं, पण माउंटबॅटन यांच्या आग्रहाखातर त्यांनी ही कारवाई थांबवली. हैदराबादचा पंतप्रधान मीर लायक अली यांच्यावर वल्लभभाईंचा काडीमात्र विश्वास नव्हता. इकडे निजामाचे घटनात्मक सल्लागार वाँल्टर मॉकटन हे माउंटबॅटन यांचे मित्र होते. विशेष म्हणजे भारताबरोबरच्या वाटाघाटीसाठीच माउंटबॅटननी मॉकटन यांना मुद्दाम पाठवले होते आणि या दोघांना हैदराबादचं भारतात विलीनीकरण नको होतं. त्यातच ब्रिटीश सरकारचे गृहमंत्री कॉनराँड कोलफिल्ड यांच्या भारतविरोधी कारवायांमुळे पटेल अधिकच सावध झाले होते.

निजामाशी शांततामय मार्गाने तोडगा निघावा असे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना वाटत होते. माउंटबॅटन भारतात असेपर्यंत आपण हैदराबादवर कोणतीही कारवाई करू शकत नाही याची जाणीव वल्लभभाईंना होती. हैदराबादमधील स्टेट कॉंग्रेसच्या मंडळींनाही हा लढा तुम्हाला वर्षभर तरी लढावा लागेल याची जाणीव त्यांनी करून दिली होती. रझाकार व निजामी पोलीस यांच्याशी अहिंसेच्या मार्गाने लढणे शक्य नाही. त्यामुळे संस्थानात चालू असलेल्या सशस्त्र लढ्यास गांधीजींप्रमाणेच सरदार वल्लभभाई पटेल यांची मूक संमती होती. एवढेच नव्हे तर संस्थानाच्या सीमेवर चालू झालेल्या बॉर्डर कॅम्पना शेजारील भागातून शस्त्र व इतर मदत सरदारांच्याच आशिर्वादामुळेच मिळत होती. यात मध्य प्रांताचे गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्र यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हैदराबादमध्ये लष्करी हस्तक्षेप करावा लागणार याची वल्लभभाईना सुरुवातीपासूनच कल्पना होती. मार्च १९४८ मध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळेही कारवाईला थोडा विलंब झाला.

 

निजामाने जाणीवपूर्वक भारताला वाटाघाटीत अडकवून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले होते. कासीम रझवी या काळात अत्यंत उद्दाम वक्तव्ये करत होता, संस्थानात रझाकारांच्या कारवायात प्रचंड वाढ होत होती, हिंदू जनता भयभीत झाली होती. या काळात आपण शांत राहून चालणार नाही याची जाणीव वल्लभभाईंना होती. दरम्यान निजामाला भरपूर सवलती देणारा करार वाँल्टर मॉकटन यांनीमाउंटबॅटन यांच्या मध्यस्थीने सरदार पटेलांकडून मंजूर करून घेतला होता पण आपल्या सुदैवाने खुद्द निजामाने आणि त्यांच्या सल्लागारानेच हा करार फेटाळून लावला. या सर्व घडामोडीमुळे माउंटबॅटन अतिशय निराश झाले. कासीम रझवीने हस्तक्षेप केल्यामुळेच हैदराबादने ही संधी गमावली. मात्र भारतासाठी हा विजय ठरला. आता कोणत्याही क्षणी हैदराबादमध्ये हस्तक्षेप करण्याचा नैतिक अधिकार भारताला प्राप्त झाला.

 

माउंटबॅटन लंडनला परत गेले आणि भारतासमोरचा एक अडथळा दूर झाला. पण अजूनही नेहरुंना लष्करी कारवाई टाळता आली तर बरे होईल असेच वाटत होते. माउंटबॅटन गेल्यावर सरदारवल्लभभाई पटेलांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. सरदार वल्लभभाई पटेल यांची यासंबंधीची जवळपास ३०० पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यावरून सरदार वल्लभभाई पटेलांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी किती विविध पद्धतीने प्रयत्न चालविले होतेयावर नव्याने प्रकाश टाकता येईल. भारताचे हैदराबादमधील प्रतिनिधी के.एम. मुन्शी यांनी फोनवर बोलताना निजाम अजूनही कराराबाबत विचार करतो आहे असे सांगितले, तेव्हा सरदार पटेल म्हणाले, “कराराची बोलणी आणि अटी माउंटबॅटनबरोबरच लंडनला गेल्या. आता निजामाबरोबर जो करार होईल तो अन्य संस्थानाबरोबर झालेल्या कराराप्रमाणेच होईल”.

 

हैदराबादमधील परिस्थिती झपाट्याने संघर्षाच्या दिशेने जात होती. जुलैच्या सुरुवातीला हैदराबादला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. सिडनी कॉटन या ऑस्ट्रेलियन वैमानिकाच्या माध्यमातून कराचीहून गोवा मार्गे रात्रीच्या अंधारात संस्थानातील बिदर व वरंगल येथे शस्त्रे उतरवली जात होती. संस्थानात अनेक हत्याकांड घडत होते त्यात गोरटा हत्याकांड आणि शोएब उल्ला खान यांची हैदराबाद शहरातच रझाकारांनी केलेली हत्या या घटनांमुळे पंडित नेहरू यांच्या मनातील द्विधा अवस्था संपली. ९ सप्टेंबर १९४८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लष्करी कारवाईचा निर्णय झाला. जनरल चौधरी यांच्याकडे या कारवाईचे नेतृत्व सोपविण्यात आले. १३ सप्टेंबरच्या सकाळी भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. या कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे नाव देण्यात आले होते. काही अपवाद वगळता फारसा प्रतिकार झालाच नाही. अवघ्या १०९ तासात निजाम शरण आला. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थान मुक्त झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व लढयाला यश आले,सरदार वल्लभभाई पटेल हेच खऱ्या अर्थाने या विजयाचे शिल्पकार होते. १९४९च्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वल्लभभाईंनी हैदराबादला भेट दिली. निजामानं विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. पराभूत निजामाला त्यांनी दिलेल्या सन्माननिय वागणुकीमुळे निजामाच्या मनातील भीती नाहीशी झाली. फतेह मैदानावर झालेल्या जाहीर सभेत बोलताना वल्लभभाई हैदराबादवासीयांना उद्देशून म्हणाले, “ तुम्ही आता भारताचा एक भाग नव्हे, तर भारतचं हृदय बनला आहात.” आजही हैदराबाद संस्थांनातील जनतेच्या मनात सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्थान ‘आमचा मुक्तिदाता’ असेच आहे . सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या परिस्थितीत हे कार्य केले त्यावरून त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. “देशावर अनेक संकटं कोसळली, पण पटेलांचा मृत्यू हे देशावरच सर्वात मोठं संकट आहे.” हे श्रद्धांजलीच्या वेळचं पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वाक्य त्यांची थोरवी यथार्थपणे वर्णन करणारे आहे.