साद दे प्रतिसाद

विवेक मराठी    02-Dec-2019
Total Views |

सोशलमिडियाचा वापर आपल्यातील विवेक जागा ठेवून केला तर कसा सकारात्मक बदल घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पालघर जिल्ह्यातील 'राष्ट्र सेवा समिती, भलिवली' येथील वनवासी भगिनींनी तयार केलेल्या आकाशकंदीलला मिळालेला भरघोस प्रतिसाद.

bamboo decorators _1 

आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या आधुनिक युगातील बऱ्याच समाजमाध्यमांत सगळेच मुक्तपणे संचार करताना दिसतात. या आधुनिक काळात एकमेकांना प्रभावीपणे जोडण्याचे साधन म्हणजे सोशल मीडिया. वास्तविक योग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. परंतु कुठल्याही निर्बंधाशिवाय सररास वापरात येणाऱ्या या माध्यमांमुळे बऱ्याच दुष्परिणामांचा सामनाही अनेकांना करावा लागला आहे. तसे पाहिले तर कोणतेही माध्यम वाईट नसते. फक्त त्या माध्यमाचा वापर करताना आपल्यातील विवेक जागा ठेवावा लागतो. त्याने स्वतःमध्ये आणि पर्यायाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर, 'विवेक राष्ट्र सेवा समिती, भालिवली' येथील वनवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाशकंदिलाचे मार्केटिंग आणि त्याला मिळालेला प्रतिसाद.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक 

पालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांचा सर्वांगीण विकास हे भालिवली येथील 'राष्ट्र सेवा समिती, भालिवली' या सामाजिक संस्थेचे एकच ध्येय आहे. ही संस्था 'शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षण' या समाजातील आवश्यक घटकांवर भरीव काम करीत आहे. 2014 साली संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून असे लक्षात आले की, येथील जिल्ह्यातील गावेच्या गावे स्थलांतरित होत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे बेरोजगारी. वनवासी बांधवांचे अर्थार्जनाचे एकमेव साधन म्हणजे शेती होय. शिक्षणाचा अभाव, प्रचंड व्यसनाधीनता, टोकाची अंधश्रध्दा यांचे सर्वाधिक प्रमाण येथील वनवासी बांधवांत दिसून येते. अशा वेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घरातील स्त्रीकडे येते. परंतु या वनवासी भगिनींना शिक्षण नाही, शून्य व्यवहारज्ञान, कधीही घराबाहेर पडणे माहीत नाही, अशी स्थिती असताना पारंपरिक कौशल्य एवढीच काय ती त्यांची जमेची बाजू होती. सर्वेक्षणानंतर त्यांच्या या पारंपरिक कौशल्याला व्यासपीठ मिळून द्यावे आणि त्यातून अर्थार्जनाबरोबरच त्यांना सन्मान मिळवून द्यावा हा राष्ट्र सेवा समितीचा हेतू होता. यातूनच 2015 साली 'प्रशिक्षण व विकास' विभाग सुरू करण्यात आला.

या प्रशिक्षणाचा कालावधी 45 दिवसांचा असतो आणि या प्रशिक्षणाचे वैशिष्टय असे की, 46व्या दिवशी प्रशिक्षणार्थीला रोजगार देणे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या प्रशिक्षणासाठी गावागावात जाऊन जनजागृती करावी लागत होती. आता राष्ट्र सेवा समितीच्या कामाचा प्रचार गावात आपसूकच होऊ लागला. सुरुवातीच्या काळात बांबूच्या चार वस्तू प्रशिक्षणात शिकविल्या जात होत्या, आता बांबूच्या 24 ते 25 वस्तू समितीमध्ये तयार केल्या जातात. समितीमार्फत केल्या जाणाऱ्या बांबूकामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी जवळजवळ दोन ते अडीच वर्षे त्याच्यावर काम केले गेले. पुढील प्रशिक्षण सुरू करण्यासाठी गावातून अर्ज येऊ लागले. बांबूकाम करणाऱ्या भगिनींनी समितीमध्येच राहून हे काम पूर्ण करावे, अशी कोणतीही अट नाही. शेती, घर संभाळून दिलेल्या कालावधीत हे काम पूर्ण करावे, हीच माफक अपेक्षा. बांबूकाम करणाऱ्या महिलांना महिन्याला 9 ते 10 हजार रुपये इतका कामाचा मोबदला मिळतो. पूर्वी रोख पैशांच्या स्वरूपात कामाचा मोबदला दिला जाई. परंतु घरातील पार्श्वभूमी पाहता या सगळया भगिनींना बँकेचे खाते उघडून त्यात त्यांना मिळणारा मोबदला जमा केला जातो. त्यामुळे त्यांना बचतीची सवय लागली आणि आता सन्मानाने या भगिनी आपल्या कुटुंबाची वाटचाल करीत आहेत, अशी प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर यांनी माहिती दिली.

राष्ट्र सेवा समितीमार्फत 2015पासून बांबूच्या विविध वस्तू बनविण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव यांना या बांबूच्या वस्तू दाखविण्याची संधी समितीला मिळाली. आपल्या वनवासी भगिनींनी केलेल्या बांबूच्या वस्तूंचे राज्यपालांनी कौतुक केले आणि त्यांच्या कामासंदर्भातील एक ऑडियो त्यांनी दिला. गेल्या वर्षी राज्यपालांनी वनवासी भगिनींनी बांबूपासून केलेल्या राख्यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे खूप व्हायरल झाली आणि राख्यांची खूप मोठया प्रमाणात विक्री झाली.

राख्यांच्या या ऑडिओे क्लिपमुळे राख्यांची मोठया प्रमाणात झालेली विक्री पाहता, वनवासी भगिनींनी केलेले आकाशकंदील अशाच प्रकारे लोकांसमोर सादर केले तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, अशी संकल्पना समितीचे संचालक प्रदीप गुप्ता यांना सुचली. त्यांची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी समितीचे सर्व सदस्य कामाला लागले. जशी राज्यपालांची क्लिप व्हायरल केली, तशाच मग या वेळी मराठी कलावंतांच्या व्हिडिओ क्लिप कराव्या, असे ठरले आणि प्रयत्न सुरू झाले. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आणि महेश पोहनेरकर यांच्या सहकार्याने ही संकल्पना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न सुरू झाला.

मराठी कलावंतांपैकी राहुल सोलापूरकर, प्राजक्ता माळी, सुबोध भावे, प्रशांत दामले, आनंद इंगळे आदी कलांवतांनी तसेच प्रसून जोशी (पद्मश्री, अध्यक्ष - केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड) यांनी समितीचे ध्येय आणि वनवासी भगिनींची मेहनत याची सुंदर गुंफण करून, समितीकडून आकाशकंदील का खरेदी केले पाहिजेत, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच विवेक पंडित (अध्यक्ष - राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती, माहाराष्ट्र शासन (राज्यमंत्री दर्जा)), सुनील लिमये (भारतीय वनसेवा अधिकारी), रमेश पतंगे (हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष) आदी मान्यवरांनी वनवासी भगिनींकडून आकाशकंदील खरेदी करण्याचे आवाहन केले. यातून एक आनंदाची गोष्ट झाली ती म्हणजे, राज्यातील अभयारण्यातील सोवीनीयर शॉपमध्येदेखील या वनवासी भगिनींनी केलेल्या बांबूच्या वस्तू वक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत.

bamboo decorators _1 

अशा साऱ्या मान्यवरांच्या व्हिडिओ क्लिप अल्पावधीतच सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल झाल्या. तसे पाहिले तर समितीचा हा पहिलाच प्रयोग होता. राख्यांसाठी मा. राज्यपालांची क्लिप व्हायरल झाल्याचा अनुभव गाठीशी होता, परंतु आताचा हा प्रयोग थोडा व्यापकतेने केलेला होता. त्यामुळे अंदाजात थोडी गडबड झाली. सोशल मीडियावर तुफान वेगाने जशी क्लिप व्हायरल झाली, तशी तुफान वेगाने आकाशकंदिलांची मागणी समितीकडे येऊ लागली. सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांद्वारे ही मागणी येऊ लागली. परंतु मानवी क्षमतेच्या काही मर्यादा असतात. येणारे फोन्स, व्हॉट्स ऍप असे सगळयांनाच संपर्क करणे शक्य झाले नाही. ज्या संख्येने मागणी आली, तेवढया आकाशकंदिलांचा पुरवठा करता आला नाही. परंतु यानिमित्ताने एक समजले की आपण करत असलेल्या कामाला समाजातून भरभरून दाद दिली जाते. आपल्या क्षमतेच्या मर्यादा अधिक गतीने विस्तारण्याची गरज आहे आणि आपल्याला नियोजनावर भर दिला पाहिजे, असे प्रगती भोईर यांनी सांगितले.

ज्या प्रमाणात मागणी आली, त्या प्रत्येकाला आकाशकंदील देता आला नाही, याचा खेद समितीला आहेच. पण ज्यांच्यापर्यंत हे कंदील पोहोचले, त्या कंदिलांच्या बॉक्सवर संस्थेत तयार होत असलेली बांबूची उत्पादने, संस्थेचा पत्ता, संपर्क क्रमांक जाईल, याची चोख व्यवस्था समितीमार्फत केली गेली, जेणेकरून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर समितीच्या प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती पोहोचेल. तसेच हे आकाशकंदील या वर्षी ऍमेझॉनवरही विक्रीसाठी उपलब्ध होते. काही जणांना समितीमार्फत कंदील मिळाले नाहीत, अशांनी अधिक पैसे खर्च करून ऍमेझॉनवरून कंदिलांची खरेदी केली. ज्यांच्यापर्यंत हे कंदील पोहोचले, त्यांनी समितीमध्ये स्वतःहोऊन फोन करून आपण केलेले कंदील तर सुंदर व पर्यावरणपूरक आहेतच, तसेच आपण ज्या पध्दतीने कंदील पाठविताना काळजी घेतली ती कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रियांचा पाऊसही अनुभवायला मिळाला. बांबूपासून तयार केलेल्या भेटवस्तू समितीतर्फे अनेक मान्यवरांना दिल्या जातात. मुंबईत सा. विवेकच्या वतीने झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. हा अनुभव वनवासी भगिनींना सुखद तर होताच, शिवाय प्रेरणादायकदेखील होता.

राष्ट्र सेवा समितीचे व्यवस्थापक लुकेश बंड यांना आपण सोशल मीडियाद्वारे केलेला पहिला प्रयोग आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यांसंबंधी विचारले असता, ''आम्ही केलेल्या आमच्या प्रयोगाला खरंच व्हायरल प्रतिसाद मिळाला. समितीतील प्रत्येक सदस्याला जराही उसंत नव्हती, सर्व जण हे काम आपल्या घरातील एखादे कार्य असल्यासारखे लगबगीने करत होते. वेळ कमी आणि काम जास्त, परंतु सगळयांच्या सहकार्याने हे काम निर्विघ्न पार पडले. नवीन अनुभव असल्यामुळे अनेक समस्यांना, अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु यातून बरेच काही शिकायला मिळाले, ही या वर्षाची पुंजी म्हणायाला हरकत नाही. आता याच्यापुढे मार्केटिंगची अद्ययावत साधने वापरून प्रत्येकाला समितीत तयार होणारे उत्पादन खरेदी करता येऊ शकेल अशी यंत्रणा राबविली जाणार आहे.''

प्रामाणिकपणे आणि स्वच्छ ध्येय ठेवून केलेल्या कामाची योग्य ती दखल समाजात घेतली जाते, हे यावरून सिध्द झाले. समाजात एक असा गट आहे, जो निःस्वार्थीपणे कार्य करत असलेल्या सामाजिक संस्थांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यास पाठबळ देतो. समितीने केलेले काम आणि त्याचे योग्य पध्दतीने केलेले सादरीकरण व मिळालेला प्रचंड प्रतिसाद यावरून एक गोष्ट सर्वच सामजिक संस्थांनी लक्षात घेतली पाहिजे की, प्रत्येक सामाजिक संस्थेने देणगीवर अवलंबून न राहता, आपण आपल्या संस्थेतर्फे करत असलेल्या कामाची माहिती समाजापर्यंत योग्य पध्दतीने मांडली पाहिजे, असे समितीचे व्यवस्थापक लुकेश बंड यांनी ठामपणे नमूद केले.

 

या वर्षी समितीचे आकाशकंदील मुंबई, ठाणे, पुणे, डोंबिवली, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर तर पोहोचलेच, शिवाय साता समुद्रापलीकडे सिंगापूर, अमेरिकेतही पोहोचले. सोशल मीडियामुळे मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे समितीतील प्रत्येक सदस्याला काम करण्याची अधिक ऊर्जा निर्माण झालीच, त्याचबरोबर ज्या वनवासी भगिनींनी हे आकाशकंदील तयार केले, त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली.